Sunday, 23 March 2014

पी. सी. जोशी नावाचा मृद्गंध

मुख्यपान » सप्तरंग » बातम्या
 
0
 
0
 
पी. सी. जोशी नावाचा मृद्गंध ! (उदय प्रकाश)
- उदय प्रकाश
रविवार, 23 मार्च 2014 - 01:00 AM IST
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4938590056682933952&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20140323&Provider=%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A5%80.%20%E0%A4%B8%E0%A5%80.%20%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%20!%20(%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6)
...
"भारतातल्या टीव्हीमाध्यमाला भारतीय मातीचाच सुगंध यायला हवा,' अशी आग्रही भूमिका विख्यात माध्यमतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ पी. सी. जोशी यांची होती. ही भूमिका त्यांनी अधिकाधिक प्रखर करत नेली. भारतीय मातीचं माहात्म्य जाणून असणारे जोशी यांचं अलीकडंच दिल्लीत निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कुठल्या टीव्हीवाहिनीवरही झळकली नाही, की वृत्तपत्रांनाही त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. जोशी यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक उदय प्रकाश यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी... 

"तो' विख्यात समाजशास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर करडी नजर ठेवणारा अर्थशास्त्रज्ञ, तसंच साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांतल्या बदलांच्या एकेका वळणाची सर्वांगीण माहिती असणारा बुद्धिवंत...राजधानी दिल्लीतल्या "पश्‍चिमविहार'मधल्या आपल्या फ्लॅटमध्ये दोन मार्च रोजी "त्या'नं या जगाचा गुपचूप निरोप घेतला...हिंदी वृत्तपत्रांत आणि टीव्ही वाहिन्यांवर त्या दिवशी केवळ निवडणुकीच्या सनसनाटी बातम्या वाजत-गाजत राहिल्या...त्या बातम्यांमध्ये "त्या'च्या जाण्याची बातमी कुठंच नव्हती. 

दिल्लीत 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा दंगे भडकले होते, तेव्हा राजीव गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याला अलीकडं 
जणू काही एखाद्या म्हणीचं स्वरूप प्राप्त झालंय. राजीव यांचं हे वक्तव्य दाखल्यापोटी वारंवार सांगितलं जातं. ते वक्तव्य होतं ः "जेव्हा एखादं मोठं झाड कोसळतं, तेव्हा धरणीकंप होतो...जमीन हादरते' (जब कोई बडा पेड गिरता है तो धरती हिलती है). 

मात्र, असं वाटून जातं, की ही "मोठी झाडं' केवळ राजकारणाच्याच मैदानात उगवत असावीत आणि कोसळत असावीत! राजकारणापलीकडच्या क्षेत्रात, म्हणजे ज्ञान-विज्ञान, कला-संस्कृती, अर्थ, समाजशास्त्र आदी क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती या काही आता अशी "मोठी झाडं' बनू शकणार नाहीत... या क्षेत्रांतली अशी "मोठी झाडं' कोसळल्यानं जमीनच काय; पण प्रसारमाध्यमं, गेलाबाजार एखादं ढिम्म वर्तमानपत्रंही, जरासुद्धा हलणार नाही, असंही वाटून जातं. अशी माणसं सध्याच्या काळात आपोआप उगवून येणाऱ्या खुरट्या, जंगली रोपांसारखीच झाली आहेत जणू. ही रोपं, या वनस्पती आपापल्या उगवतात आणि निसर्गाच्या भरोशावर जगत-वाढत राहतात... अशा माणसांचं असणं ही काही बातमी होऊ शकत नाही आणि त्यांचं जाणं हासुद्धा बातमीचा विषय होऊ शकत नाही! कारण, अशा माणसांच्या बातमीमुळं कुण्या वाहिनीचा टीआरपी वाढत नाही, शेअर बाजाराचा निर्देशांक उसळी मारत नाही, की कुठलं सरकार स्थापन होत नाही वा गडगडतही नाही! 

