Wednesday, 21 August 2013

शांत; पण दृढनिश्चयी दाभोलकर....दिव्यमराठी

http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-narendra-dabholkar-4352790-NOR.html


महंत सुधीरदास महाराज |

 Aug 21, 2013, 00:09AM IST



सकाळी जप-पूजा सुरू होती. धर्मशास्त्र लेखनसंदर्भासाठी दिल्लीवरून आलेली काही पुस्तके चाळत असतानाच माझ्या शिष्याचा भ्रमणध्वनी आला. ‘तुम्ही टीव्ही पाहिला का?’ अशी विचारणा करत त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या झाल्याचे सांगितल्यावर मी चक्क उडालोच. एका मराठी वृत्तवाहिनीवरील वृत्तांत पाहिला...काही क्षणांतच आठवणींमध्ये बुडून गेलो.
 
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीचा तो प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला. मी अंधश्रद्धा कायदा पुनर्लेखन समितीचा सदस्य. सुमारे 45 जणांना देशमुख यांनी स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलावले होते. आमच्या 15 सूचना व उपसूचना होत्या. एक-दोन मुद्दे झाले नाही तोच डॉ. दाभोलकर सभागृहात हजर झाले अन् थेट विलासरावांच्या अगदी शेजारच्याच खुर्चीत जाऊन बसले. सर्व मंडळींमध्ये चुळबूळ सुरू झाली. कोणीच काही बोलेना. उपस्थित सर्व मंडळींनी मला ‘महंतजी, तुम्ही काही तरी बोला’ म्हणून आग्रह धरल्याने मी जोरदार आक्षेप घेत ‘मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आम्हाला चर्चेस बोलावले असताना डॉ. दाभोलकर येथे कसे?’ अशी विचारणा करत ‘तुम्ही त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करा. त्यांच्यासमोर आम्हाला मुद्दे मांडावयाचे नाहीत. त्यांना बाहेर जाण्यास सांगा,’ असे मी सांगितले. डॉक्टर मात्र नेहमीसारखे शांतपणे हसत म्हणाले, ‘आपण सर्व बरोबर चर्चा करू महंतजी.’

नेहमी विविध बैठकांमध्ये, चर्चासत्रात माझे त्यांच्याशी खटके उडत असत. मी वैदिक मतप्रवाही.. ते समाजवादी विचारसरणीचे असल्याने म्हणत, ‘युरोपच्या धर्तीवर विज्ञानाची कास धरल्याशिवाय देश प्रगतिपथावर येणार नाही.’ मी म्हणायचो, ‘युरोपात सर्वाधिक अंधश्रद्धा आहे. इंग्लंडची राणी बाहेर जाताना काळी मांजरे सोडली जातात, आफ्रिकन ब्लॅक मॅजिक .. प्लॅनेट हे काय आहे?’  बाबा, पंडित, जादूटोणा, भगत हे त्यांचे नेहमीचे खाद्य. सडकून टीका करावयाचे...परंतु, चर्चासत्रे, व्याख्याने यांच्या माध्यमातून आम्ही केव्हा एकमेकांचे चांगले मित्र झालो कळलेच नाही.

पुण्याला किंवा सातारा परिसरात कार्यक्रम असताना हमखास डॉक्टर फोन करायचे किंवा माझा फोन त्यांना व्हायचा. मग काय, संत-महात्म्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य कसे हाती घेतले, यावर चर्चा होई. तुकाराम महाराज त्यांच्या आवडीचा विषय.. ‘आपणदेखील या पुरोगामी चळवळीत सामील होऊन नवीन महाराष्ट्र घडवा. जो धर्माच्या बाबागिरी-भोंदूगिरीच्या पल्याड असेल’ हे त्यांचे मत.

हाजी अलीच्या दर्ग्यावर महिलांना प्रवेशबंदी-तेथील मौलाना, इमाम यांनी महिलांना नमाज पढू दिला नाही, असे कळताच मी त्यांना फोन केला, ‘डॉक्टर, तुम्ही शनी-शिंगणापूरला महिलांना प्रवेश नव्हता तर आंदोलन केले. आता गप्प का? तेथे जाऊन आंदोलन का करत नाही? इतर धर्मांतील अंधश्रद्धेचे काय? त्यावर ‘महंतजी, व्यापक दृष्टिकोन घ्या’, हे त्यांचे नेहमीचे वाक्य. डॉ. दाभोलकर हे एक सत्यवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक होते. त्यांचे सामाजिक कार्य मोठे होते. गणेश विसर्जनाच्या संदर्भाने नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण होते, शाडूच्या मूर्तीच पाहिजेत. मूर्ती विसर्जनाची मूळ धर्मशास्त्रीय प्रक्रिया काय आहे, मोठ्या मूर्तीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे तर खूपच नुकसान होते, मूर्तिदान प्रक्रिया.. मूर्ती तीन वेळा पाण्यात बुडवून काठावर काढून ठेवण्यास हरकत नाही.. निर्माल्य पाण्यात टाकू नये, ही त्यांची ठाम मते. पर्यावरणवादी दृष्टिकोन होता. धर्मशास्त्र-ज्योतिषविज्ञानाचे डॉक्टरांचे वाचन अफाट होते. साधना ट्रस्ट हा त्यांचा आवडीचा, आपुलकीचा विषय. ‘साधना’चे संपादक असल्याचा त्यांना सार्थ अभिमानही होता.

विधानसभेत आमदार रामदास कदम यांनी साधना ट्रस्टला विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचा आरोप केला. त्याप्रसंगी ते अत्यंत संतापले होते. आपण या व माझे अकाउंट तपासा, असे त्यांनी खुले आव्हान दिले. त्या वेळी मी त्यांना ‘डॉक्टर चिडू नका, आपल्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे. त्यांच्याशी आपण आता काही बोलू शकत नाही,’ अशी मी त्यांची समजूत घातली. विचारांची उंची, खोली असलेले नि:स्पृह व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. अंधश्रद्धा कायद्याबाबतच्या सर्व शंकांचे जवळपास निराकरण झाले आहे. त्यांच्या हत्येमागील घटनेची उच्चस्तरीय चौकशीही होणे गरजेचे आहे. शासनाने येत्या अधिवेशनात संत, महात्मे, वारकरी संप्रदाय, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्याशी चर्चा करून अंधश्रद्धा कायदा विधेयक मंजूर करणे हीच ख-या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल.
 

No comments:

Post a Comment