> प्रकाश बाळ
Aug 24, 2014, 12.00AM IST
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40793483.cms
> प्रकाश बाळ 'आपल्या हातून गेलेलं राज्य परत मिळावं, असं समाजतील एका मोठ्या घटकाला वाटत होतं. पृथ्वीराज चौहान याच्या १२व्या शतकातील अंमलानंतर आता प्रथमच १६ मेच्या निकालानंतर भारताची सूत्रं हिंदूंच्या हाती आली आहेत.' हे उद्गार आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांचे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर लगेच काढलेले. विश्व हिंदू परिषदेला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लिहिलेल्या विनय सहस्रबुद्धे व रमेश पतंगे यांच्या लेखांत सिंघल यांच्या या उद्गारांचंच प्रतिबिंब पडलेलं आहे. 'स्वत: हिंदू म्हणवून घेण्यात काही तरी गैर आहे, शरम वाटण्याजोगे आहे, या विकृत भावनेचा परिपोष होणे तरी किमानपक्षी आज थांबले आहे', असं सहस्रबुद्धे म्हणतात, तर 'दुर्दैवानं भारतात हिंदू जीवनमूल्यांना धरून चालणारं शासन १६ मे २०१४ मेपर्यंत नव्हतं', अशी खंत पतंगे यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंतचे भारताचे सर्व पंतपधान हिंदूच होते. तरीही त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी वेगळे आहेत, खऱ्या अर्थानं हिंदू आहेत आणि त्यांचं शासन हिंदू जीवनमूल्यांवर आधारित असेल, असं पतंगे यांना वाटतं, मात्र सहस्रबुद्धे इतकं पुढं जात नाहीत. हा जो काही परक आहे, तो पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांतही गेल्या काही दिवसांत वारंवार आढळून आला आहे. 'मी देशातील १२५ कोटी लोकांचा प्रधानसेवक आहे, सारे जण माझ्यासाठी सारखेच आहेत, देशात सामाजिक सलोखा व सद्भावना राखली गेली पाहिजे', असं मोदी म्हणतात. उलट 'हिंदुस्तान हा हिंदूंचा देश आहे', असं सरसंघचालक म्हणत असतात. अर्थात असा फरक हा संघाच्या एकूण रणनीतीचा भाग आहे. मोदी हे पंतप्रधानपदी आहेत. त्यांना राज्यघटनेच्या चौकटीतच वागणं व बोलणं आवश्यक आहे. तीच गोष्ट भाजपा नेत्यांची. पण तसं बंधन सरसंघचालक भागवत, सिंघल वा पतंगे यांच्यावर नाही. उलट सहस्रबुद्धे पक्षाचे आता उपाध्यक्ष आणि सरकारच्या एका मंत्रालयाचे सल्लागारही आहेत. म्हणून पतंगे यांच्याइतके ते पुढं जात नाहीत. मात्र त्यामुळं पंतप्रधान मोदी व सहस्रबुद्धे आणि सरसंघचालक भागवत, सिंघल वा पतंगे यांच्या भूमिकांत काही फरक आहे, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. ही भूमिका काय आहे? गोळवलकर यांनी ते स्पष्ट करून ठेवलं आहे. 'आम्ही कोण?' या आपल्या पुस्तकात गोळवलकर म्हणतात, 'आपण केलेल्या राष्ट्राच्या पंचगुणात्मक घटनेच्या चौकटीत जे लोक बसत नाहीत, त्यांनी आपले राष्ट्रीयत्व सोडून देऊन या हिंदूराष्ट्राच्या धर्म, संस्कृती आणि भाषा यांचा स्वीकार केला पाहिजे आणि येथील राष्ट्रीय वंशाशी पूर्णपणे समरस झाले पाहिजे. जोपर्यंत ते स्वत:चे वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नत्व राखू इच्छितात, तोपर्यंत ते पूर्ण परकीय समजले जातील. ते या राष्ट्राचे एक तर मित्र किंवा शत्रू म्हणून या देशात राहू शकतात.' (पृष्ठ ४८-४९) गोळवलकर यांना अभिप्रेत असलेल्या पंचगुणात्मक घटनेच्या चौकटीत धर्म, वंश, भाषा, संस्कृती व देश यांचा समावेश आहे. भारतातील हिंदूजीवन हेच राष्ट्रजीवन असल्यानं त्याच्याशी समरस व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तेही गोळवलकर यांनी सांगून ठेवलं आहे. गोळवलकर म्हणतात-'...