Tuesday, 27 August 2013

अकस्मात विझलेला झंझावात...Arun Khore


By  on August 25, 2013
0


feature size
एखादा चिकाटीचा विचारी कार्यकर्ता आणि विलक्षण जिद्दीचा माणूस अचानक निघून गेला तर काय वाटेल? धक्का तर बसेलच, पण त्यापेक्षाही अधिक होतं ते दुःख. मंगळवारची सकाळ आम्हा सर्वांना असा भीषण धक्का घेऊन आली. नरेंद्र हा आमचा चळवळीतला म्होरक्या माथेफिरूच्या गोळ्यांना बळी पडला. महाराष्ट्रातील पुरोगामी विचार परंपरेला बळ देणारा हा उमदा नेता अकस्मात झंझावात विझल्यासारखा निघून गेला, ती हानी कशानेच भरून येणार नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची आणि जागृतीची परंपरा खूप दीर्घ आणि मोठी आहे. त्यामुळेच या वाटेतले धोकेही तितकेच मोठे. एकोणिसाव्या शतकात याच प्रस्थापितांनी काही मारेकरी महात्मा फुले यांना मारण्यासाठी पाठवले होते, त्या मारेकर्यांचं सुदैव असं की त्यांना फुल्यांचं महात्मापण कळालं आणि म्हणून त्यांनी आपल्या हातातल्या कुर्हाडी खाली ठेवल्या. फुले जे काम ज्या वर्गासाठी करत होते, त्यासाठी हे मारेकरी काम करायला तयार झाले, हा इतिहास आहे.
नरेंद्रची हत्या एकविसाव्या शतकात झाली आहे. जेव्हा समाज आणि सरकार सकारात्मक होत आहे, प्रगत होत आहे, त्या काळात अशी हत्या का होते, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रातील आणि देशातील तरुण वर्गाचे असे आयकॉन होते की, त्यांच्या कामात सहभागी होण्याचा विचार आणि निर्धार असे हजारो तरुण करत होते. चळवळीमधले सर्वजण त्याला नरेंद्र याच नावाने संबोधायचे. काही जण आपुलकीने नरुभाऊ असाही उल्लेख करायचे. गांधीजी, सानेगुरुजी, एसेम, नानासाहेब, मृणाल गोरे, मधू दंडवते या सगळ्यांच्या संस्कारात वाढलेले दाभोलकर विलक्षण साधे आणि सच्चे होते. साधे कपडे, पायात साध्या चपला आणि खांद्यावर शबनमची पिशवी याच रूपात नरेंद्रला आम्ही गेली तीस वर्षं बघत आलो आहोत. मंगळवारी पुणे शहरातल्या ओंकारेश्वराजवळच्या ज्या पुलावर त्याला गोळ्या मारल्या, तिथे त्याची पडलेली साधी चप्पल वाहिन्यांच्या बातम्यातून बघितल्यावर आम्हा सर्वांनाच चुकल्यासारखं झालं.
अंधश्रद्धांना विरोध करणारी आणि त्यासाठी तरुणांची एक क्रियाशील फळी उभी करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही संघटना नरेंद्रने स्थापन केली. बुवाबाजी, जादूटोणा, जारण-मारणासारख्या काही अघोरी उपायांच्या विरोधात एक हल्लाबोल मोहीम त्याने सुरू केली. राष्ट्रीय पातळीवर तामिळनाडूतील डॉ. अब्राहम कोवूर यांनी हा हल्ला सुरू केला होता. मात्र त्याला तरुणांची शक्ती लाभली, ती अंनिसच्या माध्यमातून. नरेंद्रची भाषणं आणि नंतर लागोपाठ प्रसिद्ध होत जाणारी त्याची पुस्तकं यामुळे महाराष्ट्रातील खेडोपाडी अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि या सगळ्या अंधश्रद्धांचा मुकाबला करायला एकत्र येऊ लागले. पुण्यात १९९२ साली झालेल्या अंनिसच्या राष्ट्रीय परिषदेत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. व्ही. एम. तारकुंडे, नानासाहेब गोरे, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, सकाळचे कार्यकारी संचालक प्रतापराव पवार या मान्यवरांनी विचारमंथन केलं. महाराष्ट्रातून आलेले दीड-दोन हजार तरुण कार्यकर्ते तीन दिवस या विचारमंथनात रमले होते.
