Saturday, 17 May 2014

काँग्रेसमुक्त भारताचे कटूसत्य

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/35269271.cms
Courtacy: Maharashtra Times, Sunday, Sanwad, 18 May 2014
modi
समर खडस

देशातील १८६ लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची १० ते १५ टक्के मते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मते ज्या पक्षाला जातात त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडते, या प्रमेयाला भाजपाने ध्वस्त करून टाकले आहे. बाबरी मशिद पाडण्यापेक्षाही या प्रमेयाला उद्ध्वस्त करणे, ही भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. निवडणुकीच्या राजकारणात मुस्लिम मतांची गरज नष्ट झाल्याचे त्यांनी राजकीय मानसिकतेत ठसवण्यात मिळवलेले यश हे संघ परिवाराच्या ९० वर्षांच्या परिश्रमाचे खरे फलित आहे.

नरेंद्र मोदींच्या भव्य विजयाचे देश-विदेशातील अनेक तज्ज्ञ असंख्य दृष्टिकोनातून अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतील. मोदींच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीपासून ते काँग्रेसच्या नाकर्तेपणापर्यंत इतके विषय या निवडणुकीच्या निमित्ताने लिहिण्यासारखे आहेत की, त्यातून मोठी ग्रंथसंपदाच निर्माण होऊ शकते. शेवटी विजयासारखे दुसरे काहीही नसते. त्यातही एकहाती मिळवलेल्या विजयासारखे तर मुळीच काही नसते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातमधील दंगलीबाबत केल्या जाणाऱ्या टीकेला पूर्णविरामच मिळेल. त्यातही, काही जणांनी त्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच, तर मोदी वा संघ परिवारातील एखादा छोट्यातला छोटा कार्यकर्ताही प्रतिक्रिया देण्याआधी देशभरात तयार झालेले सामान्य नागरिकांमधील मोदीप्रेमीच अंगावर येतील. राजकीय प्रक्रियेत माणसे मरणे वा मारणे हे प्राचीन काळापासून सुरूच आहे. त्यामुळे एखाद्याची प्रतिमा घडत वा बिघडत नसते. जेता केवळ वर्तमानच ताब्यात ठेवत नसतो, तर तो वर्तमानात जगणाऱ्या जनतेचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बनवत असतो. त्यामुळेच इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो, असे म्हणतात. प्रत्यक्षात इतिहासातली जी प्रतीके जेत्याला जवळची वाटतात त्यांच्याभोवतीच इतिहास गुंफला जातो. त्यामुळेच सत्तरच्या दशकात जोसेफ स्टालिन यांचे छायाचित्र असलेले फलक हातात घेऊन मोर्चे काढणारे लाखो तरुण युरोपभर दिसत होते. अगदी क्रुश्चेव्ह यांनी स्टालिन यांच्या विचारांना तिलांजली दिल्यानंतरही स्टालिन हे जगभरातील डाव्या विचारांच्या तरुणांचे हिरोच राहिले, कारण वातावरणात डावा विचार भरून राहिला होता. परंतु सोव्हिएत युनियनचे पतन युरोपातील डाव्या देशांना संपवून गेले. बर्लिनची भिंत पडली आणि जगभरात नव भांडवलशाहीचे वारे वाहू लागले. आज मात्र स्टालिन यांची तुलना, त्यांनी ज्याच्याशी स्टालिनग्राड व लेनीनग्राड येथे लढाई लढून बलाढ्य प्रतिस्पर्धी सेनेला पराभूत केले, त्या हिटलरबरोबरच केली जाते. मथितार्थ हा की, वर्तमानातील इतिहासकारांवर नव भांडवली विचारांचा पगडा वाढल्याने हिरोचा व्हिलन व्हायला बिलकूल वेळ लागला नाही.