विख्यात समाजशास्त्रज्ञ आणि माध्यमतज्ज्ञ पी. सी. जोशी (पूर्णचंद्र जोशी) यांच्याविषयी मी बोलत आहे...भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव पी. सी. जोशी यांचं नाव आज बहुतकरून अनेकांना माहीत असतं; मात्र मी ज्या पी. सी. जोशी यांच्याविषयी बोलत आहे, त्यांचं महत्त्व ठाऊक असणारे फार कमी लोक असतील. फुटण्यापूर्वीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी. सी. जोशी यांची कामगिरी तर महत्त्वाची आहेच आहे; पण त्या जोशींपेक्षा सुमारे वीस वर्षांहून लहान असणारे समाजशास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ पी. सी. जोशी यांनी त्यांच्या क्षेत्रात बजावलेली कामगिरीही तितकीच तोलामोलाची आहे. जोशी यांच्याशी गप्पा मारण्याचा, त्यांच्या मुलाखतीचा योग मला काही वर्षांपूर्वी आला होता, त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते, ते मला इथं द्यावेसे वाटतात. "मेरे साक्षात्कार' या त्यांच्या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. त्यांचे हे विचार आजही किती कालोचित आहेत, ते तुमचं तुम्हालाच वाचताना जाणवेल. जोशी यांच्याविषयी मी अधिक काही सांगण्यापूर्वी नजर टाका त्यांच्या या विचारांवर... 

"प्रत्येक धर्माची चापलुसी (लिप-सर्व्हिस) करणं म्हणजे "धर्मनिरपेक्षता नव्हे. प्रत्येक धर्माची अंधभक्ती करणं किंवा नास्तिकता म्हणजेही धर्मनिरपेक्षता नव्हे. "काळ वेगानं बदलत आहे, तुम्हीसुद्धा आता बदलायला हवं, पुढं जायला हवं, जुन्या-पुराण्या विचारांना, जुन्या-पुराण्या पुस्तकांना, जुन्याच रूढींना चिकटून बसाल, तर मागं पडाल,' असं आता प्रत्येक धार्मिक संघटनेला, संप्रदायाला सांगण्याची वेळ आलेली आहे. आमच्या सगळ्या दळणवळणाच्या, संवादाच्या माध्यमांचा उपयोग याच कामासाठी व्हायला हवा. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अमक्‍या मंदिरात गेले, तमक्‍या मशिदीत गेले, अमक्‍या गुरुद्वारात गेले, तमक्‍या चर्चमध्ये गेले आणि ते तिथं नतमस्तक झाले...त्यांनी तिथं पूजा-अर्चा केली, हे असलं काहीही टीव्हीवर कधीही दाखवलं जाता कामा नये, असंही माझं म्हणणं आहे आणि असं काही दाखवलं जात असेल, तर ऑडिटर जनरलनं त्याविषयी जोरदार हरकत घ्यायला हवी, तीव्र नापसंती व्यक्त करायला हवी. कुणाला असं काही (मंदिर-मशीद-गुरुद्वारा-चर्चमध्ये जाणं इत्यादी...) आपल्या व्यक्तिगत श्रद्धेपोटी करायचं असेल, तर त्यांनी ते खुशाल करावं; परंतु त्यासाठी सरकारी वाहन, सरकारी सुरक्षायंत्रणा, राजकीय विशेषाधिकार यांचा वापर संबंधितांनी करता कामा नये आणि आपल्या प्रचारासाठी माध्यमांचाही असा वापर संबंधितांनी करायला नको. आज राजकारणाचं सांप्रदायिकीकरण ज्या पद्धतीनं झालं आहे, ते पाहता अशा वातावरणात अशा प्रकारांनी वेगवेगळ्या समुदायांमध्ये एकता निर्माण होण्याऐवजी त्यांची विभागणी होऊन त्यांत फूटच पाडत असते. 

कुठल्याही धर्माला सत्तेच्या कुबड्याही मिळायला नकोत. संतांनी-पीरांनी म्हटलं आहे, की धर्म आणि सत्ता यांच्यात नेहमीच वितुष्ट राहिलेलं आहे. ज्यांचे डोळे सदोदित सत्तेकडंच लागलेले असतात, ते असले कसले धर्म सध्या आपल्याकडं निर्माण झाले आहेत? जो धर्म सत्तांचा आधार घेतो किंवा सत्तालोलुप असतो, तो धर्म अनैतिक होय. त्याला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. '' 

