Sunday, 29 September 2013

किती गृहीत धराल घरातल्या बाईला?... नीरजा


नीरजा neerajan90@yahoo.co.in
Sunday, August 18, 2013 AT 01:30 AM (IST)
Tags: saptrang,  neerja,  women
माझं बोलणं संपल्यावर माझ्याबरोबर असलेले कविमित्र माझ्यावर गरजले ः "झालं बोलून पुरुषांच्या विरोधात? किती दिवस तेच ते बोलणार? तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत? अर्धा वेळ केवळ पुरुषांच्या विरोधातच बोलत होतीस तू. फक्त शोषणच होत असतं का बाईचं? बाकी काही नसतंच का तिच्या आयुष्यात?... आम्हीही बायकांच्या सोसण्याविषयी लिहितोच की..' वगैरे वगैरे... 

कसला शोध घेत आहेत आजच्या लेखिका? स्वतःचा की त्यापलीकडं जाऊन साऱ्या जगण्याचा? माणसाच्या अंतरंगाचा की बाईच्या शोषणाचा? बाईच्या सोसण्याविषयी बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि तिच्या प्रश्‍नांची चर्चा करणाऱ्या या लेखिकांचा आणि तिला न्याय मिळावा म्हणून भांडणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा सूर नेमका कसा लागला आहे? स्त्री प्रश्‍नांची चर्चा करताना, स्त्रीकडं करुणेनं पाहताना त्यांच्या मनाचं पारडं कुठल्या बाजूला झुकतंय नेमकं? पुरुष बादच करून टाकत आहेत का त्या आता? किंवा त्याचेही काही प्रश्‍न असू शकतात, असा विचार करण्याचं सोडून दिलं आहे त्यांनी? स्त्री-पुरुष समानतेचा हा प्रवास कुठंतरी एकाच रेषेत चालला आहे, असं काहींना वाटू लागल्यामुळं असेल कदाचित; पण आता लोक म्हणतात ः "फार झालं; आता किती दिवस दळणार आहात तेच ते दळण? दुःख कुणाला नाही? पुरुष असो की बाई असो; वेदनेचा प्रवास तर प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. फक्त त्याचे रंग वेगळे असतात, त्याचा पोत वेगळा असतो. बाकी सारं सारखंच तर असतं आणि आता तर जग बदलतं आहे, पुरुष बदलत आहेत. त्यांची मानसिकता बदलते आहे. बाईनं तिला हवं ते सारंच मिळवलं आहे. अजून काय हवं आहे तिला? कशासाठी हा टाहो, हा आकांत, हा आक्रोश?'

