By वैभव छाया on September 21, 2014 Kalamnaama
अॅनिहिलेशन ऑफ कास्ट आणि अरुंधतीhttp://kalamnaama.com/annihilation-of-caste-aani-arundhati/
अॅनिहिलेशन ऑफ कास्ट आणि अरुंधतीhttp://kalamnaama.com/annihilation-of-caste-aani-arundhati/
अरुंधती रॉय लिखित प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या अॅनिहिलेशन ऑफ कास्टच्या ऑनलाईन विक्रीसंदर्भातील डिस्क्रिप्शनमध्ये एओसीचे लेखक हे अरुंधती रॉय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचं आढळलं आणि गेल्या काही महिन्यांत शांत झालेला वादाचा धुरळा अचानकपणे घोंघावला गेला आहे. सध्या इंटरनेटवर एओसी आणि अरुंधती रॉय हा ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे. त्यानिमित्ताने…
‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकाला एस. आनंद यांनी नवयान प्रकाशनामार्फत प्रकाशित करताना आंबेडकरी चळवळीशी कधीही दूरदूरवर संबंध नसलेल्या मात्र माओवादी चळवळ आणि विचारधारेशी कायम घट्ट संबंध बाळगणार्या अरुंधती रॉय यांची १४० पानी प्रस्तावना घेऊन आज ७७ वर्षांनंतर पुन्हा प्रकाशित करावं हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. गेल्या मार्च महिन्यात या पुस्तकाचं प्रकाशन एका शानदार कार्यक्रमात करण्यात आलं होतं. मात्र प्रकाशन सोहळ्यानंतर लगेचच वाद निर्माण झाला. खरंतर हा वाद प्रकाशनाआधीपासूनच सुरू होता. प्रकाशनानंतर तो मोठ्या स्वरूपात व्यक्त होऊ लागला. यातील सर्वात मोठा आरोप होता तो एस. आनंद आणि अरुंधती रॉय यांच्या इंटेन्शनचा. यासंदर्भात इंटरनेटवरील माध्यमांवर जे काही चर्चेचं रान पेटलं होतं त्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे…
एस. आनंद हे दक्षिण भारतीय ब्राह्मण असूनही अत्यंत पुरोगामी विचारांचे विचारवंत आहेत. मागासवर्गांच्या उत्थानासाठी चालू असलेल्या हरेक प्रकारच्या चळवळीत त्यांचं सातत्याने असलेलं बौद्धिक योगदान हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. एस. आनंद यांच्या नवयान या प्रकाशन संस्थेने आजवर अनेक उच्च दर्जाच्या साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे. त्यातील दोन महत्त्वाची प्रकाशनं
ज्यांचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल ती म्हणजे भीमायन आणि अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू. भीमायन ही सांप्रत काळातील अतिशय सुंदर अशी बायोग्राफी आहे. तर, कालकथित शर्मिला रेगे लिखित अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून भारतीय परिप्रेक्षात मांडलेला स्त्री-वाद विषद करतो.
काही वर्षांपूर्वी एस. आनंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासंदर्भात अरुंधती रॉय यांच्याकडे विचारणा केली होती. आनंद यांचा प्रस्ताव स्वीकारत अरुंधती रॉय यांनी सदर विषयावर सखोल अभ्यासाअंती लिहिण्याचं मान्य केलं आणि २०१४ साली त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसकट अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नव्याने प्रकाशित करण्यात आलं.
अरुंधती रॉय यांच्या १४० पानी प्रस्तावनेसह असलेलं अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नवायान प्रकाशनाने प्रकाशित केलं असून सदर नव्या आवृत्तीत बाबासाहेबांनी लिहिलेल्या एकाही शब्दाची कुठेही फेरफार करण्यात आलेली नाही. उलट एस. आनंद यांनी महत्त्वाच्या ठिकाणी अनेक उपयुक्त अशा तळटिपांचा अंतर्भाव केलेला आहे. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट समजून घेण्यासाठी या तळटिपा खूप मदत करतात. नव्या रचनेसह पुस्तक प्रकाशनाची घोषणा होताच नव्या वादाला तोंड फुटलं. त्या वादाचे मुद्दे खालीलप्रमाणे…
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? आंबेडकरांवर समीक्षा लिहिण्यासाठी एखाद्याने मागास जातितच जन्माला यायला हवं हा निकष आहे का?
२. पुस्तकाची किंमत ही साडेतीनशे रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. पुस्तकाची छपाई, बांधणी, मांडणी, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय आहे. मात्र सदर पुस्तक हे आधीच कमी किमतीत उपलब्ध असताना इतक्या महागड्या किमतीत का म्हणून प्रकाशित करत आहेत?
३. इथल्या मागासवर्गीय विद्यार्थी आणि वाचकांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज एस. आनंद यांनी का घेतला नाही?
४. मूळ पुस्तकात गांधींचा फक्त एकदाच साधासा ओझरता उल्लेख असताना मुखपृष्ठाचा अर्ध्याहून अधिक भाग हा गांधींच्याच आकृतीने का व्यापलेला आहे?
५. ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ सर्वत्र सहजगत्या अगदी माफक दरात उपलब्ध असताना ५२५ रुपये किमतीत विकण्याचा आग्रह का धरला जात आहे? कालांतराने ही किंमत ३२५ रुपयांवर आणली गेली खरी परंतु आक्षेप कायम राहिला की हे पुस्तक आंबेडकरी विचारधारेच्या सक्षमीकरणासाठी आणलेलं नसून ते केवळ नफाखोरीच्या उद्देशानेच बाजारात आणलं गेलं आहे.
६. या पुस्तकाचं मार्केटिंग ज्या पद्धतीने झालं त्यावरून तर असं वाटतं की, मुळात या पुस्तकातील डॉ. आंबेडकरांच्या विचारांपेक्षा अरुंधती रॉय यांना डॉ. आंबेडकरांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल आणि एकूणच आंबेडकरी चळवळीबद्दल काय वाटतं हे जाणवून देणं जास्त महत्त्वाचं वाटत असावं.
गेल्या जानेवारी महिन्यापासून ते आज तारखेपर्यंतच्या कालावधित एकूण निदर्शनास आलेल्या निरीक्षणावरून एक गोष्ट स्पष्टपणे मांडता येते की, या ग्रंथाला सर्वात जास्त विरोध हा दक्षिण भारतातील राज्यांमधूनच झालेला आहे. थोड्याफार प्रमाणात दिल्ली आणि राजस्थानसारख्या भागांतूनसुद्धा विरोध झालेला आहे. देशातील दोन महत्त्वाच्या मेट्रो सिटीज असलेल्या मुंबई आणि पुणेसारख्या शहरांतून या विषयावर ना विरोध झाला, ना समर्थन. उपरोक्त विषयावरील ९० टक्के चर्चा या राऊंड टेबल इंडिया, गुगल ग्रूप्स, एफबी ग्रूप चॅट्ससारख्या मुक्त माध्यमांवरच झाली. चर्चेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पाच हजाराच्या आसपास होती. हे विद्यार्थी एम. फिल, पीएचडी, जेएनयू, टीआयएसएस, आयआयएम, आयआयटीसारख्या शिक्षण संस्थाशी संबंध असलेले होते. यात ब्राह्मण, वाल्मिकी, कायस्थ, चर्मकार, बौद्ध, मेहतर जातितील विद्यार्थ्यांचा समावेश अधिक होता. या विषयावर तब्बल दोन महिने प्रचंड चर्चा झडल्या. अखेरीस ३० मार्च २०१४ रोजी झालेल्या चर्चेत अक्षय पाठक (राजस्थान, द हिंदूमधील स्तंभलेखक), कुफीर नलगुंडवार (राऊंड टेबल इंडियाचे संपादक) यांनी कन्क्ल्यूझन काढत एस. आनंद आणि अरुंधती रॉय यांना जाहीर पत्र लिहिलं. हे पत्र राऊंड टेबल इंडियावर आपल्याला आजही वाचण्यासाठी उपलब्ध आहे. या पत्रात त्यांनी पुस्तकाची किंमत, त्याची छपाई आणि माओवादी विचारांच्या समर्थक असलेल्या अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसंदर्भात विचारणा केलेली आहे.
अक्षय पाठक यांनी एस. आनंद यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात (अक्षय पाठक हे स्वतः जन्माने ब्राह्मण आहेत) अरुंधती रॉय या मागासवर्गीय जनतेचा त्यांना स्वतःला रिपे्रझेंट करण्याचा अधिकार हिरावून घेत असल्याचं म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आज ना उद्या मेनस्ट्रीम प्रवाहात येईलच त्यासाठी अरुंधती रॉय यांचीच प्रस्तावना घेण्याचा अट्टाहास करणं हे योग्य नसल्याचंदेखील नमूद केलं आहे.
या नव्या आवृत्तीमुळे खरंतर आंबेडकर लिखित साहित्य कदाचित पहिल्यांदाच देशभरातील एलिट समजल्या जाणार्या बुक-शॉपमध्ये उपलब्ध झालं आहे. पुस्तकासंदर्भात उठलेल्या वादात दोन प्रकारचे प्रवाह पहायला मिळत होते. त्यातील उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेले आक्षेप आपण वर पाहिलेच आहेत.
आता आपण मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून त्याच चर्चेत घेतल्या गेलेल्या आक्षेपांवर एक नजर टाकूयात…
१. अरुंधती रॉय यांनी पुस्तकात गांधी यांना अवाजवी स्थान देत मूळ मुद्याला बगल दिली आहे. पुस्तकात आंबेडकरांनी गांधींबद्दल केवळ एकच रेफरन्स दिलेला असताना रॉय लिखित प्रस्तावनेत केवळ गांधींची टीका करण्यात १४० पानं खर्ची घालणं हे न पटणारं आहे.