देशात स्वतंत्रपणे काम करणारं आणि सामाजिक जबाबदारी असणारं माध्यमविषयक धोरण सुचवण्यासाठी 1982 मध्ये जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याच जोशी यांचे हे विचार आहेत. त्या वेळी टीव्ही हे माध्यम "आकाशवाणी'च्या रेडिओ केंद्रापासून स्वतंत्र आणि स्वायत्त होऊ घातलं होतं. हे माध्यम दिल्लीच्या आसपासच्याच भागापुरतं सीमित न राहता, देशाच्या दूरदूरच्या भागात पोचण्यासाठी सज्ज होत होतं... टीव्ही तेव्हा रंगीतही होऊ घातला होता. त्याच काळात राजीव गांधी यांच्या नेतृत्वांतर्गत दिल्लीत आशियाई क्रीडास्पर्धाही आयोजिल्या गेल्या होत्या आणि दिल्लीच्या रस्त्यांवरून "मारुती-800' ही मोटार प्रथमच धावत होती. तो काळ म्हणजे मारुती-800 या मोटारीनं जुन्या ऍम्बॅसिडर आणि फियाट मोटारींना स्पर्धेतून बाहेर फेकण्याचा काळ होता. त्या वेळी "वॉकी टॉकी' हातात बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण बनलं होतं. अशा त्या सगळ्या काळात जोशी यांची दृष्टी तंत्रज्ञानातला हा सगळा बदल निरखत-न्याहाळत होती आणि समग्र भारतीय समाजावर त्याचा जो काही परिणाम होणार होता, त्याबद्दल चिंताग्रस्त होती. वर उल्लेखिल्याप्रमाणे त्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या "पी. सी. जोशी समिती'नं तिचा अहवाल 1984 मध्ये पूर्ण केला आणि सरकारला सोपवला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कुण्या मंत्र्यानं किंवा कुण्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या अहवालाची पानं केवळ उलटून-पालटून जरी पाहिली असती, तरी खूप बरं झालं असतं. या मंत्र्यांनी-अधिकाऱ्यांनी असं केलं असतं तर काय झालं असतं? आज टीव्ही अर्थात इलेक्‍ट्रॉनिक माध्यमात ज्या पद्धतीची धंदेवाईकता बोकाळली आहे, ज्या पद्धतीनं टीव्हीद्वारे केवळ माहितीच नव्हे; तर वाहिन्याच्या वाहिन्या विकल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं व्यापारी घराण्यांशी आणि राजकीय पक्षांशी लाखो-कोट्यवधी रुपयांची "डीलबाजी' करणाऱ्या पत्रकारांचे प्रताप उघड होत आहेत, त्या सगळ्या प्रकारांना अंकुश लावता आला असता. माध्यमं (मीडिया) भलेही खूप शक्तिशाली असतील, त्यांना "लोकशाहीचा चौथा स्तंभ' असं भलेही म्हटलं जात असेल, मात्र "जनता' नावाचा आणखीही एक "विराट' आणि अदृश्‍य राहणारा "स्तंभ' असतो. जनता नावाच्या या विराट स्तभांपेक्षा माध्यमांना मोठं आणि शक्तिशाली होऊ दिलं जाता नये. 

"पी. सी. जोशी समिती'मध्ये विख्यात चित्रपट-दिग्दर्शक मृणाल सेन, सई परांजपे, "दादासाहेब फाळके पुरस्कार'विजेते संगीतकार भूपेन हजारिका 
आदी मातब्बर मंडळी होती. कला-माहिती-संदेश-संवाद आणि समाज यांच्यातल्या संबंधांचं गांभीर्य आणि परिणाम यांची चांगलीच जाण या मंडळींना होती. म्हणूनच युरोपातल्या टीव्हीमाध्यमापेक्षा किंवा अमेरिकेसारख्या आधुनिक, औद्योगिक, समृद्ध आणि विकसित झालेल्या देशातल्या टीव्हीमाध्यमापेक्षा वेगळं टीव्हीमाध्यम या मंडळींना अपेक्षित होतं. भारतासारख्या मागासलेल्या, गरीब, निरक्षर आणि असंख्य प्रकारच्या रूढी-परंपरांनी बजबजलेल्या समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचं टीव्हीमाध्यम असायला हवं, असं या मंडळींना वाटत होतं. या टीव्हीमाध्यमाला भारतीय मातीचाच सुगंध यायला हवा. त्याचा चेहरा आणि आत्मा याच मातीनं दरवळायला हवा, अशी या समितीची अपेक्षा होती. 

