सौजन्य: एक रेघ
http://ekregh.blogspot.in/
SATURDAY, MAY 10, 2014
कॉम्रेड शरद् पाटील : अलविदा (राहुल सरवटे यांचा लेख)
भारतीय इतिहासासंबंधी प्रचंड उत्खनन केलेले, डाव्या विचारांच्या चळवळीचे कार्यकर्ते राहिलेले कॉम्रेड शरद् पाटील यांचं १२ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. अपवाद सोडता, बहुतेक मराठी वर्तमानपत्रांनी एक कॉलम, फारतर दोन कॉलम अशा बातम्यांमधे पाटलांचं प्रकरण संपवलं. एखाद्-दोन ठिकाणी इकडून तिकडून माहिती जमवून लिहून टाकल्यासारखे अग्रलेख आले, बाकी चळवळीतल्या मंडळींचे काही लेखही आले- ते बरेचसे कंटाळवाणे हळवे सूर उगाळणारे आणि पाटलांच्या मूळ कामाचा तोकडा उल्लेख करून संपलेले. पाटलांच्या कामाबद्दल फारच कमी उल्लेख होणं, हे प्रचंड निराशाजनक आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांमधे साध्या बातम्याही नाहीत, पण तिथं आशेला जागाही नव्हती. पाटील जिवंत असतानाच त्यांच्या कामाबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते काम तुलनेनं सुलभ पद्धतीनं पोचवण्याचं काम माध्यमांनी करायला हवं होतं. मासिकं, साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, अशी काही रचना टप्प्याटप्प्यानं असं करू शकते. पण आपल्याकडं असली काही रचना नाहीच. मासिकं-साप्ताहिकं कशाला काढतात काय माहीत! आणि- मग्रुरी, आकस, सॉफ्ट टार्गेटांवर सोईनं शेरेबाजी नि जिथं गरजेचं आहे तिथं नांगी टाकून वांगी खाण्याची वृत्ती एवढाच वर्तमानपत्रांचा अवतार राह्यलाय. त्यामुळं पाटील गेल्यावर गोंधळ होणार होताच, तो झालाच. वृत्तवाहिन्यांबद्दल बोलूया का? नकोच. वास्तविक पाटील गेल्यावर तरी त्यांच्या कामाबद्दल खोलवर बोलण्याची भीषण संधी साधायला काय हरकत होती.
असं सगळं असताना ह्या बारक्या कुवतीच्या 'रेघे'वर आपण काय करू शकणारोत? शिवाय पाटलांच्या कामाचा विषय हा आपल्या किमान वाचनाचाच विषय राहिलेला, त्यामुळं पाटलांना अखेरचा सलाम आपण करणार कसा? शिवाय पाटलांच्या कामावर विद्यापीठीय वर्तुळांबाहेर बोलायचं तर कसं बोलायचं? विद्यापीठीय माणूस शोधून 'रेघे'च्या वाचकांपर्यंत त्याचा मजकूर कसा न्यायचा? मुळात एवढं असं करायचंच कशाला? असेही प्रश्न विचारता येतील. ह्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर असं : शरद् पाटील यांनी जे काही काम केलं, ते जसं कसं केलं असेल, त्या सगळ्या मागं त्यांचे अपार कष्ट स्पष्ट दिसतात, शिवाय कामावरची निष्ठा नि प्रामाणिकपणा पण त्यांच्या लिखाणात आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ ह्या दृष्टीनं खरोखरच झटापट करण्यासारखा आहे). तर, अशा मूल्यांसकट साधारण नव्वद वर्षं आपल्या परिसरात जगलेला माणूस आपल्यातून गेला, तर त्याची किमान बूज ठेवणं, एवढं तरी काम पत्रकारितेकडून अपेक्षित आहेच ना. अनेक माणसं जातात, त्यांची बूज आपण 'रेघे'वर प्रत्येक वेळी ठेवू शकतोच असं नाही. पण प्रयत्न करतो. पाटलांच्या बाबतीतला प्रयत्न महिनाभर केल्यानंतर निराशेतच संपणार होता, पण तेवढ्यात एक मजकूर सापडला.
