FRIDAY, MARCH 1, 2013.....
by prof.Hari Narke......
{दिव्य मराठी, दि.२६ फ़ेब्रुवारी २०१३} |
अमृतातेही पैजा जिंकणार्या आणि भाषामाजी भाषा साजरी असणार्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला आहे. आजवर तामिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्या खंडासह जोडलेले/असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता येते. मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा अडथळा आहे. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे आणि तिचे वय एक हजार वर्षांपेक्षा कमी आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आली आहे. प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झाला आहे. या वेगवेगळ्या भाषा नसून, ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठीतले आद्यग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व र्शीमंत झाल्यानंतरचे र्शेष्ठ ग्रंथ आहेत. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वष्रे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे. पाणिनीच्या समकालीन वररुची (कात्यायन) याने लिहिलेला 'प्राकृत प्रकाश' हा व्याकरण ग्रंथ ख्यातनाम आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे 80 ग्रंथांमध्ये मराठी भाषा - त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे आवश्यक नियुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक) यांचा समावेश आहे. रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, असे त्यात म्हटले आहे. 'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.' मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची भाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या लोकभाषांमधून ती तयार झाली आहे. अशाच दुसर्या एका लोकभाषेतून संस्कृत जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम झाला आहे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या al145सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वष्रे अस्तित्वात असली पाहिजे. महारठ्ठी-मरहठ्ठी- र्महाटी-मराठी असा उच्चारभ्रमाचा प्रवास 'महाराष्ट्री हे महारठ्ठी'चे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. 'महाराष्ट्रार्शया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलत: ही भाषा महाराष्ट्राचीच, हे नि:संशय. शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते व साम्य आहे, हे अनेक उदाहरणांवरून व व्युत्पत्त्यांवरून सिद्ध होते. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. ज्ञानेश्वरीत मराठी भाषेला 'र्महाठी' या शब्दाबरोबरच 'देशी' हा शब्दही वापरलेला आहे. किंबहुना मराठीचे 'देशी' हेच नाव अधिक रूढ होते. अपभ्रंश भाषेचे साहित्यांतर्गत नाव 'देसी' असेच आहे, अपभ्रंश नव्हे. या देसीचा विकास होऊन जी भाषा निर्माण झाली ती देशी किंवा मराठी. ती अपभ्रंशाच्या 'नागर' या प्रकारापासून निघाली. पुढे वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्तयार्शय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो. वात्स्यायन, वररुची व दंडी यांनी केलेले महाराष्ट्राचे उल्लेख प्रसिद्धच आहेत. राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो. शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्यांच्या संशोधनातून मराठीबाबत एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार आहे. (साभार - लोकराज्य,फ़ेब्रुवारी२०१३) |
No comments:
Post a Comment