डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल! - श्री. संजय आवटे
चिनूक्स | 20 August, 2013 - 10:58
डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल!
’वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे...’ - १५ ऑगस्ट, १९४८ रोजी साने गुरुजींनी ’साधना’च्या संपादकीयात लिहिलेलं हे वाक्य एका चळवळीला जन्म देऊन गेलं. साने गुरुजी, ना. ग. गोरे, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांसारख्या ज्येष्ठश्रेष्ठ संपादकांनी ’साधना’ ही चळवळ जोपासली आणि ती तितक्याच प्राणपणानं फुलवली ती डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी.
विषमता टिकवण्यासाठी, विषमतेच्या वाढीसाठी विवेक संपवावा लागतो आणि विवेक संपवण्यासाठी वैरभाव वाढवावा लागतो. डॉ. नरेंद्र दाभोळकर या वैरभावाविरुद्ध आयुष्यभर लढले. विवेकी जगले. विवेकी विचार केला. अंधश्रद्धेविरुद्धचा त्यांचा लढा हा या विवेकी जगण्याचाच एक भाग होता.
’साधना’च्या एका विशेषांकात दुर्गाबाई भागवतांनी लिहिलं होतं - ’सत्य आपोआप हाती लागत नाही. ते मिळवावं लागतं. सत्य हाती लागलं, असं वाटलं, तरी त्याची परीक्षा करायची असते. सत्याच्या शोधाची ही मूलभूत पद्धत आहे. आणि या पद्धतीतून आणखी काही मूल्ये मिळतात. प्रत्येक गोष्ट वास्तवाच्या निकषावर खरी-खोटी करण्याची सवय लागली की बुद्धीचं स्वातंत्र्य प्राप्त होतं. माणूस विचाराने स्वतंत्र बनतो. त्याची निरीक्षणशक्ती स्वत:च्या कलाने काम करू लागते. तो पुन्हा मातब्बराच्या तंत्राने वागत नाही. तो माणूस कल्पक बनतो. बुद्धीची स्वतंत्रता, कल्पकता आली की मतभेद व्यक्त करण्याची, निषेध नोंदवण्याची कुवतदेखील अंगी येते. हे गुण माणसाच्या सांस्कृतिक प्रगतीची प्रसादचिन्हेच आहेत. हे गुण आणि मूल्ये शास्त्रज्ञाच्या विशिष्ट शिस्तीतून येतात. ते कुणी बाहेरून लादत नाहीत. मतभेद व्यक्त करणे आणि तशी सवलत असणे, यालाच स्वातंत्र्य म्हणतात. मतभेद किंवा निषेध हा स्वातंत्र्याचा छाप आहे.’
विवेकवादाची, स्वातंत्र्याची परंपरा या भूमीत रुजावी यासाठी आगरकर, फुले, दुर्गाबाई, दाभोळकरसर आयुष्यभर लढले. त्यांचा लढा व्यर्थच होता, असं वाटावी अशी परिस्थिती आज तयार झाली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातला विचार करणारा समाज हळहळतो आहे. दाभोळकरसरांचं कार्य, त्यांचे विचार टिकून राहतील यात शंका नाही.
येत्या काही दिवसांत 'मायबोली'वर दाभोळकरसरांशी निकटचा संबंध असणारे काही दिग्गज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या कार्याबद्दल बोलणार आहेत. त्यांचं कार्य पुढे कसं नेता येईल, याबद्दल आपल्या बरोबरीनं विचार करणार आहेत.
या मालिकेतला पहिला लेख आहे श्री. संजय आवटे यांचा. खास 'मायबोली'साठी लिहिलेला.
ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्री. संजय आवटे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना वाहिलेली ही श्रद्धांजली...
