Monday, 20 October 2014

या सत्तेशिवाय जीव रमत नाही...

Monday, October 20, 2014
http://www.sahyadribana.com/2014/10/blog-post_20.html?m=1
या सत्तेशिवाय जीव रमत नाही...

'या सत्तेत जीव रमत नाही' असं नामदेव ढसाळ म्हणाले होते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडी पहाता 'या सत्तेशिवाय जीव रमत नाही' असंच काहीसं चित्र आहे. भाजपची शिवसेनेबरोबर असलेली पंचवीस वर्षांची युती तुटली आणि काही क्षणातच राष्ट्रवादी कोंग्रेसनेही कोंग्रेससोबत असलेली पंधरा वर्षांची आघाडी मोडली. अगदी ठरवून केल्यागत सार्या गोष्टी पार पडल्या. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या क्रुतीने दुखावलेल्या शिवसेना आणि कोंग्रेसने भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. भाजपने हे आरोप फेटाळून लावले. राष्ट्रवादी आणि शरद पवारानी तर संघावर आणि भाजपवर अशा पद्धतीने हल्लबोल केला कि राष्ट्रवादीचे भाजपसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचा संशय कुणाला येणार नाही.


भाजपवर टिका करताना 'अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात राज्य देणार का ?' असा सवाल पवार साहेबानी विचारायला सुरुवात केली. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, तो जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावतो अशा प्रकारच्या हाकाट्या पिटायला सुरुवात केली. भाजप सरकार असलेल्या राज्यान्मध्ये चुकीचा इतिहास कसा शिकवला जातो, इतिहासाचे विक्रुतीकरण भाजपवाले कसे करतात हे सांगण्यातच पवार साहेबांचा जास्तीत जास्त वेळ जाऊ लागला. या विधानसभेच्या प्रचारात पवार साहेबानी केलेली भाषणे काळजीपूर्वक पहा. सर्व भाषणांचा मतितार्थ एकच- भाजपसारख्या जातीय, धर्मांध पक्षाच्या हाती सत्ता देऊ नका. शरद पवारांचे सरसेनापती सन्माननीय आर. आर. पाटील यानीही लगेच जेम्स लेनचा मुद्दा उकरुन काढून भाजपविरोधी सूर काढायला सुरुवात केली. जेम्स लेनने शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम केला त्याला भाजप आणि उजव्या विचारांच्या लोकांची फूस आहे. त्यामूळे या उजव्या विचारांच्या भाजपच्या हाती सत्ता देऊ नका असे आर. आर. पाटील सांगत होते. आता कुणाच्याही मनात प्रश्न उपस्थित होईल कि यात गैर काय आहे ? आपल्या पक्षाचा प्रचार करणे, त्यासाठी वैचारिक विरोधक असणार्या जातीय पक्षांवर, त्यांच्या ध्येय-धोरणांवर टीका करणे, या विचारांच्या लोकांचा खरा अजेंडा समाजासमोर उघड करणे चुकीचे आहे का ? अजिबात नाही. मग पवार साहेबाना आणि राष्ट्रवादीला दोष का ?

राष्ट्रवादी कोंग्रेस आणि पवार साहेब अशासाठी दोषी आहेत कि त्यानी पुरोगामीत्वाचा आव आणला. ज्या भाजपवर जातीयवादाचा आरोप केला, त्याच भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठींबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कोंग्रेसने घेतला. निवडणूकीआधी जातीयवादी असणारा भाजप आता राष्ट्रवादीला पुरोगामी वाटायला लागला का ? हा खरा प्रश्न आहे. रामदास आठवले यानी शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्याकडून आठवले यांच्यावर नेहमी टीका होत होती. आठवले यानी आंबेडकरी विचाराशी फारकत केल्याचा आरोप पवार सतत करत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यानी बहुजन समाज संघाच्या दावणीला बांधण्याचे पाप केल्याचा आरोप शरद पवार, आर. आर. पाटील आणि त्यांचा राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष करत राहिला. राष्ट्रवादी हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा मानणारा पक्ष असून आपली बांधिलकी बहुजन समाजाशी आहे अशा प्रकारचा प्रचार राष्ट्रवादीकडून नेहमीच होत राहिला. मग आत्ता भाजपला पाठींबा देताना तुमची बांधिलकी कोठे गेली ? कुठे गेला तो पुरोगामी विचार आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणी ?

वास्तविक पहाता राष्ट्रवादीने आपण पुरोगामी आहोत असा आवेश दाखवला तरी त्यांचे बेगडी पुरोगामीत्व कधीच लोकांच्या लक्षात आले आहे. राष्ट्रवादी सत्तेत असतानाच खैरलांजी हत्याकांड घडले. सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे हत्याकांड घडूनही दोन महिने सरकारी पातळीवर उदासिनता होती. या हत्याकांडाने जेव्हा दलित समाज खडबडून जागा झाला आणि तीव्र आंदोलन केले तेव्हा कुठे सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावीशी वाटली. दलित समाजाच्या कार्यकर्त्याना नक्षलवादी संबोधण्यापर्यंत आर. आर. पाटलांची मजल गेली. इतकी संवेदनशून्य भूमिका घेण्यात आली. नुकतेच घडलेले खर्डा प्रकरण आणि त्यात राष्ट्रवादी कोंग्रेसच्या मित्र संघटनानी घेतलेली दलितविरोधी भूमिका हेही राष्ट्रवादीचे बेगडी पुरोगामीत्व समोर आणायला पुरेसे होते. राष्ट्रवादीचीच सत्ता असताना डो. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात हत्या झाली. पोलीस खातं राष्ट्रवादीच्याच आर. आर. आबांकडे होतं. आज वीस महिने होऊन गेले तरी तुम्हाला साधे आरोपी सापडत नाहीत. दाभोळकरांची हत्या का झाली, कुणी केली याचा थांगपत्ता लागत नाही. दुसर्या बाजूला तूमचेच पोलीस प्लॅंचेट सारखे मूर्ख प्रकार या गंभीर गुन्ह्यात करतात, त्यांच्यावरही कारवाई होत नाही. मग पुरोगामीत्वाचा गजर कशाला करता ? एका पुरोगामी विचारवंताचे हत्यारे तूम्ही पकडू शकत नाही मग फक्त भाषणबाजी काय कामाची ? कि फक्त पुरोगामीत्वाचा जयघोष केल्याने तूमचे पुरोगामीत्व सिद्ध होणार.आहे का ?

