Saturday, 20 September 2014

ज्ञानाच्या सरोवराचा सन्मान


डॉ. अशोक केळकर यांच्या जाण्याने ज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर दखल घ्यावी, असे जे मोजके भारतीय प्रज्ञावंत आहेत, त्यातला अग्रणी हरपला आहे...
माझे हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील जुने टिपण सरांना विनम्र आदरांजली म्हणून...
......
ज्ञानाच्या सरोवराचा सन्मान
व्यासंग-संशोधनाने ज्यांनी आपले नाव जगभरातील विद्वान व संशोधकांच्या मांदियाळीत नेऊन ठेवले आहे, अशा मराठी माणसांमध्ये भाषावैज्ञानिक डॉ. अशोक रामचंद केळकर यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या जन्मभराच्या व्यासंगाचे प्रसन्न प्रतिबिंब असलेल्या 'रुजुवात - आस्वाद : समीक्षा : मीमांसा' या गंथाला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर व्हावा, यासारखी आनंदाची गोष्ट नाही. (अपवाद वगळता) तोलामोलाच्या गंथांचा गौरव करणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्काराची उंचीही 'रुजुवात'च्या सन्मानाने वाढलीच आहे. 'या पुरस्कारामुळे भाषा आणि साहित्य हे दोन्ही निकटचे विषय आहेत, हे या निमित्ताने लोकांना समजेल. हे समजणे मी अधिक महत्त्वाचे मानतो' अशी प्रतिक्रिया केळकरांनी व्यक्त केली. ती त्यांच्या कामाचेही महत्त्व सांगणारी आहे. भाषेचा साहित्याशी अनन्य संबंध तर आहेच, पण एकूण जीवनाशीही अतूट संबंध आहे. हा भाषेचा जीवन व संस्कृती यांच्याशी असणारा संबंध उलगडणे, सांगणे आणि जोपासणे असे त्रिविध कार्य केळकरांनी केले. हे कार्य म्हणजे काय, ते 'रुजुवात' पाहून समजते.
दोन वर्षांपूवीर् हा महागंथ 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित केला. तेव्हाही त्याला कमालीचा उशीर झाला होता. या गंथाला अनेक दशके कसा विलंब झाला, याची कथा केळकरांनी मनोगतात लिहिली आहे. ती मराठीच्या सगळ्या सांस्कृतिक शिलेदारांचे डोळे उघडणारी आहे. यात दोष कुणाचा? असा प्रश्ान् विचारून केळकरांनी प्रकाशकांची उदासीनता, लेखकांची अ-तत्परता आणि आपल्या वाचन-संस्कृतीचा एकारलेपणा असे उत्तरही दिले आहे. या पुस्तकाच्या प्रवासात लेखक म्हणून केळकरांना जे अनुभव आले, त्यातली माणसे महत्त्वाची नाहीत. पण मराठीतल्या अभिजात व प्रतिभासंपन्न लेखनाची समाज म्हणून आपण काय बूज राखतो, याचे विषण्ण करणारे दर्शन त्या मनोगतात होते. आता अकादमीच्या पुरस्काराने या सांस्कृतिक हलगजीर्चे थोडे परिमार्जन झाले. मात्र, केळकरांचे आजही गंथबद्ध न झालेले विपुल लेखन जेव्हा पुस्तकांत येईल व त्यांचे गंभीर वाचन मराठी समाज करेल, तेव्हा या पुरस्काराचे खरे चीज होईल.
' भाषाविज्ञान' हा संस्कृतिव्यवहारातला 'हलका-फुलका' घटक नाही. पण भाषाविज्ञानाच्या सोबत मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, समाजकारण, तत्त्वज्ञान आणि अगदी राजकारणही येतेच. ऋषिवर नॉम चॉम्स्की यांचे उदाहरण पाहिले तर भाषाविज्ञानाचा परीघ किती विषयांना स्पर्श करू शकतो आणि त्यातून अद्ययावत 'क्रिटिकल कॉमेंट्री' कशी करता येते, हे दिसते. 'रुजुवात'चा परीघही असाच अभिजात हिंदुस्तानी संगीतापासून शास्त्रीय नृत्यापर्यंत आणि ललित कलांपासून नाट्य-निमिर्तीच्या प्रक्रियेपर्यंत सारे सामावून घेतो. खरेतर, चॉम्स्की वा केळकर यांना 'भाषावैज्ञानिका'च्या रूढ भूमिकेत मर्यादित करता येत नाही. ते संस्कृतीचे सर्वांगीण भाष्यकार तसेच तत्त्वचिंतक असतात. असे भाष्य व तत्त्वचिंतन 'रुजुवात'मध्ये ठायी ठायी आहे. ते सांस्कृतिक संचित व वर्तमानाचा अर्थ लावताना भविष्याचेही सूचन करतच असते. या पुस्तकात केळकरांनी म्हटले आहे, 'खरोखरीचा अर्थपूर्ण वाद खेळायचा असेल तर दोन्ही पक्षांना मान्य होतील, अशी विधाने अगोदर एकत्र करून सुसंगतपणे एक समान विवादभूमी सादर करणे महत्त्वाचे आहे. अशी समान विवादभूमी शोधण्याचा या पुस्तकात जागोजाग प्रयत्न केला आहे. हा तटस्थपणा नाही की तडजोडही नाही. त्यामागे तत्त्वबोधाचे उद्दिष्ट असते.' हे तत्त्वबोधाचे उद्दिष्ट मनात ठेवले तर आपल्या सर्व सांस्कृतिक-सामाजिक चर्चांचा स्तरच बदलून जाईल. 'रुजुवात'च्या पुरस्काराच्या निमित्ताने एवढा धडा सर्वांनी घेतला तर?
- सारंग दर्शने

No comments:

Post a Comment