Sunday 7 October 2012

महात्मा फुल्यांची बदनामी करणारा हाच तो लेख

{सौजन्य:लोकसत्ता,लोकरंग,रविवार दि.२३ सप्टें.२०१२}
भाषा कूस बदलते आहे..
Bookmark and SharePrintE-mail
प्रशांत असलेकर , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
lokrang@expressindia.com
alt
आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय. पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय..
परवा दिवशीची गोष्ट! माझ्या मुलीला तिच्या काही मैत्रिणी बोलवायला आल्या. तिला घेऊन त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते. माझी मुलगी तेव्हा अगदी घरगुती अवतारात होती. तिचे केस विस्कटलेले होते. मैत्रिणी आल्या म्हणून आणि बाहेर जायचंय म्हणूनसुद्धा तिला खूप आनंद झाला. तिची धांदल उडाली. तिने पटापट कसातरी स्वत:चा अवतार आवरला. केसांवर फक्त हात फिरवून चाप लावला आणि ती गडबडीने बाहेर जायला निघाली. तिचा तो अवतार बघून मी तिला म्हणालो, ‘‘अगं, अशी कशी बाहेर जातेस? जरा सरसं कर!’’ माझी मुलगी गोंधळली, ‘सरसं कर’ हा शब्द तिला समजला नाही. तिच्या मैत्रिणींनाही तो शब्द कळला नाही. नीट समजावून सांगितल्यावर तिच्या भाषेत ‘हेअरस्टाईल’ ठीकठाक करून ती निघून गेली.
हल्ली असं वारंवार घडतंय. आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय, पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय.
या ठिकाणी १९५० वगैरेचे नॉस्टेल्जिक काळ अभिप्रेत नाही, तर अगदी अलीकडचा- गेल्या २५-३० वर्षांचा काळ अभिप्रेत आहे. वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत. मराठी भाषेत यापुढे अनेक शब्द असे उरतील, की ते संदर्भ, वाक्प्रचार म्हणून वापरले जातील; पण त्यांचा अर्थ कळण्यासाठी भावी पिढय़ांना शब्दकोश चाळावे लागतील.
सीमेंट-काँक्रीटच्या आजच्या चेहराहीन जगात ‘घर सारवणे’, ‘भिंती लिंपून घेणे’, ‘अंगणात सडा घालणे’ वगैरे गोष्टी कालबाह्य़ झाल्यात. त्यामुळे या क्रियांशी संबंधित जे वाक्प्रचार आहेत ते पुढच्या पिढीला सहजपणे कळणार नाहीत. चुकांसाठी सबबी सांगणे, कारणे देणे याला आपण ‘सारवासारवी’ म्हणतो. प्राजक्ताच्या फुलांचा सकाळी जमिनीवर जो खच पडतो त्याला आपण ‘फुलांचा सडा’ म्हणतो. एखाद्या कामातल्या चुका दुरुस्त करण्याला मराठी व हिंदीत ‘लिपापोती’ म्हणतात. भिंती जशा सारवून घेतल्या जायच्या, तसं चुलींना चिखलात फडकं भिजवून ‘पोतेरं’ केलं जायचं. त्या फडक्याची अवस्था दयनीय व्हायची. म्हणून एखाद्याचा खूप अपमान केला की, ‘त्याचं पोतेरं केलं’ असं म्हटलं जायचं. यापुढे मराठी भाषेत ‘सारवासारवी’, ‘सडा पडणे’, ‘लिपापोती’, ‘पोतेरं केलं’ हे शब्द राहतील; पण त्यांचा अर्थ सहजासहजी कळणार नाही. कारण हे शब्द ज्या क्रियांमधून उद्भवतात त्या गोष्टीच जीवनशैलीतून बाद झालेल्या आहेत.
काही जुन्या शब्दांची जागा नव्या इंग्रजी शब्दांनी घेतलीय. पण त्यातली खुमारी मात्र निघून गेलीय. ‘साबण मोरीत ठेवलाय’ असं सांगितलं की मुलांना समजत नाही. जुन्या सवयीनुसार मी कधी ‘मोरी’ हा शब्द वापरला की माझी मुलं बुचकळ्यात पडतात. बाथरूम म्हटलं की त्यांच्या लगेच लक्षात येतं. (कार्टी जशी काही इंग्लंडलाच जन्माला आलीत!) लहानपणीची अंधारी, थंडगार, नरक चतुर्दशीला आणि केस कापल्यावर आईने खसाखसा घातलेल्या आंघोळीची आठवण करून देणारी ‘मोरी’ चाळीबरोबरच पाडली गेली आणि कायमची हरपली. ‘स्वयंपाकघर’ हा फोडणीच्या वासाची, ठसक्याची, खकाण्याची आठवण करून देणारा अगडबंब, पण वैशिष्टय़पूर्ण शब्दही असाच लयाला गेलाय. त्याची जागा कुठलाच चेहरामोहरा नसलेल्या ‘किचन’ने घेतलीय. स्वयंपाकघर म्हटलं की जिभेला पाणी सुटायचं. किचन म्हटलं की कुठलेच भाव मनात उमटत नाहीत. मी कधी चुकून ‘स्वयंपाकघर’ हा शब्द उच्चारला तर माझी मुलं, ‘हा कोण भोटमामा आम्हाला बाप म्हणून नशिबी आलाय?’ अशा नजरेने माझ्याकडे बघतात.
