Friday, 17 August 2012

गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा


Sunday, June 24, 2012,  Divya Marathi


गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा

{सौजन्य: श्री.अरुण जाखडे, दिव्य मराठी,रविवार, दि.२५ जुन


 २०१२}गेल्या दहा वर्षांत भाषांविषयक ज्या महत्त्वाच्या घडामोडी भारतात झाल्या, त्यापैकी महत्त्वाची म्हणजे भारत सरकारने संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. या चार भाषांइतकीच मराठी ही अभिजात भाषा असून तिला असा दर्जा मिळायला हवा, अशी इच्छा आपण मराठी भाषकांची असणे योग्यच आहे. पंतप्रधान कार्यालयातून वरील चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मान्य झाला त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. ‘लोकराज्य’च्या दिवाळी अंकात हरी नरके यांनी मराठी अभिजात भाषा असल्याबद्दलचा लेख लिहिला होता आणि तेथून ही चर्चा ऐरणीवर येत गेली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयातून चार भाषांना अभिजाततेचे प्रमाणपत्र दिले, पण आता त्यांना मात्र मराठी ही अभिजात भाषा आहे, असे वाटले तरी केंद्र सरकारकडे त्यासंबंधी काही पुराव्यांसह मांडणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती नेमली आहे. हरी नरके हे समितीचे समन्वयक तर डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर असे सदस्य आहेत. वर्तमानपत्रातून या बातम्या आपण वाचल्या; परंतु अभिजात भाषा म्हणजे काय? त्याचे कोणते निकष आहेत, त्या निकषावर मराठी ही कशी अभिजात आहे, हे जाणून घ्यायला हवे. अभिजात भाषेचे चार निकष आहेत 

1.     भाषेचे वय 1500 ते 2500 वर्षे असावे.

2.     त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असावे.

3.     भाषेने स्वत:च्या मूळ रूपांपासून आजपर्यंत केलेल्या प्रवासात अंतर अथवा खंडितता आली असेल तरीही, भाषेची चौकट कायम असेल आणि ती भाषा बोलणा-यांनी लिखित स्वरूपात फार मोठे साहित्य निर्माण केलेले असले पाहिजे.

4.     त्या भाषेत सातत्याने लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेले असावे. वरील चार निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. त्यासाठी समिती ज्या मुद्द्यांचा आधार घेत आहे, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे -

-  जुन्नरजवळील नाणे घाटातील शिलालेख, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘महारथी’ असा उल्लेख आढळतो.

-  2500 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्‍ट्राचा उल्लेख.

-  श्रीलंकेतील सिंहली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या 1500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात महाराष्‍ट्री भाषेचा असलेला उल्लेख.

-  वररुची या पाणिनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्याने शोरशनी, पैशाची, अर्धमागधी, महाराष्‍ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याने ‘शेषमहाराष्‍ट्रीवत’ हा ठळक नियम केला आहे. त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठीप्रमाणे होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली 80 हस्तलिखिते ही प्राचीन आहेत आणि या पुराव्यांना बळकटी देणारी आहेत.

-  संपूर्ण भारतात 1000 लेणी आहेत. त्यातील 800 एकट्या महाराष्‍ट्रात आहेत. या लेण्यांतील सर्व शिलालेख जुन्या मराठीत आहेत.

- ‘गाथासप्तशती’ हा मराठातील आद्यग्रंथ आहे. तो हाल सातवाहनाच्या काळातील आहे. 

या सर्व पुराव्यांतून स्पष्ट होते की मराठी भाषा ही पुरातन भाषा असून ती जुनी मराठी, मध्य मराठी आणि अर्वाचीन मराठी अशा तीन काळांतून प्रवाहित राहिली आहे. पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मदतीस महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’.‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा आद्य मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय.

कै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. हा ग्रंथ 1956 ला प्रकाशित झाला, त्यानंतर तो अद्याप उपलब्ध नव्हता. पद्मगंधा प्रकाशनाने तो आता प्रकाशित केला आहे.

या ग्रंथामुळे मराठी भाषा अभिजात भाषा सिद्ध झाली व तसा दर्जा मिळाला तर मराठीला केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 500 कोटी मिळतील. ही रक्कम मराठी भाषेच्या विकासासाठी, उपक्रमांसाठी वापरली जाऊ शकते.

