Monday, 23 September 2013

आडनावांच्या आडातलं साहित्य

राजन खान

By  on September 22, 2013
feature size
आपल्याकडे आडनावाची भानगड फार भारी आहे. समाजात तर आहेच, पण साहित्यक्षेत्रासुद्धा आहेच. एकेकाळी मी राजन खान या नावाने लिहायला सुरुवात केली. तेव्हा मनातले हेतू फार आणि उद्देश तर अतिशय उदात्त होते. पण काळ गेला न् आज मला राजन खान हे नाव समाजात आणि साहित्यात जगायला जबरदस्तच अडचणीचं ठरू लागलं आहे. माणसं तुमचं आडनाव पाहून तुमच्याशी काय बोलायचं, कसं वागायचं, तुम्हाला किती श्रेय द्यायचं न् किती मागं ढकलायचं, तुमच्या किती जवळ यायचं न् तुमच्यापासून किती लांब राहायचं हे ठरवतात.
साहित्यात आडनावांचा उपयोग जाती-जातींच्या आणि धर्मांच्या टोळ्या आणि गटबाज्या करायला केला जातो. पण अतिशय वाईट गंमत अशी आहे की, साहित्याच्या वर्गवार्या करायलासुद्धा लेखकांच्या आडनावांचा बेकार आणि सर्रास उपयोग केला जातो. लेखकाचं आडनाव काय आहे यावरून त्या लेखकाला कुठल्या गटात आणि त्याच्या लेखनाला कुठल्या वर्गवारीत बसवायचं ते ठरवलं जातं.
माणसांच्या दुनियेत एवढी गर्दी आहे की, तिथे एकमेकांची ओळख पटायला न् कळायला नावं ठेवण्याची प्रथा काढली गेली. कोण कुणाच्या पोटी जन्माला आलं हे कळायला पुन्हा आईवडिलांची नावं लावण्याची प्रथा सुरू झाली. आणि माणसाचा वंश कळायला आडनावाची प्रथा सुरू झाली. पण भारतात आडनावाची भानगड ही त्या माणसाची जात, पोटजात, धर्म, इत्यादी गोष्टी कळण्यासाठी आणि माणूस माणसापासून वेगळा काढण्यासाठीसुद्धा आणि खरं तर तेवढ्यासाठीच वापरली जाते.
समाजात जात-धर्म कळण्यासाठी आडनाव वापरलं जाणं हे अतिशय घाण आहे. पण साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आडनावांचा वापर जात-धर्म कळण्यासाठी केला जावा हे आणखीनच अतिशय अतिशय (असं हजारो वेळा अतिशय) घाण आहे. आज मराठी साहित्याची भयंकर दशा अशी आहे की, मराठीतला एकही लेखक नुसता लेखक किंवा साहित्यिक म्हणून ओळखला जात नाही, तर तो त्याच्या आडनावामुळे त्या त्या जातीचा किंवा धर्माचा म्हणूनच ओळखला जातो. मराठीतल्या एकाही लेखकाला निव्वळ लेखक म्हणून ओळख मिळतच नाही, तर तो त्याच्या जाती आणि धर्माचा प्रतिनिधी म्हणूनच ओळखला जातो. काही काही लेखक आपल्या आपल्या जातीचे मुखंड म्हणूनच उघडपणे साहित्यात वावरत असतात. आपल्या स्वतःच्या जातीची माती खपवायला ते साहित्याच्या बाजारात उतरलेले असतात. एकदा त्यांची माती खपली, लोकांचा त्यांच्यातला रस संपला की, त्यांचा बाजार उठतो. ते संपतात. पण काही लेखक असेही असतात, जे स्वतःच्या जाती-धर्माच्या बाहेर उठून काही लिहायला बिहायला बघतात, पण हाय रे नशिबा! लोकच त्यांच्याकडे त्यांच्या आडनावांवरून त्यांच्या त्यांच्या जाती-धर्मांचे प्रतिनिधी म्हणूनच पाहतात.
