Saturday, 25 October 2014

मराठी बुडाली तर बुडू द्या ना!

बुडाली तर बुडू द्या ना!----मुरलीधर खैरनार


एक…. 

आज जगाच्या पाठीवर मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या आठ कोटींच्या घरात आहे. जगात सध्या बोलल्या जाणार्‍या सात हजार भाषांमध्ये मराठीचा क्रम म्हणे एकोणिसावा लागतो. म्हणजे पहिल्या पंचवीसातच. त्यामुळे अणुयुद्धासारखा एखादा अपघात झाला नाही तर मराठी भाषा आणखी हजारेक वर्षे तरी मरायची काही शक्यता नाही.

जगातल्या एकूण भाषांपैकी अडीच टक्के भाषा सध्या दरवर्षी नाहीशा (एक्सटिंट) होतात, असे एक आकडेवारी सांगते. ही गणिती टक्केवारी यापुढेही तशीच राहील असं गृहित धरलं तरी अडीच टक्के दराने आज एकोणिसाव्या नंबरवर असलेल्या या भाषेला मरायला अजून चारसाडेचारशे वर्षे नक्कीच वेळ आहे. आणि आपल्या आधीच कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगु ओडिया, मल्याळी अशा ६९८१ भाषांचे मरण्यासाठी नंबर लागलेले असतील ते वेगळंच.

तेंव्हा काळजी करायची ती कशाची?

हां आता मराठी भाषेचं येऊ घातलेलं मिंग्लीशचं नवं रुप आपण मराठी या नावानं स्विकारलं नाही, तर जुनी मराठी हद्दपार होऊन त्याजागी मिंग्लीश भाषा नक्कीच येत्या पंचवीस तीस वर्षात स्थानापन्न होणार आहे आणि ही बाब कमी स्वागतार्ह असली तरी स्वागतार्हच आहे असा माझा विश्वास आहे.


 दोन… 

दोनशे वर्षांपूर्वी मराठीत पुस्तके छापायला सुरुवात झाली तेंव्हा संस्कृतच्या टायपाचे साचे आयते मिळत होते या एकाच कारणासाठी पहिलं मराठी पुस्तक कलकत्त्यात देवनागरी लिपीत छापण्यात आलं. मराठीची त्यावेळची प्रचलित लिपी मोडी असली तरी मोडीचे साचे तयार करण्याचा महाराष्ट्री वैज्ञानिकांना कंटाळा असल्याने मराठी पुस्तके देवनागरीत छापायची प्रथा पडू लागली. मुळात पुस्तके-बिस्तके हा धंदा अभिजनांपुरताच मर्यादित असल्याने अन्य कुणी तिकडे लक्षच दिले नाही. कारण उरलेल्या ९८ टक्के सामान्य मराठी समाजाचे अन्य व्यवहार तेंव्हाही मोडी लिपीतच निर्वेध चालू होते.

ज्यांना काव्य-नाट्यरचना करायची अशी काही थोडेच अभिजन देवनागरी वापरीत. पण बाकी सामान्यजन आपले व्यवहार मोडी लिपीतच लिहीत. हे सारे १९५० सालापर्यंत निर्वेध सुरु होते. पण १९५० साली स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र या राज्यातल्या मराठी भाषेच्या गोणपाट पुढार्‍यांनी सरकारला हाताशी धरुन बिगर-अभिजन लोक वापरीत असलेली मोडी लिपीच कायमची मोडीत काढली! १९५० साली सरकारने हुकूम काढून (सॉरी, अध्यादेश) मराठी भाषा देवनागरी लिपीतच लिहिण्याचा हट्ट प्रत्यक्षात आणला. आणि तोवर मोडीत मराठी व्यवहार करणारा सारा जनसामान्य समाज एका फटक्यात बेवारशी ठरवून टाकला.

त्याचीच परतफेड आता विशी-तिशीतली तरुण पिढी करते आहे. मोठ्या हौसेने देवनागरी लिपीचा हट्ट पुरवून घेणार्‍या या अ(ति)संस्कृत लोकांची पोरेबाळे मराठी लिहिण्यासाठी रोमन लिपीचा मुक्त वापर मोबाईल, इंटरनेट आणि फेसबुकवर करीत आहेत. थोडा धीर धरा. आजची विशीतली ही पोरे तीस वर्षांनी पन्नाशीत पोचतील तेंव्हा सरकारला हाताशी धरुन देवनागरी लिपी मोडीत काढल्याचा फतवा (पुन्हा सॉरी, Adhyadesh ) काढल्याशिवाय राहणार नाहीत.