3 comments:

  1. Guruprasad Kanitkar: ‎Hari Narke: Dear Sir, Can you please allow me to share this on my wall???
    June 25 at 8:41pm {FROM:FACEBOOK}
    Reply
  2. Abhijeet Pandit: dear sir......... ur great.... all obc,s love sooooooooooooooo much ............ ur second babasaheb for them....... sir, minor casts madhe divide zalelya samast obc,s sathi kayam satark aahat karyarat aahat...... he obc jamat jevha jaagi hoil kahi warshanantar techa tya jamatila aaple mothepan ka karya kharya arthane kalel........... aaj aapan tyanchya sathi chandana sarkhe zizta aahat pan ha chandanacha suwas samast minority casts ne banlelya majority obc,s madhe kayam darwalat rahil............... jay ho.....
    June 25 at 10:26pm · Like

    Illa Ranade :great sir!
    11 hours ago · · 1

    Hari Narke ‎Guruprasad Kanitkar; u r most welcome.
    4 hours ago · Edited · Like · 1

    Vikram Gaikwad :abhinandan {FROM:FACEBOOK}
    Reply
  3. गाथा सप्तशती आणि नवरात्रा
    त जे सप्तशतीचे पाठ करतात यात काय फरक आहे?

Thursday, 16 August 2012

शब्दारण्य : मुक्काम पोस्ट खिंगर


सौजन्य: नीरजा , रविवार  १२  ऑगस्ट  २०१२ lokrang@expressindia.com
 ‘समाज म्हणजे नेमकं काय?’
आजची तरुण पिढी साऱ्या नातेसंबंधांकडे आपल्या पिढीपेक्षा जास्त प्रगल्भपणे पाहते हे लक्षात आलं. स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीही काही महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधलं. या पिढीला नातेसंबंधातली निष्ठा महत्त्वाची वाटते, पण एकनिष्ठ असण्याची कल्पना मात्र व्यवहारी वाटत नाही. काही कारणानं नाही पटलं एकमेकांशी, तरीही निभावून नेण्याचा हट्ट करताना नेमकं कोणाचं आयुष्य सुखी करतो आपण, हा प्रश्न त्यांना पडतो. ही पिढी नात्यांचं ओझं घेऊन जगायला नकार देते. त्यामुळेच त्यांना मागे सोडलेल्या नात्याविषयी ना पश्चाताप वाटतो, ना त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अपराधीभाव असतो.


