Friday, 20 September 2013

संगमनेरी! (रंगनाथ पठारे)

रंगनाथ पठारे rangnathpathare@gmail.com
रविवार, 1 सप्टेंबर 2013 - 02:00 AM IST

माणसाचं जन्मगावाशी तर जिव्हाळ्याचं नातं असतंच; पण तो कर्मभूमीशीही अनोख्या ऋणानुबंधानं बांधला जातो...कदाचित जन्मगावापेक्षाही जास्त! कर्मभूमीतली माणसं, तिथला निसर्ग, तिथला परिसर, तिथलं वातावरण हे सगळं जगण्यात असं काही मिसळून जातं, की या गावाशिवाय स्वतःच्या अस्तित्वाची कल्पनाही करवत नाही...ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि नगर जिल्ह्यातलं संगमनेर हे "अद्वैत' असंच आहे, त्याविषयी.. 

संगमनेरशी आज असलेलं माझं नातं कदाचित माझ्या जन्माच्या आधी ठरून गेलेलं असेल. माझे आई-वडील पुण्याजवळ कोथरूड (आता त्याला पुण्यातलं कोथरूड म्हणावं लागेल) या गावी राहत असताना मी माझ्या आईच्या पोटात होतो. दुसऱ्या महायुद्धात लढून आलेले माझे वडील तेव्हा ट्रक चालवत असत. माझा जन्म मात्र आमच्या जवळे या गावीच झाला. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मी गावी राहिलो. तिथंच मॅट्रिक झालो. नंतर शिक्षणासाठी चार वर्षं नगरला, तीन वर्षं पुण्यात आणि उरलेली 40 वर्षं संगमनेरात असा माझ्या आजवरच्या एकूण 63 वर्षांच्या आयुष्याचा सर्वसाधारण हिशेब आहे. उरलेल्या आयुष्यात मी आणखी कुठं कुठं थोडा फार राहीनही; पण माझी मुख्य छावणी संगमनेरातून हलण्याची शक्‍यता मला दिसत नाहीय. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे, मी या गावाच्या, या परिसराच्या निरंतर प्रेमात अडकलेलो आहे. माझा स्वभाव आणि माझ्या गरजा लक्षात घेता वरवर खरंतर तसं काही कारण नाही. वृत्तीतल्या अंगभूत अंतर्मुखतेमुळं मी कोणत्याही गावात राहिलो असतो, तरी जास्तीत जास्त काळ स्वतःच्या आतच राहिलो असतो. गाव आणि परिसराकडून माझ्या ज्या किमान अपेक्षा असतात, त्या कुठंही सहज पुऱ्या झाल्या असत्या; तरीही प्रेमात पडून मी ह्याच गावात राहिलो. कारण, हे गाव माझ्या स्वभावाशी अत्यंत जुळणारं आहे. "सौ शहरी और एक संगमनेरी' असं म्हणतात. त्यात एक गुर्मी, एक ताठा, एक अभिमान असतो आणि त्याच वेळी हे गाव आणि हा परिसर यांच्यात एक अनवट सुसंस्कृतपण आहे. आव्हान झेलण्याची खुमखुमी आहे. मूल्यांच्या जपणुकीसाठी कोणत्याही थराला जाण्याची जिद्द आहे. या बाकीच्या गोष्टी माझ्या ठायी कदाचित नसतीलही; पण एक प्रकारची गुर्मी आणि काहीएक सुसंस्कृतपण माझ्या ठायी आहे, असं मला वाटतं. माझ्यासारख्या बारक्‍या माणसातल्या अंगभूत गुर्मीला या शहरानं सांभाळून घेतलं, हे मला फार श्रेष्ठ वाटतं. इथल्या लोकांमधल्या लढाऊ जिद्दीचा मला अभिमान वाटतो. चारी दिशांनी कुठूनही संगमनेरच्या जवळ येऊ लागलो, की आपण आपल्या लोकांमध्ये चाललो आहोत, अशी भावना मनात उगवते. हे असं आणखी कुठंही जाताना होत नाही. दुनियेतल्या कोणत्याही जागी मला इतकं निवांत वाटत नाही. वाराणशीला गंगेच्या घाटावर गेलो, मन अनेक भावनांनी उचंबळून आलं; पण ते तात्कालिक होतं. संगमनेरातल्या प्रवरा नदीकाठच्या घाटावर इतक्‍या वेळा बसलो, तरी तिथं जाण्याची माझी तहान अजूनही मिटलेली नाही. (या घाटालाही इथं "गंगामाईचा घाट'च म्हणतात). नदी वाहत असताना रात्रीच्या निवांत-एकांतवेळी या घाटावर बसून स्वतःशी संवाद करण्यात जे सुख आहे, त्याला अक्षरशः तोड नाही.देव-धर्म, पूजा-अर्चा यांना माझ्या जगण्यात जागा नाही. संगमनेरची त्याविषयी तक्रार नाही. इथं आत्यंतिक श्रद्धाळूंपासून अगदी अश्रद्ध माणसं एकमेकांच्या धारणांचा आदर बाळगत सुखानं नांदतात. ही माणसं वृत्तीनं फार उत्कट आहेत. प्रसंगी कोणत्याही टोकाला जाण्याची क्षमता ते बाळगून असतात; पण तिथं ती फार काळ टिकत नाहीत. अल्प काळातच सहिष्णुतेच्या निरंतर कोमल गोफात परततात. आपण संगमनेरी आहोत, याचा त्यांना फार अभिमान असतो.

