Thursday, 16 August 2012

शब्दारण्य : मुक्काम पोस्ट खिंगर


सौजन्य: नीरजा , रविवार  १२  ऑगस्ट  २०१२ lokrang@expressindia.com
 ‘समाज म्हणजे नेमकं काय?’
आजची तरुण पिढी साऱ्या नातेसंबंधांकडे आपल्या पिढीपेक्षा जास्त प्रगल्भपणे पाहते हे लक्षात आलं. स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीही काही महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधलं. या पिढीला नातेसंबंधातली निष्ठा महत्त्वाची वाटते, पण एकनिष्ठ असण्याची कल्पना मात्र व्यवहारी वाटत नाही. काही कारणानं नाही पटलं एकमेकांशी, तरीही निभावून नेण्याचा हट्ट करताना नेमकं कोणाचं आयुष्य सुखी करतो आपण, हा प्रश्न त्यांना पडतो. ही पिढी नात्यांचं ओझं घेऊन जगायला नकार देते. त्यामुळेच त्यांना मागे सोडलेल्या नात्याविषयी ना पश्चाताप वाटतो, ना त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अपराधीभाव असतो.


‘समाज म्हणजे नेमकं काय?’ या प्रश्नाच्या समाजशास्त्रीय पद्धतीनं व्याख्या झालेल्या आहेत. पण एक सामान्य माणूस म्हणून या समाजाकडे पाहताना  नेमकं काय असतं आपल्या मनात? मला वाटतं, आपल्या मनात व्यापक पातळीवरचा एक समाज असतो. आणि दुसरा- आपलं जगणं नियंत्रित करणारा आपल्या आजूबाजूचा समाज. आपण दोघांशीही जोडलेलो असतो. व्यापक अर्थानं ज्याच्याकडे पाहतो त्या समाजातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण, जातीयता, दंगे, अराजक आणि त्याबरोबरच त्याचा इतिहास, भूगोल, त्यानं स्वीकारलेलं विज्ञान, तंत्रज्ञान, त्यातलं साहित्य, कला, संगीत यांचा आपल्यावर, आपल्या विचारांवर आणि आपल्या एकूणच जडणघडणीवर परिणाम होत असला तरी हा समाज आपल्या जगण्याच्या नेपथ्याच्या पाश्र्वभूमीवर असल्यासारखा असतो. तो आपल्या जगण्याच्या भूमिका ठरवत असला तरी तो आपल्या रोजच्या जगण्यात प्रत्यक्षपणे सामील नसतो. दुसरा समाज जो आहे तो प्रत्यक्षपणे आपल्या जगण्यावर प्रभाव टाकत असतो. आणि हा समाज बनलेला असतो तो आपल्या आजूबाजूच्या लोकांचा. त्यात नवरा किंवा बायको, त्यांचे आई-वडील, मुलं, कुटुंब, नातेवाईक, त्यांच्या परिसरात राहणारी माणसं आणि त्यांची मित्रमंडळी असतात. या सगळ्यांनी मिळून तयार झालेला हा समाज केवळ एका विशिष्ट व्यक्तीवरच नाही, तर या समाजातील प्रत्येक कुटुंबावर, त्या कुटुंबातील प्रत्येक माणसावर सतत नजर ठेवून असतो. त्यामुळे कधी त्याच्या आनंदासाठी, तर कधी त्याच्या धाकामुळे आपण आपल्या जगण्याची चौकट ठरवतो. त्यांना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात आपलं स्वत:चं जगणं नाकारत असतो. या समाजात हे आपले आजूबाजूचे लोक आपलं जगणं निश्चित करत असतात, आपल्या निर्णयांवर नियंत्रण ठेवत असतात. हे कधी अप्रत्यक्षपणे घडतं, तर कधी प्रत्यक्षपणे घडत असतं. म्हणजे आपल्या जगण्याचे निर्णय घेतानाही आपण आपल्या नकळत आपल्या आजूबाजूच्या, आपल्या नात्यातल्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार करत असतो. आयुष्यातले साधे साधे निर्णय घेतानाही या समाजाचा विचार करावा लागतो. अगदी कपडे कोणते घालायचे हे ठरवताना, मत्री करताना, जोडीदार निवडताना, घटस्फोट घेताना, मुलं किती होऊ द्यायची, हे ठरवतानाही आपण अप्रत्यक्षपणे त्याचा विचार करत असतो. आपल्या वागण्या-बोलण्याच्या साऱ्या चौकटी तोच ठरवत असतो. किंवा त्यानं ठरवल्या आहेत, हे गृहीत धरून आपण आपली वर्तणूक ठरवून घेत असतो. काही वेळा तर आपल्या जगण्यात या समाजाची थेट ढवळाढवळ सुरू होते. त्याची स्वत:ची नियंत्रणपद्धती आपल्यावर लादणारा हा समाज जास्त घाबरवून टाकणारा असतो. या समाजात राहून त्याला टाळता येत नसल्यानं अनेकदा आपण त्याला समजून घेत स्वत:चं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
