By संजय पवार on August 25, 2013
दिनांक १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘जातपंचायत अडसर आणि कायदा’ यावर महाचर्चा होती. या चर्चेत भाग घेण्यासाठी मला निमंत्रण होतं. संयोजकांना सहयोगी वक्त्यांची नावं विचारल्यावर मला चर्चेच्या विषयाऐवजी वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं! हे टेन्शन येण्याचं कारण होतं या महाचर्चेत नरेंद्र दाभोलकर सहभागी होणार होते. आणि डॉक्टर गेले काही महिने एका विषयाच्या लेखनासाठी सतत विचारणा करत होते. ते अनेक बाबतीत ‘ज्येष्ठ’ होते, अनेक मोठ्या पदांवर होते. तरीही कधीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याला धरून राग/लोभ नसायचा. ‘माझं एक काम आहे, तू ते चांगलं करशील, तर त्यासाठी थोडा वेळ काढशील का? अगदी सर्व कामं बाजूला ठेवून कर असं नाही तर जमेल तसा वेळ काढ, कारण यामुळे आपला विचार या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचणार आहे…’ डॉक्टर बोलत रहायचे. नाही म्हणणं शक्य नसे. त्यांच्या बोलण्यात कधीही हक्क दाखवणारी ओळखीतून आगाऊपणा करणारी जवळीक नसे की आपलं काम करून घेण्यापुरतीची कौतुक पेरणी नसे! त्यांना फक्त विषय आणि त्याला न्याय देणारी व्यक्ती यांचा समन्वय साधणं एवढंच साधायचं असे! याबाबत कधीही, कुणाकडून ‘डॉक्टर भेटले, तुझ्यावर वैतागले होते, चिडले होते,’ वगैरे कधीच कुठल्याही कोपर्यातून ऐकू येत नसे.
त्यामुळेच आता डॉक्टर भेटणार तेव्हा त्यांना वेळ द्यावाच लागणार याची मनोमन तयारी करून गेलो. संवादक प्रदीप भिडे, सहयोगी वक्ते अॅड. भास्करराव आव्हाड आणि मी, निर्माते जयू भाटकरांच्या केबिनमध्ये चहा घेत असतानाच डॉक्टर आले! तोच सुस्मित चेहरा, एक छोटेखानी बॅग… ते येताच मी त्यांना विचारलं, ‘कुठून येताय आणि कुठे जाताय?’ त्यावर ते फक्त हसले! कार्यक्रम सुरू होण्याची वेळ होत आली होती. मी डॉक्टरांना महाचर्चेच्या विषयावर थोडं बोलूया म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमात मांडणी करणं सोपं जाईल… असं म्हणताच डॉक्टरांनी त्यांच्या परिचित स्वरात, अत्यंत मुद्देसूदपणे, कुठेही न अडखळता ‘जातपंचायत’ या विषयावर पाच/सात मिनिटात ब्रीफ केलं. त्या अनुषंगाने उपस्थित होणार्या प्रश्नांचा ऊहापोह केला. दरम्यान मेकअप, चहाच्या सूचना येत होत्या. एक पोलीस उपमहानिरीक्षक सहभागी होणार होते, ते पोहचले नव्हते, त्यांच्याशी जयू भाटकर संपर्क साधत होते सतत… पण डॉक्टर त्या धबडग्यातही जातपंचायतीला मूठमाती या आपल्या नव्या अभियानाची माहिती देतच राहिले. लोकांच्या प्रतिक्रिया, सहभाग, कायद्याचे गोंधळ, राजकीय दबाव अशा अनेक गोष्टी…
स्टुडिओत गेल्यावर तिथे तांत्रिक गोष्टींची जुळवाजुळव सुरू होती. थोडा वेळ होता तेव्हा अतिशय शांतपणे ते मला म्हणाले, ‘मागच्या मीटिंगला तू आला नाहीस पण मी, विवेक (सावंत) यांनी काही गोष्टी ठरवल्यात. तू आता कधी पुण्यात येतोयस?’ जनरली अशा भेटीत समोरचा माणूस आधी लक्ष देत नाही, रुसून बसतो, परस्पर काही टोमणे मारतो, जाहीर राग व्यक्त करतो आणि ते काम आम्ही आता कसं दुसर्याकडून करून घेतोय असं मुद्दाम, चारचौघात उच्चरवाने सांगतो! पण डॉक्टर या असल्या समज-गैरसमजाला, रुसव्या फुगव्याला, मान अपमानाला थाराच देत नसत. ते स्वल्पविरामासारखं त्या गोष्टीला महत्त्व देऊन, बोलणं पुढे नेत!
