मी गेले काही दिवस भाजपाच्या अपरंपार विजयाने अस्वस्थ झालेल्या माझ्या समविचारी मित्रांच्या सातत्याने पडणा-या पोस्टस पहातो आहे. मला काही प्रश्न माझ्या मित्रांसाठी मांडायचेत...
१. पुरोगामीत्वाच्या व्याख्येची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. याला कोण तयार आहे?
२. मुलनिवासीवादाच्या पराभूत मानसिकतून विचारवंत आणि अनुयायी कधी बाहेर येणार आहेत?
३. रा. स्व. संघाची विचारधारा ही नेहमीच आक्रमक (राजकीय पराभूत असली तरी) व सांस्कृतिक वर्चस्ववादी राहिलेली आहे. संघटना-उपसंघटना यांचे प्रचंड जाळे त्यांनी निर्माण केले व एकच केंद्रीभूत विचार ते मांडत गेले. त्याला पर्यायी विचारव्यवस्था सबळ करण्यासाठी विचारात्मक व संघटनात्मक कार्य आपल्याकडून काय केले गेले?
४. रा. स्व. संघाने दिर्घकालीन योजना आखुन सैद्धांतिक पातळीवर त्यांच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडून काम करून घेतले. आपल्याकडे असे किती "नि:स्वार्थी" कार्यकर्ते आहेत?
५. हिंदुत्ववाद हा रा. स्व. संघाच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. तो खरा नाही. पण त्यातील भोंगळपणा ल्क्षात घेत हिंदुवाद विरुद्ध वैदिकवाद यातील तथ्ये समजावून न घेता ब्राह्मण द्वेष म्हणजे पुरोगामीपणा असे कसे समजलात?
६. ब्रिगेड अथवा मराठा सेवा संघ या फालतु, अविचारी आणि तत्वहीण संघटना मराठा जातीच्या प्रतिनिधित्व करत बहुजनवादाचा घोष करत राजकीय अस्तित्वासाठी बामसेफ किंवा तत्सम संघटनांशी नाळ जोडना-या संघटनांना पुरोगामी म्हणत प्रतिगामीपणा दाखवला याबद्दल काय करायचे?
७. जातीय तर रहायचे आणि जात्युच्छेदनाच्या गप्पा हाकायचे, हा कसला पुरोगामीपना?
८. वैदिकवादी सामाजिक जीवनात नेहमीच जिंकत राहिले, राजकारनातही जिंकले कारण समतावादी ख-या अर्थाने समतावादी कधीच नव्हते हे वास्तव काय सांगते?
९. समतावादी नसाल, केवळ आपल्या जातीवर्चस्वाचे (बहुसंख्येमुळे वा तुमच्याही वर्चस्ववादामुळे) तुमचे बुरुज ढासळले असतील तर अश्रू ढाळून काय उपयोग?
१०. निसर्ग सृष्टीला बदलायची संधी देतो...प्रकोपांतून. तुम्हाला याही प्रकोपातून बदलायची इच्छा नसेल, बदलत्या कालाशी जुळवून घेनारे नवे सुसंगत तत्वज्ञान न बनवता कालबाह्य तत्वविचारांना चिकटून बसायचे असेल तर तुम्ही मुळात पुरोगामी कसले? प्रतिगामीच कि!
प्रश्न संतप्त वाटतील.. राग येईल...पण येवू द्यात!
किमान विचार तर कराल? होऊद्यात घुसळण एकदाची...
किमान विचार तर कराल? होऊद्यात घुसळण एकदाची...
नको असेल तर जे चाललेय त्यात खुष रहा, उगाचच आपल्या व्यथित मनांच्या शोभा करू नका!
मला माहित आहे, हा लढा खूप मोठा झाला आहे आणि त्याला झोपलेल्या आपल्याच कोशातील रममाण राहिलेल्या लोकांना जाणीव नाही!
No comments:
Post a Comment