ही तर साहित्यातली आणखीनच घाण गोष्ट आहे. पुस्तकं वाचणारे लोकसुद्धा कोणत्याही लेखकाचं साहित्य नुसतं साहित्य म्हणून वाचतच नाहीत, तर त्या पुस्तकावर छापलेलं त्या लेखकाचं आडनाव आधी पाहतात, तो लेखक कोणत्या जाती-धर्माचा आहे याची मनाशी नोंद घेतात आणि मगच त्या जाती-धर्माच्या लेखकाचं पुस्तक वाचायला घेतात किंवा वाचायचं की नाही ते ठरवतात. मला स्वतःला आजवर असे असंख्य वाचक भेटले, जे मला पत्राने किंवा तोंडी बोलले की, बुवा, एकेकाळी आम्ही तुमचं लिखाणावरचं खान हे आडनाव वाचून ते वाचायचं टाळलं. खान मराठीत काय लिहिणार ना? मग एकदा चुकून वाचलं तुमचं न् मग तुमच्या प्रेमातच पडलो… ही आपल्या मराठी वाचन व्यवस्थेची भयंकर अवस्था.
हे फक्त माझंच नाही, तर मराठीतल्या तमाम लेखकांचं आहे. त्याचं आडनाव काय आहे त्यावर त्याचं लिखाण काय असतं ते वाचक जातीय-धार्मिक नजरेने जोखायला पाहतात. म्हणजे वाचकही साहित्याकडे नुसतं साहित्य या नजरेने पाहत नाहीत. तर त्यांचेही जातीय-धार्मिक आडाखे-तडाखे सुरू होतात. वाचनालाही असे जातीय धार्मिक निकष आडनावावरनं लावले जाणार असतील तर ही अवस्था अतिशय किळसवाणी आणि गलिच्छच आहे. लेखकाने काय लिहिलंय, काय दर्जाचं, काय लायकीचं लिहिलंय आणि साहित्य म्हणून ते मानवी जगण्याला काय धडा देतंय हे फक्त पाहिलं जायला हवं, पण तसं न होता, तो कुठल्या जातीचा, धर्माचा आहे हे त्याच्या आडनावावरून शोधून, मग ती जात आणि तो धर्म यांचे चष्मे नजरेला लावून जर त्याच्या पुस्तकातला मजकूर वाचला जाणार असेल तर ती गोष्ट हिणकस आणि हलकटच म्हणायला हवी.
१९८१च्या आसपास दलित साहित्याची लाट आल्यागत झालं. त्या लाटेने आणलेला एक निष्कर्ष असा होता, ज्या जातीचा लेखक असेल त्याने त्याच जातीचं लिहावं, दुसर्या जातीबद्दल लिहिण्याचा त्याला अधिकार नाही. साहित्य, खरं साहित्य म्हणून हा निष्कर्ष अमाप चुकीचा होता. जातिधर्मांमुळे वाट्याला आलेले भोग ज्याने त्याने आपापले लिहिले तर त्या भोगांचे संदर्भ अधिक खोल, अधिक गहिरे होतात हे खरंच आहे. पण एका जातीचं जगणं जाणून त्या जगण्यावर दुसर्या जातीचा माणूस लिहू शकणार नाही, ही गोष्ट मात्र खोटी. शेवटी लिहायचं तर फक्त माणसांवरच असतं. माणूस म्हणून नैसर्गिकपणा तर सगळ्याच माणसांमध्ये एकसारखाच असतो. माणसांच्या भावभावना, नवरसांचे आविष्कार यांमध्ये जातीय, धार्मिक भेद नसतात. निसर्गतः माणसामाणसांत भेद नसतात. जातीय, धार्मिक भेद हे कृत्रिम असतात आणि ते माणसानेच तयार केलेले असतात. तर माणसांनी तयार केलेल्या जातिधर्मांचा माणूस कोणत्याही जातीधर्माचा अभ्यास करून साहित्य प्रसवू शकतो. अभ्यास काही अवघड नसतो. जातिधर्मांसारखा पोकळ आणि मानवनिर्मित गोष्टींचा तर अजिबातच अवघड नसतो.