‘पन्नास पान सहज उठेल’ अशा परिमाणात जिचं क्षेत्रफळ सांगितलं जायचं ती ‘बैठकीची खोली’ ही अशीच अंतर्धान पावली आहे. ताईचं लग्न ठरलं तेव्हा तिने दाजींकडे टाकलेले चोरटे कटाक्ष ज्या बैठकीच्या खोलीने अनुभवले ती आता ‘हॉल’ झाली आणि तिच्यातली गंमतच निघून गेली. आजीच्या उबदार गोधडीची आठवण करून देणारी ‘आतली खोली’ आता ‘बेडरूम’ झालीय. नावातूनच ती फक्त झोपण्याशी नातं सांगते. शेणानं सारवलेल्या अंधाऱ्या ‘आतल्या खोलीत’ एक अंगभूत थंडावा असायचा. तिथे आजीच्या कुशीत शिरलं की पटकन् झोप लागायची. तिचं बेडरूम झाल्यापासून एसी लावूनसुद्धा फॉल्स सीलिंगवरचे रेडियमचे चंद्रतारे झोप आणत नाहीत. लहानपणी आजोबा व्हरांडय़ात आरामखुर्चीत बसून पेपर वाचायचे. व्हरांडा हे आजोबांचं साम्राज्य होतं. ‘व्हरांडा’ हा शब्द उच्चारताच आजोबांच्या धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा भास व्हायचा. त्याची सर चवळीच्या शेंगेसारख्या ‘गॅलरी’ला कुठली? तिचा उपयोग फक्त वॉशिंग मशीन ठेवण्यापुरताच!
नववधू म्हणे उंबऱ्यावरचं धान्याचं माप लवंडून घरात प्रवेश करते. त्यातलं ‘धान्याचं माप’ पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वीच मोडीत निघालं. हल्लीच्या नववधूंना धान्य भरलेला ग्लास ओलांडायला तरी ‘उंबरा’ कुठेय? उंबरा हे काय प्रकरण असायचं ते येणाऱ्या पिढीला समजावून सांगावं लागेल. हीच गोष्ट ‘मांडणी’, ‘कोनाडे’, ‘फडताळं’, ‘खुंटाळे’, ‘ताटाळे’ वगैरे शब्दांबाबत. मॉडय़ुलर किचनच्या जमान्यातल्या मुलांना हे शब्द समजणारच नाहीत. नव्या गृहरचनेत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. पाणी पिण्याची भांडी रचून ठेवण्यासाठी पूर्वी ‘घडवंची’ असायची. कांदे ठेवायचं ‘शिंकाळं’ असायचं. चटणी वाटायला ‘पाटा-वरवंटा’, शेंगदाणे कुटायला ‘खलबत्ता’ असायचा. आजोबांचा ‘बटवा’, तर आजीची ‘चंची’ असायची. आजोबा अंगात बिनबाह्य़ाचा सदरा घालायचे त्याला ‘कोपरी’ म्हणायचे. आजीच्या नऊवारी साडीच्या काष्टय़ाच्या फुलोऱ्याला ‘कमळ’ म्हणायचे. आजोबा कोपरीच्या आतल्या खिशात व आजी कमळात पैसे ठेवायची. चुलीला ‘वैल’ असायचा. भाकरीला ‘पातोडा’ असायचा. घराला ‘आढं’ असायचं. उरलेलं अन्न काढून ठेवायला ‘शकुंतला भांडं’ असायचं. तुपासाठी ‘सतेलं’ असायचं. तेलाची ‘बुधली’, माठ ठेवण्यासाठी ‘तिपाई’, लहान बाळांना पाणी पाजायला ‘बुडकुलं’, मोठय़ांसाठी ‘फुलपात्रं’ असायचं. उभा तो ‘गंज’ आणि पसरट तो ‘कुंडा’ असयाचा. फुलांची ‘परडी’ असायची. दुपारी पडायला ‘बारदान’, ‘गोणपाट’, ‘चटई’ वापरायचे. स्टोव्हमध्ये रॉकेल भरण्यासाठी ‘नरसाळं’ व स्टोव्ह पेटवण्यासाठी ‘काकडा’ असायचा. तीच गोष्ट ‘अंबाडा’, ‘गंगावन’, ‘खोपा’, ‘केसांची जाळी’ वगैरे गोष्टींबाबत. आजच्या मुलींना ‘गंगावन’ हा शब्द कितपत कळेल याबद्दल शंकाच वाटते. पैसा मुबलक झाल्यामुळे कपडे फाटेपर्यंत वापरले जात नाहीत, त्यामुळे ‘ठिगळ’, ‘रफू’ हे शब्दही विरून गेलेत.
घरांची रचना, पोशाखपद्धती, राहणीमान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे सारे शब्द आता लोप पावले आहेत. एकीकडे हे शब्द लयाला गेलेत, तर काही नवीन शब्द उदयालाही येत आहेत.