ज्या काळात बाई स्वतःच्या भाव-भावनांविषयी एखादा शब्द उच्चारायचंही धाडस करू शकत नव्हती, त्या काळात विभावरी शिरूरकर यांनी "कळ्यांचे निःश्‍वास' लोकांपर्यंत पोचवले होते. त्याआधीच कधी तरी ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेवर आसूड ओढले होते. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटले होते आणि र. धों. कर्वे यांनी तर बाईच्या रतिप्रेरणांचाही उच्चार केला होता. थोड्या प्रमाणात का असेना, पण बाईकडं माणूस म्हणून पाहायला लागले होते लोक; पण तरी ज्या प्रमाणात हा आवाज उठायला हवा होता, त्या प्रमाणात तो उठत नव्हता. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता हे शब्द रूढ होत गेले, ते सिमॉन द बोव्हाचं "सेकंड सेक्‍स' हे पुस्तक पाश्‍चात्त्य देशांतून आपल्याकडं पोचल्यावर. 1970 च्या दशकात स्त्रीवादाचं वारं आपल्याकडं येऊन थडकल्यावर आपल्याही जगण्याचा विचार केला जाऊ शकतो, हे कळलेल्या बायका मग स्वतःकडं वळून पाहायला लागल्या आणि अचानक जाग आल्यासारख्या स्वतःच्या जगण्याविषयी बोलू लागल्या. आपल्या शोषणाविषयी बोलताना त्यांचा आवाज हळूहळू एवढा वाढत गेला, की पुरुषांना त्यात लपलेला आकांत ऐकू न येता त्यातला कर्कशपणा जाणवायला लागला. त्यांनी कानावर हात ठेवले. अगदी दोन्ही अर्थांनी! गेली 40-50 वर्षं कधी व्यासपीठावरून, तर कधी लेखनातून सतत बोलणाऱ्या बायकांच्या आक्रंदनानं अस्वस्थ होण्याऐवजी त्यांची चीड येऊ लागली. त्या का बोलत आहेत, कशासाठी बोलत आहेत, हे समजून न घेता "किती गोंगाट हा,' अशा नजरेनं लोक पाहू लागले त्यांच्याकडं. केवळ लोकच नव्हे; तर स्वतःला संवेदनशील म्हणवणारे आमचे लेखक-कवीही कंटाळले. "सगळ्या कवयित्री एकाच सुरात लिहीत आहेत,' असंही वाटायला लागलंय काहींना. काही जण तर "पुरुषांविरुद्ध किती कविता लिहिल्या,' असाही प्रश्‍न विचारू लागले आहेत. मध्यंतरी "कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमा' या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान'तर्फे मला बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललं होतं. अर्थात हा खुला कार्यक्रम नसल्यामुळं प्रेक्षक नव्हते. केवळ मी, प्रश्‍नकर्ता, रेकॉर्डिंग करणारे गृहस्थ आणि "प्रतिष्ठान'च्याच एका मीटिंगच्या निमित्तानं माझ्यासोबत आलेले माझ्याच पिढीचे मराठीतले एक महत्त्वाचे कवी होते. कुसुमाग्रजांच्या कवितेतली आई, पत्नी, प्रेयसी आणि एकूण स्त्री याविषयी जवळजवळ अर्धा तास माझी मतं मांडल्यानंतर शेवटी त्यांच्या "मुक्तायन' या संग्रहातल्या "आम्ही सारे' या कवितेतल्या स्त्रीविषयी मी बोलले. या कवितेत खरं तर स्त्रीपेक्षाही स्त्रीकडं पाहण्याच्या पुरुषाच्या दृष्टिकोनावर कुसुमाग्रजांनी प्रहार केला आहे. अशी कविता कुसुमाग्रजांनी स्वतः पुरुष असूनही लिहिली, याचं कौतुक करून मी रेकॉर्डिंग संपवलं. ते संपल्या संपल्या माझ्याबरोबर असलेले आमचे कविमित्र माझ्यावर गरजले ः "झालं बोलून पुरुषांच्या विरोधात? किती दिवस तेच ते बोलणार? तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत? अर्धा वेळ केवळ पुरुषांच्या विरोधातच बोलत होतीस तू. फक्त शोषणच होत असतं का बाईचं? बाकी काही नसतंच का तिच्या आयुष्यात?... आम्हीही बायकांच्या सोसण्याविषयी लिहितोच की..' वगैरे वगैरे... इथपर्यंत ठीकच होतं; पण कविवर्यांचा राग टिपेला पोचला. माझी मुलाखत घेणाऱ्याला ते म्हणाले ः ""हिच्या संग्रहाची नावं पाहा ः "स्त्रीगणेशा', "वेणा'. दुसरी चांगली नावं सुचत नाहीत यांना. या सगळ्या स्त्रीवादी बायका बाहेर स्त्रीवादावर भाषण करतात आणि ते संपलं, की मग नवरा जेवायला थांबला असेल म्हणून घरी पळ काढतात. यांना निसर्ग दिसत नाही, यांना प्रेम दिसत नाही. बाकीच्या कवयित्री काय सोसत नाहीत? पण तरी त्या लिहितात ना प्रेमाविषयी? मग यांनाच काय झालं आहे? शोषणाशिवाय दुसरं काही नाहीच का लिहिण्यासारखं?'' वगैरे वगैरे... बरंच काही बोलले ते.

कसला राग होता तो? व्यवस्थेविरुद्ध बोलणाऱ्या स्त्रियांविषयी राग होता की आणखी काही, माहीत नाही; पण खरंच एवढा कर्कश झाला आहे का आमचा आवाज, असा प्रश्‍न पडला मला. असा प्रश्‍न अलीकडं अनेकदा पडतो. रोज बलात्काराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या ऐकत असतो आपण, कधी नवऱ्याकडून फसवल्या गेलेल्या, तर कधी "आपल्याला विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा अधिकारच आहे', अशा गुर्मीत वावरणाऱ्या पुरुषांसमोर हतबल झालेल्या स्त्रिया पाहत असतो आपण आपल्या आजूबाजूला. एखादी स्त्री नवऱ्याच्या लाथा-बुक्‍क्‍या खाऊन सुजल्या तोंडानं येऊन बसते आपल्यासमोर ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, तेव्हा त्या मुकाट बसलेल्या स्त्रीकडं पाहिल्यावर आम्ही काय करावं, अशी अपेक्षा आहे या समाजाची? माझ्या एका कवितेत मी म्हटल्याप्रमाणे ः "गावीत का गाणी फळा-फुलांनी बहरलेल्या तृप्त संसाराची आणि मानावेत त्यांचे आभार आमच्या डोळ्यांत चंद्र, फुलं-पाखरं पाहिली म्हणून?'

