राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची पत्रे आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ हे पुस्तक, या दोहोंत कडव्या मुसलमानद्वेषाचे ढीगभर पुरावे आहेत. गुरुजींनी संघाची शाखा म्हणून जनसंघ सुरू केल्यावर संघाच्या वरिष्ठ प्रचारकांनी त्यांना विचारले, ‘तुम्हीच आम्हाला सांगितलंय की, ‘वारांगनेव नृपनीती अनेक रूप:’ मग आपण वारांगनेच्या मागे का लागतोय?’ यावर गुरुजी म्हणाले, ‘वारांगनेव नृपनीती... हे बरोबरच आहे; पण आपण कुठे वारांगनेच्या मागे लागतोय? नृपनीती म्हणजे वारांगना नव्हे, पण दिल्ली जिंकून आल्यावर एखादा बाजीराव आपल्या दरबारात बसलाय आणि एखादी मस्तानी त्याच्या तालावर नाचत असेल, तर चिंता करण्याचे कारण नाही.’
या ‘वारांगनेव नृपनीती’ या संघाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे संघाने अनेकदा खरे चेहरे लपवले आणि फसवणारे मुखवटे चेह-यावर चढवले. जनमानस नव्हे, तर संघाचे वरिष्ठ स्वयंसेवकसुद्धा भ्रमित झाले. संघ शिक्षा वर्गातील एका चर्चेत एका वरिष्ठ स्वयंसेवकाने देवरसांना विचारले, ‘संघाची तीन तत्त्वे आपण सोडली का?’ देवरसांनी हसून त्याला विचारले, ‘कोणती तीन तत्त्वे?’ त्याने सांगितले, ‘हिंदूंचाच हिंदुस्थान, भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज व एकचालकानुवर्तित्व.’ देवरस म्हणाले, ‘अरे, संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे. एकदा हे झाले, की मग ‘भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज’ हे स्वाभाविकपणे येते. (संदर्भ - संघाचे महाराष्ट्र विभाग प्रमुख दामुअण्णा दाते यांचे ‘स्मरण शिल्पे’ हे पुस्तक.)
‘वारांगनेव नृपनीती’ हे मनात पक्के ठरवलेला संघ अनेक मजेशीर खेळ्या खेळतो. तो नथुरामला नाकारतो. गांधीजींना आपले दैवत मानतो. आपण यापूर्वी काय बोललोय, कसे वागलोय, हे लोक विसरले असणार, अशी त्याची पक्की खात्री असते. गांधीजींच्या खुनानंतर नथुराम गोडसेशी आमचा काही संबंध नाही, असे संघ सांगत राहिला. मात्र, ‘गांधी हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात गोपाळ गोडसे यांनी, ‘आम्ही दोघे भाऊ संघाचे क्रियाशील स्वयंसेवक होतो’, असे सांगितले. हे विधान त्या वेळी देशातील सर्वच वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. परंतु त्या वेळी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘गोडसेंचा संघाशी काहीही संबंध नव्हता.’ असे जाहीर करून गोडसे यांचा संघाशी संबंध नाकारला. त्यावर गोपाळ गोडसे यांनी ‘फ्रंटलाइन’ला 28 जानेवारी 1994रोजी मुलाखत देऊन अडवाणींच्या विधानाची संतप्त शब्दांत निर्भर्त्सना करून ‘आम्ही सर्व भाऊ संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होतो. आम्ही घरापेक्षा संघातच जास्त वाढलो. नथुराम बौद्धिक प्रमुख होता. संघाशी असलेला आमचा संबंध नाकारणे हा भेकडपणा आहे. कोर्टात खटला सुरू होता त्या वेळी त्याने दिलेल्या निवेदनात संघ सोडल्याचे सांगितले होते. कारण तसे सांगितले नाही तर संघ व गोळवलकर अडचणीत येतील, असे त्याला सांगण्यात आले होते. पण खरे म्हणजे, त्याने त्या वेळी संघ सोडलेला नव्हता.’
या ‘वारांगनेव नृपनीती’मध्ये संघ केवळ नथुरामला नाकारून थांबला नाही, तर नंतर संघाने गांधीजींना महात्मा आणि प्रात:स्मरणीय म्हटले. वाजपेयी आणि रज्जूभैया या दोघांची तर एकदा याबाबत चढाओढ लागली होती. वाजपेयी यांनी गांधीजींच्या स्वप्नातले रामराज्य आणणे हे माझे कार्य आहे, म्हणून सांगितले आणि रज्जूभैयांनी भारताच्या नवरत्नांमध्ये सर्वात देदीप्यमान असलेल्या महात्मा गांधी यांना अजून भारतरत्न मिळू नये, म्हणून संताप व्यक्त केला!