तीन….

मराठीची परिस्थिती फार वाईट आहे, आपली भाषा मरायला टेकली आहे, असा गळा आपल्याकडे नेहमी काढला जातो. अगदी १८५० साली दादोबा पांडुरंग (यांना मराठीचे पाणिनी म्हणण्याचा शौक त्यांच्या भक्तगणांना होता) यांनी तेंव्हाच्या मुंबई सरकारला उद्देशून लिहिलेल्या लेखात ‘सांप्रत मराठी भाषेची स्थिती फार शोचनीय असून सरकारी पातळीवर मराठीच्या उद्धारासाठी काही केले नाही तर येत्या काही दशकात ही भाषा नामशेष होईल.’ असा स्पष्ट उल्लेख आहे.

वेल, त्यानंतर आजतागायत सोळा दशके उलटली तरी मराठी भाषा शाबूत आहे. नुसती शाबूत नाही तर १८७१ च्या जनगणनेत मराठी बोलणारांची एकूण संख्या दीड कोटी होती, ती पाचपट वाढून आठ कोटीच्या पुढे गेली आहे.

‘मराठीची स्थिती गंभीर आहे’, ‘मराठी वाचवा’ असा कांगावा मी मला कळत असल्यापासून पन्नास वर्षे ऐकतो आहे. पण खरं सांगायचं तर मला डोळ्यांना कधी असे काही दिसले नाही. कानांना कधी जाणवले नाही.

आणि तरीही महाराष्ट्रातले बुद्धिमंत हा ओरडा करीत असतील तर त्यामागे एकतर राजकीय कारण असेल किंवा आर्थिक. ज्यांचे राजकारण मराठी भाषेवर चालते किंवा ज्यांचा नोकरी व्यवसाय मराठी भाषेवर अवलंबून आहे अशी माणसेच मोठ्या अहमहमिकेने भाषा वाचवण्याच्या बोंबा मारतात.

मग मला प्रश्न पडतो की, ज्या मराठीवर त्यांचे पोट किंवा पुढारपण चालते तीच मराठी मरायला टेकली अशी आवई ही माणसे का उठवितात बरे?

मग याचे कारण शोधतांना मराठीतलीच एक म्हण आठवते. ‘चोराच्या उलट्या बोंबा.’


 चार…

भाषा वाढायची म्हणजे त्या भाषेत बोलणारांची, दळणवळण करणारांची, व्यवहार-व्यापार करणारांची संख्या वाढली पाहिजे असा जगातल्या सार्‍या भाषात आढळून येणारा संकेत आहे. तर या बाबतीत मराठीवर निरतिशय प्रेम असण्याचा कांगावा करणारे हे सर्व लोक -(म्हंजेच भाषेचे पुढारी--म्हणजे राजकीय नेते, विद्यापिठीय प्राध्यापक, मराठीचे लेखक-पत्रकार-शिक्षक, आणि साहित्य, कला, संस्कृती वा तत्सम महामंडळांचे पदाधिकारी)- काय करतात?

या प्रश्नाचे उत्तर आहे- ‘‘काहीही करीत नाहीत.’’

उलट मराठी बोलणारांची, मराठीतून व्यवहार करु पहाणारांची संख्या वाढू नये यासाठी आपल्या भाषेचे पुढारी दिवसरात्र झटतात. १९५० साली मराठी देवनागरीतूनच लिहायचा हट्ट पुरवून घेणारे हेच. ते नुसती ती लिपी स्विकारुन थांबते तर कदाचित ठीक होतं. पण ही अवघड लिपी स्विकारल्यानंतर व्याकरण, शुद्ध भाषा, पदनामकोश आणि पारिभाषिक शब्द या सगळ्या व्याघातांचं इतकं अवडंबर माजवलं की खुद्द महाराष्ट्र सरकारनंही आपल्या बहुतेक व्यवहारातून मराठी वापरणं बंद करुन टाकलं!

मग बाकी सामान्य लोकांचा तर प्रश्नच नाही.

