Saturday, 23 August 2014

विशेष सिद्धहस्त

विशेष

अल्पपरिचय : सिद्धहस्त



http://www.loksatta.com/vishesh-news/homage-to-ur-ananthamoorthy-802145/#.U_gVqxtbUUw.facebook

राजकारणापासून स्वतस अलिप्त ठेवणाऱ्या साहित्यिकांची मांदियाळीच सर्वत्र दिसत असतानाच्या काळात कोणत्याही दडपणाखाली न येता आपले राजकीय-सामाजिक विचार व्यक्त करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून यू. आर. अनंतमूर्ती यांचे नाव घ्यावे लागेल. नातेसंबंधांवर होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या परिणामांचा आपल्या साहित्यातून वेध घेणारा, दुखाकडेही लहान मुलाच्या निरागसतेने पाहणारा हा कसदार 'भारतीय' लेखक कर्नाटकातील नवोदय साहित्य चळवळीचा 'सेनापती' होता.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील मेलिगे गावचा त्यांचा जन्म. जन्मतारीख २१ डिसेंबर १९३२. प्राथमिक शिक्षण दुर्वासपुरातल्या संस्कृत शाळेत. अगदी पारंपरिक पद्धतीने. पुढे ते तीर्थहळ्ळी, म्हैसूर येथे शिकले. म्हैसूर विद्यापीठातून एमएची पदवी संपादन केली. तेथून राष्ट्रकुल शिष्यवृत्ती घेऊन ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. पण खेडय़ातले बालपण आणि संस्कृत शाळेतून झालेले शिक्षण यामुळे अस्सल देशी पंरपरेशी झालेली 'अंतर्बाह्य़' ओळख कधीच पुसली गेली नाही. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिगहॅम विद्यापीठातून राजकारण आणि साहित्य या विषयावर डॉक्टरेट मिळविली. यातून घडलेली त्यांची विचारमूर्ती त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहिली. वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांची होणारी मानसिक स्थिती, कर्नाटकातील ब्राह्मण कुटुंबांपुढील आव्हाने, कुटुंब व्यवस्थेतील ताणेबाणे, कुटुंबातील नातेसंबंधांवर झालेले बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे  परिणाम, नोकरशहा व राजकारण यांचे संबंध असे अनेक विषय त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी राहिले. सूर्याणा कुदुरे (द ग्रासहॉपर), मोवनी (सायलेंट मॅन), संस्कार, भाव, भारती, पुरा, अवस्थे, बारा (दुष्काळ) या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. विविध भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले.
साहित्य क्षेत्राबरोबरच ते शिक्षण क्षेत्रातही रमले. ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठातील इंग्रजी विभागात रूजू झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, एबरहार्ड कार्ल्स विद्यापीठ, आयोवा विद्यापीठ, टफ्ट्स विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ येथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष (१९९२), साहित्य अकादमीचे अध्यक्ष (१९९३ ) अशी पदेही त्यांनी भूषविली.
साहित्यिक चळवळींप्रमाणेच राजकीय चळवळींमध्येही ते रमले. केवळ वैचारिक पातळीवरच नव्हे, तर प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणात उतरून त्यांनी राजकीय व्यवस्थेचा अनुभव घेतला. लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक त्यांनी लढविली होती. विचाराने ते 'देशी' डावे. तरीही कर्नाटकातील दहा शहरांची नावे बदलावीत. परंपरेने आलेली नावे कायम करावीत अशी सूचना करण्यास ते कचरले नाहीत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देशांतर