सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
विधायक दृष्टीचा अभाव ‘भाषा कूस बदलते आहे’ या प्रशांत असलेकर यांच्या लेखातील (लोकसत्ता, लोकरंग २३ सप्टेंबर) महात्मा फुले यांच्याबद्दलची म्हण आमच्यातरी ऐकण्यात नाही. कदाचित चारदोन ठिकाणी असे कुणी म्हणत असेल, तर ते चूक आहे, यात वादच नाही. संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका महापुरुषाबद्दल लेखकास यत्किंचितही माहिती नाही, असाच याचा अर्थ होतो. महात्मा फुले यांनी त्या काळातील सनातन समाजाच्या विरोधात जाऊन एका नव्या चळवळीचा प्रारंभ केला म्हणूनच आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला जे कर्तृत्व गाजवू शकत आहेत, याची जाणीव प्रत्येक पुरुषानेही ठेवणे आवश्यक आहे. ऊठसूट कोणत्याही महापुरुषाबद्दल समाजात असलेल्या आदराला हादरा देण्याची ही वृत्ती निश्चितच विधायक नाही. राजा राममोहन रॉय यांनी देशातील सतीची चाल बंद व्हावी यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच आंदोलन छेडले होते. स्त्रियांना शिक्षण देण्याची चळवळ घरापासूनच सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीलाच प्रथम शिक्षित केले आणि तिच्याकडेच विद्यादानाची जबाबदारीही सोपवली, त्यामुळेच १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. पुरोगामी राज्य असे बिरुद देशभर मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला याबद्दलचा इतिहास ज्ञात असणे आवश्यक आहे. प्रशांत असलेकर यांना तो माहीत नसावा असे दिसते. महात्मा फुले यांच्याबद्दल असे काही लिहिण्यापेक्षा त्यांनी अधिक विधायक दृष्टी अंगीकारणेच श्रेयस्कर आहे. - सुरेश माळोदे क्षमस्व २२ सप्टेंबर रोजी ‘लोकरंग’ पुरवणीत माझा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात अनवधानाने महात्मा फुले यांच्याबद्दल काही उल्लेख होता. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो. तरुणाईच्या तोंडी हल्ली रुजलेल्या (पण, अभिजात भाषाप्रेमींना न पटणाऱ्या) शब्दांच्या यादीत तो उल्लेख होता आणि भाषेने घेतलेले हे वळण योग्य नाही, असाच लेखाचा एकूण सूर होता. तसेच, हे थोपवता येत नसल्याबद्दल लेखात खंतही व्यक्त केली होती. महात्मा जोतीबा फुले यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मी स्वत:सुद्धा त्याच पायावर उभा आहे व त्यांचाच अनुयायी आहे, त्यांचा अनादर मी कसा करू शकेन? पुनश्च एकवार क्षमस्व. - प्रशांत असलेकर महाराष्ट्राला ‘महा’राष्ट्र करणाऱ्यांत थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे नाव कायमच अग्रणी आहे, असे ‘लोकसत्ता’ मानते. प्रशांत असलेकर यांच्या लेखात, त्यांच्याबद्दल चुकीचा आणि अपमानकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - संपादक |
Monday, 8 October 2012
आम्ही दिलगीर आहोत. - संपादक, ‘लोकसत्ता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment