जवळच्या गुणी माणसाचा मृत्यू फार हादरवून सोडतो. मृत्यूपुढे तर्कबुद्धी लुळी पडते. जन्माला आलेला प्रत्येकजण एक ना एक दिवस मरणार आहे हे माहित असलं तरी आप्तजणांचा मॄत्यू धक्का देतोच.विशेषत: चांगली माणसं जेव्हा लौकर जातात तेव्हा कडा कोसळावा किंवा ढगफुटी व्हावी असं काहीतरी भीषण उत्पाती होतं. आयुर्मान वाढल्याच्या आजच्या काळात ४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा. डा‘. शर्मिला रेगे यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा. त्यांचे १३जुलै २०१३ रोजी निधन झाले. त्या फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. शरीर कर्करोगाने पोखरले तरी शेवटपर्यंत त्या आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली निष्टावंत संशोधक! तरूण विदुषी! मिशनरी झील असलेली हाडाची शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन "फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू : बी. आर. आंबेडकर्स रायटिंग ऑन ब्राह्मनिकल पॅट्रिअॅर्ची", " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज", "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज", "लोकप्रिय संस्कृती व भारतातील आधुनिकता: लिंगभाव परिप्रेक्ष्यातून","स्त्रीवाद: जागतिक / स्थानिक द्वैताच्या पलिकडे" आदी ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते.ही संशोधनात्मक पुस्तके व जातीव्यवस्था आणि लिंगभाव या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अनेक शोधनिबंध हा विचारवंत, अभ्यासक, पुरोगामी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिनाच आहे. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले.
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा?
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
दिल्लीच्या एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.
सावित्रीबाईंच्या या लेकीला, अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत.आज माझ्या नात्यातले, कुटुंबातले खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्या या ज्ञानमार्गी विदुषीला.सामाजिक समतेचा आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्या शर्मिलाताईंना अभिवादन.स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट. खूपच मोजक्या लोकांना हे जमले.आपल्या देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी, प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे या मोजक्या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत, त्यांच्या पंक्तीत बसणार्या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.दाद कुठे मागायची? कशी मागायची?
No comments:
Post a Comment