Friday, 2 May 2014

दलित अत्त्याचार- हिंसक भावना वाढीला लागताहेत काय?

FROM: SAVITA MOHITE'S TIMELINE


घटना क्र.१:नितीन राजू आगे, वय वर्षे १७, अकरावीत शिकणारा दलित तरूण. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातला. कृती: एका मराठा मुलीशी शाळेत बोलताना आढळला. परिणाम: मुलीच्या भावाने सहकार्‍यांच्या मदतीने त्याची दिवसा ढवळ्या निर्घृण हत्त्या केली.
घटना क्र.२: सोनई, जि.नगर, एका दलित तरूणाची व त्याच्या दोन मित्रांची अशाच प्रकारच्या कृतीसाठी २२ तुकडे करून हत्त्या करण्यात आली होती...
घटना क्र.३: औंध, जि.सातारा, आशा शिंदे या पोष्ट ग्रे‘ज्युएट नोकरी करणार्‍या मुलीची बापानेच हत्त्या केली. कृती: एका माळी मुलावर प्रेम आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा......
घटना क्रमांक४: खैरलांजी,
घटना अनंत, ...अनेक, ...यातून निर्माण होणारे काही प्रश्न:..
१] एरवी सामाजिक प्रबोधन करणारे डा. आ. ह. साळुंखे, डा. सदानंद मोरे, मा.म. देशमुख, बाबा आढाव, पी.बी.सावंत, न्या. कोळसेपाटील, एन.डी,पाटील, गोविंद पानसरे, आणि सगळे भाई, दादा, साहेब, मोठे साहेब, भय्या, हे सगळेच लोक या घटनांवर मौन का धारण करतात?
२]राज्यात जातीयवाद सगळीकडेच आहे.पण मग त्याचा एव्हढा क्रुर आविष्कार प्रामुख्याने सत्ताधारी जातीतच का दिसतो? प्रमिला कांबळे -एकनाथ कुंभारकर यासारखे इतर जातीतले एखादे अपवादात्मक उदाहरण लक्षात घेतले तरी महाराष्ट्रात अशा बाबतीत एकच जात पुढे कशी? या जातीयवादी हिंसक संघटनांचे नेते आता आरोपी कसे आमच्या जातीचे नाहीत किंवा घटनेला जातीय वळ्ण देऊ नका, एकावरून सगळा समाज तसा आहे असे मानू नका वगैरे पोपटपंची करतील. ज्या मानसिकतेने  नथूरामच्या चुकीची शिक्षा  त्याच्या सगळ्या जातीला जाळपोळ, हत्त्या करून भोगायला लावली, सतवंतसिंग,बियांतसिंगच्या गुन्ह्याची शिक्षा देशाभरातल्या ज्या मानसिकतेने सर्व शिखांना दिली, गोध्राकांडची प्रतिक्रिया हिंसक होती... आणि ......मुळात मी हे सारेच प्रकार निषेधार्यच मानते. असे घडता कामाच नये. पण मग सत्ताधारी जातीच्या विरोधात कोणतेही शाब्दीक निषेधाचेसुद्धा पडसाद उमटू नयेत ही नेमकी कोणती दहशत आहे?इथे कोणते भय आडवे येते? हा विवेक असेल तर एरवी तो का दिसत नाही?
३] सत्ता आपली आहे.आपल्या पाव्हण्यारावळ्यांची आहे. केस झाली तरी पुढे  आपल्याला फारसे काहीही होणार नाही अशी खात्री असल्यामुळे असे क्रुर वागणे घडते का?
४} मालकपणाची भावना, राजकीय सत्तेतून आलेला अमाप भ्रष्ट पैसा असल्या जातीय भावनांना फुंकर घालतो, त्या फुलवतो का?
५]जातीमुक्तीचे कोणतेही प्रबोधन न करता सत्ताधारी जातीचे महासंघ जात्योन्नत्तीचे उपक्रम चालवित असल्याने असे घडते का?
६]आरक्षणासाठी गेली काही वर्षे महाराष्ट्रात रान पेटवण्यात आलेय. जाळू, मारू, कापू, तोडू अशी भाषा नेते सरसकट वापरीत आहेत, जाळपोळ करीत आहेत.त्याच्यामुळे युवकांमध्ये अशा हिंसक भावना वाढीला लागताहेत काय?
७} आरक्षणवादी "ऎजीच्या जिवावर बायजी उदार आणि ओबीसीच्या जिवावर रामदास सुभेदार" असलेले यावर मिठाची गुळणी का धरतात?
८]आरक्षणाला मागासवर्गीय आणि सोयरिकीला उच्चवर्णीय ही मानसिकताच याच्या मुळाशी नाही काय?ती राज्याला आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचाराला कुठे घेऊन जाणार आहे? त्यांना आरक्षण मिळाले तर आपल्या एस.सी.एस.टी. कोट्याला काही धक्का लागत नाही, त्यामुळे आपले काहीच नुकसान नाही असे माणणारे जे जे या सत्ताधारी आरक्षणाचे समर्थक आहेत ते सगळेच अशा घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारतील काय? बोलघेवडेपणाऎवजी आत्मक्लेश करतील काय?
............



No comments:

Post a Comment