विद्यापीठातल्या आणि शिक्षण समितीतल्या पुढार्‍यांनी या भाषिक प्रांतावरचा आपला वतनदारी हक्क कायम ठेवण्यासाठी भाषेच्या ‘एक्सक्ल्युझिव्हिटी’चा इतका टोकाचा आग्रह धरला की इंग्रजी वा अन्य भाषातून येणार्‍या नव्या शब्दांना मूर्खासारखा सतत विरोधच झाला. (आता ‘एक्सक्ल्युझिव्हिटी’ किंवा ‘एक्सटिंट’ साठी मराठी पारिभाषिक शब्द मला माहीत नाहीत असं समजू नका. मी मुद्दामच ते भिकेचे वांझोटे शब्द वापरले नाहीत.)


 पाच……

आजच सकाळी लॅपटॉप उघडल्यावर फेसबुकचं एक नोटिफिकेशन दिसलं, ‘तुम्ही नेहमी मराठीतून लिहिता. आमच्या मराठी आवृत्तीतली भाषा सुधारण्यासाठी आम्हाला मदत करा.’ मग सोबत काही इंग्रजी वाक्ये आणि त्याचे वेगवेगळे मराठी गद्यावतार. प्रतिक्रिया वा पर्याय देण्याच्या सोप्या सोयी. गंमत वाटली म्हणून त्यातली काही वाक्ये बदलायला मी मदत केली. जे गुगल ट्रान्सलिटरेटरचं मराठी वापरतात त्यांना चांगलं माहीत आहे की गुगलवाल्यांचं मराठी गेल्या दोन वर्षात कितीतरी समृद्ध झालं आहे.

फेसबुकवरचं मराठी सुधारावं म्हणून तिकडे कॅलिफोर्नियात बसलेल्या मार्क झुकरबर्गनं गेल्या तीन वर्षात जेवढे कष्ट घेतले आहेत, त्याच्या दहा टक्के कष्ट तरी मराठी साहित्य महामंडळाच्या किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी गेल्या तीस वर्षात घेतले असतील तर मला दाखवा रे कुणीतरी.

मोह आवरत नाही म्हणून हा एक जुना दाखला देतो. १८३० सालच्या दरम्यान मेकॉलेनं ब्रिटनच्या धर्तीवर भारतातील शिक्षण पद्धती बदलावी असं सुचवलं. तेंव्हा इंग्लंडमधले दोन मोठे तज्ञ जेम्स मिल आणि जॉन स्टुअर्ट मिल या पितापुत्रानं ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांना पटवलं. ब्रिटनमध्ये आहे तसं शिक्षण भारतात द्यायची गरज नाही. तिथल्या संस्कृत पाठशाळा आणि अरबी मदरसे यांनाच आपण अनुदान वाढवून देऊ. या गोष्टीला भारतातल्या तेंव्हाच्या पुढारी मंडळींचा म्हणजे राजेरजवाड्यांचा आणि धर्ममार्तंडांचाही पाठिंबा होता. कंपनीने तसे हुकूमही काढले. पण मेकॉले आणि भारताचा तेंव्हाचा गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक हटून बसले म्हणून भारतात इंग्रजी शाळा आणि व्हर्नाक्युलर म्हणजे देशी भाषातून शिक्षण सुरु झालं. आणि आपल्या सगळ्यांना रोज बोलल्या जाणार्‍या भाषातून शिकायला मिळालं, अरबी किंवा संस्कृतसारख्या मेलेल्या भाषातून शिकण्याची आपल्यावर पाळी आलीच नाही.

सहज म्हणून विचार करुन पाहा, १८३५ सालच्या त्या लढाईत मेकॉलेऐवजी मिल विजयी झाला असता तर काय झालं असतं? कदाचित आपण अजूनही पारतंत्र्यात असतो आणि आज ‘मराठी वाचवा’ म्हणून ओरडणारे हे सारे शुंभ ‘परोपकारी’ इंग्रजी अमदानीखालच्या ‘अखंड’ भारताचे गोडवे गात, संस्कृत व अरेबिकच्या रक्षणासाठी कदाचित समस्त मराठी भाषिक गावढ्यांना आफ्रिकेत हुसकायला निघाले असते!


सहा……

भाषा वाढण्याचा दुसरा मार्ग असतो त्या भाषेत निर्माण होणारे आणि इतर भाषिकांवर प्रभाव टाकू शकणारे विज्ञान, कला आणि साहित्य.

मराठी मातीत कोणतेही विज्ञान जन्माला येण्यासाठी हे मराठीचे उपरोल्लेखित पुढारी काय दिवे लावतात यावर काही भाष्य करण्याची गरज आहे, असे मला अजिबात वाटत नाही. अगदी सरकारी शाळेत सातवीत शिकणार्‍या पोरालाही ते चांगले माहीत आहे. 