ग्रॅन्ड फिनाले (स्पर्धेची अंतिम फेरी), फॅसेड (दर्शनी भाग), ग्रोमो (ट्रेलरचा नवा अवतार), अब्रा-का-डब्रा (कुठल्याही विषयातलं प्राथमिक ज्ञान), आरएसव्हीपी (समारंभाला किती माणसे उपस्थित राहणार, हे आगाऊ कळवणे), पसरी खाणे (दिलेला शब्द फिरवणे), डबल ढोलकी (दोन्ही बाजूने बोलणारा माणूस), चवल्या वारणे (खोटं बोलणे), कॅलेन्डर छापणे (गरोदर होणे), चमकेश (समारंभात मिरवणारे लोक), वंटास हो (चल निघ), चिरीमिरी (लाच), मांडवली/ तोडपाणी (समेट), शानपत्ती (शहाणपणा), फाटय़ावर मारणे (किंमत न देणे), किक् बसणे (नशा चढणे), वन टू का फोर (नाहीसे होणे), मकडीछाप, लपूट (बावळट मनुष्य), डाव- छावी- आयटेम  (जिच्यावर प्रेम करतो ती मुलगी), जीपीएल (हिचा अर्थ सर्वश्रुत आहे), आडेतीर (चुकीची औषध उपाययोजना), चमाट (चापट), हड्डीकट (लो-वेस्ट जीन्स) असे काही नवीन शब्द जन्माला आले आहेत.
भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. ‘मी तुमचं धन्यवाद करतो’ (आभार मानतो) यात कुणाला फारसं गैर वाटेनासं झालंय. ‘मिळणे’ या अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद तर इतकं सर्वमान्य झालंय, की (पाचवी गाडी ‘भेटली’, नव्वद टक्के मार्क ‘भेटले’, अ‍ॅडमिशन ‘भेटली’, चान्स ‘भेटला’ वगैरे) ‘मिळणे’ हे शुद्ध क्रियापद वापरणारा आता बावळट ठरू लागलाय. सुशिक्षित लोकांच्या तोंडीही ‘मिळणे’ अशा अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद रुळलंय. त्यात कुणाला गैरही वाटेनासं झालंय. त्याचप्रमाणे ‘रिकामा/ रिकामी’ या शब्दासाठी ‘खाली’ हा शब्दही सर्वमान्य झालाय. उदा. आज गाडी ‘खाली’ होती. रस्ता ‘खाली’ होता. कुशल कामगारांसाठी ‘कारागीर’ हा शब्द रूढ झालाय. गियर बदलताना अ‍ॅक्सेलेटर बंद करावा लागतो त्याबाबत ‘मोसम’ हा शब्द वेग, त्वरण या अर्थाने रूढ झालाय. गाडीने ‘मोसम’ पकडला, गियर टाकताना गाडीचा ‘मोसम’ तुटला, ही भाषा रूढ झालीये. ‘काम लागतंजुगतं झालं की येतो’ याऐवजी ‘कामाला चाल भेटली की येतो’ असं म्हटलं तरी कुणाला त्यात वावगं वाटत नाही.
एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात. ठाणे जिल्ह्य़ात ‘ठाण्याला नेलं पाहिजे’ म्हणजे (तिथे मेंटल हॉस्पिटल असल्यामुळे) वेडय़ाच्या इस्पितळात भरती केलं पाहिजे असा अर्थ समजला जातो. नागपुरात ‘फजूल फोके’ म्हणजे पोकळ बढाया, तर पुण्यात ‘निघतो’ अशा अर्थाने ‘सुटतो’ हा शब्द वापरतात. (खूप उशीर झाला, मी आता ‘सुटतो’.) मुंबईच्या पश्चिम उपनगरात ‘बस आली’ यासाठी ‘माझी लैला आली’ म्हणतात. भाषेची ही प्रादेशिक वैशिष्टय़ं बदलत नसतील कशावरून? सगळ्यात जास्त नवल वाटतं ते दोन शब्दांचं! ‘मला बावळट समजतोस का?’ अशा अर्थाने ‘मी काय अलिबागहून आलेलो आहे का?’ असं विचारतात, ते का? आणि खूप बोलणाऱ्या माणसासाठी सर्रास ‘बोलबच्चन’ हा शब्द वापरला जातो, तो कसा? ‘अलिबागवरून येणे’ व ‘बोलबच्चन’ हे दोन्ही शब्द पंधरा वर्षांपूर्वी नव्हते. त्यांचा उगम कसा झाला? १२ मैलांवर भाषा बदलते म्हणतात तशी दर १२ वर्षांनंतरही भाषा बदलत जाते का? ही कोडी कधीच उलगडणारी नाहीयेत.
जे आज नवं आहे, रुचत नाहीये, तेसुद्धा उद्या जुनं होणार आहे. उद्या तेही विलयाला जाणार आहे. शेवटी खंत तरी कशाची बाळगायची? ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही म्हणून आम्ही तक्रार करायचो. लोकहितवादींची, आगरकरांची, ‘काळ’कर्ते शिवरामपंत पराजपेंची मराठी आम्हाला अवघड वाटायची. हे लोक असं अवघड का लिहायचे, असा प्रश्न तरुणपणी पडायचा. गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही.
.........................................................................................................
टिप:....
"हले डुले महात्मा फुले" अशी नवी म्हण मध्यमवर्गियांमध्ये वापरली जात  असल्याची माहिती असलेकारांनी दिलेली आहे.या म्हणीचा अरथ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा त्यांनी दिलेला आहे.
सदर मजकुर छापील लेखात आहे.मात्र वाद निर्माण झाल्यानंतर हातचलाखीने तो नेटवरुन उडविण्यात आला आहे....