नरबळी का जातात? देवीचा कोप म्हणून जटांसारखे केस वाढवायचे का? अंगात का येतं? हातातून अंगठी कशी काढली जाते? मध्यरात्री भुतं कुठून येतात? स्मशानात भुतं असतात का? असे शेकडो प्रश्न डॉ. दाभोलकरांनी आपल्या चळवळीत उपस्थित केले आणि त्यांची खरी उत्तरं समाजासमोर शास्त्रीय निष्कर्षानुसार दिली. हातचलाखीने अंगठी किंवा भस्म हे मोठे मुनी किंवा स्वामी कसे काढतात याची प्रात्यक्षिकं तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दाखवायला सुरुवात केली. वणव्यावरून चालत जाणं किंवा हातात एखादा पेटता गोळा घेऊन हातचलाखी करणं या सगळ्यांची शास्त्रीय तपासणी त्यांनी केली.यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि लोकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं दिली. ‘लढे अंधश्रद्धेचे’, ‘बुवाबाजीविरुद्धची लढाई’ अशी अनेक पुस्तकं तरुणांसमोर आली आणि चळवळीचं वातावरण बदलून गेलं.
बारामती तालुक्यातल्या एका नरबळी प्रकरणात अंनिसने कार्यकर्त्यांची टीम पाठवली आणि सत्यशोधन केलं. अंनिसचे कार्यकर्ते एकदा मध्यरात्री स्मशानभूमीत गेले आणि भुतखेते नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. ज्योतिष शास्त्राबाबतही त्यांनी आक्षेप घेतले आणि त्यामुळे भल्याभल्या दुकानदार ज्योतिषांची भंबेरी उडाली. याबाबत तर अंनिसने पाच लाखाचं बक्षिस जाहीर केलं होतं. तथापि कोणीही ज्योतिषी त्याला प्रतिवाद करण्यासाठी पुढे आला नाही. अनेक देवदासींच्या आणि त्यांच्या मुलींच्या जटा कापण्याचे कार्यक्रम अंनिसने घेतले. समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असताना अजूनही प्रचलित असलेल्या भीषण अंधश्रद्धा आणि त्यामुळे प्राणावर बेतणारी जोखीम लक्षात घेऊन नव्या कायद्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अंधश्रद्धाविरोधी अर्थातच जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याचं ठरवलं होतं. तथापि पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारला गेली १७ वर्षं हा कायदा करता आलेला नाही. यातली ३ वर्षं युती सरकारची आहेत आणि उरलेली १४ वर्षं आघाडी सरकारची आहेत.
महाराष्ट्रातल्या सामाजिक बदलाच्या सगळ्या चळवळीत नरेंद्र अग्रभागी होता. त्यानेच अनेक नामवंत कलावंतांना या वाटेवर आणलं. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रिमा लागू, सुहास जोशी असे अनेक ज्येष्ठ कलावंत नरेंद्रच्या शब्दाखातर राज्यभराच्या दौर्याला निघाले. एक लढाऊ सेनानी ज्याप्रमाणे आपली आणखी करतो, त्याप्रमाणे अंधश्रद्धेच्या विरोधातील सगळ्या मंडळींना त्याने आपले मुद्दे आणि उद्दिष्ट्यं यांची एक निखळ अशी मांडणी करून त्यात सहभागी केलं होतं. आज महाराष्ट्रातील या चळवळीला त्याच्या जाण्याने एक पोरकेपण आलं आहे. मात्र पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक कायद्यात कसं बदलेल, यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे…
- अरुण खोरे

No comments:

Post a Comment