By कलमनामा on August 25, 2013
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला पुन्हा एकदा काळिमा फासला गेला आहे. १९४८ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करून नथुराम गोडसे या पुण्यातल्या कर्मठ धर्मांध माथेफिरूने महाराष्ट्राला असाच कलंक लावला होता. या दोन्ही घटनांमधल्या ६०-६५ वर्षांच्या काळातही शरमेने मान खाली घालायला लावणार्या अनेक घटना घडलेल्या आहेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याची ज्यांची हिंमत नाही आणि क्षमताही नाही असे विचारशून्य लोकच अशाप्रकारचे भ्याड मार्ग अवलंबत असतात! माणूस मारून विचार नष्ट होत नसतो! माणसं मारून सामाजिक परिवर्तन रोखू पाहणार्या या अमानवी आणि विकृत प्रवृत्तीचा निषेध करावा तितका थोडाच आहे.
भारतात गेल्या तीनचार हजार वर्षांपासून याच प्रकारची अमानुष मनोवृत्ती समतेचा, सहिष्णुतेचा, सर्वसमावेशकतेचा आणि विवेकाचा आग्रह धरणार्यांचा खून करत आलेली आहे, हा इतिहास यानिमित्ताने ताजा झालाय. आपली संस्कृती सहिष्णू आणि सर्वसमावेशक असल्याची फुशारकी रात्रंदिवस मारणारेच या असहिष्णू हत्याकांडात हिरिरीने सहभाग घेत असतात हे आता लपून राहिलेलं नाही. जरा वेगळा, चांगला, समाजाच्या भल्याचा विचार मांडणार्यांचे काय हाल आपल्या वैदिक-हिंदू धर्मसंस्कृतीने केले याची हवी तेवढी उदाहरणं देता येतील. चार्वाकाला जिवंत का जाळण्यात आलं, कौटिल्याचं अर्थशास्त्र शेकडो वर्षं गायब का होतं, सम्राट हर्षवर्धनाचा खून करण्याचा प्रयत्न वारंवार का करण्यात आला, बसवेश्वरावर हल्ले का झाले, चक्रधराला का मारलं, वारकरी परंपरेतील आद्य संत अणि प्रतिभावंत नेते असलेल्या नामदेवांना मंदिरात का येऊ दिलं नाही, संत तुकारामांनी असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे त्यांची स्वर्गात सदेह रवानगी करण्यात आली? संत ज्ञानेश्वरांसारखा निरागस कोवळा मुलगा आपल्या प्रतिभेची चमक दाखवू लागताच वयाच्या केवळ अठराव्या वर्षी हे जग का सोडतो? समाधी घेण्यासाठी त्यांना कुणी आणि का भरीस घातलं? ज्ञानेश्वरांचे आईवडील आत्महत्या का करतात? चोखामेळा आयुष्यभर पायरीवर समाधान का मानत असे? जोतिराव फुल्यांवर मारेकरी का पाठवले गेले? सावित्रीबाईंवर शेण का टाकण्यात आलं? रघुनाथराव कर्व्यांवर शिव्याशापांचा भडिमार का केला? महात्मा गांधींचा खून कशासाठी केला गेला? असे बरेच प्रश्न विचारता येतात. या सगळ्या घटना कोणत्या सर्वसमावेशक धर्मात आणि सहिष्णू संस्कृतीत बसतात? यातली कोणती घटना हिंदू धर्म सहिष्णू, सर्वसमावेशक आणि सनातन असल्याचं द्योतक आहे? दाभोळकर काय मागत होते? नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणा अशा आजच्या काळात कुणालाही न पटणार्या कालविसंगत गोष्टीच बंद करू पाहत होते ना? हिंदू धर्मरक्षकांना दाभोलकरांचा इतका राग का येत होता? अघोरी प्रथा हेच हिंदू धर्माचे सनातन वैशिष्ट्य आहे याची पक्की खात्री असल्याशिवाय आणि या अभिमानास्पद वैशिष्ट्यावरच दाभोलकर हातोडा चालवताहेत असा समज करून घेतल्याशिवाय त्यांना दाभोलकरांचा इतका संताप येत नसणार हे उघड आहे! दाभोलकरांची हत्या आणि गांधी-तुकारामांची हत्या यात काडीचाही फरक नाही आणि हत्या करणारीही औलाद तीच आहे! त्याच भेकड मिजाशीनिशी ती आजही शाबूत आहे! मागच्या एकदोन वर्षांपासून ती दाभोलकरांना जीवे मारण्याच्या, हातपाय तोडण्याच्या धमक्या निर्लज्जपणे देत होती! अखेर तिने डाव साधला आणि आपली धर्मसंस्कृती कशी सहिष्णू आहे असं म्हणत ती पुन्हा एकदा भेसूर हसली! आपल्या सहिष्णू संस्कृतीचा विजय असो!