..............................................................................................................

5 comments:

  1. FROM:LOKSATTA:LOKRANG, NET EDITION....

    #17 मी भारतीय 2012-09-29 00:40
    निषेध...निषेध.. .महात्मा फुलेंची नालस्ती करना-या लोकसत्ता आणि असलेकरांनी तात्काळ माफी मागावी!

    ReplyDelete
  2. from:loksatta,lokrang, net
    प्रशांत असलेकर तुम्ही असले कसले. असा वाक्प्रचार लिहिताना तुम्हाला जराही जनाची नाही मनाची थोडी सुद्धा लाज वाटली नाही काय? फुले-शाहू-आंबेड करांच्या महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार नाही, याचीहि तुम्हाला चाड नाही काय? बघा बुवा कोणी तोंडाला काळे फासले, पायताण फेकून मारले, थप्पड लगावली तर दोष कोणाला द्यायचा? लोकसत्तेच्या संपादक महाशयांनी लेख छापण्यापूर्वी वाचण्याची तसदी घेतली नाही हि लाजिरवाणी गोष्ट आहे.
    अजूनही वेळ गेलेली नाही. संपादक महाशय चुकीबद्द माफी मागायला कसली लाज वाटतेय?
    माफी मागा आणि अशा अस्वीकृत लिखाणास आवर घाला हि नम्र विनंती.

    ReplyDelete
  3. FROM:LOKSATTA,LOKRANG NET EDITION:....

    #13 धनंजय आदित्य 2012-09-27 17:57
    या लेखात - हले डुले महात्मा फुले -याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. --- ही महात्मा फुले यांची घोर बदनामी आहे. लेख लिहिणारे प्रशांत आसोलकर यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  4. 11 हर्ष देशपांडे 2012-09-26 00:54
    माननीय रवींद्र तहकिक

    उगाचच मनाला येईल ते बोलू नका , ब्राह्मण मुले शिवाजी महाराजांचा आदरच करतात. आणि आम्बेद्कारांबद् दल बोलणार सर्व जातीत सम प्रमाणात आहेत. आता या असलेकारांना फुले यांचे नाव घ्यायची काय गरज होती देव जाणे.
    Quote


    -1 #10 सनी .ए 2012-09-25 16:00
    महात्मा फुले यांची बदनामी करणारे प्रशांत असलेकर यांचे जाहीर व तीव्र निषेध...

    प्रशांत असलेकर व दैनिक लोकसत्ताने माफी मागावी.

    ReplyDelete
  5. आमच्या म्हणी तुम्हाला सोसायच्या नाहीत असलेकर साहेब . जरा जपून ।

    ReplyDelete