नरेंद्र मोदींच्या विजयामुळे स्वतंत्र भारतात देशाची सत्ता पहिल्यांदाच पूर्णपणे संघ परिवाराच्या हातात आली आहे. संघाच्या असंख्य पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी आजवर हिंदूराष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित केले, तरी ते अटलबिहारी वाजपेयींच्या काळात प्रत्यक्षात येणे इतर पक्षांमुळे शक्य झाले नव्हते. मोदींच्या झंझावाताने ते शक्य झाले आहे. देशातील राजकीय वातावरण आज घडीला उजव्या बाजूला झुकलेले दिसत असले तरी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वातावरण तात्काळ उजव्या बाजूला झुकत नसते. ते झुकवण्यासाठीच तर सत्तेची गरज असते. काँग्रेस ना डावी ना उजवी. तो सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेच्या मार्गाने गोल गोल फिरत सबगोलंकारी भूमिका घेणारा काही जणांचा पुंजका आहे. त्यामुळे, सत्ता ही सांस्कृतिक बदलासाठी वापरण्याची इच्छाशक्ती तर सोडाच त्याची साधी जाणदेखील एकाही काँग्रेसी कार्यकर्त्यात दिसणार नाही. सेक्युलॅरिझम वगैरे शब्द कोणे एकेकाळी पं. नेहरूंनी वगैरे वापरल्यामुळे कुठे तरी भाषणात त्याचा ओझरता उल्लेख करण्यापर्यंतच त्यांची धाव. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने केवळ सत्ता भोगली. त्यातून ज्या गांधी-नेहरू विचारांचे तुणतुणे ते देशात वाजवतात वा महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांची जपमाळ ओढतात, त्या विचाराला भक्कम करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न शून्य होते. मात्र नरेंद्र मोदींच्या नावाने आलेली संघ परिवाराची सत्ता ही काँग्रेससारखी राजकीय मटका खेळून आलेली नाही. काँग्रेसच्या नाकर्तेपणाला विजयात परावर्तित करण्यासाठी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनापासून ते प्रसार माध्यमांपर्यंत प्रत्येक गोष्टींचा त्यांनी कुशलतेने वापर केला. मोदींचा चेहरा नव मध्यमवर्गाला आकर्षून घेणारा आहे, असे लक्षात आल्यावर अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठांना बाजूला करण्यात संघाला थोडासाही वेळ लागला नाही. मोदींनी स्वपक्षातील दिग्गजांवर मात केल्यानंतरही त्यांच्या प्रचाराच्या झंझावतावर किती खर्च होतोय, हे बोलण्यातच काँग्रेस व डावे पुरोगामी कार्यकर्ते धन्यता मानत होते. मात्र त्याचवेळी मोदींची प्रतिमा जनमानसात अधिकाधिक भक्कम होण्यासाठी संघाचे कार्यकर्ते प्रत्येक राज्यात घरोघरी फिरत होते. इतक्या अथक परिश्रमानंतर व संघ स्थापनेनंतर जवळपास ९० वर्षांनी हाती आलेली सत्ता संघाच्या विचारधारेतील हिंदूराष्ट्राच्या निर्मितीसाठी न राबवायला ते काँग्रेसी मुळीच नाहीत.

कालपर्यंत, भाजपचा कारभार संघाच्या इशाऱ्यावरून चालतो, या आरोपाला उत्तर देताना कसरत करणारे भाजपचे नेते निकालात भाजपने मारलेली मुसंडी पाहताच 'हो, भाजपचा कारभार संघाच्या इशाऱ्यावरूनच चालतो आणि ती आमची आईच आहे', हे छाती ठोकून सांगत होते. भाजपला अशी मातृसंघटना असल्यामुळेच पूर्वी मनात दडवलेले, आता त्यांनी छातीठोकपणे सांगणे स्वाभाविकच आहे. काँग्रेस मात्र सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेच्या मागे फिरणारा काही अप्पलपोट्यांचा पुंजका असल्याने सत्ता गेल्यावर त्यांची पळापळ होणार यात काहीच शंका नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी जोवर मते मिळवून देतात, तोवरच त्यांची आंधी काँग्रेसींना दिसते. आता निवडून आलेल्या ४८ जणांपैकी कितीजण राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यापुढे झुकतील? काँग्रेसच्या विघटनाला आता तात्काळ सुरुवात होणार यात काहीही शंका नाही. सेक्युलॅरिझमचा अर्थ केवळ मुस्लिमांमधील धर्ममार्तंडांना जवळ करणे हा आहे, असाही एक सोयिस्कर अर्थ काँग्रेस काढत आली आहे. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अशाच प्रकारे प्रचंड बहुमताचा वापर करत राजीव गांधी यांनी संसदेत बदलला होता.