डॉक्टर,
तुम्ही किती संयत, सुसंगत… किती सुरेल, समतोल… झपाटलेलं जाणतेपण तुमच्यात अंगभूत, ओतप्रोत. या मरणासन्न समाजाला जागे करत विचारांचा जागर अहोरात्र करणारे तुम्ही! बाकीचे कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत कोसळत असताना अथवा संधीसाधू दांभिकांच्या पंढरीत विरघळून जात असताना तुम्ही मात्र समकालीन समंजसपणासह पुढे धावत राहिलात. तुम्ही संघटन करत राहिलात, संस्था उभ्या करत राहिलात, एखाद्या कॉर्पोरेट सीईओच्या व्यवस्थापनकुशलतेनं. तर्ककठोर ज्ञानर्षीच्या ज्ञानासक्तीनं. फाटक्या कार्यकर्त्याच्या झपाटलेपणानं! माणसं घडवत आणि त्यांना प्रयोजनासह उभं करत, विवेकाला मस्तकी धरत या महाराष्ट्रभूमीत अवघा हलकल्लोळ केलात तुम्ही!
कारण, तुम्हीच एकदा म्हणाला होता, अंधाराचा बभ्रा जास्त होतो. प्रत्यक्षात अंधार तेवढा घनघोर नसतो. या अंधाराचं मार्केटिंग मुद्दाम केलं जातं. (मार्केटिंगचे तर तुम्ही जाणकारच!) कारण त्यात अनेकांचे हितसंबंध सामावलेले असतात. तुम्ही रस्त्यावर येऊच नये म्हणून ते अंधारवाले जाहिरातबाजी करत राहतात. पण, प्रत्यक्षात मात्र अंधार तेवढा काही शक्तिशाली नसतो. आपण आपली पणती हातात घेऊन धावत राहिलं की अंधाराची सेना आपोआप गारद होते! तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइडही. तुम्ही असं सांगितलं की मलाही ते पटत असे. पण, डॉक्टर, आपला अंदाज चुकला बहुधा. कारण, अंधाराच्या बाजूला नक्की किती सैन्य आहे, याचा अदमासच आपल्याला नाही आला. कळतनकळत आपलंही सैन्य अंधाराला जाऊन मिळाल्याचं लक्षात नाही का आलं आपल्या? लाभार्थी होण्यासाठी जो-तो अंधारशरण होत असताना झाडाझडती अटळ असते, डॉक्टर!
तुम्ही विचार करायला का घाबरता, असा रोकडा सवाल विचारणार्या आगरकरांचाही इथे खून नाही झाला. खून ना फुल्यांचा झाला, ना राजा राममोहन रॉय यांचा. अठराव्या, एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील प्रतिगामी व्यवस्थेत जे घडले नाही, ते एकविसाव्या शतकात, लोकशाही व्यवस्थेत, ज्ञानाधारित समाजात घडावे!
दाभोळकर अनेकांना गैरसोईचे होते हे खरे, कारण ते प्रश्न विचारत होते, आव्हान देत होते. खुलेपणाला आवाहन करत विवेकवादाला अधोरेखित करत होते. तुकारामाचा खरा वारसा सांगत या राज्याला विवेकाचं अधिष्ठान देऊ पाहत होते. पण, ग्यानबातुकारामावर आपली दुकानदारी सांभाळणार्यांनातरी हा विवेकाचा जागर कसा आवडेल? विचारांच्या गळचेपीसाठी, अभिव्यक्तीच्या पायमल्लीसाठी व्यवस्था कार्यरत असताना विचारांचा जागर फारच महत्त्वाचा आहे, हे भान डॉक्टरांना होते. विचार ही कोणत्याही कृतीसाठी पूर्वअट असते. मात्र, विचार करायला घाबरणं, हे कोणत्याही समाजाचे लक्षण असते. अशावेळी समाजाला विचारप्रवृत्त करणार्या चळवळी महत्त्वाच्या. पण प्रस्थापितांना असं आव्हान कधीच नको असतं. आणि असे सरंजामी मूलतत्त्ववादी सत्तेच्या केंद्रबिंदूजवळ येतात, तेव्हा त्यांची मस्ती आणखी वाढते. त्यांना बहुविधता नको असते, मतमतांतरं नको असतात. समीक्षण नको असतं. म्हणून त्यांना दाभोळकर नको असतात.