मी इतकी वर्षं या शहरात राहत असलो, तरी मला इथं फार लोक ओळखत नाहीत आणि ही मला फार सुंदर गोष्ट वाटते. मला माझं खासगीपण, अनामिकपण इथं सहज जपता आलं. अर्थात हल्ली नावानं बरेच लोक ओळखतात. माझा धाकटा मुलगा डॉ.अनिरुद्ध 2008 पासून इथं नेत्रशल्यचिकित्सक म्हणून प्रॅक्‍टिस करतो. हल्ली "त्याचे वडील' ही माझी ओळख असते. माझ्या लेखक असण्याचं पुष्कळांना तितकं माहीत नसतं. तेही मला छान वाटतं. ज्यांना माहीत असतं, ते ती माहिती स्वतःजवळ ठेवतात. कामाखेरीज तुम्हाला निष्कारण ताप देण्याचा या लोकांचा स्वभाव नाही. मी या शहरात राहतो, हे पुष्कळांना अभिमानाचं वाटतं. आजच्या काळात या शहराला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर मानानं उभं करण्यात आपला सहभाग आहे, हे मला सुखद वाटतं. के. बी. दादा देशमुख, दत्ता देशमुख, नानासाहेब दुर्वे, भाऊसाहेब थोरात यांच्यासारखी उत्तुंग माणसं या भूमीत जन्मली. त्यातल्या काहींना मला पाहता आलं, काहींशी संवाद करता आला, ही माझ्यासाठी श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. इथल्या गोरगरिबांमध्ये, आदिवासींमध्ये शिक्षण पेरणाऱ्या प्राचार्य वि. म. कौंडिण्यांसारख्या माणसाच्या नेतृत्वाखाली मला 20 वर्षं काम करता आलं, ही मला माझ्या आयुष्यातली मोठी मिळकत वाटते. काही वर्षांआधी कुणीतरी (बहुधा मराठा ज्ञातीचे अभिमानी) म्हणाल्याचं ऐकलं ः "पठारे यांच्यात फार मोठी कुवत होती; पण कौंडिण्यांच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं.'

मला अजूनही समजत नाही; माझं काय नुकसान झालं ? आणि झालंच असेल तर असं नुकसान आणखी हजार वेळा करून घ्यायला मी आनंदानं तयार आहे. (कै.) संभाजीराजे थोरात यांचं असाधारण अकृत्रिम मैत्र मला इथंच लाभलं. कुलीन मराठा घराण्यात जन्मलेल्या संभाजीराजे यांचा साहित्याशी दुरान्वयानंही संबंध नव्हता. तरीही आम्ही तासन्‌तास किंवा दिवसच्या दिवस एकमेकांसोबत आनंदानं राहत गप्पा करायचो. माझ्या घरगुती प्रश्‍नांत त्यांचा शब्द अंतिम असे. मला असं वाटतं, की एक वेगळ्या प्रकारची दिलेरी आणि चमत्कारिक भडकूपण हा आमच्यातला कॉमन फॅक्‍टर होता. आज या दुनियेत नसलेले दिलीप धर्म, व्ही. एस. उर्फ प्रकाश कुलकर्णी आणि हयात असलेले सु. रा. चुनेकर, अली मुल्ला खान वकील, रावसाहेब कसबे यांच्यासारखे मित्र मला इथंच मिळाले. यापैकी काहींशी आता माझा संपर्कही उरलेला नाहीय. काहींशी फार क्वचित तो होतो; पण त्यांनी माझं जगणं समृद्ध केल्याची कृतज्ञता माझ्या मनात कायम आहे. या मित्रांसोबत अनेक वैचारिक वाद झाले; किंबहुना अखंड वाद-विवाद, चर्चा हे या परिसराचं वैशिष्ट्यच आहे. इथं आलो तेव्हा मी अगदी रॉ होतो. माझी दुनिया फार सोपी-सरळ होती. "परीक्षेत अतोनात मार्क मिळवणारा तो बुद्धिमान' असा माझा बावळट समज होता. अहंगंड माझ्या ठायी अतोनात होता. त्या साऱ्याचा निचरा या शहरानं केला आणि मला सतत भूमीवर, गोरगरिबांविषयीच्या आस्थेच्या कवेत ठेवलं.

