http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/21082013/0/1/
सावधान, रात्र वै-याची आहे (विशेष संपादकीय)
कुमार केतकर | Aug 21, 2013, 02:17AM IST
नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हे अवघ्या महाराष्ट्राला एक लांच्छन आहे. अवघे आयुष्य व्रतस्थपणे जगणा-या, अंधश्रद्धा निर्मूलन हा ध्यास घेतलेल्या, सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व या विचारांनी प्रेरित होऊन त्या मूल्यांसाठी संघर्ष करणा-या एका ध्येयवादी माणसावरचा हा हिंस्र हल्ला म्हणजे देशात वाढत चाललेल्या सनातनी वृत्तीचा भीषण पुरावा आहे. ही हत्या म्हणजे तमाम सुसंस्कृतपणाची, आधुनिक व विज्ञानवादी विचारसरणीची मुळेच महाराष्ट्रातून उखडून काढण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच त्यामुळे हा संघर्ष संपणार नाही आणि दीडशे वर्षांहून अधिक दीर्घ परंपरा असलेला पुरोगामी विचार नष्ट होणार नाही. संघर्ष जारी राहणारच, पण सर्व संघर्षयात्री स्वयंसेवकांना या हत्येने दिलेल्या इशा-याचे भान ठेवावे लागणार आहे. राजीव गांधींच्या जयंतीला, सद्भावना दिनालाच ही हत्या व्हावी हाही केवळ योगायोग असेल असे नाही. देशातील वातावरण धार्मिक उन्मादाने भडकवून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे, हे महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीने लक्षात घ्यायला हवे. हा मुद्दा पक्षीय राजकारणाचा नाही. हा मुद्दा फॅसिझम विरुद्ध लोकशाही, धर्मांध शक्ती आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि प्रगत भारत विरुद्ध सनातनी भारत यांच्यातील घनघोर संघर्षाचा आहे. नरेंद्र दाभोलकर हे या वेदीवरचे बळी आहेत. हा एका व्यक्तीचा खून नाही, तर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रावरचा खुनी हल्ला आहे. ज्या प्रवृत्तींनी नथुराम गोडसे निर्माण केला त्याच प्रवृत्ती अजून समाजात दबा धरून बसलेल्या आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मुंबईमध्ये कामगार नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी डॉ. दत्ता सामंत यांची हत्या झाली होती. विचार कामगारमुक्तीचा असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचा, त्या विचारालाच रुजू द्यायचे नाही, असा विडा महाराष्ट्रद्रोही मंडळींनी उचलला आहे. ही तालिबानी वृत्तीच गांधीजींच्या, इंदिरा गांधींच्या आणि राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार होती.
नरेंद्र दाभोलकर त्या अर्थाने गांधीवादी होते. त्यांचे नावही नरेंद्र असावे हा आजच्या काळातील दैवदुर्विलासी योगायोगच म्हणावा लागेल. त्यांचा अंधश्रद्धाविरोधी लढा पूर्णपणे अहिंसक होता. त्यांनी महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते त्याचप्रमाणे अहिंसेच्या विचारावर उभे केले होते. अंधश्रद्धाविरोधाची लढाई संसदीय पातळीवर लढायची तर तसे पुरोगामी कायदे विधिमंडळाने करावयास हवेत या दृष्टिकोनातून त्यांनी तत्संबंधी विधेयकाचा पाठपुरावा गेली 30 वर्षे केला होता. अंधश्रद्धेचा बळी मुख्यत: महिला असतात, जादूटोण्यामुळे हजारो गरीब कुटुंबे उद्ध्वस्त होतात, मूल होण्यासाठी वा अमाप धनप्राप्तीसाठी कित्येक जण साधू-बाबांच्या चरणी शरण जातात आणि सर्वनाश ओढवून घेतात हे पाहून व्यथित झालेल्या दाभोलकरांनी अवघा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून ढवळून काढला होता. समाजवादी चळवळीचा वारसा असलेले दाभोलकर हे साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे केवळ संपादक नव्हते, तर त्या विचाराचे निशाण देशभर (जगभरही!) नेणारे एक निष्ठावान अहिंसक सेनानी होते. म्हणूनच अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांचा तेथे सन्मान केला होता. त्या निमित्ताने त्यांनी अमेरिकेतही प्रबोधनयात्रा काढली होती. याच विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तके लिहिली होती. खेडोपाडी जाऊन अगदी गरीब वस्त्यांमध्ये जाऊन-राहून त्यांनी त्यांचे जादूटोण्याच्या विरोधात प्रबोधन केले होते. लोक अंधश्रद्धांमुळे कसे फसवले जातात हे प्रात्यक्षिकांमार्फत समजावून सांगितले होते. अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन नरबळीही कसे दिले जातात याची उदाहरणे त्यांनी दिली होती. दाभोलकरांचा विरोध होता तो अंधश्रद्धेला. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या विरोधात नव्हते. उलट भारतीय तत्त्वज्ञान कसे प्रगल्भ, प्रगत, तर्कनिष्ठ, इहवादी व विज्ञानवादीही आहे हे ते सांगत असत; परंतु दाभोलकर हे जणू हिंदूंच्या विरोधात आहेत, असा प्रचार करण्यात आला. अतिरेकी हिंदुत्ववादी व्यक्ती व संघटनांनी दाभोलकरांच्या विरोधात मोहीमच उघडली होती. त्यांच्या हत्येनंतरही तथाकथित ‘सोशल मीडिया’वर दाभोलकर यांचे चारित्र्यहनन चालू आहे. त्यांच्याविरोधात गरळ ओकली जात आहे. महाराष्ट्राचा फुले-शाहू महाराज-आंबेडकरी वारसा उधळून टाकण्याचे हे षड्यंत्र आहे. महाराष्ट्र सरकारने या कारस्थानाची पाळेमुळे खणून काढायला हवीत. नथुरामने पुण्याहून दिल्लीला जाऊन गांधीजींची हत्या केली होती. नरेंद्र दाभोलकरांची हत्या पुण्यालाच केली गेली आहे... रात्र वै-याची आहे.

No comments:
Post a Comment