Sunday, 23 February 2014

मराठीचं सोवळेपण संपवलं पाहिजे !

रंगनाथ पठारे  Maharashtra Times, Sunday,23 feb.2014
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/30865316.cms....



ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर मेळ आणि त्यांची स्थिती एखाद्या भाषेत किंवा भाषिक समाजात कशी आहे, यावरून त्या भाषेची गुणवत्ता किंवा महत्ता जोखण्याचा आजचा काळ. खरं म्हणजे हे कोणत्याही काळात योग्यच म्हणायचं. पण ते आज अधिक खरं आहे. विज्ञानातील शोधाचं तातडीनं तंत्रज्ञानात रुपांतर होण्याचा आजचा जमाना. खेरीज तंत्रज्ञान सुद्धा सतत झपाटयानं बदलणारं. हा झपाटा सोसण्या इतकी भाषा लवचीक आणि चपळ हवी. मुख्य म्हणजे त्या भाषेला तिची स्वतःची तंत्रज्ञानाची भाषा हवी. तरच नवे बदल ती झपाट्याने तिच्या आत बसवू शकेल. या दृष्टीने विचार करता आपल्या भाषेची सद्यस्थिती फार शोभादायक म्हणता यावयाची नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यासाठी आपण बव्हंशी परक्या भाषेवर म्हणजे आंग्ल भाषेवर अवलंबून आहोत. आणि म्हणूनच उच्च प्रतीच्या ज्ञानासाठी सुद्धा आपण या आंग्ल भाषेवरच अवलंबून आहोत.

शिकणाऱ्या सगळ्या लोकांना-विशेषतः सगळ्या आर्थिक स्तरातील पालकांना आपल्या पाल्यांना आंग्ल भाषेत घुसवण्याचा जो ध्यास लागला आहे, तो यामुळेच. ते तसे जाणे तितके सोपे नाहीय आणि गेले तरी ज्ञान-विज्ञान त्या भाषेतून आपल्या आत घेणे मुश्कील आहे. कारण काही हजार वर्षांच्या परंपरेचे आयते संचित मातृभाषा आपल्याला देते, जे ज्ञानाच्या ग्रहणासाठी सर्वात उत्तम असते. आंग्ल भाषेचे असे संचित उपलब्ध नसताना तिचा वापर करून ज्ञान कसे मिळवणार? ती भाषा नुसती लिहायला-वाचायला शिकून काय उपयोग? ते फक्त राजा त्रिशंकू सारखे धड पृथ्वीवर नाही आणि धड स्वर्गातही नाही असे मध्यंतरी लटकणे होय. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना या त्रिशंकू अवस्थेत ढकलत आहोत. अगदी डोळे झाकून ते करत आहोत. हे असे का आणि कसे झाले? याचे मूळ आपल्या झापडबंद जात‌िव्यवस्थेत आहे. तसेच ते काराग‌िरांच्या भाषेचा आपल्या भाषेच्या मूळ 'कॉर्पस'मध्ये समावेश न करण्याच्या आपल्या भद्रजनांच्या प्राचीन काळापासूनच्या वृत्तीत आहे. कारागिरीचा संबंध तंत्रज्ञानाशी आहे. शेती करणारा शेतकरी, त्याला साहाय्य करणारे कारागीर म्हणजे गवंडी, सुतार, लोहार, चांभार, साळी, कोष्टी, शिंपी, सोनार यांसारखे आणखी कितीतरी समाजघटक. (खेरीज भटके-विमुक्त, आदिवासी-त्यांच्या भाषा तर आपल्या डोक्यातही नसतात.) हे सगळे तंत्रज्ञान वापरणारे लोक आणि त्यांच्या-त्यांच्या कारागिरी-विशिष्ट भाषा. (इथं कबीर, नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सेना न्हावी, अशा आपल्या संतकवींच्या भाषा आठवा. विशेष म्हणजे यांपैकी बहुतेकांचे लेखनिक ब्राह्मण किंवा तत्सम ज्ञातीचे होते.)