गेले काही दिवस ते माझ्या मागे लागले होते ते यासाठी की विवेक सावंत हा आमचा पूर्वीचा लोकविज्ञान चळवळीतला सहकारी सध्या महाराष्ट्र नॉलेज इन्स्टिट्यूटचा प्रमुख आहे. शालेय स्तरापासून ते अगदी प्रौढ साक्षरांपर्यंत संगणक साक्षरता करण्याचं काम ही संस्था करते. शासनाचीच पण पूर्ण स्वायत्त संस्था… तर ते आता शालेय विद्यार्थ्यांना ‘आकाश’ टॅब देणार आहेत. त्या टॅबवरून काही अॅप्लिकेशन देणार आहेत. त्यात विज्ञान, अंधश्रद्धाविरोधी काही गोष्टीरूप खेळ, अशा काही इंटरअॅक्टिव्ह गोष्टी करता येतील का? त्यासाठी दाभोलकर आणि ते भेटत होते. हे असं गोष्टीरूप कोण लिहू शकेल? म्हणून चर्चेअंती दोघांनी माझं नाव निवडलं… तर त्या संदर्भातल्या बैठकी, प्रारूप ठरवणं, एखादी गोष्ट लिहून पाहणं असं चाललं होतं… मधल्या मीटिंगला मी जाऊ शकलो नाही. पण डॉक्टरांनी त्याचा बाऊ न करता आतापर्यंत काय काय ठरलंय आणि ते करायचं आहे कारण महत्त्वाचं आहे आणि अशा मोठ्या संस्थेने स्वतःहून यात मदत देऊ केलीय तर ती आपण वाया घालवता नये असं नेहमीच्या शांतपणे ते सांगत होते आणि २७ तारखेला दुपारी भेटूया अशी भेट निश्चिती केली. माझा ईमेल घेऊन मध्ये काय ठरलंय ते पाठवतो म्हणाले.
मला त्यांचं नेहमी आश्चर्य वाटायचं. तसं म्हटलं तर डाव्या पुरोगामी चळवळीत आमची पिढी दाखल झाली तेव्हा आणीबाणी पर्व संपून जनता पक्षाचा प्रयोग फसूनही दोनचार वर्षांचा काळ लोटला होता. युक्रांद सह सेवादलातूनही फाटाफूट झाली होती, दिनांक साप्ताहिकही थंडावलं होतं.
नाही म्हणायला स्त्री मुक्ती, भटक्यांच्या चळवळी आणि नामांतराचा प्रश्न सुरू होता. खादी वस्त्रांकित तरुण पिढी, विविध सभा, संमेलनं मेळावे यात दिसे. विषमता निर्मूलन संमेलनात तर हमखास. तिथेच कधीतरी डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव कानावर पडलं, प्रत्यक्ष पाहिलं. त्यावेळी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद ही चळवळींची प्रमुख स्थळं होती. त्यात सातार्यातून दाभोलकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, किशोर बेडकीहाळ पुढे तुषार भप्रे, प्रमोद कापर्डे असे अनेक ‘कार्यकर्ते’ संपर्कात आले.
डाव्या चळवळीतील समाजवादी, कम्युनिस्ट हे सूक्ष्म भेदही हळूहळू कळायला लागले, वैचारिक मतभेदामुळे वेगवेगळे झालेले गट, त्यांच्या संघटना, त्यांची मुखपत्रं, त्यातून एकमेकांच्या ‘विचारांना’ आव्हान, प्रतिआव्हान देणारे लेख. या लढ्यात आमच्यासारखे चित्रकार, कलावंत आणि गं. बा. सरदार, नलिनी पंडित, राम बापट यांसारख्या विचारवंतांची मात्र गोची व्हायची. सगळेच ‘मूळ’ विचाराने एकच, तरीही सूक्ष्म भेदाने मतभेदाच्या भिंती इतक्या मोठ्या करून ठेवलेल्या की कप्पेबंद जातीव्यवस्थेचीच आठवण यावी!
या अशा भेदाभेदातच कधीतरी ‘दाभोलकर’ संस्थानाविषयीही काही बाही ऐकू येई… पण मी त्याअर्थाने कुठेच वैचारिक सक्रिय नसल्याने चित्रकार लेखक म्हणून माझा सर्वत्र संचार असायचा… तरीही डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी थेट संपर्क गेल्या पाच दहा वर्षांतला…
पहिल्यांदा ते भेटले ते अंधश्रद्धाविरोधी टीव्ही मालिका निर्माण करण्यासंदर्भात. त्यावेळच्या झी मराठीचे प्रमुख नितीन वैद्य, अजय भालवणकर, निखिल साने यांच्याशी चार/दोन मीटिंग झाल्या. नितीनला डॉक्टरांना वाहिनीवर वेळ द्यायचा होता. निर्मिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती करेल. पण पुढे घोडं अडलं ते जाहिरातींवर. डॉक्टरांचं म्हणणं आम्ही जो पैसा उभा करू, त्या व्यक्ती, संस्था यांना ‘जाहिरात’ स्वरूपात स्थान मिळावं, यावर ‘झी’च्या मार्केटिंग विभागाच्या काही व्यावसायिक अडचणी होत्या. ‘झी’च्या रेग्युलर सिरिअल पॅटर्नमध्ये ही सिरिअल करता येणार नव्हती अशा अनेक तांत्रिक गोष्टीत ती कल्पना अडकली. पुढे नितीनही तिथून गेला. अनेक बदल झाले.
