By: संजय सोनवणी
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_4205.html
वैदिक धर्म आणि शैवप्रधान हिंदू धर्म हे सारत: भिन्न आहेत हे आपण हिंदू धर्माच्या बाबतीत विवेचन करतांना पाहिले आहे. वैदिक धर्म हा उभ्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करतो हेही उघड आहे. खरे तर वर्णव्यवस्था हेही मुळचे वैदिक धर्माचेही अंग नव्हते हे आपण पुरुषसुक्ताच्या संदर्भात चर्चा करतांना पाहिले आहे. परंतू नंतर कधीतरी ही व्यवस्था जन्माला आली आणि ती वैदिक धर्मियांनी स्वीकारली हेही खरे आहे.
आजच्या विषमतेचे मूळ या वर्णव्यवस्थेकडे जाते. वर्णव्यवस्था हीच मुलात वैदिक असल्याने जे अवैदिक आहेत, म्हणजे ज्यांचा गेली हजारो वर्ष वेदांशी संबंध आलाच नाही त्यांना ती लागू पडत नाही हेही तेवढेच खरे आहे. वेदोक्ताचा अधिकार असनारे आणि नसणारे हे सरळ उभे दोन तट भारतात पडलेले आहेत. वैदिक विरुद्ध अवैदिक हा संघर्ष, वैदिक धर्मियांना हिदू समजल्याने निर्माण झाला आहे व त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.
थोडक्यात वैदिक धर्मियांना हिंदू धर्मापासून वेगळे समजणे अत्यावश्यक बनलेले आहे. जेंव्हा वेदांचा जन्मही झाला नव्हता त्या काळात, म्हणजे सिंधुपुर्व काळातच लिंगपुजक धर्म अस्तित्वात आला होता. त्याचे भौतिक अवशेषही उपलब्ध आहेत. शैव तत्वज्ञान हे प्राय: लिंगपुजक, प्रतिमा-मुर्तीपूजक असून वैदिक अमूर्त इंद्र-वरुणादि देवतांचे यजन यज्ञातुन आहुती देत केले जात होते. मुर्तीपुजा वैदिक धर्म अस्तित्वात येण्यापुर्वीच्याच काळापासून केली जात होती. आजही ती सर्रास सुरु आहे. किंबहुना प्रचलित धर्म हा सर्वस्वी शैवप्रधान आहे. या धर्मात वर्णव्यवस्थेला कधीही स्थान नव्हते. जे काही अल्प-स्वल्प मिळाले ते वैदिकांच्या सहवासाने. परंतू वैदिक धर्मियांनी वर्णव्यवस्थेतील उच्च स्थान मात्र त्यागले नाही. त्यातुनच उच्च-नीचता सुरू झाली. अनुकरणातून आलेली ही उच्च-नीचता दूर करण्याचे प्रयत्न शैवांनी वारंवार केलेले आपल्याला दहाव्या शतकानंतरच्या इतिहासात दिसतात. पण त्यात अद्याप तरी यश आलेले नाही. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मही आपल्याच धर्माचा भाग आहे ही भ्रामक समजुत!
परंतु ती समजूत ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावरच आपल्याला दूर करावी लागणार आहे. वेदमाहात्म्य-वेदमान्यता या गोष्टींचे अवदंबर गेली शतकानुशतके माजवले गेले आहे त्यातून बुद्धीभेद होणे स्वाभाविक होते. परंतू ज्या ९५% समाजाला वेदाधिकारच नाही तर ते वैदिक कसे हा प्रश्न समाजाला कधी पडला नाही. आणि जर ते वैदिक नव्हेत तर मग वेदआधारित वर्णव्यवस्था मान्य करण्याचे कारणच काय हाही प्रश्न कधी पडला नाही. प्रत्येक धर्माची आपापली व्यवस्था असते जशी ती वैदिक धर्मियांची होती. ती असूदेत. पण जे त्या धर्माचेच नव्हेत त्यांनी ती व्यवस्था मान्य करण्याचे व त्याआधारीत आपले समाजजीवन ठरवायचे कारण काय?