आपल्या भद्र लोकांच्या प्रतिष्ठित भाषेत या आणि अशा लोकांच्या भाषेचा समावेश आपण सहसा करत नव्हतो. भद्रजनांना कारागिरांची गरज असे. पण त्यांच्या भाषेपासून फटकून राहण्याची, तिची टिंगलटवाळी करत तिच्यापासून दूर राहण्याची त्यांची सोवळी वृत्ती असे. साहजिकच तंत्रज्ञानाची भूमीच आपल्या भाषेत तयार झाली नाही. ज्ञान,विज्ञान आणि शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असण्याचा दीर्घ इतिहास आपल्या भाषेला आहे. परिणामी ज्ञान सुद्धा मर्यादित होऊन ते बव्हंशी दार्शनिक आणि अंदाजी स्वरूपाचे स्वतःला अधिभौतिक म्हणवण्यात धन्यता मानणारे झाले आणि त्याच गुंत्याच्या हलत्या ढगांच्या प्रकारे डोलत राहणारे राहिले. अभिजनांच्या सोवळ्या भाषेत विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमी रुजण्यापेक्षा पूजा-अर्चा किंवा फार तर वेद-उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके यांचे पठण अशा गोष्टी प्रतिष्ठित राहिल्या. ज्ञानापासून वंचित असलेला कारागिरांचा वर्ग आपल्या परीने तंत्रज्ञानाचा विकास करत राहिला. पण विज्ञानाची भूमी त्याला उपलब्ध नसल्याने तेही बव्हंशी स्थिरच राहिले. एक गोष्ट आठवते. एकदा एका व्युत्पन्न तरुण शास्त्र्यास नदी ओलांडून जायचे होते. नावेत बसल्यावर शास्त्री नावाड्याशी बोलू लागला- तू अमुक वाचले आहेस का, तमुक वाचले आहेस का? नावाडी बिचारा अशिक्षित. त्याला ते शास्त्रज्ञान कुठून असणार? तो संकोचून, 'नाही महाराज.' म्हणे. त्यावर शास्त्री म्हणे, 'अरेरे! व्यर्थ आहे तुझे जीवन.' नावाडी आणखी संकोचून जाई. असे ते चालले असताना त्यांची नाव एका भोवऱ्यात अडकली. नावाडी घाबरून गेला. म्हणाला, 'महाराज, आपणास पोहता येते काय?' शास्त्री म्हणाले, 'नाही.' नावाडी म्हणाला, 'अरेरे! महाराज, आपले जिणे याक्षणी व्यर्थ झाले आहे.

आता नदीत उडी घेऊन पोहून ती पार करता आले तरच जगणे शक्य आहे.' आपल्या अभिजनांत आणि सामान्यजनांत असे अंतर कायम उरलेले आहे. अगदी आंग्लसंपर्कानंतर सुद्धा इंग्रजीच्या खिडकीचा वापर करून नवे ज्ञान-विज्ञान आपल्या भाषेत आणण्याऐवजी त्यासाठी त्या भाषेत शिरणे आणि आपल्या स्वतःच्या भाषेचे सोवळेपण टिकवणे अशीच आपल्या अभिजनांची चाल राहिली. विविध कारागिरीची कामे करणारे बहुजन या ज्ञान-विज्ञानापासून बव्हंशी वंचितच राहिले. स्वातंत्र्यानंतर किंवा त्याच्या आसपास शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. पण शिक्षणासाठीची भाषा अभिजन भाषाच राहिली. ज्ञान-विज्ञानाची भाषा तिच्यात प्राथमिक स्तरावरच रेंगाळत राहिली. महाराष्ट्राचे वेगळे राज्य झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषेची या अंगाने जलद वाढ व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकली होती. पण ते धोरण पुढे चालविण्यास राज्यकर्त्यांसकट आपण साऱ्यांनीच कुचराई केली. परिणामी उच्च प्रतीच्या ज्ञान-विज्ञानाच्या शिक्षणासाठी अंग्रेजीचा वापर कायम राहिला. सोवळी प्रमाण मराठी सोवळीच राहिली. बोलींच्या दणकटपणाचा समावेश तिच्यात अभावानेच झाला.