मी 1973 मध्ये संगमनेरात आलो. तेव्हा शहर लहान होतं. माझ्यासाठी खोली बघायला मी आणि दिलीप धर्म हिंडत होतो. त्या काळी बरेच प्राध्यापक चंद्रशेखर चौकाच्या परिसरात राहत असत. तो सामान्यतः ब्राह्मण ज्ञातीच्या वस्तीचा भाग होता. प्राध्यापकही बव्हंशी ब्राह्मणच असत. आम्ही गणपुले यांच्या वाड्यात जागा विचारण्यासाठी गेलो. त्या वाड्यात अत्रे, कुलकर्णी वगैरे आडनावांचे आमचे ज्येष्ठ सहकारी राहत होते. "जागा शिल्लक आहे,' असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. दिलीपनं माझी ओळख करून दिली. गणपुले म्हणाले ः ""पठारे म्हणजे मराठा काय?''
म्हटलं ः ""होय.''
म्हणाले ः ""म्हणजे आपण अभक्षभक्षण करत असालच.''
म्हटलं ः""अगदी रोज नाही; पण मला ते वर्ज्य नाहीय.''
म्हणाले ः ""आपणासाठी आमच्याकडं जागा नाही.''
बाहेर आलो. दिलीप वैतागला. म्हणाला ः ""फारच कर्मठ आहेत हे लोक.''
मी म्हटलं ः ""मला हा माणूस आवडला उलट. त्याचं जे काही आहे, ते त्यानं स्पष्ट आणि स्वच्छ मांडलं.''

आजही मला असं वाटतं, की हा खास संगमनेरी स्वभाव. आत-बाहेर वेगळं नाही. जे असेल ते स्वच्छ. नंतर मला तिथून जवळच वसंतराव ऊर्फ व्ही. आर. देशपांडे यांच्या वाड्यात जागा मिळाली. त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं होतं. सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना तिथं मुक्त प्रवेश होता. ते फारच आनंदी आणि स्वागतशील लोक होते. कर्मठता आणि प्रागतिकता एकमेकींच्या शेजारी गुण्यागोविंदानं नांदण्याचा हा खास संगमनेरी स्वभाव. तिथं मी एक वर्ष राहिलो. नंतर कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये मला जागा मिळावी म्हणून कसबे यांनी कौंडिण्यांकडं शब्द टाकला. कसबे हे त्यांचे थेट आणि आवडते विद्यार्थी. ही जागा कॉलेजच्या परिसरात असल्यानं अधिक सोयीची होती; म्हणून मी देशपांडे यांचा वाडा सोडला. तो वाडा मुळात पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणे असलेले निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशरामी यांचा होता.

नंतरचा सगळा काळ मी जुन्या शहराच्या गावठाणाबाहेर घुलेवाडी, गुंजाळवाडी अशा भागांत राहिलो. या परिसरानं मला इथं बांधून टाकण्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण माझे विद्यार्थी होत. सलग 37 वर्षं इथल्या मुला-मुलींशी मी जोडता राहिलो. त्यातल्या बहुतेकांची नावंदेखील मला आता सांगता येणार नाहीत; पण मी फार आनंदानं त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. मी स्वतःला त्यांच्या संगमनेरी स्वभावात पेरत राहिलो आणि त्यांच्यातलं संगमनेर माझ्यात घेत राहिलो. आता त्यांच्यात आणि माझ्यात कोणताही दुजाभाव राहिला आहे, असं मला वाटत नाही. मी लिहिणारा माणूस असल्यानं बाहेर पुष्कळांना वाटायचं, की शिकवण्यात मला खास रस नसेल. फिजिक्‍समध्ये मला तितकं स्वारस्य नसेल. मी कसा शिक्षक होतो, हे माझे विद्यार्थीच सांगू शकतील; पण शिकवणं ही माझी आवड होती, हे मी नक्की सांगेन. फिजिक्‍स वाचल्यामुळं मी दुनिया अधिक नीट समजावून घेऊ शकलो.आधी आधी मला वाटायचं, की आपण इतके बुद्धिमान (तो मूर्खपणा होता. परीक्षेत चांगले मार्क पडणं ही बौद्धिक उंचीची एकमेव कसोटी नव्हे. कारण, विश्‍लेषण करण्याच्या क्षमतेची आपल्या परीक्षापद्धतीत फारशी कसोटी लागतच नाही) आपण विद्यापीठात किंवा पुण्यात असं कुठंतरी असायला हवं. तेवढा लायक मी नक्कीच होतो; पण संगमनेर परिसरानं ते बिनमहत्त्वाचं करून टाकलं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये मी स्वतःचा चेहरा बघत आलो. ते माझ्यात त्यांचा चेहरा बघत गेले. बाहेर मला "संगमनेरी' म्हणून ओळखलं जातं. ते मला आवडतं. मला त्याचा अभिमान वाटतो..."सौ शहरी और एक संगमनेरी!

No comments:

Post a Comment