या अशा समाजाच्या मानसिकतेवर, विशेषत: आपलं सारं जगणं नियंत्रित करत असलेल्या समाजाच्या चौकटीवर, ती चौकट तयार करणाऱ्या विविध घटकांवर, त्याच्या इतिहासावर, आजच्या वर्तमानावर आणि भविष्यावरही अलीकडेच ‘अक्षरमानव’नं आयोजित केलेल्या समाज संमेलनामध्ये चर्चा घडविली गेली. ‘अक्षरमानव’नं आयोजित केलेलं हे चौथं संमेलन नेहमीप्रमाणे पाचगणीजवळच्या िखगर येथे पार पडलं. साहित्य, कला तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी इथं आली होती. त्यांच्या उपस्थितीत आणि पावसाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या संमेलनात स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, जातीयवाद आणि जातीयतेची उतरंड, धर्मभेद आणि त्याचा अतिरेक, भाषा, सामाजिक चौकटी, परंपरा, संस्कृतीचे विरूपीकरण, शेतकरी, शोषित वर्ग, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह अशा अनेक विषयांना स्पर्श केला गेला. चार रात्री पाच दिवस एकमेकांबरोबर राहून एकमेकांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असलेली हरळीकरांसारखी मंडळी समाजाविषयी बोलताना अनेकदा स्वत:च्या आयुष्याकडून समाजाकडे, त्याच्या मानसिकतेकडे येत होती. तर काही मंडळी समाजाविषयी बोलता बोलता स्वत:च्या आयुष्याकडे जात होती. ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि स्त्री- चळवळीसाठी नारी समता मंचाची स्थापना करणाऱ्या विद्या बाळ यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या विषयाबरोबरच तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांविषयी बोलत असतानाच इच्छामरणासंबंधीचे आपले विचारही मांडले. ‘पुरुषस्पंदन’ या मासिकाचे संपादक व ‘मावा’ या संघटनेचे कार्यकत्रे हरिश सदानी यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी आज पुरुषांचाही इतर पुरुषांशी व स्वत:शी संवाद होण्याची आणि त्यासाठी किशोरवयीन वयापासूनच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. या समाजाचा सर्वात महत्त्वाचा आणि आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बाजूला फेकला गेलेला घटक म्हणजे शेतकरी. या शेतकऱ्याच्या आजच्या प्रश्नांविषयी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांनी आपली निरीक्षणं नोंदवली. 
तर फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक प्रा. हरी नरके यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा विस्तृत पट उलगडणारी मांडणी करताना मराठी भाषा अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर गेली अनेक वर्षे आद्यकवी मुकुंदराजांवर थांबलेली आपली गाडी स. आ. जोगळेकरांनी संपादित केलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती' या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठीतील आद्य- ग्रंथापर्यंत आणून ठेवली.
श्याम बेनेगल यांनी दिग्दíशत केलेल्या ‘समर’ या चित्रपटाचे उदाहरण देऊन, जातव्यवस्थेपासून स्वत:ला तोडून आलेल्या कलाकाराला पुन्हा जातव्यवस्थेचेच बळी व्हावे लागते का, असा प्रश्न करताना अभिनेते व कवी किशोर कदम यांनी आज अशा कलाकारांना पडलेल्या आयडेंटिटी क्रायसिसच्या प्रश्नाला हात घातला. तर सिनेविश्लेषक अशोक राणे व रेखा देशपांडे यांनी आजच्या चित्रपटांतून हाताळल्या जाणाऱ्या विविध सामाजिक प्रश्नांवर व आज होणाऱ्या चित्रपटांच्या समीक्षेवर टिप्पणी केली.
अश्विनी धोंगडे यांनी एस. एन.डी. टी. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असताना तरुण मुलींच्या प्रश्नांना भिडताना आलेल्या वेगवेगळ्या पातळीवरच्या अनुभवांचं कथन केलं तेव्हा- जुन्याच साच्यात आपली तरुण पिढी अडकून पडली की काय, असा प्रश्न पडला होता. पण कविता आणि अमृता या दोन तरुण मुलींनी या संमेलनात मांडलेल्या विचारांनी जुन्या पिढीला केवळ अवाक्च केलं नाही, तर आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडलं.
खरंच, किती गृहीत धरत असतो आपण नव्या पिढीला! आणि पुन्हा आपण तयार केलेल्या सामाजिक चौकटीत घट्ट बसवून संकुचित करून टाकतो त्यांच्या विचारांना! पण या दोन मुलींनी केलेली त्यांच्या आयुष्याची मांडणी पाहिल्यावर आजची तरुण पिढी साऱ्या नातेसंबंधांकडे आपल्या पिढीपेक्षा जास्त प्रगल्भपणे पाहते हे लक्षात आलं. मुलांना जे आवडतं आहे त्यात रमू द्यावं आणि या रमण्यातच खरं जगणं आहे, हे त्यांनी सांगितलंच; पण स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीही काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं. या पिढीला नातेसंबंधातली निष्ठा महत्त्वाची वाटते, पण एकनिष्ठ असण्याची कल्पना मात्र व्यवहारी वाटत नाही. काही कारणानं नाही पटलं एकमेकांशी, तरीही निभावून नेण्याचा हट्ट करताना नेमकं कोणाचं आयुष्य सुखी करतो आपण, हा प्रश्न त्यांना पडतो. बळजोरीनं हे नातं ओढत राहण्यापेक्षा समंजसपणे बाजूला होणं जास्त चांगलं, असं त्यांना वाटतं.
