Monday, 13 October 2014

मी भाजपला मत देणार नाही. कारण...


माझा सहकारीAnand Bhandare याचं हे निवेदन.
वाचा आणि स्वस्थ बसू नका.
मी भाजपला मत देणार नाही. कारण...
* मोदी म्हणतात, गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ. आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणतात, उद्योगपतींनो, मुंबई, महाराष्ट्रात तुमच्यासाठी काय ठेवलंय? हा काय प्रकार आहे?
* मोदी म्हणतात, महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. भाजप लगेच सांगतो, विदर्भ वेगळा होणारच! ही लपवाछपवी कशासाठी?
* गेले पंचवीस वर्ष विदर्भाची मागणी आम्ही करतोय, असं फडणवीस म्हणतात. मग गेले पन्नास वर्ष सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात यायला धडपडताहेत, यावर भाजपची भूमिका काय हे कुणी सांगेल काय?
* कर्नाटकचे माजी भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा महाराष्ट्रात येऊन सांगतात, येथील कन्नडिगांनी भाजपला मतदान करावे. मग येळ्ळूरमधील लोकांनी मराठी फलक लावल्यावर कर्नाटक सरकार खवळून का उठले?
* मुंबई महाराष्ट्रातच असताना मोदी सतत त्यांच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राचा स्वतंत्रपणे उल्लेख का करतात?
* रिझर्व्ह बॅंकेचे मुख्यालय मुंबईतून हलविण्याची एवढी घाई भाजप सरकारला का आहे?
* पाणीपुरीच्या भांड्यात लघ्वी करणाराचं चित्रण करणाऱ्या मुलीला जाहीरपणे 'वेश्या' म्हणणाऱ्या मुंबई प्रदेशच्या माजी अध्यक्षावर (राज पुरोहित) कारवाई सोडाच उलट या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकिट दिले आहे. हेच का भाजपवाल्यांचे
'पार्टी विथ डिफरन्स?'
* मुनगंटीवार म्हणतात, जिंकण्यासाठी मते कमी पडत असतील आणि इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांमुळे आम्ही जिंकणार असू तर त्यांना घेण्यात गैर काय?
* केवळ सत्ता मिळावी यासाठी सर्व पक्षातील जवळपास साठ लोकांना उमेदवारी देणाऱ्या भाजपवाल्यांनी साधनशुचितेच्या बाता माराव्यात का?
* ज्यांच्यावर आरोप आहेत अशांना सर्वच राजकीय पक्षांनी तिकिटे देवू नये, असे मोदींनी संसदेत आवाहन केले आणि इकडे महाराष्ट्रात येऊन विजयकुमार गावित, अनिल गोटे, शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी आवाज बसेपर्यंत भाषणे दिली (तिकडे हरियाणात डी पी यादवांबरोबर अमित शहा फिरतात), याला काय म्हणायचे?
* महाराष्ट्राची बूज न राखणारी, खुलेआम महाराष्ट्राची खिल्ली उडविणारी जाहिरात करून 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' विचारताना गेली पंधरा वर्ष विरोधी पक्षात असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी असूनही 'कुठे नेऊन ठेवलाय?' मध्ये भाजपवाल्यांची काहीच जबाबदारी नाही का?
* भाजपची जाहिरात सांगते, पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मोदी सांगतात, साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कुणाचं खरं मानावं?
* देशातील फक्त चार राज्यांत (गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ) भाजपची सत्ता. यातील दोन राज्ये तर बीमारूच. तरीही यांची जाहिरात असं सांगते की भाजपच्या सर्व राज्यांमध्ये 'हे घडतंय'. म्हणजे नेमकं कुठे घडतयं?
* रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या २०१३ च्या अहवालानुसार कित्येक क्षेत्रातील मानांकानुसार महाराष्ट्र हा गुजरातच्या कितीतरी पुढे आहे, हा अहवाल खोटा आहे असं भाजपवाले म्हणतील का?
* मुंबईत मेट्रो असतानाही 'मी मुंबईला मेट्रो देईन' असं मोदी म्हणतात, या 'मी' पणाला काय म्हणावं?
* वल्लभभाई पटेलांचा पुतळा स्वखर्चाने बांधण्याची टिमकी वाजविणाऱ्या गुजरात सरकारला केंद्रातून आता ८०० कोटी मिळणार आहेत, ते कशाला?
