http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/43020697.cms
चार महिन्यांपूर्वी विकासाचे सुंदर (दिवा) स्वप्न दाखवून केंद्रात मुसंडी मारणाऱ्या भाजपला नुकत्याच आठ राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत तोंडघशी पडावे लागले. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी 'लव्ह जिहाद'चे काढलेले अस्त्र भाजपसाठी आत्मघातकी ठरले. त्यामुळे पक्षाला जाती धर्माऐवजी लोकांना अपेक्षित असलेल्या विकासाच्याच मुद्द्यावर अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्रासह हरियाणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पुन्हा मुखभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जातीय भट्टीवर राजकारण शिजविणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेशचा देशभरात नावलौकिक आहे. असे राजकारण करण्यात समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांचा हात तेथे कोणी धरू शकलेले नाही. भाजप आणि काँग्रेसकडे यांच्यासारख्या 'राष्ट्रीय' पक्षांना अजून त्या प्रमाणात ही कला अवगत नसल्याने त्यांची तेथे अद्याप डाळ शिजू शकली नाही. मात्र, काँग्रेसच्या केंद्रातील आणि अखिलेश यादव यांच्या राज्यातील 'कारभारा'चा अनुभव घेतल्यामुळे जनतेने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. त्यावेळी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि जीवघेण्या महागाईमुळे जनता त्रस्त होती. त्यांनी या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी भाजपचा पर्याय निवडला. अर्थात त्यांना नरेंद्र मोदी यांनी विकासाचे गुलाबी स्वप्न दाखविले. या स्वप्नांमध्ये रमलेल्या तरुणाईने तर अगदी डोळेझाकपणे 'मोदीं'च्या कमळाला डोक्यावर उचलून धरले. यात केवळ हिंदूच होते का? नाही. यात सर्वच जाती धर्माच्या मतदारांचा सहभाग होता. कॉलेजात जाणारी आणि टीव्हीबरोबरच सोशल मीडियामुळे 'शहाण्या' झालेल्या या वर्गाची विकासाच्या अपेक्षेची नस भाजपने जाणली. त्यामुळेच त्यावेळी उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेल्या अमित शहा यांनी हिंदुत्वाबरोबरच विकासाला या नवमतदारांसमोर अधिक आक्रमकपणे मांडले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने उत्तर प्रदेशात निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले. याचे बक्षीस म्हणून अमित शहांचे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रमोशन झाले.
देशाच्या राजकारणाला दिशा देणारे अनेक नवनवीन राजकीय प्रयोग उत्तर प्रदेशात करण्यात आलेले आहेत. प्रस्थापित पक्षांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी नवीन फॉम्युला तयार करून त्याद्वारे मात करणे, ही येथील राजकारणाची चाल राहिलेली आहे. अमित शहा यांनीही संघप्रणित संपूर्ण हिंदू राष्ट्र संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या उद्देशाने 'लव्ह जिहाद'च्या अस्त्राला बाहेर काढले. 'इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मुस्लिम तरुणांकडून हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने मुस्लिम केले जात आहे. यामुळे व्यापक प्रमाणात सामाजिक हानी होत असल्याचा आरोप करण्यात आला. या मुद्याला भाजपने उत्तर प्रदेशात डोक्यावर घेतले. नव्हे हाच अकरा जागांवरील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहील याची काळजी घेतली. यासाठी खासदार योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज यांच्यासारख्या विखारी भाषणे करणाऱ्यांकडे धुरा सोपविण्यात आली. पक्षातील राजनाथसिंह, लालजी टंडन, डॉ. मुरली मनोहर जोशी यांसारख्या सीनिअर मंडळींना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. अगदी तिकीटवाटपातही त्यांना सहभागी होऊ दिले नाही. 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून जातीय मतांचे ध्रुवीकरणे करणे आणि समाजवादी पक्षाच्या मुस्लिम आणि यादव मतांमध्ये सुरुंग लावायचा, अशी अमित शहा यांची रणनीती होती. मायावती यांचा पक्ष पोटनिवडणुकीत नसल्यामुळे आपली स्पर्धा कमी होईल आणि दलित मतदार आपल्याकडेच वळतील, असे भाजपने गृहीत धरले. मात्र, प्रत्यक्षात झाले भलतेच. लोकसभा निवडणुकीत मोदींना डोक्यावर घेणाऱ्या याच मागास समाजाने विधानसभा पोटनिवडणुकीत 'लव्ह जिहाद'च्या मुद्याशी असहमती दर्शवित भाजपला जमिनीवर आपटले. उत्तर प्रदेशातील मतदारांमध्ये सुमारे २० टक्के वाटा असलेला ब्राह्मण आणि ठाकूर हे भाजपची पारंपरिक वोटबँक मानली जाते. त्यांच्यासह सुमारे ४५ टक्के वाटा असलेला इतर मागास वर्गही आपल्यासोबतच आहे, असा गोड गैरसमज भाजपने करून घेतला आणि 'लव्ह जिहाद'चा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडला.
