Monday, 7 April 2014

एकाधिकाराची लक्षणे

एकाधिकाराची लक्षणे
लोकमत अग्रलेख, सोमवार दि.७एप्रिल, २०१४
http://www.epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=11
     A A A << Back to Headlines          Next >>

एकाधिकाराची लक्षणे
धराकांडापासून गुजरातेत उसळलेल्या भीषण धार्मिक दंगलींच्या काळात नरेंद्र मोदींचे विश्‍वासू सहकारी व सर्वगामी सूत्रधार असलेले तेव्हाचे गृहराज्यमंत्री अमित शाह हे सध्या तुरुंगाबाहेर पॅरोलवर आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याचा निकाल यथावकाश लागेलही. सध्या नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर आपल्या उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराची सारी धुरा सोपविली असून त्या राज्यातील उमेदवारांच्या निवडीपासून त्यांच्या प्रचारापर्यंत सारेच व्यवहार शाह सांभाळत आहेत. गुजरातमध्ये निवडणूक काळात ते लोकांना दिसू नयेत आणि त्यांचे त्या काळातील वास्तव्य गुजरातबाहेर असावे, असाही या योजनेचा एक हेतू आहे. गुजरात दंगलीच्या काळात ज्या एका इसमाची सर्वांत मोठी दहशत त्या राज्यातील अल्पसंख्याकांच्या मनात होती, त्याचे नावही अमित शाह हेच आहे. लोकसभेच्या निवडणुकीला देशात तोंड लागले आहे आणि तीत उतरलेल्या बहुतेक सार्‍याच पक्षांनी आपापले जाहीरनामे सादर केले आहेत. मात्र, निवडणूक तोंडावर आली तरी नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांनी आपला जाहीरनामा अद्याप जनतेसमोर आणला नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण त्यात करावयाच्या नोंदीसंबंधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांत तीव्र स्वरूपाचे मतभेद हे आहे. शिवाय आज तयार केलेला जाहीरनामा उद्या आपल्याच सत्तेच्या पायातील बेडी ठरण्याचा धोकाही त्या पक्षाला वाटत असणार. सामान्यपणे हुकूमशाहीच्या मार्गाने प्रवास करणारे पक्ष जाहीरनामे किंवा वचननामे यांना फारसे महत्त्व देत नाहीत. सत्ताधार्‍याच्या मनात जेव्हा जे येईल तेव्हा तो त्याचा वचननामा असतो, असेच त्या राज्यप्रणालीत मानले जाते. नरेंद्र मोदींचे सहकारी अमित शाह यांनी नेमकी हीच गोष्ट भाजपने जाहीर न केलेल्या जाहीरनाम्याविषयी सांगितली आहे. जाहीरनाम्याची गरजच काय, मोदी हाच आमचा जाहीरनामा आहे, असे त्या मोदींच्या निष्ठावंताने सांगितले आहे. राज बब्बर या काँग्रेसच्या उमेदवाराने नेमकी हीच गोष्ट अधोरेखित करीत भाजपला जाहीरनाम्याची गरज काय, असा प्रश्न विचारला आहे. हुकूमशहांना जाहीरनामा नसतो, मोदींच्या वागण्या-बोलण्यात सारी एकाधिकारशाहीच आहे आणि तेच अमित शाहच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे, असे राज बब्बरांचे म्हणणे आहे. भाजप हा एकेकाळी जास्तीच्या लोकशाहीची व पक्षांतर्गत चर्चेची गोष्ट सांगणारा पक्ष होता. त्याचा जाहीरनामाही निवडणूक जाहीर होताच लोकांच्या हाती पडत असे. काँग्रेसचाच जाहीरनामा त्या तुलनेने उशिरा लोकांपुढे यायचा. आताची निवडणूक सर्वच अर्थाने वेगळी आणि काहीशी मोदीकेंद्रित बनली आहे. मोदी हे नेते, ते म्हणजेच पक्ष आणि ते म्हणजेच संघ, अशी त्यांच्या प्रचाराची आखणी आहे. त्यांच्या प्रचारफलकांवर 'भाजपचे सरकार' असे लिहिलेले नसते, त्यावर फक्त 'मोदी सरकार' असे म्हटलेले असते. ही गोष्ट वाजपेयींच्या किंवा अडवाणींच्या काळात भाजपने केली नाही. त्या आधी नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेस नेतृत्वानेही ती केली नाही. एक व्यक्ती म्हणजेच सरकार, ही घोषणा लोकशाहीचा पराभव सांगणारी आणि तिला लागणारी वृत्ती नाकारणारी आहे. तशीही भाजपच्या प्रचारयंत्रणेत नेतृत्वाची एकूणच वजाबाकी असल्याचे चित्र आहे. तीत अडवाणी नाहीत, मुरली मनोहर नाहीत, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याचा तीत समावेश नाही. सारा प्रचार मोदी एके मोदी असा आहे. ही रीत मोदींनी पक्षाला व त्याच्या जुन्या नेत्यांना संपविल्याचे सांगणारी आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांचीही त्यांच्याजवळ फारशी पत्रास उरली नसल्याचे दाखविणारी आहे. या स्थितीत अमित शाह हा त्यांचा सहकारी मोदी हाच जाहीरनामा, मोदी म्हणतील तोच वचननामा, असे म्हणत असेल तर ते या सार्‍या एकाधिकारशाही वाटचालीशी सुसंगत ठरावे असेच आहे. प्रश्न, या सार्‍या प्रकाराबाबत भाजपमधील व संघातील सारे जुने व ज्येष्ठ नेते गप्प असण्याविषयीचा आहे. मात्र जे पक्षाला वा संघाला विचारता येत नाही ते जनतेला विचारता येते. निवडून आलाच तर तुम्ही देशासाठी व आमच्यासाठी काय करणार, हा जनतेचा सर्व राजकीय पक्षांना सवाल आहे आणि त्याचे उत्तर आपल्या जाहीरनाम्यातून देणे हे त्या पक्षांचे कर्तव्य आहे. आपला जाहीरनामा ऐन मतदानाच्या वेळी प्रगट होईल, असे आता भाजपकडून सांगितले जात असले तरी त्याच्या या संबंधीच्या एकूण वर्तनाचा अर्थ उघड आहे. मोदींना जाहीरनाम्यात रस नाही आणि वचननामाही त्यांच्या लेखी कुचकामाचा आहे.
http://www.epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12....

No comments:

Post a Comment