मी आजवर अनेक जातिधर्मांवर लिहिलं. अनेक जातिधर्मांची पात्रं माझ्या लिहिण्यात येत राहिली. वाचणारे लोक म्हणत राहिले, यातून तुमची नेमकी जात आणि धर्म कळत नाही. आणि मला विचारात राहिले की, हे तुम्हाला कसं जमतं?
काय अवघड आहे? ज्या जगात मी जन्माला आलो, त्याच जगातल्या कृत्रिम मानवी जातधर्मांबद्दल मला माहीत नसणार तर कुणाला माहीत असणार? मीही माणसांच्याच पोटी जन्माला आलोय. मला माणसांची जगण्याची व्यवस्था पाठ असणारच की. मी काही परग्रहावरून आलेला ‘एलियन’ नाही. त्यामुळे इथली व्यवस्था कळणं अवघड जावं…
राहिला माझी जात, धर्म न कळण्याचा प्रश्न. ती कशाला कळायला हवी? मी माणूस आहे एवढं पुरेसं नाही का? आणि लेखकाला कसला आलाय जात आणि धर्म? लेखकाला नसतंच ते जातधर्माचं इंद्रिय. नसायलाच पाहिजे. किमान मला तरी नाही. मी जातधर्मांच्या जीवावर जगणार नाही.
लेखक थोडा नावाजला जायला लागला की त्याच्या आडनावाच्या आतल्या जातीचा शोध सुरू केला जातो. वाचक तो घेतात आणि लेखक आवडला तर त्याचं वाचत राहतात. किंवा त्याचं वाचायचं सोडून देतात. पण साहित्यक्षेत्र हाताळायची ठेकेदारी घेतलेले जे लोक असतात, समीक्षक, पुरस्कार देणारे, सन्मान देणारे, पदं देणारे, अभ्यासाला पुस्तकं लावणारे, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा मुखवट्यांनी जातीय चळवळी चालवणारे लोक मात्र त्या लेखकाच्या आडनावाचा पिच्छा पुरवतात आणि आडून आडून किंवा स्पष्टपणे त्या आडनावाच्या मूळ जातीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात आणि मग त्या लेखकाला कसं वागवायचं, काय द्यायचं, आपण त्याच्याशी कसं वागायचं ते ठरवतात. आडनावातून हा लेखक आपल्या जातीचा आहे याचा शोध लागला की तो कोणत्याही गोष्टीला लायक असो नसो, त्याला धरून सर्वांर्थाने त्याचं भलं करायला निघतात आणि आपल्या जातीचा नाही असं कळलं की त्याला संधी मिळेल तिथे चेपायला, मागं ढकलायला पाहतात. आडनावांवरून मग साहित्यातली श्रेयाची, गटातटाची राजकारणं सुरू करतात. मराठी साहित्य सध्या अशा गटातटांच्या जातीय-धार्मिक राजकारणाच्या खातेर्यात नरकातल्या किड्यांप्रमाणे खितपत पडलं आहे.
मराठीत काही आडनाव फार घोळाची ठरतात. त्यातून बर्याच जातीय गंमती पण घडतात. पाटील, पवार, जाधव, शिंदे, गायकवाड, देशमुख, लाटकर, पाटकर, दळवी, साठे, देशपांडे, कुलकर्णी ही आणि अशीच बरीच आडनावं अनेक जातींमध्ये सापडतात. त्या त्या जातींचे लोक हे आडनाव आपल्यापैकी असेल असं समजून आधी एकमेकांना चिकटायला जातात. धागेदोरे शोधताना हे आडनाव आपल्यापैकी आहे असं कळलं तर मग चिकटणं घट्ट होतं. पण नंतर लक्षात आलं की हे आपल्यापैकी नाही, भलत्यापैकीच आहे तर मग एकमेकांपासून पळापळ सुरू होते. ही आडनावमैत्री आणि आडनावदुश्मनी मराठी साहित्यात सर्रास चालू असते. आडनावं साहित्यातला जातीय एकोपा किंवा जातीय दुरावा तयार व्हायला वापरली जातात.

No comments:

Post a Comment