आज जी प्रमाण मराठी आपण वापरतो तिच्या बाहेर महाराष्ट्रभर (आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ) मराठी भाषेच्या बोलींची फार मोठी सशक्त दुनिया आहे. या बोली ही आपल्या मराठीपणाची फार मोठी ताकद आहे. या लोकांना गावठी म्हणून हिणवण्याचे किंवा मनातल्या मनात तसे मानण्याचे थांबवणे गरजेचे आहे. त्यांच्यात प्रतिभेची कमी नाहीय. नव्या तंत्रज्ञानाची भाषा आत्मसात करण्याची त्यांची भाषिक क्षमता बिलकूलही कमी नाहीय. बीड येथील डॉ. सुधीर निकम परवा त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या खेडूतांविषयी सांगत होते. एक ऐंशीच्या घरातला म्हातारा सोबत्यांसह आला. त्यातला एक सोबती म्हाताऱ्याविषयी म्हणाला, 'आवो डाक्टर! यान्ला देवाकून तीनचार टायमाला मिसकॉल येऊन गेले. पन ह्ये फोनच उचलीत नायीत, त्याला कोन काय करनार?' म्हाताऱ्याला तीनचार वेळा अटॅक येऊन गेले होते. तरीही तो टिकाव धरून होता. त्याचे चित्रण अत्यंत खिलाडू भाषेत त्या दुसऱ्याने किमान शब्दात केले. जनसामान्यात प्रतिभेची कमी नाहीय. तंत्रज्ञानाला भाषेत घेण्याची सहजता त्यांच्यात पुरेपूर आहे. आपल्या भाषेत प्रतिभेची कमतरता नाहीय. ती आपली म्हणण्याची गरज मात्र आहे. असाधारण दर्जाची वास्तुशिल्पे इथे उगीच निर्माण झालेली नाहीयेत. या काराग‌िरांच्या प्रतिभेची ती साक्षच आहेत. पण परिणाम म्हणून या कारागिरांना-तंत्रज्ञांना काय मिळाले? तर तो समजा शिल्पी असेल तर त्याचे काम झाले की राजा त्यास बिदागी देई. पण त्याचे हात छाटत असे. का, तर त्याने या दर्जाचे काम आणखी कोणासाठी करू नये. विशेष म्हणजे शिल्पी सुद्धा श्रद्धापूर्वक हात छाटून घेत असे. किंवा काम झाल्यावर आपले हात छाटले जातील याची त्यास कल्पना असे. कारागिरीच्या, सगळ्या क्षेत्रात हीच रीत होती. अशा भूमीत कौशल्याचे तंत्रज्ञान कसे उभे राहणार? त्याची परंपरा कुठून मूळ धरणार?
आज सुदैवाने चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि डहाणू-पालघरपासून नांदेड-धर्माबादपर्यंत सारीकडे राहत असलेला आणि स्वतःच्या भाषेत लिहिणारा अठरा पगड जातीत जन्मलेला मराठी लेखक आहे. पुरुषोत्तम बोरकरांच्या 'मेड इन इंडिया'तली मराठी, खानदेशच्या अशोक कौतिक कोळी यांची तावडी बोलीतली मराठी, प्रवीण बांदेकरांच्या 'चाळेगत'मधली मराठी, परभणीच्या आसाराम लोमटे यांची मराठी, कोल्हापूरच्या किरण गुरव यांच्या 'राखीव सावल्यांचा खेळ'मधील मराठी, जी.के. ऐनापुरे यांच्या 'रिबोट'मधली मराठी, सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास'मधील मराठी, भास्कर चंदनशिव यांच्या 'जांभळढव्ह'मधली मराठी आणि पुण्या-मुंबई कडच्या जयंत पवार, समर खडस, मकरंद साठे, मेघना पेठे यांची मराठी...एकाच मराठी भाषेची आज प्रतिष्ठित असलेली ही किती सुंदर रूपं आहेत! हे मी साहित्यातल्या भाषेपुरतं उदाहरणादाखल दिलंय. मराठीची ही सगळी रूपं आपल्या आत घेऊन तिच्यात अधिक अभ्यासपूर्वक भर घालून आपल्या भाषेचं आजचं विराट रूप समोर आणा. मग सहज लक्षात येईल की अकरा कोटी लोक जी भाषा बोलतात, ती काही साधीसुधी भाषा नाहीय. ती छोटी तर अजिबातही नाहीय. इच्छाशक्ती प्रकट केली आणि बलपूर्वक प्रयत्न केले तर सगळं ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विराट भाषेत आणणं नक्कीच शक्य आहे. जगाच्या नकाशात ठिपक्याएवढी जागा असलेला इस्रायल ते करू शकतो, तर आपण ते का नाही करू शकणार? त्यासाठी आधी आपल्या भाषेचं सोवळेपण संपवलं पाहिजे. तिच्या भोवतालची तिची विराट दुनिया आपल्या आत घेतली पाहिजे.