हे असे प्रश्‍न मनात असतानाच संजय पवार यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं "ठष्ट' हे नाटक पाहण्याचा योग आला आणि वाटलं ः "नाही, आमचा आवाज कर्कश झालेला नाही.' "तो कर्कश होत आहे,' अशी हाकाटी देऊन तो दाबण्याचा प्रयत्न मात्र होत आहे.
गेली कित्येक वर्षं बायका जिवाच्या आकांतानं त्यांच्या जगण्याचा पट उलगडून दाखवत आहेत...त्याकडं लक्ष वेधू पाहत आहेत...

कधी वेदनेचा सूर लावून, तर कधी आक्रमक होऊन त्यांच्या शोषणाचं गाणं गात आहेत; पण तरीही या व्यवस्थेनं बंद केलेले कान उघडून शांतपणे ऐकण्याची आणि त्यावर विचार करण्याची आमच्या पुरुषांचीच तयारी नाही. अशा वेळी "ठष्ट' या नाटकानं केलेलं काम महत्त्वाचं वाटलं. लग्न या एकाच गोष्टीवर अडकलेल्या स्त्रीच्या आयुष्याची गाडी पवार यांनी एका वेगळ्या वळणावर आणून ठेवली आहे. व्यवस्थेनं दिलेली भूमिका करून करून दमलेली स्त्री स्वतःचं आयुष्य स्वतःला हवं तसं जगण्याचा विचार करू शकते, हे तर त्यांनी दाखवलं आहेच; पण पुरुषी मानसिकतेवर कोरडेही ओढले आहेत. या नाटकातली अनामिका म्हणते ः "स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटची आता गरज नाही, तर पुरुषांच्या ओरिएन्टेशनची गरज आहे.' हे वाक्‍य स्त्रीपात्राच्या तोंडी असलं तरी पुरुषानं लिहिलं आहे, हे जास्त दिलासा देणारं होतं. पवार यांनी मांडलेला हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटला.

बायकांना सांगून झालं आहे. त्या स्वतःला या चौकटीबाहेर काढण्यासाठी उत्सुक आहेत; पण त्यांची ही उत्सुकता मारण्याचं काम पारंपरिक मुशीत घडवला गेलेला पुरुष आणि त्याच्या आजूबाजूच्या स्त्रियाही करत आहेत. त्यामुळं बदलू पाहणाऱ्या स्त्रियांना बदलता येईल, अशी परिस्थितीच निर्माण होत नाही आणि ती होत नसल्यानं आपल्याकडची मुलं आजही व्यवस्थेच्या त्याच आरशातल्या आपल्या प्रतिबिंबावर प्रेम करत आहेत. त्यामुळंच आता खरी गरज आहे, ती त्यांचे वर्ग घेण्याची!

आणि असे वर्ग घेण्याचं काम आज स्वतः पुरुष करत आहेत, ही आणखी समाधानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या नव्हे; तर देशाच्या कानाकोपऱ्यात असे लोक आपल्याला भेटतात. "मावा'सारख्या संघटना स्थापन करणारे पुरुष असोत, की "नारी समता मंच' किंवा स्त्रीमुक्ती संघटनांसारख्या अनेक संघटनांतून स्त्रियांसोबत काम करणारे पुरुष असोत, त्यांची संख्या कदाचित कमी असेल; पण गेली काही वर्षं स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती अशा शब्दांच्या झंझावातानं भेलकांडून गेलेल्या समाजात राहताना स्त्री-पुरुष नात्यात जो ताण निर्माण झाला आहे, तो ताण कमी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

केवळ बाईचंच नव्हे; तर साऱ्या माणूसजातीचं दुःख जाणणाऱ्या पुरुषांची संख्या अशीच वाढत गेली, तर कदाचित स्त्रीच्या शोषणाच्याच नव्हे; तर सर्व पातळ्यांवर होणाऱ्या शोषणाचा विचार केला जाईल. स्त्री-पुरुषांमधलं सामंजस्य वाढेल, मालकी हक्काची भावना जाऊन केवळ आदराची भावना निर्माण होईल...पण हे एवढं सोपं नाही. आपल्या मैत्रिणीकडून "टोटल डिझास्टर'ची अपेक्षा करणारे पवार यांच्यासारखे आणखी संवेदनशील लोक तयार व्हायला हवेत. आजही कथा-कवितेतून स्त्रीशोषणाचा विचार करणारे लेखक, कवी आणि सामाजिक चळवळीच्या व्यासपीठावरून स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे पुरुष आपल्या घरातल्या बाईला मात्र गृहीत धरत असतात. अशा काळात गरज आहे, ती आतून-बाहेरून पारदर्शक असणाऱ्या पुरुषांची. असे पुरुष असलेला आदर्श समाज निर्माण होईलच; फक्त घराघरातून त्या प्रकारचं शिक्षण मात्र दिलं गेलं पाहिजे. पुरुष स्त्रीपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण करू पाहणाऱ्या समाजानं बदलायला हवं. हे जर झालं तर खऱ्या अर्थानं बदल झाला, असं म्हणता येईल!

No comments:

Post a Comment