* महाराष्ट्राचा हरीत पट्टा जपणारा गाडगीळ अहवाल मोदी सरकारने फेटाळला. ग्रामपंचायतीलाही विकासात अधिकार न देणारे मोदी सरकार 'सबका साथ, सबका विकास' कसा करणार आहेत?
* पर्यावरण कायद्यात बदल, वन्यजीव कायद्यात बदल, वन संरक्षण कायद्यात बदल, कामगार धोरणात बदल हे मोदी सरकारचे धोरण कुणासाठी आहे?
* विकास हा फक्त खाजगीकरणातूनच होतो हा मोदी आणि कंपनीचा विखारी विचार महाराष्ट्राच्या खरंच हिताचा आहे का?
* अमेरिकन औषधी कंपन्यांच्या फायद्याकरीता नियमात बदल करणारे मोदी सरकार कुणाचे भले करणार आहे?
* अरूणाचल प्रदेशावर अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या चीनला मोदी सरकारने उत्तर प्रदेशात तीन एसईझेड प्रकल्प मंजूर करून दिलेत, हे उघड गुपित काय सांगते?
* पाकिस्तानच्या सध्याच्या गोळीबारीबाबत 'राजकारण' करू नका, असे मोदी आताच का बोलताहेत?
* पालघर येथे होणारे कोस्ट गार्ड हब केंद्रात भाजप सत्तेवर येताच गुजरातच्या पोरबंदरला हलविण्याची घाई का केली?
* बुलेन ट्रेन ही वास्तविक लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी असताना पहिली बुलेट ट्रेन मुंबई - अहमदाबाद अशीच का? आणि पुन्हा ती अहमदाबादच का?
* मुंडे असते तर मला यावं लागलं नसतं, असं म्हणणारे मोदी लोकसभेच्या प्रचारावेळी मुंडे असतानाही महाराष्ट्रात का आले होते? मुंडेंचं एवढं महत्व पक्षात असताना त्यांना केंद्रात मंत्रिपद देताना भाजपची एवढी चलबिचल का झाली? आणि मुंडेंची चिता विझायच्या आत त्यांच्या खात्याचा कारभार लगेच गडकरींकडे कसा काय सोपवला जातो?
* गेल्या साठ वर्षात भारतात विकास झालाच नाही असं प्रचारसभेत सांगणारे मोदी मंगळावर आम्ही पोचलो, असं अमेरिकेत सांगतात. घरात एक आणि बाहेर एक हे गौडबंगाल काय आहे?
* शिवाजी महाराज आणि भगतसिंगांच्या काळातही अमेरिकेत भारताचा डंका वाजलेला नाही असं अमेरिकेत सांगताना मोदींना नेमकं काय सांगायचं होतं?
* डंका वाजलेला नाही तर मग 'शिवछत्रपतींचा आशिर्वाद' ही जाहिरात भाजपला आताच का करावी लागली?
* महाराष्ट्रातील प्रचारसभेत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेईन, हरियाणातील सभेत हरियाणाला गुजरातच्या पुढे नेईन, असं म्हणणाऱ्या मोदींना किमान भाजपची तरी इतर राज्यंही दिसत नाहीत काय?
* देशाचा प्रधानमंत्री एका राज्याला दुसऱ्या राज्यापेक्षा पुढे घेऊन जाईन असं म्हणूच कसा शकतो? आणि मग इतर राज्यांनी प्रधानमंत्र्यांवर विश्वास का म्हणून ठेवायचा?
* असा कोणता लौकिक आहे की गुजरात आणि राजस्थान या भाजपच्याच राज्यातील पोलिस कुमक पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विधानसभा मतदानाच्या बंदोबस्तासाठी आणण्यात आली आहे?
* ज्या पध्दतीने २५ वर्षांची सेनेबरोबरची युती तोडली, शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर सेनेला जी मानहानीकारक वागणूक दिली, सर्वाधिक खासदार सेनेचे असूनही जे एकमेव मंत्रीपद दिले, तो अमित शहा आणि कंपनीला झालेला सत्तेचा भस्म्या रोग नाही तर काय आहे?
* मोदींचा चेहरा वगळता प्रदेश भाजपला महाराष्ट्रात चेहरा आहे का? नाही ना? तर मग मोदींच्या तालावर नाचणारे सरकार महाराष्ट्राला हवे आहे का?
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मित्रहो,
मोदी, शहा या जोडगोळीच्या आश्रयाने आणि केवळ प्रचारतंत्राच्या नवनव्या जाहिराती करून पराचा कावळा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आणि संधी महाराष्ट्राकडे चालून आली आहे. हे तुम्हाला पटत असेल तर स्वत:च्या नावाने आपल्या मित्रमंडळींना हा मेसेज पुढे पाठवा. विश्वास ठेवा, तुमच्या स्वत:च्या नावामुळे तुमच्या सभोवतालात निश्चितच फरक पडेल.
आनंद भंडारे.

No comments:

Post a Comment