ही दुनिया आपल्याला तंत्रज्ञानाची भूमी पुरवण्याइतकी सक्षम आहे. ही भूमी वापरून नवी सोपी सहजसाध्य तंत्रज्ञानाची मराठी घडवावी लागेल. सरकारी कोषातील संस्कृतप्रचुर मराठी तितकी उपयोगाची नाही. अर्थात पर्याय नसेल तर तीही वापरावी लागेल. कवी माधव ज्युलियन ऊर्फ यांचे मित्र रामभाऊ मराठे यांनी एक स्थापत्यकोश रचला होता, त्याची इथे आठवण होते. बांधकाम करणारे गवंडी जे शब्द त्यांच्या अवजारांसाठी वापरतात, त्यांचा त्यांनी यात समावेश केला होता. आपल्या अग्रक्रमात सहज सोप्या बोलींनाच प्राधान्य द्यावं लागेल. त्या अगदी सशक्त आहेत याची जाणीव जागती ठेवावी लागेल. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या भाषेला सुदृढपणे आपल्या भाषेत घडवण्याखेरीज, घडवत राहण्याखेरीज भाषिक समूह म्हणून टिकून राहण्यासाठी या जमान्यात अन्य कोणताही उपाय नाहीय.

मराठी लोकांमधून वैज्ञानिक, तंत्रज्ञ घडवायचे असतील तर हाच रास्त मार्ग आहे. इथं पारंपरिक अभिजनांतून निर्माण झालेल्या व आंग्ल भाषेत शिकलेल्या काही लोकांची नावं काहींना कदाचित आठवतील पण ते प्रमाण किती? आणि भाषेच्या विराट पटात तशी संधीच न मिळालेल्यांचे प्रमाण किती याचाही विचार करावा. आणि अभिजन वर्गाचेही आजचे चित्र बदलले आहे, बदलते आहे. सगळ्या जातीतून नवा अभिजन वर्ग घडतो आहे. या अभिजन वर्गाने इतर बहुजनांकडे बंधुभावाच्या भावनेने कृतीपूर्वक पाहण्याची गरज आहे. आपल्या सगळ्या बोलींसकट ही भाषा बोलणारे आपण लोक एकाच प्राचीन आणि सशक्त कुळाचे सभासद आहोत, याची जाणीव रुजण्याची आणि ती वाढण्याची गरज आहे. आपल्या भाषेतच सर्व प्रकारच्या ज्ञानार्जनाची संधी मिळणं हा आपल्या लोकांचा हक्कच आहे. त्यांना त्यापासून वंचित ठेवण्याचे पाप आपण आणखी किती काळ करत राहणार आहोत? श्रेष्ठ मराठी कवी नामदेव ढसाळ यांनी रांडव झालेल्या मराठी भाषेला अहेवपण मिळावं म्हणून आवाहन केलेलं होतं. ते आवाहन आजही अबाधित आहे. हे अहेवपण मिळवण्याचा रस्ता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा घडवण्यातूनच जातो, असं मला वाटतं.

Wednesday, 19 February 2014

आदिवासी अ-न्याय पंचायत

--Prof. Chandrakant Puri.....Maharashtra Times
http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/ladies/injustice-with-tribal-women/articleshow/29676989.cms

आदिवासी अ-न्याय पंचायत

डॉ. चंद्रकांत पुरी

आदिवासी समाजात महिलांना पुरुषांपेक्षा काकणभर अधिकच मान आहे. या समाजातील जात पंचायतींचा न्यायही निःपक्षपाती असतो, असा अनुभव आहे. मात्र पश्चिम बंगालमधील बलात्काराच्या घटनेने या अनुभवाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

भारतातील आदिवासी समाज मुख्यत्वे मातृवंशीय असल्याने त्यात महिला महत्त्वाची जबाबदारी पार पडतात. आदिवासी समाजाबरोबर गेली दोन दशके काम करताना आणि संशोधन करताना सगळ्यात महत्त्वाचे जाणवलेलं वेगळेपण म्हणजे महिलांना समाजात असणारा मान, जो पुरुषापेक्षा कणभर जास्तच. महिला आणि पुरुष चालतानाही महिला पुढे आणि पुरुष मागे असं चित्र दिसतं. अनेक जात पंचायतीच्या बैठका अनुभवताना एक महत्त्वाचा भाग जो मला जाणवला तो म्हणजे जात पंचायतीत दिला जाणारा नि:पक्षपाती न्याय आणि आपली बाजू मांडण्यासाठी दिली जाणारी समान संधी.