पण संघाची गांधीजींबद्दलची यापूर्वीची भूमिका काय होती? गुरुजींनी त्यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात ‘प्रादेशिक राष्ट्रवाद की सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या प्रकरणात ‘देशाला पौरुषहीन बनवणारे आत्मघातकी नेतृत्व’, असा त्यांचा उल्लेख केला आहे. गुरुजींनी हा गांधीद्वेष स्वयंसेवकांच्या मनात एवढा भरला होता की, गरज म्हणून गुरुजींनी 1965मध्ये ‘भारतभक्ती स्तोत्रात’ महात्मा गांधींच्या नावाचा समावेश केला. त्या वेळी प्रचंड नाराजी उमटली. पुणे जिल्ह्याचे एक ज्येष्ठ प्रचारक गोपाळराव देशपांडे त्यावर नाराजीने बोलले, ‘काकासाहेब मुळे यांनी माझ्या विभागात हे प्रात:स्मरण नको, असे म्हटले.’ काशिनाथपंत लिमये यांनीही विरोध प्रकट केला. संघाच्या शिस्तीत हे अक्षरश: बंड होते. गुरुजींनी पत्र पाठवून त्यांना ‘आपला निर्णय आमच्यावर बंधनकारक नाही, असा पायंडा आपणासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाडण्याचे ठरवले, तर मी काय करणार?’ असा प्रश्न विचारला.
महात्मा फुले, आंबेडकर अशाच प्रकारे 1985मध्ये ‘एकात्मता स्तोत्रात’ आले. त्यानंतर तर समरसता मंचाच्या व्यासपीठावर गुरुजी, डॉ. हेडगेवार यांच्या बरोबरीने त्यांच्या फोटोंना स्थान दिले गेले. एकेकाळी महात्मा फुले म्हणाले होते, ‘बरे झाले हे शिपायांचे बंड फसले. नाही तर पुन्हा आमच्या पायात काठी आणि हातात मडके आले असते आणि आम्ही शिकतो म्हणून आमच्या शाळा जाळल्या असत्या.’ अशा वेळी त्यांचा आणि संघ तत्त्वज्ञानाचा संबंध काय? ते राहू देत. हे ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ म्हणून उभे आहेत आणि महात्मा फुले एका ठिकाणी म्हणताहेत, ‘सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करून महंमदाच्या जवांमर्द सैनिकांनी आर्थिक व सामाजिक पिळवणुकीतून आमची सुटका केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’ आता याचं संघ काय करणार? संघाचे व्यासपीठ महात्मा फुले आणि भारतरत्न आंबेडकर नेमके काय म्हणाले ते सांगत नाही, तर गोळवलकर आणि डॉ. हेडगेवार जे म्हणाले तेच हे महामानव यापूर्वी सांगत होते, म्हणून सांगत असते.
ज्यांचे विचार महाराष्ट्राला माहीत आहेत त्या महापुरुषांबद्दल संघ परिवार ही खेळी खेळतो, तर त्यांच्यापुढे विवेकानंद आणि सरदार पटेल म्हणजे, ‘किस झाड की पत्ती’. विवेकानंदांनी सांगितले, या देशाचा अभ्युदय करावयाचा असेल, तर हिंदू- मुसलमान सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा. या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाली आहेत. त्यांचं धर्मांतरही पुन्हा आपापल्या जातीतच झालंय! दलितांबद्दल आपल्या मनात जी कणव आणि सहसंवेदना आहे, तीच आपल्या मनात त्यांच्याबद्दल हवी. 10 जून 1898 रोजी सर्फराज हुसेन यांना विवेकानंदांनी पत्र पाठवून सांगितले, ‘आमच्या अद्वैत वेदांतातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात समतेचा संदेश सर्वप्रथम आणला तो इस्लामनेच. मात्र, जेथे वेदही नाहीत, कुराणही नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र, हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’ 20 ऑगस्ट 1892 रोजी जुनागडच्या नवाबांना पत्र पाठवून ते सांगतात, ‘ज्यांच्या पाचशे पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेले नाही, ते पुरोहित आज वेद सांगताहेत. परमेश्वरा, ब्राह्मणांच्या रूपाने आज या देशात हिंडणा-या या राक्षसांपासून या देशाचे रक्षण कर.’ आणि 27 एप्रिल 1896 रोजी आपल्या आलमबझार मठातील शिष्यांना पत्र पाठवून ते सांगतात, ‘आपले देव आता जुने झालेत. आता आपणाला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपणाला नवा भारत घडवायचा आहे.’ असे नेमके आणि भेदक विचार मांडणारे विवेकानंद. मात्र, संघ परिवार त्यांचे आणि आमचे विचार, तत्त्वज्ञान आणि रचना एकच आहे, असे सांगत त्यांचा जयजयकार करत पुढे येतो. विवेकानंदांचे विचार दडपून त्यांच्या नावावर आपले विचार लोकांच्या गळी मारण्याचा प्रयत्न असतो.