दाभोळकर अनेकांना गैरसोईचे होते हे खरे, कारण ते प्रश्न विचारत होते, आव्हान देत होते. खुलेपणाला आवाहन करत विवेकवादाला अधोरेखित करत होते. तुकारामाचा खरा वारसा सांगत या राज्याला विवेकाचं अधिष्ठान देऊ पाहत होते. पण, ग्यानबातुकारामावर आपली दुकानदारी सांभाळणार्यांनातरी हा विवेकाचा जागर कसा आवडेल? विचारांच्या गळचेपीसाठी, अभिव्यक्तीच्या पायमल्लीसाठी व्यवस्था कार्यरत असताना विचारांचा जागर फारच महत्त्वाचा आहे, हे भान डॉक्टरांना होते. विचार ही कोणत्याही कृतीसाठी पूर्वअट असते. मात्र, विचार करायला घाबरणं, हे कोणत्याही समाजाचे लक्षण असते. अशावेळी समाजाला विचारप्रवृत्त करणार्या चळवळी महत्त्वाच्या. पण प्रस्थापितांना असं आव्हान कधीच नको असतं. आणि असे सरंजामी मूलतत्त्ववादी सत्तेच्या केंद्रबिंदूजवळ येतात, तेव्हा त्यांची मस्ती आणखी वाढते. त्यांना बहुविधता नको असते, मतमतांतरं नको असतात. समीक्षण नको असतं. म्हणून त्यांना दाभोळकर नको असतात.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या कोणा माथेफिरुनं केलेली नाही आणि ती सुटी, एकटी अशी घटनाही नाही. त्यामागे एक कारणपरंपरा आहे. एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. गेले कित्येक दिवस जे पेरलं जात होतं, त्याचा परिपाक आहे हा! ते पेरलं जात होतं तेव्हा आपण त्याचे साक्षीदार होतो. कधी झोपेचं सोंग घेत, कधी खरोखरीच झोपत, कधी जागे राहून टक्क डोळ्यांनी बघत, तर कधी थेट ती कृती करत आपण त्यात सहभागी झालो. रोम जळत असताना फिडल वाजवणार्या नीरोला शिव्या घालत प्रत्यक्षात आपणही त्याच्या पार्टीत सामील झालो. पी. साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे, नीरोचे गेस्ट आहोत आपण! त्यामुळे आता अचानकपणे आपल्याला धक्का बसण्याचं कारण नाही. इतर कोणाकडे बोट दाखवण्यात हशील नाही. ती जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.
गेल्या काही दिवसांपासून जे सुरु होतं, त्यातून हे असं घडणं अटळ होतं. कधी एखाद्या पुस्तकाचं निमित्त करुन संशोधन संस्थेवर हल्ले चढवले जाणार, कधी जातींचे पुढारी असे मस्तवाल होत जाणार की थेट मंत्रालयात त्यांचा दबदबा वाढावा, कधी आमच्या धर्माला, आमच्या धारणेला आव्हान देतो म्हणून विचारवंतांवर हल्ले होणार, जातपंचायतीच्या बडग्यामुळे एखादी कळी कुस्करली जाणार, धर्म-अध्यात्माच्या नावाखाली बाबाबुवांचे महत्त्व एवढं वाढणार की त्यांचं संस्थीभवन होत जाणार! या अशा वातावरणात डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या कृतिशील विचारवंताची हत्या झाली आहे. जगण्याची सगळी क्षेत्रं आपण अशा लोकांच्या ताब्यात दिली आहेत आणि आता या जगण्यावर आपला हक्क उरलेला नाही. संकुचित लाभासाठी, लोभाच्या हितसंबंधांसाठी आपण सगळेच या व्यवस्थेचे भागीदार झालो आहोत. रोज लोकशाहीचं अपहरण होत असताना ठेकेदारांच्या हातात आपण संपूर्ण व्यवस्था सोपवली आहे. त्यातून भवताल असा आक्रसून गेला आहे आणि मेघांनी नभ काळवंडून गेलं आहे की इथल्या मातीत असं काही पेरलं जाणं आणि ते उगवून येणं अस्वाभाविक नाही.
अशा वळणावर उभे आहोत आपण...! असहिष्णुतेनं असं निर्लज्ज, हिंस्त्र टोक गाठलं आहे की, अवघी आशाच संपून जावी...गुन्हा काय त्याचा, तर त्याने विवेकाचा जागर केला...! गुन्हा काय त्याचा, तर त्यानं तुम्हांला विचार करायला भाग पाडलं! प्रत्ययासे ज्ञान, तेच ते प्रमाण असे मांडत,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता,
या वाटेनं जात त्यानं कैक ठेकेदारांना आव्हान दिलं... अनेकांच्या दुकानांना त्यामुळे कुलुप लागलं! म्हणून, त्याचा खून केला त्यांनी दिवसाढवळ्या?
सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता,
या वाटेनं जात त्यानं कैक ठेकेदारांना आव्हान दिलं... अनेकांच्या दुकानांना त्यामुळे कुलुप लागलं! म्हणून, त्याचा खून केला त्यांनी दिवसाढवळ्या?
या मातीत असा विखार वाढू लागला आहे की व्यक्तिगत आणि सामूहिक जगणंच त्यामुळे विकृतीच्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे. एखादा माणूस आवडत नाही, पटत नाही, तर त्याला संपवून टाकायला हवं, ही असहिष्णूता सर्वदूर दिसू लागली आहे. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
गेल्या काही दिवसांपासून मी हे पोटतिडकीनं मांडतो आहे. 'कृषीवल'च्या दिवाळी अंकातील निबंधात मी म्हटलं होतं -एकविसाव्या शतकात ज्या अंतर्विरोधाचा सामना आपण करत आहोत, त्याकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. एकीकडे आपण अतिशय प्रगत आणि आधुनिक अशा टप्प्यावर प्रवेश केला आहे आणि त्याचवेळी आपले जगणे कमालीचे अविवेकी व्हावे अशी स्थिती उदभवलेली आहे. अभिव्यक्तीची आणि माहितीची साधने एवढ्या झपाट्याने वाढत चालली आहेत, पण विचार करण्याची साधने मात्र आक्रसत आहेत. आपल्यासमोर हा पेच आज उभा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे, विचार करणे ही माणसाची मूलभूत सवय असली तरी विचार करण्याचे टाळणे हीही त्याची स्वाभाविक, सहज अशी प्रवृत्ती आहे. तुम्ही विचार करायला का घाबरता, असे गोपाळ गणेश आगरकर म्हणाले त्याला अनेक वर्षे उलटून गेली. पण आजतागायत तो प्रश्न कायम आहे. शक्यतो विचार करायचे टाळणे लोकांना आवडते. कारण विचार करायचा म्हणजे सूर्याच्या तेजात, आगीत होरपळून जायचे. त्यापेक्षा अविचाराने वागणे सोपे असते. म्हणून माणसांनी चाकोर्या निर्माण केल्या. चाकोरीमध्ये तोचतोचपणा असेल पण सुरक्षितता असते. त्यामुळे विचार करण्याच्या फंदात न पडणे लोकांना आवडते. याचा अर्थ ते अविचार करतात असे नाही, पण न विचार करताना मात्र दिसतात. 'थुंकू नका' असे फलक सर्वत्र रस्त्यांवर दिसतात. पण ते आपण कधी गांभीर्याने घेत नाही. याउलट 'थिंकू नका', असे फलक कुठेही नसतात, पण ते आपण डोक्यात घट्ट मारून घेतले आहेत. अप्रगत समाजात माणसे अशी वागत असतात तेव्हा चालते फारतर, पण समाजाची लौकिक प्रगती होत असताना विचारापासून असे दूर जाणे हे खरे नाही. कारण त्यातून दुभंग समाज जन्माला येत असतो. असा स्किझोफ्रेनिक समाज अनेक समस्या निर्माण करतो. हा अविवेक दूर करण्याऐवजी या अविवेकाचे राजकारण करण्याचा प्रयत्न व्यवस्थेकडून होत असतो. प्रस्थापितांना असा अविवेक हवाच असतो. किंबहुना त्यातच त्यांचे हितसंबंध असतात. हा अविवेक सर्व क्षेत्रात असतो. त्यात केवळ श्रद्धा- अंधश्रद्धा एवढाच मुद्दा असतो, असे नाही. मग तो विकासाचा आराखडा असो वा निवडणुकीचा आखाडा असो, लग्नाचा मंडप असो की घराचा उंबरठा असो, सगळीकडे पायाच अविवेकाचा असेल तर यापेक्षा वेगळे काय होणार! भारतात सध्या ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याचे मुख्य कारण हे आहे. विवेकाचे बोट सुटले की कोंडी होते. आपण खापर कधी राजकारणावर फोडतो तर कधी जागतिकीकरणावर. कधी ते भांडवलवादावर फुटते तर कधी माध्यमांवर. पण एकमेव कारण खरे आहे. ते म्हणजे विवेकाचे बोट आपण सोडले आहे. त्याला आणखी एक पदर आहे. व्यक्तिगत जीवनात आपण दांभिक आहोत आणि सामूहिक जीवनात अविवेकी. हा पेच आज आपल्यासमोर आहे.