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. १९६९ साली एम्. बी. बी. एस्. झाल्यानंतर त्यांनी सातार्यात सदाशिव पेठेत प्रॅक्टिस सुरू केली. परंतु रूटिन डॉक्टरी पेशात त्यांचं मन फारसं रमलं नाही. सातार्याचं हे दाभोलकर घराणं उच्चशिक्षित. त्यांचे थोरले भाऊ देवदत्त दाभोलकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि विचारवंत. दुसरे भाऊ दत्तप्रसाद हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नामांकित लेखकही. समाजवादी विचारांचा वारसा या परिवाराला लाभला. साहजिकच या विचारसरणीच्या मुशीत नरेंद्र यांची जडणघडण झाली. जयप्रकाश, लोहिया, एसेम, इत्यादींचे विचार त्यांच्या मनाला भिडत होते. फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मेंदूत झिरपत होते. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं वैचारिक नेतृत्व करणारे गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, ज. रा. दाभोळे, बाबा आढाव आदींचाही प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे डॉक्टरकी स्वीकारली असली तरी समाजपरिवर्तनाची तगमग त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी सातार्यात समाजवादी युवक दल ही संघटना सुरू केली. लक्ष्मण माने, पार्थ पोळके, दिनकर झिंब्रे, किशोर बेडकिहाळ, प्रमोद कोपर्डे यासारखे आज नावारूपाला आलेले अनेक नेते, कार्यकर्ते, लेखक, पत्रकार या संघटनेत घडले. पुढे हे काम दाभोलकरांना अपुरं वाटू लागलं. व्यापक पातळीवर व्यापक परिवर्तनाचं काम केलं पाहिजे याचं व्यापक भान त्यांना आलं. त्याच दरम्यान, म्हणजे १९८०-८२ साली, श्रीलंकेच्या बुद्धिस्ट चळवळीतून प्रेरणा घेऊन अब्राहम कोवूर यांनी श्रीलंकेत विज्ञानप्रसारासंदर्भातली एक आगळीवेगळी यात्रा काढली होती. त्यातून प्रेरणा घेऊन भारतात बी. प्रेमानंद यांच्या नेतृत्वाखाली चमत्कार, बुवाबाजी, भूत-भानामती, विज्ञानाधारित प्रयोग वगैरे गोष्टी दाखवणारी अभिनव विज्ञानयात्रा निघाली. ती महाराष्ट्रात आल्यानंतर श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. अशाप्रकारची चळवळ कायमस्वरूपी आवश्यक आहे हे हेरून श्याम मानव यांनी लगेचच अशी चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे तिचे बॅनर. यथावकाश डॉ. नरेंद्र दाभोलकर तिच्यात सामील झाले. पुढे काही कारणांनी ते त्यातून बाहेर पडले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने काम करू लागले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आज महाराष्ट्रभर २३० शाखा असून या चळवळीत हजारो कार्यकर्ते तन-मन-धनाने काम करत आहेत. भ्र्रम आणि निरास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, अंधश्रद्धा विनाशाय, अंधश्रद्धा ः प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, तिमिराकडून तेजाकडे अशी १२ पुस्तकं लिहून या चळवळीसाठी आवश्यक असलेली पायाभूत वैचारिक बैठक दाभोलकरांनी तयार केली. त्यांनी चळवळीची टप्पेदार चतुःसूत्री बनवली, ती अशी ः- बुवाबाजी, भूत-भानामती, चमत्कार यांचं पितळ उघड पाडून त्यात चाललेलं शोषण रोखणं-थांबवणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणं, धर्माची विधायक, कठोर आणि कृतिशील चिकित्सा करणं आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणं. या चारही पातळ्यांवर त्यांनी विवेकाने आणि चिकाटीने वाटचाल केली. धर्मनिरपेक्ष, संवेदनशील, सजग आणि विवेकवादी माणूस तसंच समाज घडवणं हे त्यांनी आपलं जीवितकार्य मानलं होतं. समाजपरिवर्तनासाठी एकाचवेळी प्रबोधन, रचना आणि संघर्ष या तिन्ही आघाड्यांवर लढावं लागतं. अत्यंत धीरोदात्तपणे, ठामपणे आणि तरीही विलक्षण नम्रपणाने दाभोलकर या सर्व गोष्टी करत असत. हे अवघड कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं किंवा असंही म्हणता येईल की, धैर्यधुरंधरता आणि विनम्रता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेच अविभाज्य भाग होते. ती त्यांची उपजत वृत्तीही असावी. साधेपणा हा तर त्यांच्या दिसण्या-वागण्या-बोलण्याचा महत्त्वाचा पैलू होता. अलीकडच्या काळात साधी राहणी, उच्च विचारसरणी असं ज्यांच्याकडे बोट दाखवून निःशंकपणे म्हणावं असे जे विरळा लोक आहेत त्यात दाभोळकर अग्रभागी होते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यांचं कार्यक्षेत्र नव्हतं. व्यापक परिवर्तन हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी सुरू केले. १९८६ साली त्यांच्या पुढाकारातून सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना झाली. त्यांच्याच प्रेरणेने सातार्यात १९८९ साली परिवर्तन ही व्यसनमुक्ती संस्था स्थापन करण्यात आली. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार आणि उपचार या चार पातळ्यांवर भरीव स्वरूपाचं कार्य या संस्थेमार्फत चालतं. या संस्थेमार्फत सध्या ४० व्यसनी व्यक्तिंवर एका महिन्याचा निवासी उपचार केला जातो.