कलेच्या बाबतीत बोलायचे तर परंपरेच्या नावाखाली अस्सल मराठी कलेला आपण कुंपणात बांधले आहे, बोन्साय करुन तिचे वाढणे कायमचे बंद केले आहे. मग ते संगीत नाटक असो की तमाशा. जलरंगातली चित्रे असोत की खेडोपाडीची लोकगीतं. अशा नसबंदी केलेल्या सामर्थ्यहीन कलेला नवे पाठीराखे मिळणं फारच दूर आहे.

बरं दादा कोंडकेसारख्या एखाद्या कलाकाराने सिनेमाच्या मदतीने मराठी भाषेत नवनवे झेंडे उभारले तर आमचे मराठी अभिजन त्याला नाके मुरडणार. ‘ही कलाच नव्हे’ असा ठणाणा करीत त्यावर उग्रगंधी तामूलतुषार सोडणार. या असल्या भडभुंज्या भोटांमुळे विष्णुबुवा चिपळूणकरासारख्या मद्दड आणि एकांगी माणसाचे अंधगोलांगुल मराठी गेली शंभर वर्षे मराठीच्या पाठ्यपुस्तकात ठाण मांडून आहे. दादा कोंडके आणि त्याच्या मराठीवर एकतरी धडा आजवर कुठे आला आहे का?

लक्षात घ्या, आज भारतभर आणि भारताबाहेरही व्यवहारात जो हिंदीचा मोठा प्रसार झाला आहे त्याला बॉलीवूडचे हिंदी सिनेमे आणि सतराशे साठ चॅनेल्सवरच्या दे-दणादण सिरीयल्स जबाबदार आहेत, सरकारी मलिद्यावर आयुष्य उंडारणार्‍या हिंदी भाषा प्रचार समित्या नव्हेत!


सात…

जी बाब मराठी कलेची, तीच मराठी साहित्याची. हजारो लोकांना मराठी वाचायचा नाद लावणार्‍या हडप, काकोडकर, अर्नाळकर, काशीकर, नाईक, शिरवळकर, कदम यांच्यासारख्या लेखकांना आमचे हे मराठीचे मनसबदार कचर्‍याप्रमाणे लेखणार. त्याऐवजी कुचकामी आणि प्रोथगामी समीक्षेने वाखाणलेले कुठले तरी, शंभर पुस्तकेही खपण्याची औकात नसलेले लेखक विद्यापीठात शिकण्यासाठी कोवळ्या मुलांच्या माथी मारणार.

अशाने भाषा वाढत नाही. भंपक भामट्याची दोंदे तेवढी वाढतात.

जगभरात शंभर कोटी लोक इंग्रजीतून व्यवहार करतात. या शंभर कोटी लोकांसाठी इंग्रजीत दरवर्षी सरासरी पाच लाख पुस्तके छापली जातात. आठ कोटी लोक मराठीतून व्यवहार करतात. इंग्रजीच्या हिशेबाने पाहिले तर मराठीत दरवर्षी चाळीस हजार पुस्तकेे छापली जायला हवीत. पण ही सरासरी चार हजार सोडा, दोन हजारसुद्धा पडत नाही!

आता ही माहिती ज्यांच्यासाठी सोयरी आहे, त्यांनीच सुतक पाळावे असा आमच्या भाषेच्या पुढार्‍यांचा हट्ट असतो. केवढा हा अर्थांतरन्यास!

स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीच्या वाढीला खूप मोठी संधी होती. पण त्यावेळी भाषेचे पुढारपण ज्या टोळभैरवांच्या हाती गेले त्यांनी ती संधी कायमची नष्ट करुन टाकली. याच टोळभैरवांच्या पिलावळीच्या हाती अजूनही मराठी भाषेचे पुढारपण असल्याने आजसुद्धा मराठीच्या वाढीची सुतराम शक्यता नाही.

मी म्हणतो बुडायची असेल तर बुडेना का मराठी? तुमच्या बुडाला का बुडबुडे फुटतात? एखादी भाषा संपली म्हणून जगातले लोक काही बोलायचं किंवा लिहायचं थांबणार नाहीत.

आपण मराठीत लिहितो याचा मला मुळीच अभिमान वाटत नाही.

भाषा मेली म्हणून नवे लेखक किंवा नवे साहित्य जन्माला यायचे थोडेच थांबणार आहे?




मुरलीधर खैरनार फोन 9850724131 इमेल: murli2999@gmail.com

No comments:

Post a Comment