पहिली बाब म्हणजे शिव-गणपती, पार्वती ते मुर्ती रुपात अनेक देवतांचे जेही लोक पूजन करतात ते शैवप्रधान हिंदू होत. पुजा ही मुलात अवैदिक आहे. हा शब्द द्राविड भाषेतील आहे. धुप-दीपांनी पुजा केली जात असल्याचे अनेक पुरावे सिंधू संस्कृतीतील उत्खननांनी आता आपल्याला उपलब्ध करुन दिले आहेत. ते मी क्रमश: पुढील भागांत देणारच असल्याने त्याबद्दल येथे एवढेच.
जातीसंस्था ही शैवांची देणगी आहे जी दहाव्या शतकापर्यंत अत्यंत लवचीक होती, नव्या जाती बनत होत्या तर अनेक जाती नष्ट होत होत्या हे मी जातिसंस्थेच्या इतिहासात स्पष्ट केले आहे. जातीबदल हा सहज होत होता. दहाव्या शतकानंतर आर्थिक, राजकीय संकटे कोसळल्याने क्रमश: जातीसम्स्था बंदिस्त होत गेली हेही मी त्या लेखमालिकेत स्पष्ट केले आहेच. जर जाती नष्ट होत होत्या, नव्या व्यवसायाधारित बनत होत्या तर याचा अर्थ एवढाच आहे कि जाती जशा बनू शकतात तशाच त्या नष्टही होत राहतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपुष्टात आलेले आहेत. नवे असंख्य व्यवसाय जन्माला आलेले आहेत. त्यामुळे जन्माधारित जातिसंस्था विसर्जित करण्याची वेळही आलेली आहे. परंतू वर्णव्यवस्थेच्या पगड्यामुळे व सामाजिक सुरक्षेच्या कारणांमुळे लोकांना जात जपणे आवश्यक वाटते. जी गोष्ट आपल्या धर्माची नाही ती जपणे हाच मुळात अधर्म नव्हे काय? जातिसंस्था ही वर्णव्यवस्थेप[रमाणे उभी नसून आडवी संस्था आहे. म्हणजेच सर्व जाती या समान दर्जाच्या आहेत. वर्णव्यवस्था मात्र विषमतादर्शक आहे. ती जे लोक जपतात त्यांनी खुशाल जपावी. परंतू हिंदू धर्मात वैदिक धर्मीय बसत नसल्याने हिंदुंनी वर्णव्यवस्था त्यागली पाहिजे.
जे लोक वेद/ वेदोक्त कर्मकांड/संस्कार व वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवतात व आचरणही करतात ते वैदिक धर्मिय असून जे अवैदिक आहेत, मुर्ती/लिंगपुजक आहेत ते सर्वस्वी अवैदिक असून शैवप्रधान हिंदू धर्मीय आहेत...म्हनजेच एकार्थाने खरे हिंदू आहेत. या धर्मात घुसलेली वैदिक तत्वे अमान्य करणे निकडीचे असून समतेच्या मार्गातील मोठा अडथळा आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
तसेच, आपले लग्न लावायला ज्याप्रमाणे मौलवी अथवा फादर आपण बोलावत नाही त्याच प्रमाने, वैदिक धर्मीय हे स्वतंत्र धर्माचे असल्याने, त्यांना बोलावू नये. गुरव-जंगम यांच्या मार्फत अथवा स्वता:च विवाह लावावेत...पुजा कराव्यात.
वैदिक धर्मात, आधीच सांगितल्याप्रमाणे, मुर्तीपुजेला स्थान नाही. काही वैदिक लोक तेही काम करतात...हा त्यांचा द्वै-धर्मीपणा आहे, जो खरे तर त्यांच्याही धर्माच्या दृष्टीने पाखंडीपणा आहे. हा गोंधळ त्यांचा त्यांनी हटवावा.
वैदिक धर्मीय हिंदू नव्हेत. हिंदू शब्द सिंधुवरुन आला आहे. सिंधू संस्कृती ही आपल्याच पुर्वजांनी निर्माण केली व प्राकृतीक धर्म वाढवला. त्या धर्माचे हजारो वर्ष आपण जतन जोपासना करत आलो आहोत. त्यात कालौघात काही वैदिक पुटे बसलीत पण ती सहज दूर करता येतील.
थोडक्यात वर्णव्यवस्था सर्वस्वी नाकारने व वैदिक पगडा झुगारुन देत आपला मुळचा समतेचा धर्म जोपासत "सर्व जाती एकसमान" हा मुळचा आदर्श जोपासावा.
शैव धर्माची पुरातनता पुढील लेखात देत आहे.
Pls read this also
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
No comments:
Post a Comment