‘समाज म्हणजे नेमकं काय?’ या प्रश्नाच्या समाजशास्त्रीय पद्धतीनं व्याख्या झालेल्या आहेत. पण एक सामान्य माणूस म्हणून या समाजाकडे पाहताना  नेमकं काय असतं आपल्या मनात? मला वाटतं, आपल्या मनात व्यापक पातळीवरचा एक समाज असतो. आणि दुसरा- आपलं जगणं नियंत्रित करणारा आपल्या आजूबाजूचा समाज. आपण दोघांशीही जोडलेलो असतो. व्यापक अर्थानं ज्याच्याकडे पाहतो त्या समाजातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण, जातीयता, दंगे, अराजक आणि त्याबरोबरच त्याचा इतिहास, भूगोल, त्यानं स्वीकारलेलं विज्ञान, तंत्रज्ञान, त्यातलं साहित्य, कला, संगीत यांचा आपल्यावर, आपल्या विचारांवर आणि आपल्या एकूणच जडणघडणीवर परिणाम होत असला तरी हा समाज आपल्या जगण्याच्या नेपथ्याच्या पाश्र्वभूमीवर असल्यासारखा असतो. तो आपल्या जगण्याच्या भूमिका ठरवत असला तरी तो आपल्या रोजच्या जगण्यात प्रत्यक्षपणे सामील नसतो. दुसरा समाज जो आहे तो प्रत्यक्षपणे आपल्या जगण्यावर प्रभाव टाकत असतो. आणि हा समाज बनलेला असतो तो आपल्या आजूबाजूच्या लोकांचा. त्यात नवरा किंवा बायको, त्यांचे आई-वडील, मुलं, कुटुंब, नातेवाईक, त्यांच्या परिसरात राहणारी माणसं आणि त्यांची मित्रमंडळी असतात. या सगळ्यांनी मिळून तयार झालेला हा समाज केवळ एका विशिष्ट व्यक्तीवरच नाही, तर या समाजातील प्रत्येक कुटुंबावर, त्या कुटुंबातील प्रत्येक माणसावर सतत नजर ठेवून असतो. त्यामुळे कधी त्याच्या आनंदासाठी, तर कधी त्याच्या धाकामुळे आपण आपल्या जगण्याची चौकट ठरवतो. त्यांना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात आपलं स्वत:चं जगणं नाकारत असतो. या समाजात हे आपले आजूबाजूचे लोक आपलं जगणं निश्चित करत असतात, आपल्या निर्णयांवर नियंत्रण ठेवत असतात. हे कधी अप्रत्यक्षपणे घडतं, तर कधी प्रत्यक्षपणे घडत असतं. म्हणजे आपल्या जगण्याचे निर्णय घेतानाही आपण आपल्या नकळत आपल्या आजूबाजूच्या, आपल्या नात्यातल्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार करत असतो. आयुष्यातले साधे साधे निर्णय घेतानाही या समाजाचा विचार करावा लागतो. अगदी कपडे कोणते घालायचे हे ठरवताना, मत्री करताना, जोडीदार निवडताना, घटस्फोट घेताना, मुलं किती होऊ द्यायची, हे ठरवतानाही आपण अप्रत्यक्षपणे त्याचा विचार करत असतो. आपल्या वागण्या-बोलण्याच्या साऱ्या चौकटी तोच ठरवत असतो. किंवा त्यानं ठरवल्या आहेत, हे गृहीत धरून आपण आपली वर्तणूक ठरवून घेत असतो. काही वेळा तर आपल्या जगण्यात या समाजाची थेट ढवळाढवळ सुरू होते. त्याची स्वत:ची नियंत्रणपद्धती आपल्यावर लादणारा हा समाज जास्त घाबरवून टाकणारा असतो. या समाजात राहून त्याला टाळता येत नसल्यानं अनेकदा आपण त्याला समजून घेत स्वत:चं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
या अशा समाजाच्या मानसिकतेवर, विशेषत: आपलं सारं जगणं नियंत्रित करत असलेल्या समाजाच्या चौकटीवर, ती चौकट तयार करणाऱ्या विविध घटकांवर, त्याच्या इतिहासावर, आजच्या वर्तमानावर आणि भविष्यावरही अलीकडेच ‘अक्षरमानव’नं आयोजित केलेल्या समाज संमेलनामध्ये चर्चा घडविली गेली. ‘अक्षरमानव’नं आयोजित केलेलं हे चौथं संमेलन नेहमीप्रमाणे पाचगणीजवळच्या िखगर येथे पार पडलं. साहित्य, कला तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी इथं आली होती. त्यांच्या उपस्थितीत आणि पावसाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या संमेलनात स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, जातीयवाद आणि जातीयतेची उतरंड, धर्मभेद आणि त्याचा अतिरेक, भाषा, सामाजिक चौकटी, परंपरा, संस्कृतीचे विरूपीकरण, शेतकरी, शोषित वर्ग, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह अशा अनेक विषयांना स्पर्श केला गेला. चार रात्री पाच दिवस एकमेकांबरोबर राहून एकमेकांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असलेली हरळीकरांसारखी मंडळी समाजाविषयी बोलताना अनेकदा स्वत:च्या आयुष्याकडून समाजाकडे, त्याच्या मानसिकतेकडे येत होती. तर काही मंडळी समाजाविषयी बोलता बोलता स्वत:च्या आयुष्याकडे जात होती. ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि स्त्री- चळवळीसाठी नारी समता मंचाची स्थापना करणाऱ्या विद्या बाळ यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या विषयाबरोबरच तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांविषयी बोलत असतानाच इच्छामरणासंबंधीचे आपले विचारही मांडले. ‘पुरुषस्पंदन’ या मासिकाचे संपादक व ‘मावा’ या संघटनेचे कार्यकत्रे हरिश सदानी यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी आज पुरुषांचाही इतर पुरुषांशी व स्वत:शी संवाद होण्याची आणि त्यासाठी किशोरवयीन वयापासूनच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. या समाजाचा सर्वात महत्त्वाचा आणि आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बाजूला फेकला गेलेला घटक म्हणजे शेतकरी. या शेतकऱ्याच्या आजच्या प्रश्नांविषयी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांनी आपली निरीक्षणं नोंदवली. 
तर फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक प्रा. हरी नरके यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा विस्तृत पट उलगडणारी मांडणी करताना मराठी भाषा अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर गेली अनेक वर्षे आद्यकवी मुकुंदराजांवर थांबलेली आपली गाडी स. आ. जोगळेकरांनी संपादित केलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती' या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठीतील आद्य- ग्रंथापर्यंत आणून ठेवली.
श्याम बेनेगल यांनी दिग्दíशत केलेल्या ‘समर’ या चित्रपटाचे उदाहरण देऊन, जातव्यवस्थेपासून स्वत:ला तोडून आलेल्या कलाकाराला पुन्हा जातव्यवस्थेचेच बळी व्हावे लागते का, असा प्रश्न करताना अभिनेते व कवी किशोर कदम यांनी आज अशा कलाकारांना पडलेल्या आयडेंटिटी क्रायसिसच्या प्रश्नाला हात घातला. तर सिनेविश्लेषक अशोक राणे व रेखा देशपांडे यांनी आजच्या चित्रपटांतून हाताळल्या जाणाऱ्या विविध सामाजिक प्रश्नांवर व आज होणाऱ्या चित्रपटांच्या समीक्षेवर टिप्पणी केली.
अश्विनी धोंगडे यांनी एस. एन.डी. टी. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असताना तरुण मुलींच्या प्रश्नांना भिडताना आलेल्या वेगवेगळ्या पातळीवरच्या अनुभवांचं कथन केलं तेव्हा- जुन्याच साच्यात आपली तरुण पिढी अडकून पडली की काय, असा प्रश्न पडला होता. पण कविता आणि अमृता या दोन तरुण मुलींनी या संमेलनात मांडलेल्या विचारांनी जुन्या पिढीला केवळ अवाक्च केलं नाही, तर आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडलं.
खरंच, किती गृहीत धरत असतो आपण नव्या पिढीला! आणि पुन्हा आपण तयार केलेल्या सामाजिक चौकटीत घट्ट बसवून संकुचित करून टाकतो त्यांच्या विचारांना! पण या दोन मुलींनी केलेली त्यांच्या आयुष्याची मांडणी पाहिल्यावर आजची तरुण पिढी साऱ्या नातेसंबंधांकडे आपल्या पिढीपेक्षा जास्त प्रगल्भपणे पाहते हे लक्षात आलं. मुलांना जे आवडतं आहे त्यात रमू द्यावं आणि या रमण्यातच खरं जगणं आहे, हे त्यांनी सांगितलंच; पण स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीही काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं. या पिढीला नातेसंबंधातली निष्ठा महत्त्वाची वाटते, पण एकनिष्ठ असण्याची कल्पना मात्र व्यवहारी वाटत नाही. काही कारणानं नाही पटलं एकमेकांशी, तरीही निभावून नेण्याचा हट्ट करताना नेमकं कोणाचं आयुष्य सुखी करतो आपण, हा प्रश्न त्यांना पडतो. बळजोरीनं हे नातं ओढत राहण्यापेक्षा समंजसपणे बाजूला होणं जास्त चांगलं, असं त्यांना वाटतं.
