Sunday, 18 May 2014

लोकप्रियता ‘पावर’लेस ?


May 18, 2014, 03.19AM IST
17
pawar
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जे पानिपत झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार या प्रश्नाचे उत्तर निकालानंतर दुसऱ्या दिवशीही मिळू शकले नाही. राष्ट्रवादीचा दारूण पराभव म्हणजे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मतदारांनी दाखविलेला अविश्वास असल्याचेच सिद्ध होते आहे; पण त्याबाबत कोणीच थेट बोलायला तयार नसल्याने ही झाकली मूठ कोण उघडणार असाच प्रश्न आहे.

'राष्ट्रवादी'ने गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ जागा मिळविल्या होत्या. त्याच्या जोरावर या पक्षाने कॉँग्रेस आघाडी सरकारमध्ये तीन मंत्रिपदेही मिळाली होती. खुद्द पवार गेली दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री आहेत. विधानसभेमध्ये राष्ट्रवादीने केलेल्या कामगिरीच्या जोरावर पवार यांचे पुतणे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषवित आहेत. त्याचबरोबर पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील गेली पाच वर्षे लोकसभेवर व त्यापूर्वी राज्यसभेच्या खासदार आहेत. या सर्वांनी त्यांच्या बालेकिल्यामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये भरपूर कामे केल्याचा त्यांचा दावा आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे कमी झालेले मताधिक्य हा या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय. आतापर्यंत शरद पवार यांनी बारामतीमधून अनेक निवडणुका लढविल्या; पण शेवटच्या दिवशी एक सभा घेतली की त्यांचा प्रचार संपत असे. या वेळेस सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातील गावे, वाड्या वस्त्या प्रचारासाठी पिंजून काढल्या होत्या. तरीही मतदारांनी त्यांना अपेक्षित यश दिले नाही. याचे मुख्य कारण काय असावे, याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादी कॉँग्रेस नक्की कधी करणार असाच प्रश्न या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.

अजित पवारांवर जबाबदारी ?

गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यामधील चार खासदारांपैकी दोन शिवसेनेचे, एक कॉँग्रेसचा, तर एक राष्ट्रवादीचा अशी विभागणी होती. या जिल्ह्यात असलेल्या २१ विधानसभा मतदारसंघांपैकी १५ मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत तर २१ पैकी १८ मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच यंदा लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

गेल्या दोन दशकांत पुण्यातील सर्व सत्ताकेंद्रांवर पवार कुटुंबीयांचे नियंत्रण आहे. असे असूनही ही स्थिती का उद्भवली याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे सगळेच नेते अजित पवार यांच्याप्रमाणे मस्ती आणि बेफिकीरीने वागत असल्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. त्याचप्रमाणे गेल्या दशकामध्ये कोणत्याही नव्या चेहऱ्याला प्रमुख पदावर संधी देण्यात आलेली नसल्याचेही कारण आहे. जिल्ह्याच्या व पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यानेही त्यांच्या विरोधातील नाराजी वेगाने वाढल्याचे चित्र आहे. पवार यांच्या दहशतीमुळे त्यांच्यापुढे स्पष्टपणे बोलण्याची हिंमत कोणीच दाखवित नसल्याचेही चित्र पक्षामध्ये आहे. त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, पैसेवाल्या कार्यकर्त्यांशी सलगी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा जाहीरपणे करण्यात आलेला अपमान ही देखील कारणे याच्यामागे आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिन्ही पवारांचे वर्तन हा देखील सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचप्रमाणे अनेक विषयांमध्ये घेतलेली सोयीची भूमिकाही पवारांच्या विरोधात गेल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

एवढा मोठा झटका बसल्यानंतरही पवार आता पुण्यामध्ये आत्मपरीक्षण करणार का, हा मुख्य प्रश्न आहे. या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलल्यावर त्यांनी या भावना व्यक्त केल्या; पण जाहीरपणे याबद्दल वाच्यता करण्यास मात्र कोणीही तयार झाले नाही.

No comments:

Post a Comment