Wednesday, 24 September 2014

भारत - एकाच वेळी अनेक युगात


भारताचे यान मंगळावर पोचल्याचा आनंद आणि अभिमान व्यक्त करताना अनेकांनी आतातरी मुलींच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून लग्ने मोडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केलीय. त्यावर अनेकांनी ज्या शास्त्रज्ञांनी हे यान तयार केले त्यांनीच आधी तिरूपतीला जाऊन या यानाची प्रतिकृती अर्पण केली होती याचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित केलाय.

१. भारतात एकाच वेळी आपण चंद्र, मंगळ अशा यशस्वी स्वार्‍या केल्या तरी तरी त्याच वेळी आपण आदीमानव काळातही राहात असतो. राहणार. भारत हा असा देश आहे की तो एकाच वेळी अनेक युगात {काळांमध्ये } वावरत असतो. हे बदलायला आणि सारा देश वर्तमानात यायला फार काळ लागेल. पण हे बदलेल.
अनेक धर्म, वर्ण, जाती, पंथ, वंश, आर्थिक वर्ग, अशा नानाविध गोष्टींमध्ये आपण विभागले गेलेलो आहोत. मुळात अनेक बाबतीत हा देश एक नाहीच. अशावेळी या विसंगती अटळ आहेत. अपरिहार्य आहेत.

२. आहे ही विसंगती टिकून राहावी, आहे या अंधश्रद्धा टिकल्या तरच आपले हितसंबंध कायम सुरक्षित राहतील हे ओळखून अहोरात्र काम करणारा एक फार मोठा, पोलादी संघटन असलेला आणि भक्कम आर्थिक बळ असलेला, पाठीशी प्रचारकांची फौज बाळगणारा वर्ग इकडे अस्तित्वात आहे. बदलासाठी मात्र "बोलण्यापलिकडे" फारसे  कोण काम करतोय?

३. परिवर्तन आपोआप होत नसते. त्यासाठी समर्पित वृत्तीने, सातत्याने आणि कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे काम करावे लागते. त्याचा संपूर्ण अभाव असताना बदलाची अपेक्षा करणे म्हणजे भाकड गायीला वासरू का होत नाही असे विचारण्यासारखे आहे.

४. कितीही आपटा पण  जोवर धर्मसत्ता, बाजारसत्ता आणि राजसत्ता यांची एकी आहे, तोवर  आपण बडबडण्यापलिकडे काहीही साध्य करू शकणार नाही.

५. चला व्यक्त होण्याचे समाधान तरी का गमवा? बोला, लिहा, संथ गतीने का होईना पण त्यचाही परिणाम होईलच.

मंगल हो!

No comments:

Post a Comment