Thursday, 1 August 2013

ओबीसींनो, आर्थिक महासत्ता,ज्ञानसत्ता बना! (लेख ९)

संजय सोनवणी, 

ख-या अर्थसत्तेचे निर्माते तुम्हीच होता. तुम्हीच पुरातन काळापासुन मानवी समाजाला उपयुक्त असे शोध अत्यंत कल्पकतेने लावत गेला. समाजाचे जीवन सुखमय करण्याचा चंग बांधला. त्यातुनच एक अर्थव्यवस्था उभी राहिली. जागतीक व्यापार घडला. सर्वच निर्मानकर्त्यांचे त्यात योगदान होते. गेल्या एक हजार वर्षात तुमची आर्थिक घसरण झाली. सामाजिक दर्जा संपला. औद्योगिक क्रांतीने तुम्हाला अक्षरश: हतबल करुन सोडले. भिकारे बनवले. आत्मसन्मान संपला. उरला त्पो फक्त जातींचा वांझ अभिमान.
पण आज आपण जागतिकीकरणाच्या काळात आहोत. फक्त भांडवलदारच प्रगती करु शकतात हा सिद्धांत आता कालबाह्य झालेला आहे. कल्पक लोकांना कधी नव्हे एवढ्या संध्यांची रेलचेल आहे. भांडवलदारांनाही कल्पक लोकांची गरज आहे. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." हा सिद्धांतच तुमच्या मुळावर आलेला आहे. अंथरुन पाहुन पाय पसरावे..." वा "बिकट वाट वहिवाट यशाची धोपट मार्गा सोडु नको..." हे उपदेश ऐकणे व ते आचरणात आनणे सर्वप्रथम बंद करा. काळ कोणताही असो, अर्थसत्ता ज्याच्या हाती तोच जग जिंकु शकतो,. आपण जग जिंकायला जन्मलेले आहोत आणि जिंकनारच अशीच भावना बाळगा आणि तशी पावले उचला.
नोकरच नव्हे...मालक व्हायची स्वप्ने पहा! कारण तेच तुमच्या रक्तात आहे...जीन्समद्धे आहे.
तुम्ही म्हणाल, सांगणे सोपे आहे, पण ते साध्य करायचे कसे? सोपे आहे, मुलात आपल्याला साध्य करायचे कि नाही एवढेच आधी ठरवावे लागते. त्यावरच ’हो’ कि ’नाही’ असा काथ्याकुट करण्यात जे मुर्ख वेळ दडवतात ते कोणत्याच निष्कर्षावर कधी येत नाहीत. पर्यायी ते होते तेथेच राहतात. काळ बदलला असला तरी मानवाच्या मुलभुत गरजांत बदल झालेला नाही. त्या गरजा हेरा आणि आधुनिकतेची जोड देत लहान मोठे व्यवसाय सुरु करा.
यावर विस्ताराने लिहिण्यासारखे खुप आहे पण येथे थोडक्यात मांडनी करतो.
धनगरांना मेंढरं घेत गांवगन्ना न फिरता थोडासा आधुनिक तंत्रद्न्यानाचा व व्यवस्थापनाचा मार्ग स्वीकारला तर आहे त्याच पुरातन धंद्यात राहुनच अफाट प्रगती साधता येवु शकते. मानवजात या भुतलावर आहे तोवर हा उद्योग जीवंत राहणार आहे. दलालांच्या नादी न लागता व्यवस्थापन सुधरवा, मी खात्रीने सांगतो, गांव सोडुन कोणी बाहेर पडणार नाही. यासाठी नाबार्डच्या अनेक योजना आहेत, पण त्याचे लाभार्थी धनगर नाहीत एवढेच! तुमचेच धंदे अन्य भांडवलदार बळकावत चालले आहेत, त्याचे भान कधी येणार? किती माळी आज फुलोत्पादनात आहेत आणि निर्यात करताहेत? किती माळ्यांनी ग्रीनहाउसेस टाकली आहेत? का? कोणी अडवले आहे काय?