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन धनगर आणि आदिवासीत भांडण लावून देण्याचे पातकही यांच्याकडूनच घडले. जर धनगर आरक्षणाची मागणीच चूकीची होती आणि तसा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा दावा होता तर शरद पवारानी 2009 च्या लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना धनगराना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेच कसे ? आत्ताही धनगर समाजाचे आंदोलन ऐन भरात असताना याबाबत संदिग्ध भूमिका घेण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करायचा नाही आणि बाहेर मात्र पत्रकार परिषद घेऊन धनगराना पाठींबा द्यायचा हे धोरण सातत्याने राबविले. म्हणजे एकिकडे आरक्षणासाठी धनगराना उठवून बसवायचे आणि दुसरीकडे आदिवासी नेत्याना फूस लावून आदिवासीना भडकवायचे असा दुटप्पीपणा म्हणजे तूमचे पुरोगामीत्व का ? या बेगडी पुरोगामीत्वामूळे बहुजन समाजातील दोन उपेक्षित घटकात वितुष्ट निर्माण झाले. अर्थात ती तूमची राजकीय गरज असली तरी त्यामूळे महाराष्ट्राचे समाजिक वातावरण गढूळ झाले.

बहुजन समाजातील कोणत्याही घटकाने कधी भाजप अथवा शिवसेनेसारख्या पक्षाना मदत केली तर त्यानी पुरोगामी विचाराना काळीमा फासल्याची बोंब मारायची, बहुजन समाज त्यानी संघाच्या दावणीला बांधल्याची ओरड करायची आणि यानी मात्र सत्तेसाठी कोणतीही भूमिका घ्यायची, हे कसे योग्य आहे ? पवार साहेबांचे एक आवडते वाक्य आहे; 'राजकारणात कुणीही अस्प्रुश्य नसतं'. मग हीच भूमिका आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यानी घेतली तर बिघडलं कुठे ? कि तूम्ही हवी ती सोयीस्कर भूमिका घ्यायची आणि इतरानी मात्र वैचारिक, नैतिक बांधिलकी जपतच राजकारण करायचे हा अट्टहास कशासाठी ?

मागे शेतकरी संघटनेचे आंदोलन चालू असताना राजू शेट्टी यांची 'जात' काढून पवार साहेबांचे पुरोगामीत्व सिद्ध झाले. मतदानानंतर बोटाला लावलेली शाई पूसून दोनदा मतदान करा असे पवार साहेब म्हणाले होते. आर. आर. पाटील म्हणतात कि बलात्कार करायचा तर निवडणूकीपर्यंत तरी थांबायचे होते. ही नैतिकता आहे का ? म्हणजे आधी तोंड सैल सोडायचे आणि आपल्या विधानांचा गाजावाजा झाला कि 'मजेत बोललो' असे म्हणायचे किंवा दिलगीरी व्यक्त करुन मोकळे व्हायचे. अजित पवारांची धरणात ..........ची भाषा, मासाळवाडी गावात दम देऊन मत मागण्याची पद्धत या गोष्टी नैतिक, लोकशाही प्रक्रियेशी सुसंगत असतील तर मग बोलायलाच नको.

शरद पवार अपवाद वगळता सत्तेच्या बाहेर कधीही राहिले नाहीत. 1978 साली पूलोदचा प्रयोग करुन त्यानी अनपेक्षित सत्ता मिळवली होती. तेव्हा तर जनसंघालाही सामावून घेतले होते. अनेक ठीकाणी स्थानिक स्वराज्य संस्थान्मधे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्ष-संघटनांशी तडजोड करण्याची तयारी शरद पवारानी नेहमीच ठेवली आहे. त्यामूळेच आता सत्ता जाणार या भितीने त्यानी भाजपला बाहेरुन पाठींबा देवू केलाय. भाजप तो पाठींबा स्विकारतो कि नाही हे कळेलच, परंतू त्यामूळे पवारांची काहीही करुन सत्तेत राहण्याची व्रुत्ती दिसून येते. नामदेव ढसाळ म्हणतात, "या सत्तेत जीव रमत नाही". तर पवार साहेबांचे धोरण आहे, "या सत्तेशिवाय जीव रमत नाही". काहीही असो, पवारानी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचा पाठींबा भाजपला देवू केलाय ते पहाता त्याना पुरोगामीत्वाचा जयघोष करण्याचा अधिकार नाही.

-प्रकाश लालासाहेब पोळ, कराड.

No comments:

Post a Comment