भारतात लोकशाही प्रगल्भ आहे हे खरं, पण तीही अशा गोष्टींचा आधार कळतनकळत घेते. कधी धर्माचं भय दाखवून, कधी नैतिकतेचा बागुलबुवा उभा करून, तर कधी जातीय समीकरणे मांडून, कधी पैशांचं आमिष दाखवून सामान्य माणसाला फसवण्याची प्रवृत्ती लोकशाही चौकटीतही दिसते. खरंतर आमिष आहे म्हणजे पुढे सापळा असणार हे आमच्या सामान्य आदिवाशाला समजतं. पण, तरीही वारंवार फसत राहतो सामान्य माणूस. मग लक्षात येतं की, त्याचंही ते संकुचित राजकारण असतं. सामान्य माणूस वाटतो तसा भाबडा नसतो. व्यवस्था त्याला जशी वापरून घेते, तसंच सामान्य माणूसही व्यवस्थेला वापरून घेत असतो! कारण त्याला विचार न करता शॉर्टकटचे स्वार्थ हवे असतात. त्यातून होतं ते मात्र दीर्घकालीन नुकसान.
त्या हानीचा अंदाज आतातरी आपल्याला यायला हरकत नाही. जागतिकीकरणानंतरच्या खुलेपणाचं वारे पिऊन सरंजामी शक्ती मस्तवाल होत असताना व्यवस्था अधिकच बंदिस्त करण्यासाठी प्रस्थापितांची धडपड सुरु आहे. या अंतर्विरोधाचं सोदाहरण स्पष्टीकरण म्हणून या भ्याड हल्ल्याकडे पाहिले पाहिजे.
अर्थात, मूलतत्त्ववादी-विभाजनवादी वृत्ती आणि दहशतवादी निर्बुद्ध असतात. किंबहुना निर्बुद्ध असतात म्हणूनच तर त्या मूलतत्त्ववाद, दहशतवाद, विभाजनवाद याकडे वळतात. इतिहासापासून या वृत्ती धडा घेत नाहीत. त्यांना हे समजत नाही की माणसं मेल्यानं अथवा मारल्यानं विचार नष्ट झाल्याचे एकही उदाहरण नाही. ‘वार्याहाती दिले माप’, अशा आवेगानं विस्तारलेले विचार ‘की तोडिला तरु फुटे अधिक भराने’, प्रमाणं अधिकच पुष्ट होतात. अधिक रसरशीत आणि समकालीन होत जातात.
विचारांचा जागर घालतो या गुन्ह्यासाठी त्यांनी दाभोळकरांची हत्या केली असेल, तर मग खरे गुन्हेगार त्यांना ठाऊकच नाहीत. नीट पाहिले तर त्यांना जाणवेल, घराघरात असे दाभोळकर आहेत. महाराष्ट्राची मान शरमेनं झुकवणारी, सुन्न करणारी, हादरवून टाकणारी अशी ही हत्या आहे, पण या आघातानं परिवर्तनवादी खचणार नाहीत. उलट अधिक एकसंध, एकात्म आणि सजग होत जातील!
श्रद्धा या संकल्पनेचा अर्थ आणि आशय ज्यांनी आयुष्यभर स्पष्ट केला, त्या दाभोळकरांना श्रद्धांजली वाहताना जबाबदारीची जाणीव ठळक होत चालली आहे.
डॉक्टर, तुम्हांला आज आश्वासन एवढेच. दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न कितीही होवोत, अंधाराचा बभ्रा कितीही वाढो… आमच्या हातात दिवा आहे, तुम्ही दिलेला. तो तेवत राहील, विझणार नाही! आता तर त्या दिव्याची मशाल होईल.
-संजय आवटे
No comments:
Post a Comment