प्रेमाला जातीच्या कुंपणात बांधण्याचा भाजपचा हा प्रयत्न उत्तर प्रदेशासह अन्य राज्यातील मतदारांच्या पचनी पडलेला नाही. विकासाचे गुलाबी चित्र मांडल्यानंतर महागाई कमी करण्याच्या आश्वासनपूर्तीसाठी प्रयत्न करण्याऐवजी भाजपकडून जातीयवाद आणि विभाजनवादाला जोपासण्याचा प्रयत्न झाल्याचा समज सर्वदूर झाला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील अकरापैकी तीन जागा मिळवित भाजप काठावर पास झाला आहे. यापूर्वी हातात असलेल्या सात जागा पुन्हा समाजवादी पक्षाच्या खात्यात गेल्या आहेत. 'लव्ह जिहाद'चा नकारात्मक परिणाम केवळ उत्तर प्रदेशातच झाला असे नाही. गुजरात, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला बहुतांश ठिकाणी मतदारांकडून मिळालेला नकार पचवावा लागला. गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी विक्रमी मताधिक्य घेत विजय मिळविला होता. त्यांच्या याच जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पुन्हा विजय मिळाला असला तरी मताधिक्य कमालीचे घटले आहे. खरे म्हणजे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. यापूर्वीही गेल्याच महिन्यात झालेल्या बिहार विधानसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला चारच जागा मिळू शकल्या होत्या. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची हातमिळवणी करीत भाजपला रोखण्याची यशस्वी खेळी केली होती. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालूंच्या पक्षाला भाजपच्या खालोखाल सर्वाधिक २० टक्के तर नितीशकुमार आणि काँग्रेस यांना अनुक्रमे १४.४ आणि आठ टक्के मते मिळाली होती. हीच मते एकत्रित विधानसभा पोटनिवडणुकीत 'नितीश-लालू' जोडीच्या पारड्यात पडली. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी नितीशकुमार आणि लालू हे दोन राजकीय ध्रुवावरील राजकीय व्यक्ती एकत्र येऊ शकतात, हे स्पष्ट झाले होते. मात्र, या निवडणुकीतील पराभवातून भाजपने कोणताही धडा न घेता उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील राज्यामध्ये 'लव्ह जिहाद'चा मुद्दा उपसून काढला, जो सूज्ञ मतदारांनी नाकारला.
केंद्रात सत्तासनावर विराजमान झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत मोदींच्या भाजपला १३ राज्यांमध्ये विधानसभेच्या ५४ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची तीन टप्प्यांत परीक्षा द्यावी लागली आहे. यातील निम्म्या जागा सुद्धा भाजपला राखता आलेल्या नाहीत. येत्या महिनाभरात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. दोन्ही राज्यांमधील 'अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर' भाजपच्या पथ्यावर पडू शकतो. दोन्ही राज्यांमधील जनतेला विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे, जीवघेण्या महागाईपासून सुटका हवी आहे, भ्रष्ट कारभारापासून मुक्ती हवीय. मोदींनी ढोल बडवित सांगितलेल्या सुशासनाची मतदारांना आस आहे. असे निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी ठरू शकणारे अनेक प्रभावी मुद्दे हाती घेतल्यास भाजपच्या सादाला मतदारही प्रतिसाद देऊ शकतील. या दोन्ही राज्यांमधील पराजय अमित शहा आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांचे नाक कापणारा ठरू शकतो. भाजपने कथित 'लव्ह जिहाद'सारख्या सामाजिक विषमतावादी मुद्द्याऐवजी विकासावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास भाजपला यश मिळून पक्षाचे 'सुपरहिरो' मोदींची प्रतिष्ठा वाचेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांची विकासाची अपेक्षा पूर्ण करण्याची दीड दशकानंतर संधी मिळू शकेल.
Sep 21, 2014, 12.29AM IST सौजन्य : विजय महाले |

No comments:
Post a Comment