त्यांनी एक तर हिंदू संस्कृती व भाषा यांचा स्वीकार करावा, हिंदुधर्माबाबत पुज्यबुद्धी बाळगून त्याचा मान राखण्यास शिकावे. हिंदू वंश व संस्कृतीच्या म्हणजेच हिंदुराष्ट्राच्या उत्कर्षाशिवाय दुसरी कोणतीही कल्पना मनात बाळगू नये. स्वत:चे अस्तित्व विसरून जाऊन हिंदू जातींमध्ये पूर्णत: मिसळून जावे.' (पृष्ठं ५०—५१) असं नाही केलं, तर, काय होईल? गोळवलकर यांनी तेही सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात- 'कोणत्याही जादा सवलती व हक्क न मागता, नागरिकत्वाचे मूलभूत हक्कही न मागता पूर्णपणे हिंदूराष्ट्राच्या अधीन अशा स्थितीत या देशात राहावं. तिसरा कोणताही मार्ग त्यांना शिल्ल्क राहत नाही किंवा राहू नये.' (पृष्ठ-५१) संघ परिवार बिगर हिंदुंबाबत समतेऐवजी 'समरसता' हा शब्द का वापरतो, याची फोड गोळवलकर यांच्या या लिखाणात आहे. तसंच, मोदी सरकार आल्यावर 'हिंदी'चा प्रश्न का उफाळून येऊ लागला, तेही या लिखाणातून कळून चुकतं. सहस्रबुद्धे यांच्या लेखातील 'गायपुराण' व पतंगे यांच्या लेखातील विश्व हिंदू परिषदेपुढील आव्हानांत 'ख्रिस्ती मिशनरी व परदेशी संस्कृती'चे आक्रमण हे उल्लेख गोळवलकर यांच्या या मूलभूत सिद्धांताला धरूनच आहेत. पंतप्रधान मोदी हे गोळवलकर यांचे नि:स्सीम व निष्ठावान भक्त आहेत. विविध १६ राष्ट्रपुरुषांची चरित्रं सांगणारं पुस्तक मोदी यांनी लिहिलं आहे. त्यात सर्वात मोठं प्रकरण हे गोळवलकर यांच्यावर आहे. गांधीहत्येनंतर गोळवलकर तुरूंगात होते. नंतर गोळवलकर यांची सुटका झाली, तेव्हा त्या प्रसंगाचं मोदी यांनी भावनेने ओसंडून जाणारं जे वर्णन केलं आहे, ते त्यांच्या 'गुरूजीं'वरच्या भक्तीचं प्रत्यंतर आणून देतं. अर्थात सर्वच स्वयंसेवक गोळवलकर यांचे भक्त असतात. मात्र आज गोळवलकर यांच्या अशा लिखाणाचा कोणीही उल्लेख करीत नाही; कारण ते राजकीय व सामाजिकदृष्ट्या अडचणीचं आहे. पण संघ परिवाराची वाटचाल याच विचारानं आखून दिलेल्या वाटेवरून होत राहिली आहे, हे विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी हे संघ परिवारातील 'मवाळ' मानले जातात. पण वाजपेयी यांनी १९६७साली भिवंडी दंगलीनंतर संसदेत बोलताना 'अब हिंदू मार नही खायेगा', असं म्हटलंच होतं की! अशोक सिंघल वा प्रवीण तोगडिया रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात हेच म्हणत होते ना! आणि आज सहस्रबुद्धे, 'गर्व से कहो हम हिंदू है' या विश्व हिंदू परिषदेच्या घोषणने कसा बदल घडवून आणला त्याचं वर्णन करतात. मात्र तसा बदल घडवताना देशात भीषण दंगली झाल्या, शेकडो लोक मारले गेले, याचा उल्लेख ते करीत नाहीत आणि करणारही नाहीत; कारण हे सगळं घडलं व घडवून आणण्यात आलं, ते गोळवलकर यांच्या विचाराला अनुसरूनच. हिंदूंना 'गर्व' वाटण्यासाठी ते अपरिहार्यच होतं, असंच सहस्रबुद्धे आणि पतंगे यांना खरं तर म्हणायचं असतं. नेमका येथेच महात्मा गांधी यांचा संबंध पोचतो. आपण हिंदू आहोत, याची गांधीजींना कधीच लाज वाटत नव्हती. किंबहुना आपण सनातन हिंदू आहोत, असं महात्माजी उघडपणं म्हणत असत. पण आपण हिंदू असण्याचा गांधीजींना 'गर्व' नव्हता. महात्माजींचा हिंदूधर्म त्यांना समावेशकतेची शिकवण देत होता. संघर्षाऐवजी त्यांचा सहजीवनावर भर होता. त्यांची ही भूमिका बहुसंख्य हिंदुंना पटली होती. संघाला तेच खुपत होतं. म्हणून नथुरामनं त्यांचा खून केला. ज्या सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारायला मोदी निघाले आहेत, त्यांनीही श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणून ठेवलं आहे- 'न्यायालयात काय होईल, ते मला ठाऊक नाही, पण संघानं जो विद्वेषी प्रचार केला, त्याची परिणती अंतिमत: बापुजींच्या हत्येत झाली, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.' तात्पर्य, गेल्या सहा दशकांत आपलं 'हिंदूराष्ट्रा'चं उद्दिष्टं उराशी बाळगून संघानं काळानुसार रणनीती बदलत, योग्य वेळ येताच संधी साधत, येथील लोकशाही स्वातंत्र्याचा उपयोग करीत वाटचाल सुरू ठेवली. देशाच्या राजकारणातील उलथापालथी व हिंदुत्ववादाच्या विरोधकांची राजकीय दिवाळखोरी यांमुळं संघाच्या हाती स्वबळावर सत्ता येऊ शकली आहे. साहजिकच आपल्या 'हिंदूराष्ट्रा'च्या उद्दिष्टाकडं संघानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तेव्हा असा असहिष्णू, विसंवादी, धार्मिक व सांस्कृतिक श्रेष्ठत्वावर आधारलेला आणि मूळ हिंदूधर्माची व्यापकता व सर्वसमावेशकता यांना छेद देणारा देश 'हिंदूं'ना हवा आहे काय, हा खरा प्रश्न आहे. पुढील निवडणुकीत लोकांना याचा कौल द्यायचा आहे. |
No comments:
Post a Comment