संघ परिवार आज पटेलांबद्दल हेच करतोय. नेहरू, पटेल, लोहिया ही गांधीजींनी निवडलेली आणि घडवलेली माणसे आहेत. सर्वधर्म समभाव, साधनशुचिता आणि लोकशाही हे त्यांच्यावरचे वज्रलेप संस्कार आहेत. संघाने आपल्या स्वयंसेवकांवर केलेले तप्त संस्कार हिंदूंचाच हिंदुस्थान, कडवा मुसलमानद्वेष आणि एकचालकानुवर्तित्व हे आहेत. नथुराम गोडसे, बाबरी मशिदीचा विध्वंस, श्रीराम सेना हे सर्व त्यात येते. श्रीराम सेनेने मुलींना हॉटेलमधून बाहेर काढून बडविले. त्यानंतर ‘हिंदू व्हॉइस’ या परिवाराच्या मासिकात- ज्याला सरसंघचालकांचा आशीर्वाद आहे, त्यात श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांची मुलाखत आली. एप्रिल 2009मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या मुलाखतीत त्याने सांगितले, ‘मी संघाचा आहे. हा अतूट संबंध आहे. नथुरामने गांधींचा खून करून फार मोठी राष्ट्रसेवा केली, असे मी मानतो. मात्र, मी तेव्हा तेथे असतो, तर नेहरूंचापण खून केला असता.’
हे खुनाचे राजकारण करणा-या संघाबद्दल पटेल काय म्हणालेत, हे संघाने व मोदींनी लक्षात घ्यावयास हवे. केंद्रीय मंत्रिमंडळात नेहरूंनी सामील करून घेतलेले (तेव्हा हिंदू महासभेचे आणि नंतर जनसंघाचे नेते) श्यामाप्रसाद मुखर्जींना 18 जुलै 1948 रोजी पत्र पाठवून सरदार पटेलांनी सांगितले, ‘म. गांधींचा अघोरी आणि अमानुष खून घडावा, अशा त-हेचे वातावरण हिंदू महासभा, विशेषत: रा. स्व. संघाने देशात निर्माण केले होते, हे सरकारकडून आलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. हिंदू महासभेचे कार्यकर्ते या कटात सामील होते याबद्दल माझ्या मनात पक्की खात्री आहे. रा. स्व. संघाच्या हालचाली तर केंद्र सरकारच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणा-या होत्या. संघावर बंदी घालूनही त्यांच्या विघातक हालचाली सुरूच असल्याचे अहवाल माझ्याकडे येत आहेत.’
त्यानंतर पटेलांनी 11 सप्टेंबर 1948 रोजी गोळवलकरांना पत्र पाठवले. त्यात म्हटलंय, ‘हिंदूंना संघटित करून त्यांना मदत करणे समजण्यासारखे आहे; परंतु निरपराध स्त्री-पुरुष आणि लहान मुलांवर सूड उगवायला संघ प्रेरित करीत होता. हीन पातळीवरून संघ स्वयंसेवक जे विषारी फुत्कार सोडीत होते, त्याचा परिणाम म. गांधींसारख्या अलौकिक महात्म्याच्या खुनात झाला. म. गांधींच्या खुनानंतर संघाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्यामुळे संघ सरकारच्या नव्हे, तर भारतीय जनतेच्या मनातून साफ उतरला आहे. जनतेच्या मनात संताप उसळला आहे, संतापाचा पारा फारच वर चढला आहे.’
पटेलांना काय माहीत, जनतेचा पारा उतरवता येईल, हे संघाला चांगलेच ठाऊक होते. थोडा काळ जाऊ द्यावा. मग महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न आंबेडकर, विवेकानंद आणि खुद्द सरदार पटेल आमचेच विचार मांडत होते किंवा आम्ही त्यांचा वारसा चालवतोय, हे लोकांना प्रचारातून समजावून देता येईल. विश्वामित्री पवित्रा घेऊन, नथुराम गोडसे आणि प्रमोद मुतालिक यांच्याशी आमचा संबंध काय? त्यांचे नाव आम्ही प्रथमच ऐकतोय, असे सांगता येईल आणि ‘वारांगनेव नृपनीती’ या गुरुजींनी दिलेल्या तत्त्वाची शिकवण कामी येत राहील.