करू अशी घोषणा करून वाद अंगावर घेण्यासही ते बिचकले नाहीत. महाभारतातील उल्लेखांनुसार ब्राह्मण गोमांसभक्षण करीत असत, या त्यांच्या विधानाने असाच मोठा वाद झाला होता. ख्यातनाम साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या 'आवरण' या कादंबरीवर त्यांनी सडकून टीका केली. त्यावरून त्यांना स्वतलाही टिकेचे धनी व्हावे लागले. त्या कटू अनुभवामुळे  पुढे त्यांनी साहित्यिक कार्यक्रमांत भाग घेणेच बंद करण्याचा निर्णय घेतला. हीच बंडखोर वृत्ती त्यांच्या खासगी जीवनातही दिसली. १९५६ मध्ये त्यांनी विवाह केला तो जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन इश्टर या ख्रिस्ती तरूणीशी. आपल्या पत्नीसह गेली अनेक वर्षे ते बंगळुरूमध्ये राहात होते. पण त्यांचे प्रेम होते म्हैसूरवर. तेथे गेल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक म्हणून माझी सर्व रूपे आठवतात, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. दहा वर्षे बंगळुरूत राहिल्यानंतर तेथे परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती पण ती अपूर्णच राहिली..  
आणि साहित्याची दिशा बदलली..
अनंतमूर्ती यांच्या संस्कार या कादंबरीने तत्कालीन साहित्यविश्वात एकच खळबळ उडवून दिली. एका सनातनी ब्राम्हण घरातील विरोधाभासावर ही कादंबरी बेतली होती. त्या कादंबरीवर अनंतमूर्ती यांनी बालपणात व्यतीत केलेल्या कालखंडाचा प्रभाव होता. त्यामुळेच ती कादंबरी अनुभवाधारित ठरली. पुढे या कादंबरीवर चित्रपटही निघाला. समांतर सिनेविश्वात या चित्रपटाने मानाचे स्थान मिळवले. १९७० साली सवरेत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटास मिळाला. प्रस्थापित मूल्यांना आव्हानण्याचे धाडस अनंतमूर्ती यांनी आपल्या साहित्यकृतीतून दाखविले. म्हणूनच त्यांना नवोदयवादाचे प्रणेते म्हटले जाई. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी प्रेम विवाह केला. हा विवाह एका ख्रिश्चन युवतीशी होता. त्यांच्या या आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अनंतमूर्ती यांनी १९९२ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टचे अध्क्षपद आणि १९९३ मध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्षपद भूषविले होते.
पुरस्कार
'१९८४  राज्योत्सव पुरस्कार
'१९९४ ज्ञानपीठ पुरस्कार
'१९९५ मास्ती पुरस्कार
'१९०८ पद्मभूषण
'२००८ नादोजा पुरस्कार (कर्नाटक विद्यापीठ)
'२०११ द हिंदू लिटररी प्राइज
'२०१२ कोलकाता
विद्यापीठाची डी.लिट
लघुकथा संग्रह
एनडेनधिगु मुगियाडा काथे, मौनी, प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८)ो, क्लिप जॉइंट, घट श्रद्धा, आकाशा मट्टू बेक्कू,
इराडू दशाकाडा काटेगालू,
ऐडू दशकडा काटेगालू
कादंबऱ्या
संस्कार, भारतीपुर,
अवस्थे, भाव, दिव्य
नाटके
आवाहने, कवितासंग्रह, १५ पद्यागालू, मिथुना, अजाना हेगाला सुकूगालू, समीक्षा,
प्राजने माथू परिसरा, सन्नीवेशा सनमक्षमा, पूर्वापारा, युदापल्लटा, वाल्मिकीय नेवदल्ली, मातू शोथा भारता, सद्या मट्टू शाश्वता
पत्रकारिता
संपादक- रूजवाथू
कादंबऱ्यांवरील चित्रपट
संस्कार, बारा,
अवस्ते, मौनी, दीक्षा
जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी सॉमरसेट मॉम हे जगभर एक लहानशी वही घेऊन हिंडले तर काफ्का या विचारवंताने याचसाठी एका खोलीत बसून शांतपणे चिंतन करण्याचा पर्याय स्वीकारला असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात, काफ्का यांना गवसलेले जीवनाचे सार अधिक रसरशीत आणि जिवंत होते.