२. सोबतच बाबासाहेबांची उंची वाढवण्यासाठी गांधींची उंची कमी करणं हे देखील त्यांना पचनी पडलेलं नव्हतं. मात्र अरुंधती रॉय यांनी गांधींची केलेली समीक्षा ही आजवर गांधीजींवर केल्या गेलेल्या एकूण समीक्षेतील सर्वात कठोर अशीच आहे.
३. सदर समीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच अस्पृश्यांचे एकमात्र उद्धारकर्ते दाखवताना रॉय यांनी गांधींचं अस्पृश्यांच्या मानवी हक्कांच्या लढ्यात कोणतंही सबळ योगदान नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनी एस. आनंद यांच्या इंटेन्शनवरच शंका उपस्थित करत आनंद यांना केवळ नफा कमावण्यातच रस असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात राऊंड टेबल इंडियावर प्रकाशित झालेल्या दोन लेखांवर सखोल चर्चा घडून आली. या चर्चेची व्याप्ती इतकी मोठी होती की MINT, Business Standard, The Hindu सारख्या वर्तमानपत्रांनी याची दखल घेत प्रत्येकी एक-एक स्तंभ या चर्चांच्या विश्लेषणासहित छापला होता.
अॅनिहिलेशन ऑफ कास्टच्या ऑनलाईन विक्रीसाठीचा ईमेल हा स्वतः एकतर प्रकाशक आणि लेखक यांच्याकडून गेलेला असतो तेव्हाच अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाईट त्या मान्य करून त्यांना ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. तीन दिवसांपूर्वी जवळपास सर्वच वेबसाईटवर एओसीच्या लेखक जोडगोळीत आधी अरुंधती रॉय नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं होतं. मी स्वतः या संदर्भातील स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. त्यानंतर झडून आलेल्या चर्चेमुळे हा विषय अवघ्या अर्ध्या दिवसात इतका पसरला गेला की ज्या-ज्या वेबसाईट्सवर अरुंधती रॉय यांचं नाव पुस्तकाच्या लेखिका म्हणून होतं ते बदलून प्रस्तावना लिहिणार्या लेखिका असं बदललं गेलं. आता यासाठी आपण एकतर प्रकाशक एस. आनंद किंवा लेखिका अरुंधती रॉय यांनाच जबाबदार धरू शकतो.
पुस्तक प्रकाशनाच्यावेळेस अरुंधती रॉय यांनी त्यांच्या भाषणात मांडलेला एक मुद्दा अतिशय वादग्रस्त ठरला होता. त्यांनी आज देशभरातील बाबासाहेबांचे जेवढे पुतळे आहेत त्या पुतळ्यांच्या हातात असलेलं भारतीय संविधान काढून त्या ठिकाणी अॅनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक असायला हवं, असं म्हटलं…
कदाचित त्या विसरल्या असाव्यात की स्वातंत्र्यानंतरही इथल्या मागास वर्गीयांवर आजही तितकेच अमानुष अत्याचार होतायेत जेवढे आधी होत होते. मात्र आजवर कधीही खलिस्तान, द्राविडीस्तान किंवा पाकिस्तानच्या धर्तीवर वेगळ्या दलितीस्तानची मागणी झालेली नाही. इथल्या प्रत्येक आंबेडकरवाद्याचा प्रवास हा संविधानवादाच्या दिशेनेच चाललेला आहे हेसुद्धा त्या साफ विसरलेल्या दिसत आहेत.
खरंतर आज आंबेडकरोत्तर चळवळीतील कालखंडात आंबेडकरी विचार आणि चळवळीची नव्याने मांडणी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ती केवळ मागासवर्गातून येणार्या बुद्धिवाद्यांनीच करावी हा सनातनीपणा आपण बिलकूल जोपासता कामा नये. खरं तर याआधीही तो फारसा जोपासला गेलेला नाही. एस. आनंद यांची आजवरची सर्व प्रकाशनं इथल्या आंबेडकरवाद्यांनी डोक्यावरच घेतली आहेत. डॉ. गेल ऑम्वेटसारख्या परदेशी मूळ असलेल्या विचारवंताना चळवळीत अग्रस्थान बहाल केलेलं आहे. मात्र अरुंधती रॉय यांच्याबाबतीत त्यांच्या मनात माओवादाविषयी असलेल्या सॉफ्ट कॉर्नरमुळे निश्चितच शंका उपस्थित केली जाऊ शकते. त्यांचं आजवरचं आयुष्य हे बिगर आंबेडकरी आणि बिगर जात संघर्षाच्या चळवळीत गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या लेखनाला लिहिलेलं प्रास्ताविक, बदलत्या काळात बदललेल्या संदर्भांबरोबर त्यांचं साहित्यिक आणि वैचारिक मूल्य कितपत स्वीकारलं जाईल अथवा अधोरेखित केलं जाईल हा यक्षप्रश्न आपल्यासमोर अजूनही उभाच आहे.http://kalamnaama.com/annihilation-of-caste-aani-arundhati/
No comments:
Post a Comment