असं सगळं असताना ह्या बारक्या कुवतीच्या 'रेघे'वर आपण काय करू शकणारोत? शिवाय पाटलांच्या कामाचा विषय हा आपल्या किमान वाचनाचाच विषय राहिलेला, त्यामुळं पाटलांना अखेरचा सलाम आपण करणार कसा? शिवाय पाटलांच्या कामावर विद्यापीठीय वर्तुळांबाहेर बोलायचं तर कसं बोलायचं? विद्यापीठीय माणूस शोधून 'रेघे'च्या वाचकांपर्यंत त्याचा मजकूर कसा न्यायचा? मुळात एवढं असं करायचंच कशाला? असेही प्रश्न विचारता येतील. ह्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर असं : शरद् पाटील यांनी जे काही काम केलं, ते जसं कसं केलं असेल, त्या सगळ्या मागं त्यांचे अपार कष्ट स्पष्ट दिसतात, शिवाय कामावरची निष्ठा नि प्रामाणिकपणा पण त्यांच्या लिखाणात आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ ह्या दृष्टीनं खरोखरच झटापट करण्यासारखा आहे). तर, अशा मूल्यांसकट साधारण नव्वद वर्षं आपल्या परिसरात जगलेला माणूस आपल्यातून गेला, तर त्याची किमान बूज ठेवणं, एवढं तरी काम पत्रकारितेकडून अपेक्षित आहेच ना. अनेक माणसं जातात, त्यांची बूज आपण 'रेघे'वर प्रत्येक वेळी ठेवू शकतोच असं नाही. पण प्रयत्न करतो. पाटलांच्या बाबतीतला प्रयत्न महिनाभर केल्यानंतर निराशेतच संपणार होता, पण तेवढ्यात एक मजकूर सापडला.
हा मजकूर राहुल सरवटे यांचा आहे. राहुल हे न्यूयॉर्कमधे कोलंबिया विद्यापीठात '१८४८ ते १९२० ह्या काळातल्या मराठी वैचारिक परंपरेच्या विकासाचा जातिव्यवस्था विषयक आकलनाच्या विशेष संदर्भात अभ्यास' करतायंत. आणि दिल्लीतल्या नवयान प्रकाशनासाठी शरद् पाटलांच्या 'मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही करतायंत. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाटलांबद्दल लिहिणं योग्य वाटलं. त्यांनी 'नवयान'च्या संकेतस्थळावर यासंबंधी इंग्रजीतून टिपण लिहिलेलं आहेच. शिवाय मराठीतून 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावर त्यांनी काही मजकूर लिहिलेला आहे. या दोन्ही मजकुरांमधून, शिवाय 'ऐसी अक्षरे'वरच्या त्यांच्याच प्रतिक्रियांची भर टाकत एक एकसंध मजकूर राहुल यांच्या परवानगीनं आपण 'रेघे'साठी तयार केला, त्यांनी पडताळल्यानंतर तो आता रेघेवर प्रसिद्ध होतो आहे. राहुल यांचे आभार.
आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना पाटलांच्या म्हणण्याचा काहीएक प्राथमिक अंदाज यावा, हा रेघेवरच्या या नोंदीचा मुख्य हेतू. या म्हणण्याचं समर्थन, त्यावरची टीका, असा मजकूरही वास्तविक तज्ज्ञ व्यक्तींकडून उभा करायला हवा. आपल्याला रेघेवर सध्या तसं करणं शक्य नाही. शरद् पाटलांना डिबेट घडवायची आस आयुष्यभर राहिली, पण मराठीतल्या अशा डिबेटसाठीच्या जागा खंगून खंगून कधीच मरून गेल्यात. तरीही- वाचूया हा एक लेख.