ही पिढी नात्यांचं ओझं घेऊन जगायला नकार देते. त्यामुळेच त्यांना आता मागे सोडलेल्या नात्याविषयी ना पश्चाताप वाटतो, ना त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अपराधीभाव असतो. उलट, आपल्याला आणि दुसऱ्याला हवं तसं जगू देण्यावर या पिढीचा जास्त विश्वास आहे हे जाणवत राहतं. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलही त्यांची मतं अगदी स्पष्ट आहेत. केवळ त्यातून होणाऱ्या मुलांचं काय, असा प्रश्न त्यांना आज पडत असला तरी त्याचं उत्तरही त्या शोधून काढतील, हे त्यांचा स्वत:वरचा विश्वास पाहून वाटलं. आयुष्य आपल्या जबाबदारीवर पेलण्याची त्यांची तयारी आहे. कोणत्यातरी अबलख घोडय़ावरून येणाऱ्या राजकुमाराची त्या वाट पाहत नाहीत. सुखी संसाराची पारंपरिक स्वप्नं त्या पाहत नाहीत. अर्थात लग्नसंस्था किंवा कुटुंबसंस्था त्या नाकारत नाहीत. साऱ्याच सामाजिक चौकटींची तोडमोड त्यांना करायची नसली तरी त्या विस्तारण्याची गरज त्यांना वाटते आहे. आणि मुख्य म्हणजे ती विस्तारताना त्यांना स्वत:लाही वाढायचं आहे. समाज, नातेसंबंध त्यांच्या जागी आहेतच; पण ते आपल्या जगण्यावर स्वार होणार नाहीत, याची काळजी त्या घेत आहेत. त्या समोरच्या व्यक्तीचा आदर करतातच, पण स्वत:च्या व्यक्तित्वाचाही त्या तेवढाच आदर करतात. आज त्यांच्याबरोबर वाढणारी सारीच मुलं असा विचार करत असतील असं नाही. पण तशीही मुलं त्यांच्या आजूबाजूला त्यांना दिसताहेत. आणि त्यांना ते जास्त आश्वासक वाटतंय. त्यांच्या विचारांतली ही पारदर्शकता खरं तर ३०-४० वर्षांपूर्वी गौरी देशपांडे यांच्या कादंबरीतल्या नायिकांमध्ये आमच्या पिढीला सापडली होती. पण पुढं ती हरवत गेली का, की तेवढा मोकळेपणा स्वीकारण्याची आमच्या पिढीची मानसिक तयारी झालेली नव्हती. ‘कारावासातील पत्र’मधील त्यांची नायिका म्हणते, ‘‘तो सर्व काळ मला जगायला परत मिळाला तर मी वेगळी नक्कीच वागेन. एक तर साऱ्या बाजूंनी असा तुझा आणि माझाही कोंडमारा करणार नाही; आणि दुसरं म्हणजे दु:खाची बादली भरायसाठी अगदी रांगेत उभं राहून नळ कधी येतोय म्हणून वाट पाहणार नाही. सुखाच्या जवाची चटणी दु:खाच्या पर्वताच्या सावलीत बसून खाईन. साऱ्या पुरुषजातीशी माझं नातं सशस्त्र तहाचं. ते चालवून घेऊन त्यात मौज वाटणारा, त्यालाच नसíगक समजणारा कुणी भेटला तरच त्याच्याशी माझे कायमस्वरूपाचे संबंध निर्माण होणार.’’
गौरी देशपांडे यांच्यासारखं स्वत:चं ठाम विधान करणाऱ्या आणि या समाजाचा एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या या तरुण पिढीचं आजच्या समाजाचं आकलन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी बोलावलेल्या नव्या पिढीतल्या या मुलींनी, तसेच आजही हिंदू-मुस्लीम विवाहाला विरोध करणाऱ्या समाजात राहून आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या एका तरुण जोडप्यानं जुन्या पिढीला डोळे आणि मन उघडे ठेवून नव्या पिढीतील मुलांची विचार करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी केलेलं आवाहन हा या संमेलनाचा क्लायमॅक्स ठरला, हे कबूल करायलाच हवं.
एकूणच ‘समाज’ या एका व्यापक विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना समाजातील विविध घटकांचा- म्हणजेच तरुणांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांच्या प्रश्नांचा ऊहापोह या संमेलनात करण्यात आला. अतिशय मनमोकळी चर्चा आणि राजन खान व त्यांच्या टीमचे नेटके नियोजन हे या संमेलनाचं वैशिष्टय़ होतं. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या साहित्य संमेलनाला असलेलं उत्सवाचं रूप इथं नसल्यानं शे-दीडशे लोकांच्या या सुनियोजित संमेलनात साहित्यिक, कलावंत यांच्यापासून सामान्य माणसांचा विचारही ऐकला गेला, हे महत्त्वाचं
सौजन्य: नीरजा ,

