Tuesday, 27 August 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली..Dr Pradeep Patkar



माझा आणि येथील कित्येक जेष्ठ कार्यकर्त्यांचा डॉ. दाभोलकरांशी १९८८ ते २०१३ या काळातला २५ वर्षांचा स्नेहबंध होता. डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुक्खाबाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता व नेता. विशेषणे अपुरी ठरावित असे जीवन चरित्र.
असे कार्यकर्ते, नेते, महाराष्ट्रात आधीच बोटावर मोजण्या इतपत. ज्या काळात अश्या माणसांची आत्यंतिक गरज त्याच काळात त्यांची निर्घृण हत्या. पुरोगामी महाराष्ट्राचा अणखी एक विचारस्तंभ आता आपल्यापाशी नाही. २०० शाखा आणि तालुका तिथे अनिस हे चित्र महाराष्ट्रात उभे करणारे हे नेतृत्व ! चळवळीपासुन नवा तरुण दूर रहात असल्याचे चित्र इतरत्र, अनिस मध्ये मात्र गेली २० वर्षे सतत तरुण कार्यकर्ते!! कार्यकर्तेहि असे जे पदराला खार लावून घरादारातली टीका सहन करून नोकरी रोजगार सांभाळीत समाजाचे गैरसमज दूर करीत , रोष पत्करीत, विवेकनिष्ठा जोपासत, रुजवीत, कामे करण्यास वेळोवेळी जीव धोक्यात घालून शोषक, गुंड, फसव्या सामाजकंटकांचा पर्दाफाश करीत भोळ्या अंधश्रद्ध भक्तांचे शोषण थांबवण्यासाठी जागोजाग धावणारा. विवेकवाहिनी, विवेकजागर, युवाएल्गार, शोध भुताचा बोध मनाचा, जातीअंताचा लढा, अश्या विविध उपक्रमाद्वारे शिक्षक-विद्यार्थी-महिला-कर्मचारी अशा समाज घटकात विवेक निर्भयता नीती रुजवीत २० वर्षे अविशांत श्रम करणारे असंख्य निरिच्छ सत्शील संयमी कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर आहेत. ही तरुणाई डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली निरलस काम करीत आली, आणि करीत राहील.
शरीर संपले कि विचार संपतील असे वाटून खून करणारे ना धार्मिक ना नास्तिक. कारण आत्मा अमर आहे हा धार्मिकांचा सिद्धांत ! शरीर नाशवंत, विचार तेवढे अ-क्षर नाश न पावणारे - हे मानणारे विज्ञानवादी असे खून करणार नाहीत. ज्यांना समाजातील शोषणाची दखल घेण्यात जराही रस नाही जे सदा स्वार्थ साधण्यात मग्न. बरेचसे विचारवंत परदोषदर्शनात व्यग्र वा थोडे अध्यात्मात थोडे विज्ञानात, वेळ येताच कुंपणावर उडी मारून स्थिर! हा खून करतात मतीभ्रष्ट धर्मभ्रष्ट पाशवी वृत्तीचे गुन्हेगार ज्यांना ना कळला माणूस ना देव ना संस्कृती ना धर्म ना अध्यात्म!
निशस्त्र, संयमी, नेमस्तवादी वयवर्षे ६८ माणसाला,तो सकाळी फिरत असताना, निर्घृण अमानुषतेने मागून गोळ्या घालणे यात काडीचेही शौर्य दिसत नाही. हा ईश्वराचा न्याय म्हणणाऱ्याना ईश्वर हा इतका कुटील खूनाचा प्लॅन करेल तरी कसा असा प्रश्न पडत नाही. धर्म व ईश्वराविषयीचे गैरसमज, त्याच्या नावाखाली चाललेली शोषक कर्मकांडे, बळी विधी, अघोरी कृत्ये, बळींचा शारीरिक मानसिक छळ, लैंगिक शोषण, हत्या हे सारे थांबविण्यासाठी काम करणारा ईश्वराला प्रिय असेल यात शंका नाही. मग इश्वर या कर्माचे फळ असे कसे देइल अशी जराही शंका या विद्वान साधकाना कशी येत नाही !!
