निखिल वागळे यांचा राजीनामा
आयबीएन लोकमत या वाहिनीला फार मोठी लोकप्रियता मिळवून देण्यात संपादक निखिल वागळे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या आक्रमक पत्रकारितेवर बेहद्द खुश असलेला जसा फार मोठा वर्ग होता तसाच त्यांच्यावर चिडलेलाही. आणि त्यांचे वाभाडे काढणारीही बरीच मंडळी होती. अफाट समर्थक आणि मज्बूत विरोधक लाभलेले बलदंड संपादक हीच त्यांची खरी ओळख आहे.राहील. भुमिका घ्यायची म्हटली की कोणालाही अजातशत्रू राहताच येत नाही. संपुर्ण लोकानुनय आणि गोलगोल-गोडगोड पत्रकारिता करणारे बरेच जण आहेत. त्यांची स्वत:ची ओळख काय?बोटचेपे आणि शरणागत हीच.
याचा अर्थ वागळे सर्वगुणसंपन्न पत्रकार होते किंवा आदर्श संपादक होते असाही नाही. ते रोखठोक होते. बेधडक नी बिन्धास होते पण तरिही बरेचसे पक्षपाती होते हे खरेच आहे. अनेकदा ते समोरच्याला बोलूच देत नसत.त्यांच्या लाडक्या मतांवर ते निहायत खूष असायचे. त्यालाही दुसरी बाजू असू शकते हेच त्यांना मंजूर नसते. दुसर्यालाही भले त्याचे म्हणणे चुकीचे असेल पण ते मांडू दिले पाहिजे असे ज्यांना वाटत नाही आणि समोरच्याचे शांतपणे ऎकून घेण्याची सहिष्णुता ज्यांच्याकडे नसते ते आक्रमकतेमुळे कितीही लोकप्रिय झाले तरी श्रेष्ठ पत्रकार किंवा संपादक होऊ शकत नाहीत. "बघा फक्त आयबीएन लोकमत" ही त्यांची घोषणा तर हास्यास्पदच होती. आहे.
वागळे बहुश्रुत होते. प्रागतिक होते. उत्तम वक्ते होते, पण तरिही नको इतके स्वत:वर खुष होते.डूख धरणे हा त्यांचा स्वभाव होता. स्वत:च्या च्यानेलचे ढोल पिटणे यात ते वाकबगार होते. अनेकदा अनाकलनीयरित्या ते घुमजावही करायचे.विश्वासार्हतेपेक्षा लोकप्रियता आणि बेदरकारवृत्ती यासाठी ते अधिक दक्ष असल्याचे जाणवायचे. त्यांच्या प्रागतिक विचारांमुळे एका विशिष्ट छावणीतली मंडळी त्यांच्यावर फार खुन्नस धरून होती/आहेत. याउलट त्यांच्या सरधोपट आणि आभासी प्रागतिक मतांचा इतका डांगोरा पिटला गेला होता की वागळे पुरोगाम्यांचे भलतेच लाडके बणून गेले होते. अनेक नव्या मुलामुलींना विशेषत: विविध सामाजिक थरातील मुलामुलींना मोठी संधी दिली. वागळेंचे अनेक कार्यक्रम गाजले. काही गाजवलेही गेले.
वागळे आणि अत्रे यांच्यात एक साम्य होते.आहे. दोघेही अफाट, पण हा वरवरचा वर्ख झाला. खोलखोल आत हे दोघेही गुणवान परंतु अत्यंत मिजासखोर आणि बेमुर्वत. अंगी गुणवत्ता बरीच मोठी असूनही, आपली वैगुण्ये दागिन्यांसारखे आवर्जून सांभाळणारे. अशांना फक्त स्तुतीपाठक आवडतात.टिकाकार नकोसे असतात.
वागळॆंसारखे लोक आपणही एक नोकर आहोत हे विसरून अमरपट्टा घेऊन आल्यासारखे मालकाच्या थाटात वागतात आणि स्वत:वर ही वेळ ओढवून घेतात.
वागळे लवकरच दुसर्या च्यानेलवर जातील. कदाचित स्वत:चे च्यानेलही काढतील. ते स्वस्थ बसणारे नाहीत. त्यांनी स्वस्थ बसूही नये. त्यांची रसवंती नक्कीच बरसेल. त्यांच्याशिवाय आयबीएन पुचाट अगदी मचूळ वाटेल. वागळे म्हणजे आयबीएन, आणि आयबीएन म्हणजे वागळे अशी सवय लागलेले लोक वैतागतील. वागळॆंना पुढील प्रवासासाठी सर्व शुभेच्छा. ते गेले म्हणून हर्षवायू झालेल्यांना कानाखाली वाजवायला वागळे लवकरच प्रगटतील...आम्ही त्यांच्या सगळ्या गुणदोषांसह त्यांची वाट बघत राहू..प्रतिक्षेत...
No comments:
Post a Comment