समाज साहित्य संमेलन

सौजन्य: प्रा. हरी नरके


असे साहित्य संमेलन की ज्यात अध्यक्षपदाच्या निवडीचे वाद नाहीत, मुळात ज्याला अध्यक्षच नाही, उद्घाटक नाही, कोणीही निमंत्रित वक्ते नाहीत, साचेबंद वेळापत्रक नाही, सर्व मान्यवर लेखक स्वखर्चाने येतात, जातात, तीन दिवस, चार रात्री रसिक वाचकांसोबत एकत्र राहून हृद्य संवाद साधतात, जाताना भरभरुन आनंद आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जातात,  हे स्वप्नवत वाटते ना? पण असे साहित्य संमेलन आज अस्तित्वात आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय?
नुक्तीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नेहमीप्रमाणे ही निवडणूक गाजू लागली आहे. पावसाळ्यात उगविणा-या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे हे वाद उगवतात, गाजतात आणि पेल्यातील वादळाप्रमाणे शमतातही. शासकीय अनुदान आणि देणग्या व  प्रायोजक यांच्याद्वारे  संमेलनासाठी कोटय़ावधी रुपये जमा केले जातात, लेखकांचे मानधन, प्रवासखर्च आणि डामडौल यावर ते खर्ची पडतात. वर्षानुवर्षे तेच ते वक्ते, तीच ती भाषणे,तीच ती रडगाणी आणि त्याच त्या कविता असा अत्यंत निर्जीव, निरस, शीण आणणारा एक निरर्थक उपचार पार पाडला जातो. जत्रा मात्र `जंक्शान' होते. त्यातुन निष्पन्न मात्र काहीच होत नाही तो भाग वेगळा. पण हा आता परिपाठच झाला आहे. त्यात बदल होणे केवळ अशक्य आहे.मोठे लेखक त्यामुळेच या "अभासात" संमेलनाकडे फिरकतही नाहीत.
पाचगणीजवळ खिंगर नावाचे एक टुमदार गाव आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले, नितांतसुंदर! तिथे 27 ते 29 जुलै या काळात हे "समाज साहित्य संमेलन" पार पडले. सुमारे 150 लेखक, कवी आणि रसिक तीन दिवस चार रात्री धो धो पावसात साहित्यात रमले होते. गप्पांचे फड रंगत होते. लेखकांसोबत रसिकही व्यासपीठावरुनच बोलत होते. ख्यातनाम लेखक श्री.राजन खान यांची ही साहित्यिक अलिबाबाची गुहा. त्यांच्या "अक्षर मानव" या संस्थेतर्फे गेली चार वर्षे हे साहित्य संमेलन भरविले जाते. मी,आम्ही, आपण यानंतर समाज हा यावर्षीचा विषय होता. यावर्षी रंगनाथ पठारे, विद्या बाळ, नीरजा, अशोक राणे, रेखा देशपांडे, किशोर कदम, अश्विनी धोंगडे, सुमती लांडे, प्रसाद कुलकर्णी, हरिश सदानी, हेमंत जोगळेकर, सुमती अरळीकर, छाया कोरगावकर, विद्यालंकार घारपुरे, अनुराधा औरंगाबादकर, हेमंत पाटील, शरद लांजेवार, छाया महाजन, साहेबराव ठाणगे, पवन वैद्य, अनिल सपकाळ, महावीर जोंधळे, शमशुद्दीन तांबोळी, संतोष नारायणकर,प्रविण धोपट आणि इतर अनेकजण मोठय़ा गोळ्यामेळ्याने या संमेलनात घरचे कार्य समजून वावरत होते. या संमेलनाला उद्घाटक, अध्यक्ष, निमंत्रित वक्ते असे चौकटीतील काहीही नसल्याने सगळे कसे अनौपचारिक, उत्स्फूर्त आणि मोकळेढाकळे असते. म्हणूनच जिवंत आणि सच्चे असते. या संमेलनाला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. सगळ्यांचे सगळ्यांनी ऐकणे, स्वतःचे बोलून निघून न जाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहणे मात्र बंधनकारक असते.
राजन खान यांनी आस्थेवाईक प्रास्ताविक केल्यानंतर त्यांनी अचानक सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना मंचावर निमंत्रित करुन मनोगत व्यक्त करायला सांगितले. हेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते. त्यानंतर समारोपापर्यंत तीन दिवस याच पद्धतीने कार्यक्रम चालू होते. आता यानंतर कोण बोलणार आहे हे राजन खान सोडले तर कोणालाही माहीत नसायचे. संस्पेन्स कायम असायचा.कोणाही वक्त्यांना पूर्वकल्पना दिली जात नसे. अनेकदा रसिक, वाचक किंवा श्रोते म्हणून आलेल्यांनाही बोलायला सांगितले जाई. तर दुसरीकडे अनेक मान्यवरांना तीन दिवसात मंचावरुन बोलण्याची संधी मिळु शकली नाही.नविन मंडळींची  तारांबळ उडे पण अनेकदा फार दर्जेदार, ताज्या दमाचे, नवेकोरे आणि चाकोरीबाहेरचेही ऐकायला मिळे. गुजरातमधून घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या शामिया मिर्झा आणि निमेष पटेल या नवविवाहित इंजिनियर जोडप्याचे अनुभव ऎकताना एखादा थरारक चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. ते दोघे गर्भश्रीमंत,उच्चशिक्षित हिंदु-मुस्लीम कुटुंबातील तरुण. शाळेपासुनची दोघांची मैत्री. त्यांच्या आंतरधर्मिय लग्नाला मात्र दोन्ही घरचा कडवा विरोध.