साधना हे साने गुरुजींनी स्थापन केलेलं साप्ताहिक. त्या ध्येयवादी, वैचारिक साप्ताहिकाचं गेली १४ वर्षं डॉ. दाभोलकर यांनी कुशल संपादन केलं. नव्या काळाची नवी आव्हानं पेलत ते वाढवलं. या कालावधित या साप्ताहिकाच्या साठ विशेषांकासह सातशे अंक नियमितपणे प्रसिद्ध झाले. साधना प्रकाशन गृहातर्फे गेल्या १० वर्षांत ४० दर्जेदार ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. दाभोलकरांच्या परिसस्पर्शाने साधना साप्ताहिकाने अभूतपूर्व झेप घेतली. त्यांच्या व्यापक दृष्टिकोनामुळेच साधना अधिक बहुजनसन्मुख झालं.
सामाजिक कार्यकर्ता ही दाभोलकरांची ओळख पुरेशी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू, बांगला देशाविरुद्ध झालेल्या कबड्डी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व, व्यक्तिगत कौशल्याची सात सुवर्णपदकं, शिवछत्रपती क्रीडापुरस्कार आणि शिवछत्रपती युवा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाचे त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे दाभोलकर हे एकमेव व्यक्ती होत. २००६ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्याकडून १० लाखांचा दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा पुरस्कार त्यांना मिळाला. पुरस्कारापोटी प्राप्त झालेली सर्व रक्कम त्यांनी सहजपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देऊन टाकली. कालपरवाच त्यांनी नाशिक आणि लातूर या ठिकाणी जातपंचायतीच्या प्रथेविरोधात मोठ्या परिषदा घेतल्या. जातिअंताच्या दिशेने दिली गेलेली ती जणूकाही नवी ललकारीच होती!
बोलताबोलता एकदा मी सहज त्यांना म्हटलं, डॉक्टर, तुम्ही समाजात विवेकवाद आणि विज्ञाननिष्ठा रुजवण्याची चळवळ आयुष्यभर करत आला आहात, तीच भूमिका आणि तीच चळवळ गौतम बुद्धानेही आयुष्यभर केली. माझं वाक्य संपल्याक्षणी ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘अरे अरुण, मी विचाराने बुद्धिस्टच आहे. बुद्धाने जी पंचशीलं सांगितली तीच पंचशीलं मी निष्ठेने पाळत आलो आहे. मी खोटं बोलत नाही, मादक पदार्थांचं सेवन करत नाही. व्यभिचार करत नाही, चोरी करत नाही आणि प्राणिमात्राची हत्याही करत नाही. या पाचपैकी एकही गोष्ट मी कधी केली नाही. बुद्धाने सत्य-अहिंसेचा मार्ग सांगितला. हाच विचार महात्मा गांधींनी अनुसरला आणि मीही त्याच वाटेने चाललोय!
जो माणूस कायम विवेकाच्या, अहिंसेच्या, सत्याच्या आणि सत्यशोधनाच्या मार्गाने गेला, त्याचीच आज हत्या झालीय. हा केवळ दाभोलकरांचा खून नाही, तर बुद्ध, गांधी, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांच्या विचारांचा सार्वजनिक खुनखराबा आहे. असं करू पाहणारे किंवा अशा घटनांमध्ये विकृत आनंद मानणारे अनेक नथुराम अद्यापही महाराष्ट्रात आणि देशात जिवंत आहेत हे या निमित्ताने उघड झालं आहे. देशात सेक्युलॅरिझम आणि रॅशनॅलिझम रुजवू पाहणार्यांच्या कार्यात ही विघातक शक्ती कायम आडकाठी आणत राहणार हे आता सिद्धच झालं आहे. म्हणूनच आता मागे सरून, डरून चालणार नाही. वेगवेगळ्या बुरख्यांखाली लपलेले सगळे नथुराम उघडे पाडले आणि विवेकाधिष्ठित धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीची शपथ घेऊन कृतिशील पद्धतीने ती अंमलात आणली आणि त्याची तातडीची सुरुवात म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचं बिल मंजूर केलं तरच ती खर्या अर्थाने दाभोलकरांना आदरांजली ठरेल.
- अरुण
No comments:
Post a Comment