आता ३३७ जागा एनडीएच्या ताब्यात आहेत. त्यामुळे दोन-तृतीयांश सदस्य संख्येवर कायदे करण्याची व कायद्यात बदल करण्याची ताकद जनतेने भाजपाच्या हातात दिली आहे, हे पुरोगाम्यांच्या लक्षात आले आहे काय? एकट्या भाजपलाच २८३ जागा देऊन जनतेने बहुमताच्या आकड्याच्या पुढे नेऊन ठेवले आहे. देशातील १८६ लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची १० ते १५ टक्के मते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मते ज्या पक्षाला जातात त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडते, या प्रमेयाला भाजपाने ध्वस्त करून टाकले आहे. बाबरी मशिद पाडण्यापेक्षाही या प्रमेयाला उद्ध्वस्त करणे, ही भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. निवडणुकीच्या राजकारणात मुस्लिम मतांची गरज नष्ट झाल्याचे त्यांनी राजकीय मानसिकतेत ठसवण्यात मिळवलेले यश, हे संघ परिवाराच्या ९० वर्षांच्या परिश्रमाचे खरे फलित आहे. त्यामुळे यापुढे राजकारणातील यशासाठी तोंडदेखले का होईना, कराव्या लागणाऱ्या सेक्युलॅरिझमच्या गप्पा आता बंद होतील. हिंदूराष्ट्र म्हणजे केवळ भाजपाची सत्ता स्थापणे नसून, हा विचार मना-मनात रूजवणे आहे. संघ परिवार त्यात पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

आर्थिक क्षेत्रात मोदी किंवा परिवाराची भूमिका ही सध्याच्या नव भांडवलशाहीच्या फायद्याचीच आहे. संघातील काही बुद्धिवंत हे स्वदेशीची भूमिका घेत असले तरी ही आर्थिक आध्यात्मिकता फार न ताणण्याचे कसब व लवचीकता त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्यामुळे जी उद्योग घराणी मोदींच्या मागे ठामपणे उभी राहिली, त्यांचे नशीब तर फळफळणार आहेच, पण रोजगारनिर्मितीच्या नावाखाली त्या उद्योगांवर प्रचंड सवलतींची खैरातही होणार आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते, विमानतळ, बुलेट ट्रेन असे अनेक प्रकल्प येतील. मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढेल. मात्र गुजरातचा अनुभव पाहता, दुसऱ्या बाजूला मानवनिर्देशंकाचे काय होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही.

येणाऱ्या पाच वर्षांत अनेक निर्णय होतील, जे वरवरचे दिसले तरी पूर्वीपेक्षा खूप वेगळे आणि दूरगामी परिणाम करणारे असतील. १६ तारखेच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी बडोद्यात केलेल्या भाषणात सांगितलेल्या दोन गोष्टी शेवटी सगळ्यांनी लक्षात ठेवाव्यात. या निवडणुकीचे नेतृत्व हे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या नेत्यांनी केले, ही एक आणि स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच आघाडीशिवाय बिगर काँग्रेसी सरकार स्वबळावर सत्तेत आले, ही दुसरी गोष्ट. स्वातंत्र्य आंदोलनाची परंपरा व त्यातून उभी राहिलेली गांधी-नेहरू विचारांची परंपरा आता संपली आहे आणि देश काँग्रेसमुक्त झाला आहे, हेच कटू सत्य मोदींनी देशाच्या जनतेला ५६ इंचाची छाती ठोकत यातून सांगितले आहे.

No comments:

Post a Comment