***
मानवाची सर्वोच्च अध्यात्मिक प्रेरणा कोणती या प्रश्नाचं उत्तर: समतेची तीव्र भूक
***
ज्या जबाबदारीने आणि तीव्रतेने आपण आपले प्रेम लपवितो, तितक्याच तीव्रतेने आपण आपली बांधिलकीही लपवायला हवी.
***
समतेच्या माध्यमातूनच उत्तमतेची निर्मिती शक्य आहे. देशातील अनेक जाती, गटांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव हेच भारताला कमी नोबेल पारितोषिके मिळण्याचे प्रमुख कारण आहे. शिक्षणाने सर्वागिण बुद्धिमत्तेचा सन्मान राखायला हवा.
श्रद्धांजली..
यु.आर.अनंतमूर्ती यांच्या निधनामुळे कन्नड साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात मनापासून सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
***
अनंतमूर्ती यांच्या निधनाने केवळ कन्नड नाही तर भारतीय साहित्यातील तेजस्वी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ब्राह्मण समाजातील चुकीच्या रूढी व त्यामुळे लोकांची होणारी दयनीय अवस्था यांचे प्रभावी चित्रण त्यांनी लेखनातून केले. पात्रांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण व त्यातून घेतला जाणारा समाजाचा वेध हे त्यांच्या साहित्याचे लक्षणीय रूप होते. समाजवादावरील निष्ठा आणि मूलतत्त्ववादी हिंदुत्ववादाचा विरोध त्यांच्या लेखनातून दिसला. प्रागतिक विचारांवर श्रद्धा आणि समाजाच्या आधुनिकतेची चिंता असल्याने अनंतमूर्ती यांना विशिष्ट गटांचा प्रखर विरोध झाला. तरीही ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत.
- चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ समीक्षक  
***
अनंतमूर्ती हे राष्ट्रीय पातळीवर एक अत्यंत महत्त्वाचे लेखक होते. शेवटपर्यंत त्यांनी प्रतिगामी आणि सांप्रदायिक विचारांना प्राणपणाने विरोध केला. आपल्या भूमिकांवर ठाम निष्ठा असणारे फार कमी लेखक असतात. अशा लेखकांपैकी अनंतमूर्ती हे एक महत्त्वाचे लेखक होते. त्यांची नाटके आणि इतर साहित्य हे भारतीय साहित्यविश्वात नवे आदर्श निर्माण करणारे ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे आज भारतीय साहित्य जगताला मोठे दु:ख झाले आहे.
- नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक
***
यू. आर. अनंतमूर्ती हे कन्नड साहित्यातील व कर्नाटकातील एक मोठे नाव होते. नव्य साहित्य प्रकार किंवा आधुनिक साहित्यातील गद्य लेखनाचे अध्वर्यू असे त्यांना म्हणावे लागेल. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे नवीन प्रवाहाचा त्यांना परिचय होता. बालपण कर्मठ वातावरणात गेल्यामुळे भारतीय संस्कृतीची चांगली माहिती त्यांना होती. काही दोषांचाही त्यांना अनुभव होता. त्यांच्या कथांमधून हे दोषही व्यक्त होतात. कन्नडमध्ये त्यांच्या ३० ते ३५ कथा व पाच-सहा कादंबऱ्या आहेत. त्यांचे साहित्य संख्येने कमी, पण गुणवत्तेने हे साहित्य मोठे आहे. या साहित्याने कन्नड साहित्यावर प्रभाव टाकला. विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपले विचार ते निर्भीडपणे मांडत होते. त्यामुळे वाद झाले, त्यांच्यावर टीकाही झाली, पण मनात आलेले विचार त्यांनी सतत निर्भीडपणे मांडले.
 - उमा कुलकर्णी, प्रसिद्ध अनुवादिका

No comments:

Post a Comment