आदिवासी समाजाच्या या परंपरेला तडा देणारी घटना नुकतीच पश्चिम बंगालमधील संथाल या आदिवासी समाजात घडली आणि आदिवासी समाजाशी बांधिलकी मानणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य लोकांना प्रचंड मोठा धक्का बसला. हा धक्का दोन गोष्टींसाठी - एक म्हणजे आदिवासी समाजातील स्त्रीचा सन्मान कमी कसा झाला? आणि दुसरं म्हणजे आदिवासी जमाती आणि आदिवासी न्याय पंचायती महिलांबाबत एवढ्या क्रूर कशा झाल्या?

वृत्तपत्रीय बातम्या, माझं बंगाली कनेक्शन आणि त्यामुळे स्थानिक वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यातून या घटनेबद्दल कळतं ते असं...

कोलकात्यापासून १८० किलोमीटर अंतरावरील लाभपूर, (जिल्हा सुरी) या गावात एका २० वर्षीय संथाल जमातीच्या आदिवासी महिलेवर त्यांच्या गावातील 'मोरोल' (मुखिया) याच्या सांगण्यावरून १३ पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडली २० जानेवारी २०१४ रोजी. कारण होतं या महिलेचे शेजारच्या गावातील एका विवाहित मुस्लीम पुरुषाशी असलेले अनैतिक संबंध. काहींच्या सांगण्यानुसार, या दोघांना त्यांच्या घरात 'अनैतिक' संबंध करताना पाहिले आणि प्रत्येकी रु. २७ हजार दंड बजावण्यात आला. मुलाच्या कुटुंबियांनी घरातील दागिने वगैरे विकून हे पैसे जात पंचायतीत भरले म्हणून त्याची सुटका झाली, पण हा दंड मुलीने भरला नाही म्हणून मुखीयाने गावातील तरुण मुलाना तिच्या बरोबर 'मज्जा' करण्यास सांगितले आणि मुलांनीही तसं केल्याचं सांगण्यात येतं.

या घटनेनंतर गाव सोडण्यास आणि तक्रार करण्यास या महिलेला मज्जाव करण्यात आला आणि तसं केल्यास तिला आणखी अत्याचाराला सामोरं जावं लागेल असं सांगण्यात आलं. ४८ तासांनंतर तिच्या आईने आणि भावाने तिला लपून स्थानिक दवाखान्यात दाखल केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने मुलीची तब्येत नाजूक होती म्हणून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही केस पोलिसात दाखल झाल्याने ही सर्व घटना उजेडात आली.

गावातील महिलांनी, अशी घटना त्यांच्या पतींकडून घडलेली नाही... या महिलेचे चारित्र्य शुद्ध नसल्याने ते झाकण्यासाठी तिने हे खोटे आरोप केले, असे म्हटले आहे. आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी मात्र महिलेवर अत्याचार झाला आहेच, असे सांगून गावातील १२ पुरुषांना अटक केली आहे.

असेही कळते की, गेल्या काही वर्षांपासून या आदिवासी पाड्यातील वृद्धांनी अनेक प्रकारची बंधने घातली आहेत जी त्यांच्या सामाजिक मूल्ये आणि चालीरीतीविरुद्ध आहेत. उदाहरणार्थ - प्रेम विवाहावर बंधने, महिलांवर वेशभूषाविषयक बंधने, मोबाइल वापरण्यास तरुण मुलीना बंदी इत्यादी. त्यांच्या मते समुदायात नैतिक मुल्यांची वृद्धी करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृती अबाधित राखण्यासाठी हे सगळे ते करताहेत. तरुण मुले आणि मुली यांना एकत्र मिसळण्यावरही बंदी घालण्यात आल्याचे कळते, जे मुलत: आदिवासी संस्कृतीच्या विरोधात आहे.

या निमित्ताने आदिवासी जात पंचायतीच्या अस्तित्वाबाबच/पारंपारिक न्याय पंचायतीबाबत (त्यांच्या शब्दांत 'सालीशी सभा') पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेनंतर आदिवासी न्याय पंचायतीवर होत असलेल्या टीकेवर संथाल जमातीच्या २० संघटनांनी टीकेची झोड उठविली आहे. त्यांच्या मते त्यांच्या 'सालीशी सभा'वर बंदी घालण्याची मागणी म्हणजे आदिवासी स्वायत्ततेवर घाला आहे.