दहा महिने शामियाच्या आईवडीलांनी तिला घरात कोंडुन ठेवले. मोबाईल काढुन घेतला.टीव्ही बघायला बंदी केली.कडक पहारा.घराबाहेर जायचे नाही,मैत्रीनींनाही भेटायचे नाही,काम नाही,धाम नाही, आई २४ तास सोबत.मुलगी जणु तुरुंगात असावी तशी.पण मुलाने शेजारच्या घरी कुरियरवाला बनुन जावुन तिच्याशी संपर्क केला आणि मग त्यांनी रात्री अडीच वाजता बंगल्याच्या टेरेसवरुन उड्या मारुन पोबारा केला,थेट पुणे गाठले आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला. हे ऎकताना भारत खरेच २१ व्या शतकात आहे का? असा प्रश्न पडत होता.आपला समाज जाती-धर्मात कसा वाटला गेलेला आहे त्याचे हे विदारक दर्शन होते.
हिरकणीचे बि-हाड, हे नवे दलित आत्मकथन. अतिशय ताकदीचे.  लेखिका सुमती अरळीकर या चर्मकार समाजाच्या. त्यांचे पती दिलीप अरळीकर हे ब्राह्मण समाजाचे.त्यांच्या आंतरजातीय विवाहाला ब्राह्मण वडीलांनी विरोधासाठी जी गलिच्छ हत्यारे वापरली ती चीड आणणारी. त्यांच्या सहजीवनाचे अनुभव उपस्थितांना सामाजिक वास्तवाचे नवे पदर उलगडुन दाखवणारे ठरले.त्यांचे अनुभव थरारुन सोडणारे होते. तरुण पिढीतील कविता आणि अमृता दोन मुलींनी आजच्या तरुणाईबद्दलची मांडलेली मते शॉक ट्रिटमेंट देणारी होती.लिव्ह इन रिलेशनशिपचं त्यांना  आकर्षण वाटतं.तरुण मुलांना जे आवडतं तिथेच त्यांना रमु द्या,त्यातच खरं जगणं आहे,असंही त्यांनी सांगितलं.नातेसंबंधातील निष्ठा त्यांना महत्वाची वाटत असली तरी एकनिष्ठ राहणे अव्यवहारीपणाचे वाटते. नात्याचे ओझे घेवुन जगायला त्यांचा नकार आहे. तरुण लेखक प्रविण धोपट म्हणाले, तरुण पिढीची काळजी करायचे सोडुन द्या. ती वाचन करित नाही म्हणुन चिंता करु नका.जातीपाती नष्ट करायच्या असतील तर सर्वांनाच ब्राह्मण करा.ही तरुण पिढीची प्रातिनिधिक मतं नसतीलही, पण दिशा कळायला मदत होते.वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत त्याचा कयास बांधता येतो.
कवी आणि अभिनेते किशोर कदम यांचे सिनेसृष्टीतील जिवंत अनुभव चिंतनाला खाद्य पुरविणारे होते. राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण कमळ विजेत्या "समर" या चित्रपटात शाम बेनेगल यांनी कलावंत आणि जातीव्यवस्थेचे पदर स्पष्ट केले आहेत. त्यात कदमांनी केलेला रोल आव्हानात्मक होता.पण हा रोल देताना कदमांच्या जातीचा विचार झाला असावा,हे कळल्यानंतरची त्यांची मानसिकता, सत्यदेव दुबेंचे अनुभव, आयडेंटिटी क्रायसिस, याबद्दल ते खुलेपणाने बोलले. हेमंत पाटील आणि शरद लांजेवार यांनी गुजरात आणि आंध्रच्या सामाजिक जीवनाचे केलेले विश्लेषण संपूर्ण नवे आणि वेगळे होते.आंध्रातील कष्टाळू सामान्य माणसाचे सिनेमावेड, गुजराती समाजातील जातींची उतरंड आणि अर्थ अभियांत्रीकी हे चित्रण महत्वाचे होते.तीन दिवसात चाळीसपेक्षा अधिक लोक बोलले. त्यात क्वचित काही जणांचा सूर लागला नसला किंवा काहींनी थोडाफार अपेक्षाभंगही केला असला तरी एकूण लेखाजोखा समृद्ध करणारा होता. उद्घाटकीयात नीरजा म्हणाल्या, "समाज म्हणजे नेमकं काय?या प्रश्नाच्या समाजशास्त्रीय व्याख्या झालेल्या आहेत.पण एक सामान्य माणुस म्हणुन या समाजाकडे पाहताना नेमकं काय असतं आपल्या मनात? समाजातील राजकारण,अर्थकारण,जातीयता,दंगे,अराजक,इतिहास,भुगोल, विज्ञान,तंत्रज्ञान,साहित्य,,कला,संगीत यांचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो.तो आपल्या जगण्याच्या भुमिका ठरवित असतो.समाजाच्या दडपणामुळे कलावंताचा कोंडमारा होत असतो. शब्दाशब्दांवर आजकाल काही संघटना सेन्सॉरशीप लादताना दिसतात. निकोप लोकशाहीला आणि लेखन स्वातंत्र्याला बाधक असलेली जगण्यातली ही ढवळाढवळ, ही झुंडशाही कलावंतानी झुगारली पाहिजे.नीरजा यांच्या विवेकी, आत्मसंवादी आणि प्रागतिक चिंतनाने या संमेलनाची उत्तम पायाभरणी केली.