शरद् पाटील (१७ सप्टेंबर १९२५ - १२ एप्रिल २०१४) [फोटो : 'नवयान'च्या संकेतस्थळावरून] |
शरद् पाटील : महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा शेवटचा आवाज
- राहुल सरवटे (rahul.sarwate@gmail.com)
डॉ. आंबेडकरोत्तर काळातील कदाचित सर्वश्रेष्ठ जाती-विरोधी विचारवंत/कार्यकर्ता, शरद् पाटील यांचे गेल्या १२ एप्रिल रोजी धुळे मुक्कामी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कार्ल मार्क्सच्या 'दास कापितल' ह्या महाग्रंथातले चुकलेले बीजगणित उलगडून दाखवणारा; बुद्ध आणि मार्क्स ह्या महा-दर्शनिकांचा समन्वय करणारा; जात निर्मूलनासाठी नवे चर्चाविश्व निर्माण करणारा, अवैतनिक जीवनदायी कार्यकर्ता-विचारवंत... शरद् पाटील हे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच ओळीत घेता येणारे नाव आहे. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा प्रबोधनाचा (Enlightenment) वारसा सांगते. ह्यात अनेक ब्राह्मणी - नेमस्त, जहाल, सुधारणावादी, पुनरुज्जीवनवादी आणि अब्राह्मणी, भक्ती मार्गी, अवैदिक, बौद्ध - असे अनेक विचारवंत येतात. त्यांच्या परस्पर झगड्यातून, विमर्शातून मराठी वैचारिक परंपरा घडली. कॉम्रेड पाटील हे ह्या परंपरेला समृद्ध करणारे, तिचा पाया तात्विक दृष्टीने दृढ करणारे कदाचित शेवटचे विचारवंत. आपला आजचा परिवर्तनवाद (मार्क्सवाद/आंबेडकरवाद) प्रबोधन काळातली जाती-निर्मूलनाची भाषा साफ विसरलाय. कॉ. पाटलांचा मृत्यू ह्या अर्थाने एका काळाचा शेवट आहे.
मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती - २००८ |
मावळाई प्रकाशन, चौथी आवृत्ती- २०१० |
ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात. ह्या समन्वयाचे त्यांचे सूत्र आहे - "मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र आहे - शोषणशासनाधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्या मधील लढ्यांचा आहे; तर भारतीय इतिहासाचे फुल्यांनी दिलेले सूत्र आहे - बळीराजाच्या अंतापासूनचा भारतीय समाजाचा इतिहास आर्य द्विज आणि अनार्य शूद्र यांच्यामधील वर्णजाती लढ्यांचा आहे. ह्या दोन्ही सूत्रांचे विधायक नकारकरण आपल्याला मा-फु-आच्या सूत्राकड़े नेते : शोषणाधारित समाजाच्या उदयापासून वसाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास हा वर्ण-जाती-जमाती ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे तर वसाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास हा वर्ग-जाती-जमातींच्या लढ्याचा इतिहास आहे" (पाटील १९९३: १५). नकारकरण हा शब्द पाटील sublimationसाठी प्रतिशब्द म्हणून वापरतात. ह्याचा अर्थ 'नकार देणे' असा नसून, ह्या प्रवाहांना 'नव्या रुपात परिवर्तित करणे' असा आहे.
पाटलांच्या चिकित्सक चौकटीत भारतीय इतिहास हा अश्या प्रकारे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारांच्या सततच्या संघर्षाचा इतिहास आहे. पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दांत - "सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिन्नपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादानेच होऊ शकते" (पाटील, १९९३: १६). मा-फु-आ हे अशा प्रकारे नव्या वर्ग-वर्ण-जाती निर्मूलनाचे क्रांतिशास्त्र बनले. (पाटलांच्या खोल आणि व्यापक वाचनाचा पडताळा सतत त्यांच्या लिखाणात दिसतो. उदाहरणार्थ, पतंजलीने केलेल्या पाणिनीवरील टीकेचा संदर्भ देऊन पाटील ही ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विभागणी भारतीय दर्शनशास्त्रातसुद्धा किती मूलभूत भूमिका बजावते ते दाखवतात. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात ह्यावरून, पाणिनीच्या १. ४. १. ह्या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ब्राह्मणी देश (अव्रुशलको देशः) आणि अब्राह्मणी देश (अब्रह्मणाको देशः) अशी विभागणी करतो.)