कि संस्कृती संभ्रमाच्या या काळात अनिस विरोधकांनी आपापले मेंदु जराही न वापरण्याचे ठरविले आहे काय ? ज्या विधेयकातील सर्व ११ कलमे कुठेही धर्म - हिंदुधर्म वा इतर कुठलाही- या विषयी बोलत नाहीत. त्यात आहे फक्त फसवणूक,दुखापत, दहशत , अयोग्य मार्गदर्शन/सक्ती, अविवेकी कृत्यांना प्रोत्साहन, मानवी हक्कांची पायमल्ली या व अश्या अनेक मानवी क्रूर कृत्यांचा विरोध ! माणसाचे भावनिक, शारीरिक, लैंगिक शोषण होऊ नये या साठी कायद्याचे संरक्षण त्या व्यक्तीस मिळावे व अशी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना सजा मिळावी एवढेच साधणारे हे विधेयक असताना त्या बाबत इतका खोटा प्रचार कशाशाठी ? तो हि विधेयक न वाचता, न समजून घेता ! ना इथे पूजेला, प्रार्थनेला,वारीला,यात्रेला, मिरवणुकीला, उत्सवाला, जपजाप्याला, मंत्राला विरोध. हे सारे करून माणसाना तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर त्यानाही प्रयत्नानीच आपापले प्रश्न / अडचणी सोडवाव्या लागतात. देवालये वा ट्रस्ट यांना कसलाही विरोध नाही. आहे तो फक्त देवाधर्माच्या नावाखाली दुःखीतांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, लैंगिक फसवणूक, इजा वा छळ आणि शोषण करण्याला विरोध!
हे विधेयक नसेल तर महाराष्ट्रात जागोजागी अशी दुष्कृत्ये, नरबळी, लैंगिक शोषण, अघोरी प्रथा फसवणूक, आणि अशास्त्रीय घातक उपचार (?) आज प्रमाणेच पुढेही चालू राहतील व कार्यकर्त्यांना व पोलिसांना कायद्याची विशेष मदत होऊ शकणार नाही. आपल्याला समाजात काय हवे आहे ? हे नीट लक्ष्यात घ्या आणि मग हा वटहुकुम - विधेयक – कायदा चांगला कि वाइट हे ठरवा.
आज डॉक्टरांच्या समाजकार्याचा वारसा जागोजागी समर्थपणे पेलू शकणारे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत. समाजाला सोबत घेउन प्रबोधन व संघर्ष दोन्हीचे संतुलन साधीत हे कार्य पुढे चालू राहील. अतिशय समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. चार्वाक वादी लोकायत, बुद्धाचा प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत , त्याला जोडून मार्क्सवाद, प्रयोगशीलतेला चिकित्सेला पोषक असे चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, नागार्जुन, वाग्गभट, जैन गणित शास्त्रज्ञ - महावीराचार्य यांचे विचार, सांख्याचा प्रकृती विचार, कणादांचा परमाणु वाद , महाराष्ट्राची संतमहात्म्याची परंपरा, महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे विवेकी समाज निर्मितिचे महान कार्य, साने गुरुजींचा मानवता धर्म, स्वा सावरकर, प्रबोधनकार यांचे प्रखर वैज्ञानिक विचार आपल्यापाशी आहेत. अन्याय शोषण अत्याचार यांचा समर्थ प्रतिकार करण्याची ताकत तर सारी येथेच समाजातच उपलब्ध आहे.
आम्ही सावरू आणि घातक शोषणाला आवरूही, हे निश्चीत समजा.
आपणा सर्वाना बरोबर घेउन आम्ही सारे कार्यकर्ते पुढची वाटचाल करीत राहू. आपली साथ सोबत, वेळोवेळी मार्गदर्शन अपेक्षित आहे.
आमच्या या दुःखद प्रसंगात आमचे सांत्वन करायला आपण सोबत आहात या बद्दल आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्व कार्यकर्ते आपले कृतज्ञ आहोत.

डॉ. प्रदीप प. पाटकर
उपाध्यक्ष म. अनिस
p3patkars@sify.com

1 comment:

  1. आता समस्त सुबुद्ध लोकांनी एकत्र येऊन अंनिसचे काम पुढे चालू ठेवणे हीच डॉ. दाभोलकर यांना उचित श्रद्धांजली असेल.

    ReplyDelete