समारोपाला रंगनाथ पठारे यांनी शेती, शेतकरी, राज्यकर्ते आणि जागतिकरण यांचा एक धारदार छेद प्रस्तुत केला. आपण स्वतः शेतकरी समाजातून आलो असून आता शहरात राहून, आपला वर्ग आणि वर्गजाणीवा बदलल्या तरी या प्रश्नांशी नाळ जोडलेली असल्याने त्या जगातल्या गुंतागुतीच्या रसायनाशी आपले आतडय़ाचे नाते आहे. आजचे राज्यकर्तेच शेतक-यांचे खरे शोषणकर्ते आहेत, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. हरीष सदानी यांनी "स्त्री भ्रूणहत्या" या शब्दांऐवजी आपण "स्त्रीलिंगी गर्भपात" हे शब्द वापरावेत अशी साधार मांडणी केली. साहेबराव ठाणगे यांनी आजच्या खेडय़ाचे बदलते वास्तव उलगडून दाखविले. ते म्हणाले, "माझ्या गावातील 40 वर्षांचे चुलत भाऊही ज्येष्ठ नागरिक म्हणून एस.टी.चे अर्धे  तिकीट काढून प्रवास करतात आणि बापाला उपाशी मारणारेच दहाव्याला अख्या तालुक्याला जेवायला घालतात!"
हेमंत जोगळेकरांनी समाजात सलणा-या अनेक गोष्टी शेअर केल्या. माझं आयुष्य म्हणजे केवळ एक टिंब आहे असं म्हणणा-या अनुराधा औरंगाबादकरांनी आपल्या अनुभवकथनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. रेखा देशपांडे म्हणाल्या, "बाईचं पिढय़ानुपिढय़ा ऐकलं गेलं नाही. आता ते ऐकले जायला लागले आहे. तेव्हा आता बायकांनी कंठाळी बोलण्याऐवजी शांतपणे बोलले तर ते अधिक प्रभावी ठरेल." सुमती लांडे म्हणाल्या, "मला बाईपणाकडून माणूसपणाकडे जायला आवडते.  आज चाळीशीची प्रत्येक स्त्री घाबरलेली आणि तरुण पिढी गोंधळलेली आहे. मुलं अपडेट आहेत पण वाचत नाहीत त्यामुळे आई धास्तावलेली असते".
प्रत्येक सत्रात प्रश्नोत्तरे,चर्चा होत असत.काही वेळा त्या फार रंगत असत. रंगनाथ पठारे यांनी चर्चेत बोलताना लेसिंग डोरिस यांच्या `द गोल्डन नोटबुक' या स्त्री-पुरुष संबंधावरील जागतिक साहित्यातील मानदंड ठरलेल्या ग्रंथांच्या तोडीचे लेखन भारतीय स्त्रियांनी करावे असे आवाहन यावेळी  केले.
मराठा सेवा संघाच्या अशोक राणांना रंगनाथ पठारे, हरिष साळवे आणि इतर अनेकांनी फैलावर घेतले. आधी आपण जात मानत नाही म्हणणारे राणा नंतर मात्र आपण अमुक जातीचे नाही वगैरे बोलू लागले. पुरुषोत्तम खेडेकरांचे जातीय दंगलीचे तसेच विशिष्ट समाजातील सर्व पुरुषांची कत्तल करण्याला चिथावणी देणारे लेखन आपण वाचलेले नाही असे सांगून त्यांनी अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. त्यांची ही दांभिक  भाषणबाजी कुणालाच आवडली नाही. जातीय संघटनांचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनी कडाडून विरोध केला. राज्यात दहशतवाद पसविणा-या समाजविघातक विचारांना या साहित्यमंचावरुन  झालेला विरोध हे सुचिन्हच म्हटले पाहिजे. साहित्यिक मंडळी अनेकदा "अभासात" वावरतात आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर हे चित्र फार भावणारे होते.
समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, ख्यातनाम चित्रपट समिक्षक अशोक राणे, प्रा. अश्विनी धोंगडे, स्त्रीवादी विचारवंत विद्या बाळ, आणि स्वता: राजन खान  आदींच्या मनोगतांनाही उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. ही चिंतनशील मनोगते त्यांचा व्यासंग आणि अधिकार यांनी संपन्न होती. या ज्येष्ठांना ऎकणे फार सुखावह होते. तीन दिवस कोसळणा-या पावसात सतत होत असलेल्या या थेट संवादाने सगळेच चिंब भिजून निघाले. "स्त्री-भृणहत्या, स्त्रीपुरुष समता, आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह, आजचे बदलते जातीवास्तव, धार्मिक उन्माद आणि धर्माचे राजकारण, जागतिकीकरण आणि बाजार व्यवस्थेचे आक्रमण,शेतकरी आत्महत्या, अभिजात मराठी भाषा,संस्कृती आणि सांस्कृतिक राजकारण, सत्ता आणि माध्यमे यांचे समाजावरील नियंत्रण" अश्या अनेक विषयांवर खोलवर चर्चा झाल्या.
  `अभासात' संमेलनाला विटलेल्या साहित्यप्रेमींना एक चौकटीबाहेरची सुंदर वाट या संमेलनाने दाखविलेली आहे. महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे २५० साहित्य संमेलने होतात. पण एका विषयाला वाहिलेले आणि इतके सळसळते संमेलन दुसरे नसावे. अशी संमेलने गावागावात झाली तर मराठी साहित्याची मरगळ आणि शिण झटकला जाईल आणि मराठीला नवी जोमदार पालवी फुटेल यात शंका नाही. पुढील वर्षीच्या संमेलनाला नक्की यायचंच असा निर्णय घेऊन मंडळी परतली. समाज साहित्य संमेलनाने मला दिलेली तीन दिवसांची शिदोरी पुढील 365 दिवस निश्चित पुरेल असा मला विश्वास वाटतो.

सौजन्य: प्रा. हरी नरके