लिंगभाव आधारित गुन्ह्यांमध्ये बंगाल सगळ्यात पुढे आहे. सन २०१२ मधील एकूण गुन्ह्यात १३ टक्के वाटा एकट्या बंगालचा आहे. गेल्या दोन महिन्यांत महिलेवरील बलात्काराची बंगालमधील ही तिसरी घटना. गेल्या वर्षी 'निर्भया' प्रकरणानंतर देशभरात प्रचंड क्षोभ उसळला होता. असे असूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे. आदिवासी पाडे पोलिस ठाण्यांपासून अनेक कोस दूर असल्याने तेथे पोलिसांचा वचकच नसतो. असे कितीतरी पाडे आहेत कि जेथे आजपर्यंत पोलिस यंत्रणा पोहोचलीच नाही. अनेक वेळा स्थानिक प्रकरणात आदिवासी मंडळी पोलिस ठाण्यात जातच नाहीत. पोलिस ठाणी तरी महिलांसाठी कुठे सुरक्षित आहेत? आदिवासी महिलांवर पोलिसांनी पोलिस चौकीत केलेल्या छळाविरुद्ध मी स्वत: रायगड जिल्ह्यात काम करताना आवाज उठविला होता. ते कोर्टातही जात नाहीत; कारण न्याय लवकर मिळत नाही. म्हणून स्थानिक न्याय पंचायतीत लोक आपले तंटे घेऊन जातात आणि 'न्याय' मिळवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातही या जात पंचायतींनी गेल्या वर्षी कसा उच्छाद मांडला होता हे आपण अनुभवले आहेच. महाराष्ट्रात आजही भटक्या विमुक्त समाजात जात पंचायती अस्तित्वात आहेत आणि त्यांचे न ऐकणाऱ्याला शिक्षा देण्याचे काम करताहेत. दुर्दैव म्हणजे सुशिक्षित लोकही अशा पारंपारिक न्याय पंचायतीला मानतात, नव्हे, त्याचा भाग बनून लोकांवर दंड लावण्यात धन्यता मानतात.

बंगालच्या निमित्ताने पुन्हा एकदा पारंपारिक न्याय पंचायती आणि जात पंचायती यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षे होऊनही कायद्याचे राज्य आपण प्रस्थापित करू शकलो नसू, तर आपण काय साध्य केले हा एक प्रश्न आहे. लोक अशा न्याय यंत्रणेकडे का जातात? पोलिस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी का झाल्या आहेत? आजही पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता कायम का आहे? स्त्री पुरुष समानता आचरणात का येत नाही? स्त्रिया ह्या 'उपभोग्य वस्तू' मानण्याची 'मनु'वादी मानसिकतेला आपण कधी तिलांजली देणार? असे प्रश्न उपस्थित होतात.

हे सगळे होत असतानाच महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या स्त्री सदस्या बलात्कारासाठी जर मुलींनाच जबाबदार धरणार असतील तर कोणत्या प्रकारचे राजकारणी आपण पाळतो आहोत आणि स्त्रीयांना न्याय मिळवून देणाऱ्या अशा आयोगाचे काय करायचे? हाही मोठा प्रश्न आहे.

एकीकडे लोकजागरण करतानाच अस्तित्वात असलेले आयोग, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, दररोजचे बलात्कार उघड्या डोळ्याने पाहणारे आणि पी‌डित महिलांना न्याय मिळवून न देता केवळ राजकारण करणारे आमचे लोकप्रतिनिधी यांना जाब विचारणारे कार्यकर्ते गावोगावी तयार होणे आवश्यक आहे.

ब्रिटीशकालीन विचारधारा मानून वर्षानुवर्षे अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी ताटकळत ठेवणाऱ्या आमच्या न्याययंत्रणेबद्धल काय बोलावे? जिथे न्यायमूर्तींसोबत काम करणाऱ्या महिला सुरक्षित नसतील, तर आदिवासी महिलांचे काय?

(लेखक मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राचे अध्यासन प्राध्यापक आहेत.)
Feb 1, 2014, 01.00AM IST