Tuesday, 21 October 2014

१००% सत्ताकारणी शरद पवार---




शरद पवारांनी भाजपाला पाठींबा दिल्याचा त्यांच्या चाहत्यांना खूप राग आलाय. आपले राज्य अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात द्यायचे का? राष्ट्रवादी कधीही भाजपाला पाठिंबा देणार नाही असे चार दिवस आधी प्रचारात जोरजोरात सांगणारे पवार कसे बदलले याचा त्यांना धक्का बसलाय.पवारांनी समर्थकांना चक्क फसवले, खासे चकवले असे त्यांना वाटते.

पवार बदललेले नाहीत. त्यांनी तुम्हाला फसवलेलेही नाही. तुम्ही  त्यांना धर्मनिरपेक्ष समजत होतात, संघ-भाजपा विरोधी समजत होतात ही तुमची चुक आहे. तुम्ही त्यांना ओळखू शकला नाही याचा खरं तर तुम्हाला राग आलाय. मान्य करा की, चुक तुमची आहे.

शरद पवार गेली सुमारे ५० वर्षे सतत सत्तेत आहेत. ते सत्ताकारणी आहेत. ते सत्तानिरपेक्ष राजकारणाची कल्पनाही करू शकत नाहीत.ते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यासाठी जगले, जगत आहेत.

त्यांचा पक्ष म्हणजे  स्थानिक मनसबदार आणि शक्तीशाली नेत्यांची मोळी आहे. तो एकजिनशी नाही. ती एक खाजगी कंपनी आहे. तिची ९९% भाग भांडवलाची भागपत्रे  ते, सुप्रिया आणि अजित पवार यांच्या नावे आहेत. उरलेल्या १% टक्क्यात भुजबळ, आर.आर. जयंत, दिलीप, तटकरे आदी आहेत.

पवार अपार क्षमता असलेले पण शून्य विश्वासार्हता असलेले उद्योगपती आहेत. त्यांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर ही जपमाळ ओढून बहुजनवादाचे ढोल बडवीत सत्ता मिळाली त्यांनी ती उपभोगली. आता ते सत्तेवाचून राहूच शकत नाहीत.

आदतसे मजबूर आहेत ते.

संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा, शिवसंग्राम, मराठा सेवा संघाचे प्रमुख आश्रयदाते आहेत काकापुतणे.
मराठा आरक्षण दिले नी ओबीसी चिडले.

मराठा, मुस्लीम, लिंगायत, कैकाडी, धनगर, कोळी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा, पत्रे, आरक्षण मागितले त्यातल्या जमेल त्यांना त्यांनी देवून टाकले.नंतर तर मागायलाही कोणी बाहेर राहिले नाहीत.

तत्व, ध्येयवाद, निष्ठा या सार्‍यांची चेष्टा म्हणजे शरद पवार.

सत्ता आणि अधिक सत्ता हाच त्यांचा प्राणवायू आहे.

No comments:

Post a Comment