ही पिढी नात्यांचं ओझं घेऊन जगायला नकार देते. त्यामुळेच त्यांना आता मागे सोडलेल्या नात्याविषयी ना पश्चाताप वाटतो, ना त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अपराधीभाव असतो. उलट, आपल्याला आणि दुसऱ्याला हवं तसं जगू देण्यावर या पिढीचा जास्त विश्वास आहे हे जाणवत राहतं. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलही त्यांची मतं अगदी स्पष्ट आहेत. केवळ त्यातून होणाऱ्या मुलांचं काय, असा प्रश्न त्यांना आज पडत असला तरी त्याचं उत्तरही त्या शोधून काढतील, हे त्यांचा स्वत:वरचा विश्वास पाहून वाटलं. आयुष्य आपल्या जबाबदारीवर पेलण्याची त्यांची तयारी आहे. कोणत्यातरी अबलख घोडय़ावरून येणाऱ्या राजकुमाराची त्या वाट पाहत नाहीत. सुखी संसाराची पारंपरिक स्वप्नं त्या पाहत नाहीत. अर्थात लग्नसंस्था किंवा कुटुंबसंस्था त्या नाकारत नाहीत. साऱ्याच सामाजिक चौकटींची तोडमोड त्यांना करायची नसली तरी त्या विस्तारण्याची गरज त्यांना वाटते आहे. आणि मुख्य म्हणजे ती विस्तारताना त्यांना स्वत:लाही वाढायचं आहे. समाज, नातेसंबंध त्यांच्या जागी आहेतच; पण ते आपल्या जगण्यावर स्वार होणार नाहीत, याची काळजी त्या घेत आहेत. त्या समोरच्या व्यक्तीचा आदर करतातच, पण स्वत:च्या व्यक्तित्वाचाही त्या तेवढाच आदर करतात. आज त्यांच्याबरोबर वाढणारी सारीच मुलं असा विचार करत असतील असं नाही. पण तशीही मुलं त्यांच्या आजूबाजूला त्यांना दिसताहेत. आणि त्यांना ते जास्त आश्वासक वाटतंय. त्यांच्या विचारांतली ही पारदर्शकता खरं तर ३०-४० वर्षांपूर्वी गौरी देशपांडे यांच्या कादंबरीतल्या नायिकांमध्ये आमच्या पिढीला सापडली होती. पण पुढं ती हरवत गेली का, की तेवढा मोकळेपणा स्वीकारण्याची आमच्या पिढीची मानसिक तयारी झालेली नव्हती. ‘कारावासातील पत्र’मधील त्यांची नायिका म्हणते, ‘‘तो सर्व काळ मला जगायला परत मिळाला तर मी वेगळी नक्कीच वागेन. एक तर साऱ्या बाजूंनी असा तुझा आणि माझाही कोंडमारा करणार नाही; आणि दुसरं म्हणजे दु:खाची बादली भरायसाठी अगदी रांगेत उभं राहून नळ कधी येतोय म्हणून वाट पाहणार नाही. सुखाच्या जवाची चटणी दु:खाच्या पर्वताच्या सावलीत बसून खाईन. साऱ्या पुरुषजातीशी माझं नातं सशस्त्र तहाचं. ते चालवून घेऊन त्यात मौज वाटणारा, त्यालाच नसíगक समजणारा कुणी भेटला तरच त्याच्याशी माझे कायमस्वरूपाचे संबंध निर्माण होणार.’’
गौरी देशपांडे यांच्यासारखं स्वत:चं ठाम विधान करणाऱ्या आणि या समाजाचा एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या या तरुण पिढीचं आजच्या समाजाचं आकलन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी बोलावलेल्या नव्या पिढीतल्या या मुलींनी, तसेच आजही हिंदू-मुस्लीम विवाहाला विरोध करणाऱ्या समाजात राहून आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या एका तरुण जोडप्यानं जुन्या पिढीला डोळे आणि मन उघडे ठेवून नव्या पिढीतील मुलांची विचार करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी केलेलं आवाहन हा या संमेलनाचा क्लायमॅक्स ठरला, हे कबूल करायलाच हवं.
एकूणच ‘समाज’ या एका व्यापक विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना समाजातील विविध घटकांचा- म्हणजेच तरुणांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांच्या प्रश्नांचा ऊहापोह या संमेलनात करण्यात आला. अतिशय मनमोकळी चर्चा आणि राजन खान व त्यांच्या टीमचे नेटके नियोजन हे या संमेलनाचं वैशिष्टय़ होतं. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या साहित्य संमेलनाला असलेलं उत्सवाचं रूप इथं नसल्यानं शे-दीडशे लोकांच्या या सुनियोजित संमेलनात साहित्यिक, कलावंत यांच्यापासून सामान्य माणसांचा विचारही ऐकला गेला, हे महत्त्वाचं
सौजन्य: नीरजा ,

No comments:

Post a Comment