Sunday, 9 September 2012

हेच ते हमोंचे प्रचारपत्र




जात दाखवुन अवलक्षण..

सौजन्य:दै.लोकमत, दि.९ सप्टे.२०१२,पान ४ व ५,महाराष्ट्रातील सर्व आवृत्या
..............................................................................................................................
अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद हे समीकरणच बनू गेले आहे. ८६व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘जात’वाद उफाळून आला आहे. त्याला कारणीभूत ठरले ते एक उमेदवार ह. मो. मराठे यांनी प्रचारासाठी काढलेले एक पत्रक. या पत्रकाला साहित्य वतरुळातून आक्षेप घेतले जात असतानाच संभाजी ब्रिगेड या संघटनेने थेट मराठे यांनी माघार घ्यावी, अशी मागणी केली. एवढेच नव्हे, तर ते अध्यक्षपदी निवडून आले तरी काम करू देणार नाही, राज्यात फिरू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
...............................................................................................................................................................
ह. मो. मराठे यांच्या प्रचार पत्रातील वादग्रस्त भाग-[ ज्यामुळे सर्व वाद सुरू झाला.ह.मो.मराठे यांच्या वादग्रस्त भुमिकेतील काही अंश..]

‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’ हा माझा प्रदीर्घ लेख ‘किस्त्रीम’च्या २00४च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांविषयीच्या अपप्रचाराला नवे उधाण येत असल्याचे मला जाणवत होतेच. पण, ५ जानेवारी २00४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड’ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले. जेम्स लेन नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, {‘‘xxxxxxxxxxxxxxxxxxx" जेम्स लेनचे शिवराय आणि जिजाऊ यांचे चारित्र्यहनन करणारे ते विषारी विधान हमोंनी याठिकाणी जसेच्या तसे दिले आहे, ते मी वगळले आहे..} भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरील प्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वरील हल्ला केला होता. दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २00४ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वार्‍यावर सोडण्यात आले. ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे. हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे खून ब्राह्मणांनीच केले असे सांगितले जाऊ लागले आहे. या द्वेषमूलक अपप्रचाराला साधार आणि तर्कशुद्ध उत्तरे देणे आवश्यकच झाले आहे. ब्राह्मणांनी भारतीय समाजाची जडणघडण, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा इत्यादी क्षेत्रात केलेले कार्यही बहुजन समाजातील नवशिक्षित तरुण पिढीसमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्र्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातीत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे.
............................................................................................................................................................
ह.मो.मराठे यांची मुलाखत..
 संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालली असताना अचानक हा वाद उफाळून कसा आला?
माझी शंका खरी करत पुन्हा माध्यमांनी हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने चव्हाट्यावर मांडला आहे. हा वाद म्हणजे केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा कुटिल डाव आहे. माध्यमांनी रचलेले कुभांड आहे. हा डाव माझ्याविरुद्ध मुद्दाम रचला गेला आहे. माझी भूमिका पहिल्यापासून कधीच जातीयवादी नव्हती. उलट जातीयवादी साहित्यिक हल्ले होऊ नयेत म्हणून तर्कशास्त्राच्या आधारे त्याविषयी जागरूकता निर्माण करून या हल्ल्यांचा विरोधच केला होता. हे काम मी गेली ७-८ वर्षे करत आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे उकरून माझ्या विरोधी विपर्यास्त प्रचारासाठी त्याचा वापर होऊ शकतो, अशी शंका वाटली. म्हणूनच ही भूमिका स्पष्टपणे मांडली. मी जर ही भूमिका मांडली नसती तर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माझे साहित्य नीट न वाचताच उगाच नको ते तर्क करतही हा वाद उकरून काढला असता. आज मी माझी भूमिका स्पष्ट केली तरीही मला ब्राह्मणवादी ठरवून मोकळे झाले. हा केवळ ‘मीडिया ट्रॅप’ आहे ज्यात माध्यमेच वाद काढतात व तेच निकाल लावून मोकळे होतात. माझ्या साहित्याविषयी माझ्या मतदारांची दिशाभूल होऊ नये म्हणूनच ही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
’ आपल्या प्रचारपत्रकामुळेच वाद निर्माण झाला, अशी टीका केली जात आहे, यावर आपले मत काय?
ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे. त्यामुळे माझा संबंध केवळ माझ्या मतदारांशी आहे. हे प्रचार पत्र माझ्या १ हजार ६८ मतदारांसाठी आहे. हा आमच्यातील खासगी संवाद असून, यात कोणत्याही माध्यमाने हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही. हे पत्र प्रत्येक मतदारापर्यंत पोहचूनही कोणत्याही मतदाराने याविषयी शंका व्यक्त केलेली नाही. मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभा राहणार हे दीड महिन्यापूर्वीच जाहीर केलेले असताना आता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावरच हा वाद कसा निर्माण झाला? याचाच अर्थ याच वेळेची वाट बघून हा डाव साधण्यात आला आहे. अपप्रचार करायचा असे ठरवूनच जणू सगळी पावले उचलली जात आहेत. माझे बरेच हितचिंतक असे म्हणत आहेत की, माध्यम कोणीही असले तरी सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. मात्र, अशी शंका मी व्यक्त करणार नाही. मला कोणावरही बोट उचलायचे नाही. माझे जे मतदार आहेत ते मलाच मते देतील.

’ पण मुळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘जात’ यावीच कशाला, असेही विचारले जात आहे?
माझे साहित्य वाचून मी काय जातीयता केली हे माझ्या वाचकांनीच ठरवावे. माझ्यातल्या लेखकाला जात नसली तरी माणूस म्हणून मला जात आहेच. आरक्षणानंतर जातींचे पुनरुज्जीवन झाले आहे. भारताने स्वीकारलेल्या जातींच्या आधारावरील आरक्षण व्यवस्थेमुळे सरकारनेच जात प्रत्येकाच्या माथी मारली आहे. मग, मी जर ब्राह्मणविरोधी प्रक्षोभक लेखनाला तर्कशुद्ध उत्तरे देत ही जातीयता योग्य नाही अशी माझी भूमिका मांडत असेन तर यात जातीयवाद कोठे आला? साहित्यिक निवडणुकीत हा मुद्दा कशाला हवा असे जर कोणाला वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करावे. माझ्या साहित्याची माहिती देणारा दोन पाने मजकूर दिला आहे, तो लक्षात घ्यावा. जो वाद उठवला गेला आहे तो दूषित पूर्वग्रहातून निर्माण केला आहे.

’ ब्राह्मण मते मिळविण्यासाठी आपण पत्रक काढले असेही म्हटले जाते?
साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवड ही साहित्यिकांची पात्रता व योग्यतेतूनच व्हावी. मात्र, या निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेलाच माझा विरोध आहे. निवडणूक म्हटली की असे प्रकार सुरू होतात. ज्या मुद्दय़ांचा काहीही संबंध नाही, तर्कसंगत नाही असे मुद्दे समोर आणले जातात. परंतु, माझ्या या भूमिकेला मराठा, ओबीसी, मागासवर्गीय सर्वांचा पाठिंबा आहे. माझ्या मतदारांपैकी केवळ ४0 टक्केच ब्राह्मण आहेत. उर्वरित ६0 टक्के ब्राह्मणेतरच आहेत. त्यामुळे हा ब्राह्मण मते मिळविण्याचा प्रकार कोणास वाटत असेल तर तसे अजिबातच नाही.
माझी भूमिका कधीही जातीवादी नव्हती हे मी वेळोवेळी माझ्या लेखनातून सिद्ध केलेच आहे. सोलापूर ‘लोकमंगल’ दिवाळी अंक २00९मध्ये छापून आलेला ‘वाढत्या जातीवादाचा विषारी विळखा’ हा लेख यंदाच्या किलरेस्कर मासिकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदात म्हटले होते की, ‘‘जातवार आरक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक समतोल यांच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेली दहशत, गुणवत्तेशी तडजोड, राजकीय पक्षांनी घेतलेला जातींचा आधार अशा अनेक कारणांमुळे जातीय जाणिवा तीव्र झाल्या. जातीजातींमधला खिलाडूपणा संपला. सामाजिक स्नेहभाव संपत आला आणि निर्माण झाला तो विखार आणि अविश्‍वास! नव्याने तयार होऊ लागलेले हे वातावरण भारतीय समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अजिबातच स्वागतार्ह नाही. भारतीय समाजात केवळ हिंदू समाजामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त जाती आहेत. सगळा हिशोब मांडला तर भारतामध्ये पाच हजार जाती असाव्यात. या सर्व जातींनी आणि धर्मांनी, सर्व सांस्कृतिक प्रवाहांनी, सर्व भाषिकांनी भारतात सुखाने, सलोख्याने आणि सामंजस्याने नांदणे आवश्यक आहे. तरच भारत देश प्रगती करू शकेल. अनेक संघर्षामुळे भारत देशाची पुष्कळ शक्ती वाया गेली आहे. यापुढे ती जातीय युद्धांनी वाया जायला नको!
..............................................................................................................................................................
प्रतिक्रिया....
जातीय प्रचाराचा मान हमोंकडे
-प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत
साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मराठे यांनी वाड्मयीन गुणवत्तेवर मते मागायला हवी होती. मात्र, त्यांनी जातीय प्रचार करून या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रूप आणले आहे. गेल्या ८५ संमेलनांत अनेक वाद घडले; पण, जातीय प्रचाराचा मान हमोंकडेच जातो. हमो यांनी मतदारांचे स्वरूप बघून हा पवित्रा घेतलेला असल्याचे दिसत आहे. जेम्स लेनच्या शिवरायांविषयी लिहिलेल्या पुस्तकावरची बंदी उठवली म्हणजे जेम्स लेनला निर्दोष मुक्त केले असा अर्थ होत नाही. मुळात खटला पुस्तकबंदीबाबत होता, तो जेम्स लेनविरुद्ध नव्हता. या संमेलनात पहिल्यांदाच जातीय प्रचार झाला हे निषेधार्थ आहे.
...................................................................................................................................................................

1 comment:

  1. FROM:FACEBOOK:

    Sanjay Sonawani: ह. मो. अत्यंत लबाड, धुर्त आणि कट्टर जातीयवादी माणुस आहे.
    Yesterday at 8:11am · Unlike · 3

    Abhiram Dixit: ह मो चे पत्रक जालावर उपलब्ध आहे काय ?

    ReplyDelete