नंतर डॉक्टारांनी सह्याद्री वाहिनीसाठी प्रयत्न करून पाहिला. पण तिथेही तशाच काही अडचणी उभ्या राहिल्या. डॉक्टरांकडे ‘कंटेंट’ होता पण पुढच्या सगळ्या तांत्रिकतेपुढे एखाद्या भगतापुढे सामान्य माणूस शरण जावा, तसे ते शरण जायचे!
त्यानंतर चित्रपट करण्यासाठी त्यांना काही लोक आर्थिकसाह्य द्यायला तयार होती. पुन्हा आमच्या भेटी झाल्या. काही गोष्टी ठरल्या काही प्रमाणात पुढे गेल्या आणि पुन्हा थांबल्या!
या सर्व प्रकारात डॉक्टर शांत असत. घडलं तर आनंद नाही घडलं तर पुन्हा प्रयत्न. या संदर्भात त्यांनी कधीच कुणाला दूषणं दिली नाहीत, कुणाच्या सामाजिक जाणिवेचे वाभाडे काढले नाहीत की घायकुतीला येऊन अर्धवट काही काम केलं नाही.
त्यांना सदाशिव अमरापूरकर, सोनाली कुलकर्णी, सुमित्रा भावे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, नंदू माधव, उमेश कुलकर्णी असे अनेक लोक आपली व्यवसायिकता बाजूला ठेवून मदत करायला तयार होती. पण या लोकांच्या जाणिवेवर बोट ठेवून त्यांना त्यांच्या पदराला खार लावून करायला लावणं त्यांनी कधीच जमलं नाही, आवडलं नाही, त्यांना याची पूर्ण जाणीव असे की हे कलाकार पूर्णवेळ कलाकार आहेत. त्यांच्या पोटाला, वेळेला जाणिवेचे चिमटे लावून जबरदस्तीने काही करून घेणं चुकीचं आहे. ते म्हणत की त्यांचा चांगुलपणा, विचार म्हणून त्यांनी चार पैसे कमी करणं, पैसे न घेणं किंवा उलट मदत देणं हे सर्वस्वी त्यांच्या स्वेच्छेवर! आपण त्यांना त्यांचं मानधन देण्याची तयारी ठेवूनच भेटायचं.
काही ना काही कारणाने मालिका, चित्रपट यातलं काहीच घडलं नाही. त्यांचं विधेयकही १७ वर्षं पडून आहे. पण त्यांचं सातत्य तसंच होतं. वाढत्या वयाची पर्वा न करता ट्रेन, पॅसेंजर, एसटी कशानेही कधीही प्रवासाची तयारी.
भेटीच्या वेळी, स्वतःबरोबर आपल्याही वेळेचं नियोजन ते करत. म्हणजे तू बारा वाजता ये, आपल्याला तासभर लागेल बोलायला, मग जेवू नंतर मला चारला कार्यक्रम आहे, तू तीन नंतर तुझे पुढचे कार्यक्रम ठेव!
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासंदर्भात गेल्या १७ वर्षांतील अनुभव त्यांनी (आजच्या प्रथेप्रमाणे) लिहायचं ठरवलं असतं तर ते आजच्या काळातलं भांडाफोड करणारं, हातोहात खपणारं पुस्तक ठरलं असतं. पण मंत्र्यांच्या केबिनमध्ये झालेली बोलणी एका मर्यादेपलीकडे त्यांनी कधीच जाहीर केली नाहीत की चविष्ट गॉसिपसारखी पसरवली नाहीत. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात पत्रकारांना हाताशी धरून त्यांना खूप कंड्या पिकवता आल्या असत्या किंवा स्टिंग ऑपरेशन करून ‘तहलका’ मचवता आला असता! पण त्यांचा विश्वास मतपरिवर्तन, मनपरिवर्तनावर होता. या विधेयकावर धर्मांध शक्ती आणि त्यांना पोसणार्या राजकीय पक्षांनी वाट्टेल त्या पद्धतीने टीका केली की त्यांना राग येण्याऐवजी ते व्यथित होत! एक प्रकारची हतबलता त्यांना येई पण क्षणिकच! मग त्या विरोधात शांततापूर्ण प्रतीकात्मक आंदोलन करायची तयारी ते करत!
त्यांना हल्ली तुमचा दुसरा गांधी करू अशा धमक्या मिळाल्या होत्या. मला खात्री आहे की हे ऐकल्यावर डॉक्टर हसून मला मारा पण मला गांधींच्या पंक्तित कुठे नेता? असं म्हणाले असते आणि नंतर असंही म्हणाले असते, त्या निमित्ताने का होईना गांधी जिवंत आहे आणि त्याला विचाराने नाही तर अविचारानेच संपवावं लागतं, तरीही तो पुन्हा जिवंत होतोच… हे त्यांना कळलं तरी पुरेसं आहे.
सफदर हश्मी नंतर खूप वर्षांनी एक अॅक्टिव्ह कार्यक्रता शहीद झाला या निमित्ताने हातपाय गाळून बसलेली डावी चळवळ पेटून उठेल अशी आशा आणि तीच श्रद्धांजली डॉक्टरांना!
No comments:
Post a Comment