Saturday, 24 August 2013

Shekhar Sonalkar -- हे राम ………… मी दुखी आहे

Shekhar Sonalkar
हे राम …………
मी दुखी आहे…

नरेंद्र दाभोळकर माझे जवळचे मित्र. विचारांचे घट्ट नातेसंबंध. त्यांना संपविण्यात आले, पाठीमागून जवळून गोळ्या घालून. दर आठवडयाला ते मंगळवार- बुधवार साप्ताहिक साधना अंकाच्या कामासाठी नियमित पुण्यात असत. मंगळवार- बुधवार सकाळी ते घडल्याच्या काट्याप्रमाणे नियमित फिरायला जात. शनिवार पेठेतील साधना कार्यालय समोरील रा ग जाधव यांच्या घरातून अलका चौकातून एस एम जोशी सोश्यलीस्ट फौडेशन वरून ते संभाजी पर्यंत ठरलेल्या रस्त्याने पायी फिरायला जात. कबड्डीपटू असल्याने फिट होते. त्यांना अनेकदा धक्काबुक्की, एखादी थापड मारणे, शिवीगाळ करणे, सभा उधळण्याचा प्रयत्न करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार घडले होते. असे प्रकार संतान भारत, हिंदू जंगगारण सभा, नरेंद्र महाराजांचे शिष्य, अभाविप, विश्व हिंदू परिषद, भाजपा, संघ परिवार ह्यांचे कार्यकर्ते करती असत. पण ते पोलिस तक्रार करीत नसत. कधी त्यांनी ह्याचे भांडवल केले नाही. ते सत्याग्रही मन परिवर्तनावर विश्वास ठेवणारे होते.

त्यांचा संवादावर विश्वास होता. जादूटोणा विरोधी विधेयकावर त्यांनी सतत १० वर्षे अनेकदा विरोधकांशी चर्चा केली. एका एका शब्दावर वाक्यावर अर्थावर सविस्तर चर्चा झाली. विरोधकांचे काही आक्षेप मुद्दे लक्षात घेऊन मसुदा बदलला. भाजप, शिवसेना सामोरासमोर विरोध नाहीं म्हणत, जनतेत जाऊन मात्र अपप्रचार करीत की, "हिंदू धर्माविरुद्ध आहे, तुम्ही नवस केलात तर तुरुंगात जाल, पूजा करता येणार नाही, आमचा महाराज बाबा ह्यांच्यात चमत्कारी शक्ती आहे असे म्हणालात तरी जेल मध्ये जाल." इत्यादी. काह्रे तर असे काहीही बिलात नाही.

मला एक एसएमएस आला. नंबर अननोन होता. "मारल्याने विचार मारत नसतो आणि संघटनेवर बंदी घातल्याने संघटनेचा विचार मारत नसतो. दाभोलकरांना मारणाऱ्याचा निषेध" हे खरे आहे की मारल्याने विचार मारत नसतो आणि संघटनेवर बंदी घातल्याने संघटनेचा विचार मारत नसतो. पण देशात कायदा नावाची व्यवस्था असते, कायदा हातात घेऊन दुसऱ्याचे विचार स्वातंत्रावर घाला घालणे, ह्या विरुद्ध देशात कायदा आहे. ह्या कायद्याने अश्या संघटनांवर बंदी घालणे न्यायोचितच आहे.

फेसबुकवर मी प्रा. सविता नंदनवार ( मु जे महाविद्यालय जळगाव येथे इंग्रजीच्या प्राध्यापक) यांनी एक पोस्ट टाकली होती व त्याद्वारे नथुरामने केलेल्या गांधीजींच्या खुनाचे समर्थन केले होते. त्यांच्या दृष्टीने कितीही चुकीचा विचार दुसऱ्याचा असला तरी त्याला संपविण्याचा विचार आणि अशा खुनाचे समर्थन स्वतः ला सुशिक्षित म्हणवणारे कसे करू शकतात ? हे एक विकृत आणि भ्याड मनोवृत्ती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. असेच छुपे समर्थन नथुरामचे कौतुक करून मधुसुदन चेरेकर यानीही केले होते. ते नथुराम किती देशभक्त होता असे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. हि प्रवृत्ती घातक आहे, समाजद्रोही आहे, घृणास्पद आहे, कायद्याने गुन्हा आहे. यांचा निषेद केला पाहिजे. चर्चा करून त्यांना बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यांनीही एका विचारसरणीचेच न वाचता, चौफेर वाचन केले पाहिजे. किमान मोकळ्या मनाने चर्चा केली पाहिजे.

जर सगळ्यांना बुद्धी असेल, तर ते आपापल्या बुद्धीचा वापर करतील. ते वेगळा विचार करू शकतात. लोकशाहीत सगळ्यांना विचार स्वातंत्र्याचा अधिकार असतो. त्यांचा वेगळा विचार करण्याचा अधिकार हे लोकशाहीचे मुलाधारी तत्वद्यान आहे. यावर लोकशाही ह्यावर आधारित असते. ब्रिटनमधील एक विचारवंत वोल्टेयर म्हणतात की मला तुझे मत पूर्णपणे अमान्य आहे ते देशहिताचे नाही अशी माझी खात्री आहे. पण तुझे विचार मांडण्याचे तुझे स्वतंत्र अबाधित राहावे मी माझ्या मृत्यू पर्यंत झगडत राहीन ."

हिंदू धर्म उदार आहे देव न मानणारे, फक्त प्रार्थना करणारे, वेद न मानणारे, ब्राह्मणी वर्चस्व न मानणारे देखील हिंदू आहेत. विवेकानंदानी उदार हिंदू धर्म सांगितला होता. अशी तालिबानी प्रवृत्ती हिंदू धर्माला मान्य नाही.

असे खून करणे कोणत्या देवाला, कोणत्या धर्माला मान्य होईल ? कोणता धर्म अशी शिकवण देतो. हे कृत्य हिंदू धर्माला लाज आणणारे आहे.

मी दुखी आहे पण आपल्या अधिकारावर मानवतेवर ठाम आहे. अश्यांशी लढावे लागेल तर लढू यात. ते मारणार असतील तर शौर्याने मरू यात. मारून विचार संपणार नाही अंध श्रद्धा निर्मुलन समिती संपणार नाही.

No comments:

Post a Comment