Wednesday, 7 August 2013

वंजारी समाजाचा इतिहास

संजय सोनवणी, 


आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.

पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.

हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.

मालवाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशुंच्या पैदाशीतही अग्रेसर राहिला.

कोकणातुन व गुजरातेतील क्च्छमधुन मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशालिस्ट वर्गही यातुनच निर्माण झाला. मीठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडुन ते उचलायचे आणि देशभर विकायचे. त्या काळात मीठाची किंमत मोठी होती. लवण (मीठ) वाहतुक करणारे ते "लमान" (लभान) हा पोटभेद त्यातुनच निर्माण झाला.

आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक वंजारी समाज लढवैय्याही बनलेला होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी-लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.

वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी/लमानांचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी/लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने  वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी/चारण/लमानांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.

थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी/लमाण समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणा-यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल! हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.


अनेक वंशातुन निर्माण झालेला समाज

संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा, यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्र्रात काही जिल्हयात आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्टया निराळी आहे. याचे कारण म्हनजे या समाजाचे गेल्या दोनेकशे वर्षांत झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नांवे वेगळी झाली हे वरील यादीवरुन लक्षात येईल. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत चारण, मथुरिया, लमाण आणि घाडी, यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार चाहमान, जाडोत, किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.

थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणुन बंजारा-वंजारी-चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे.

वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.

आजचे वास्तव

आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असम्ख्य वंजारी उसतोदणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती.

महाराष्ट्रात याच समाजातुन उदयाला आलेले महत्वाचे राजकीय नेतृत्व म्हनजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाचे ते एकमेव आशास्थान असले तरी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात त्यांना शह देण्याची अन्य जातींतील नेतृत्वांची प्रवृत्ती एकार्थाने विघातक अशीच आहे. सध्या बहुजन समाजाचे ऐक्य करण्याचे प्रयत्न चालु आहेत त्यात महादेव जानकर, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे पुढाकार घेत आहेत. भविष्यात काय होइल हे सांगता येत नसले तरी आज वंजारी समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे.

No comments:

Post a Comment