सुगावा प्रकाशन, पहिली आवृत्ती- २००३ |
पाटलांचा जन्म १९२५ साली धुळ्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. १९४५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून विद्यार्थी संपात उडी घेतली आणि पुढे आयुष्यभर मार्क्सवादी चळवळीत काम केले. १९२५ साली स्थापना झालेल्या 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'ची १९६४ साली 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' आणि 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)' अशी दोन पक्षांमध्ये विभागणी झाल्यावर पाटील मार्क्सवादी पक्षात गेले. तिथेही जातीचा अजेंडा काही पक्ष कार्यक्रमात अग्रक्रम मिळवू न शकल्याने, पाटील अखेर १९७८ साली पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्याला नाव दिले: 'सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष'. आपल्या नवीन मा-फु-आवादी भूमिकेतून त्यांनी पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या अनेक ज्ञानशास्त्रीय आणि ऐतिहासिक गृहितकांवर टीका केली. पारंपरिक मार्क्सवादी दृष्टीकोनाविरोधात, त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की वर्ग (class) ही संस्था वसाहतवादातून जन्माला आलेली असून, त्या आधी ती भारतीय इतिहासात एक कोटी (category) म्हणून वावरत नाही. दुसऱ्या बाजूला जातीचा ऐतिहासिक विकासक्रम उलगडून दाखवताना, पाटील सांगतात की, जात तिच्या उगमाच्या वेळी एक नवीन प्रगतिशील सामाजिक संस्था होती त्यामुळे, गौतम बुद्धाने त्याच्या हयातीत जातिव्यवस्थेला अनुकूल भूमिका घेतली होती. ह्या भूमिकेत डॉ. आंबेडकरांच्या जातीच्या उगमाविषयक संकल्पनेची टीका आहे आणि त्यामुळे पाटलांच्या ह्या भूमिकेचा दलित चळवळीत बराच प्रतिवाद झाला. पाटलांचा दलित आणि बहुजनवादी राजकारणावरचा मुख्य आक्षेप हा राहिला की, ह्या चळवळी जातिसंस्थेचा उच्छेद ह्या मूळ सूत्राशी प्रामाणिक राहिल्या नाहीत.
मावळाई प्रकाशन, पहिली आवृत्ती- २०१२ |
एक छोटासा किस्सा नोंदवून हा लेख आटोपता घेतो: 'जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती' (२००३) ह्या पुस्तकात कॉम्रेड पाटलांनी एक प्रसंग सांगितलाय (हा किस्सा इंग्रजी भाषांतरात मात्र नाहीये!): धुळे जिल्ह्यातल्या वाटोदा नावाच्या गावी एका व्याख्यानानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी कॉम्रेड पाटील बोलत होते. त्यापैकी काही जण चीनमधील शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारत सरकारतर्फे नुकतेच जाऊन आले होते. तिथे त्यांना एक मराठी जाणणारा चिनी दुभाषा मदतनीस म्हणून सोबत दिला होता. त्या दुभाष्याशी ह्या मंडळींची मैत्री झाल्यावर, त्याने विचारले : 'शरद् पाटलांचे कसे काय चालले आहे?' ही मंडळी चाट झाली.
हा प्रसंग अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे..
वैचारिक इतिहासाचे प्रवाह कुठून कुठे वाहत असतात? पाटील ह्या चिनी दुभाष्यापर्यंत कसे पोहोचले? आणि आपल्या मराठी मुख्य धारेतल्या लिखाणात ते का पोहोचले नाहीत? त्यांच्या मृत्यूनंतर देखील भारतीय पातळीवर त्यांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा उच्चारलं गेलेलं नाही. पाटील त्यांच्या भाषणात आणि लिखाणातही सांगत की त्यांचा बऱ्याच भाषांमध्ये अभ्यास केला जातोय… त्यात भारतीय इंग्रजी का नसावी?