या समितीनं सरकारला जो अहवाल सादर केला होता, त्याचं शीर्षकही हीच अपेक्षा व्यक्त करणारं होतं. ते शीर्षक असं होतं ः "ऍन इंडियन पर्सनॅलिटी फॉर टीव्ही'. मात्र, सरकारनं हा अहवाल घेतला व फडताळात ठेवून दिला आणि आता आपण सध्या पाहतच आहोत 200 वाहिन्यांची "इंडियन पर्सनॅलिटी'...! आपण पाहतच आहोत "भारतीय मातीचा दरवळणारा सुगंध...'! 

मी दिल्लीतल्या मिरांडा महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेलो असता, त्या कार्यक्रमात जोशी यांच्या निधनाची बातमी मला कळली. त्यांच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी. ही बातमी उशिरा कळल्यामुळं मला म्हणूनच आश्‍चर्य वाटलं नाही; पण तीव्र दुःख मात्र जरूर झालं. जोशी यांच्या निधनाची माहिती तोवर कुठंच नव्हती, याचं दुःख केवळ मलाच झालं असेल, असं नाही. शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कला-संस्कृती या क्षेत्रांत काम करणारे मान्यवर, इतिहास संशोधक, पुरातत्त्वज्ञ अशी आपापल्या क्षेत्राला वाहून घेतलेली आपल्या देशातली जी काही मंडळी आहेत, ती कोणत्याही गुन्हेगारापेक्षा, भ्रष्ट नेत्यापेक्षा किंवा बॉलिवूडमधल्या मनोरंजनाच्या कारखान्यात एका ठुमक्‍यावर कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या नट-नट्यांपेक्षा, हिंसाचाराच्या दृश्‍यांचा आणि अंगप्रदर्शनाचा आधार घेत "बॉक्‍स ऑफिस सुपरहिट' सिनेमे निर्माण करणाऱ्यांपेक्षा नक्कीच मौल्यवान आणि अनमोल आहेत, असं टीव्ही पाहणाऱ्या, टीव्ही संच घरी असणाऱ्या या देशातल्या लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांना वाटत असेल. मला जसं वाटतं तसंच. 

पी. सी. जोशी हे दिल्ली विद्यापीठातल्या "इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ' या संस्थेचे संचालकही होते. "कल्चरल डायनॅमिक्‍स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ'सारखं नावाजलेलं पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. 
जोशी यांनी काही काळापूर्वी इशारा दिला होता ः 

""आपल्या संवादमाध्यमांचा, दळणवळणाच्या माध्यमांच्या अमर्याद क्षमतांचा भीतिदायक दुरुपयोग होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. येणारी माहिती आणि प्रसारित होणाऱ्या बातम्या यांच्याकडं गांभीर्यानं पाहील, असा कुणी "थिंकटॅक' त्यांच्याकडं नाहीय. सत्यजित रे, भूपेन हजारिका आणि मृणाल सेन यांच्याशी माझं यासंदर्भात बोलणंही झालं होतं. मी या सगळ्या मान्यवरांना म्हटलं होतं ः "टीव्हीमाध्यमाचा दुरुपयोग होत असताना पाहून तुम्ही मंडळी त्याच्याकडं पाठ फिरवू नका. त्यात सहभागी होऊन या माध्यमाचं स्वरूप तुम्ही बदला. नाहीतर हा इलेक्‍ट्रॉनिक मीडिया प्रेक्षकांची अभिरुची इतकी विकृत आणि प्रदूषित करून टाकेल, की प्रेक्षकवर्ग मग तुमच्यासारख्या मंडळींच्या चित्रपटांचा आनंद लुटायला लायकच राहणार नाही.' '' 
दुर्दैवानं असंच घडलं आहे! 

जोशी यांना भारतीय साहित्याविषयीही खूप जिव्हाळा होता. हिंदीतले कथासम्राट मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांवर त्यांनी एक सुदीर्घ लेख लिहिलेला आहे. प्रेमचंद यांच्या "गोदान' आणि अन्य कादंबऱ्या आणि भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यातल्या आंतरिक संबंधांकडं पाहण्याची वेगळीच दृष्टी हा लेख देतो. जोशी यांनी अतिशय मूलगामी पद्धतीनं हे बंध उलगडून दाखवले आहेत. 

जोशी यांचं हे अशा पद्धतीनं जगाचा निरोप घेणं ही माझ्यासारख्यांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. मग भलेही या बातमीला कुण्या व्यावसायिक टीव्हीवाहिनीनं किंवा वृत्तपत्रानं स्थान दिलेलं नसेना का ! 

पी. सी. जोशी यांना माझी विनम्र श्रद्धांजली...

No comments:

Post a Comment