***
वर उल्लेख आलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकातून शरद् पाटील यांच्याबद्दलची थोडक्यात सनावळी-
१९२५ : १७ सप्टेंबर रोजी धुळे येथे सत्यशोधकी शेतकरी कुटुंबात जन्म.
१९२५ : १७ सप्टेंबर रोजी धुळे येथे सत्यशोधकी शेतकरी कुटुंबात जन्म.
१९४२ : धुळे येथेच मॅट्रिक्युलेशन.
१९४३ : बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला प्रवेश.
१९४४ : मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे दाखल.
१९४५ : पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात सहभागी.
१९४६ : शिक्षण सोडून जीवनदानी कार्यकर्ते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतल्या मुख्यालयात चित्रकार.
१९४७ : धुळे येथे ट्रेड युनियन आघाडीवर.
१९४९ : हद्दपारी.
१९५१ : शेतकरी आघाडीवर.
१९५६ : पासून मृत्यूपर्यंत आदिवासी चळवळीत कार्यरत.
१९६४ : कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल.
१९६६ : दोन तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी वास्तव्य.
१९७८ : (२७ जुलै) जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला मा.क.प.ने नकार दिल्याने पक्षाचा राजीनामा.
१९७८ : (१५ ऑक्टोबर) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन.
१९८२ : (ते १९९३) 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाचे संपादन.
१९८७ : दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त महासभेतर्पे साक्री येथे आंदोलन.
***
पाटलांचं पुस्तक रूपात प्रकाशित साहित्य -
खंड १ : भाग १ व २ : दास-शूद्रांची गुलामगिरी
खंड १ : भाग ३ : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
खंड २ : भाग १ : जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व
खंड २ : भाग २ : शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी?
खंत ३ : जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती
खंड ४ : प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद
इतर : अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र । मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद । भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत । बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही । स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत । पश्चिम भारतातील स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका । स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता) । शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा? । नामांतर- औरंगाबाद आणि पुण्याचे.
***
शरद् पाटील यांचं इंटरनेटवर उपलब्ध काही लिखाण-
मराठी :
आंबेडकर आणि मार्क्स - समन्वयप्रवर्तन..! (परामर्श, फेब्रुवारी १९८६)
आदिवासी-दलित स्त्रियांचे प्रश्न : सामाजिक तात्त्विक दृष्टिकोन (परामर्श, मे १९८९)
कृष्णपरंपरा व तुकोबापरंपरा (परामर्श, नोव्हेंबर १९९७)
आदिवासी-दलित स्त्रियांचे प्रश्न : सामाजिक तात्त्विक दृष्टिकोन (परामर्श, मे १९८९)
कृष्णपरंपरा व तुकोबापरंपरा (परामर्श, नोव्हेंबर १९९७)
इंग्रजी :
प्रॉब्लेम ऑफ स्लेव्हरी इन एन्शन्ट इंडिया (सोशल सायन्टिस्ट, जून १९७३)
ऑन अ सर्व्हे ऑफ फेमिन कन्डिशन्स इन साक्री तालुका ऑफ महाराष्ट्र (सोशल सायन्टिस्ट, ऑगस्ट१९७३)
अर्थ मदर (सोशल सायन्टिस्ट, एप्रिल १९७४)
ए मार्क्सिस्ट एक्स्पोझिशन ऑफ इस्लाम (सोशल सायन्टिस्ट, मे १९७६)
***
शरद् पाटील व लोक ('परिवर्तनाचा वाटसरू' पाक्षिकाच्या १६ जुलै २०१३च्या शरद् पाटील विशेषांकातला फोटो.) |
No comments:
Post a Comment