हीच बाब शिंप्यांपासुन ते सोनारांना समजावुन घ्यावी लागणार आहे. जे धंदे औद्योगिकरणामुळे डुबलेले आहेत त्या जातींना आता नवीन व्यवसायांत घुसावे लागणार आहे. मग ते सेवा व्यवसाय असोत कि लघु ते मध्यम उत्पादन व्यवसाय. अन्न प्रक्रिया उद्योगाला भारतात आजही पराकोटीचा वाव आहे. अमेरिकेतील लोक येथे फुड्माल्स काढतात, आणि त्यांचे पदार्थ विकतात, तुम्हाला आपलीच खाद्य संस्क्रुती भांडवल म्हणुन मिलालेली असुनही त्यावर धन कमवायचा विचार डोक्यात का घुसत नाही? भाज्या-फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग तर आजही भारतात अल्पांशाने आहेत. अब्जावधी रुपयांचा शेतमाल दरवर्षी वाया जातो. गांवोगांवी त्यावर निर्जलीकरणाचे प्रकल्प काढता येवु शकतात. निर्यात करता येवू शकते. त्यासाठीसुद्धा सरकारी वित्तसहाय्याच्या योजना आहेत. त्यांचा लाभ घेत अर्थोन्नती कधी साधणार? चोरडियांनी लोणच्याचा उद्योग काढला. आज ते खुप मोठे झाले. घरोघर लोणची बनवणारे आज त्यांची व इतरांची लोणची विकत घेतात. तुम्हाला कोणी अडवले आहे?
हीच बाब अनेक जीवनोपयोगी वस्तु निर्मिती व सेवांबाबत राबवता येवू शकते. पण धैर्य हवे. श्रीमंत व्हायचा हव्यास हवा. पैसा हे तुमच्या लायकीचे एक प्रतीक आहे. तुमच्याकडे पैसा कमवण्याची अक्कल नसेल तर तुम्ही नालायक आहात असेच सरळ समजुन चाला.
सरकारी नोक-या हे एक म्रुगजळ आहे. प्रा. हरी नरके याबाबत नेहमीच उद्वेगाने बोलतात. केंद्रीय मंत्रालयांतील वरिष्ठ अधिका-यांत (जवळपास ७००० पैकी) फक्त २ ओबीसी आहेत, ही बाब शरम वाटण्यासारखी नाही कि काय? ज्यांची उद्यमशीलतेची मानसिकता नाही त्यांना नोक-या हाच पर्याय आहे. पण सरकार वर्षानुवर्षे ओबीसींचा कोटाच भरत नाही. त्याविरुद्ध आंदोलन करायला, रस्त्यावर उतरायला कोणी अडवले आहे कि काय? तुमचे न्याय्य हक्क तुम्हालाच मिळवण्याचा प्रयत्न करता येत नसेल, किमान स्वार्थासाठी का होईना संघटीत होता येत नसेल तर तुम्ही नालायक आहात असेच म्हणने क्रमप्राप्त आहे.
खाजगी विद्यापीठे हा एक भयंकर सैतान आता आपल्या डोक्यावर बसु घातलाय. खरे तर शिक्षण-आरोग्यसेवा ही जबाबदारी सरकारचीच आहे. ही जबाबदारी सरकार खाजगी क्षेत्राकडे ढकलत आहे. मग आम्ही कर तरी मग का भरावा? शेतसाराही का द्यावा? खाजगीकरण कोठे असावे आणि कोठे नसावे याची अक्कल ज्या सरकारकडे नाही त्यांनी लोकशाहीचे व संसदेचे गुणगान गावु नये. यामुळे कोट्यावधी लोक उच्च शिक्षणापासुन वंचित राहु शकतात हे वास्तव ध्यानात घ्यावे लागेल. खाजगी विद्यापीठ विधेयक लाथाडावेच लागनार आहे. अन्यथा पुर्ण असहकार पुकारावा लागेल. ती हिम्मत सर्वांना कंबर कसुन बांधावीच लागणार आहे, नाहीतर अर्थक्रांती सोडा द्न्यानक्रांतीही घडु शकणार नाही.
प्रत्येक उच्चवर्णीय जात ही स्वत:चे हित पाहण्यासाठी कटिबद्ध आहे व ते आपला अजेंडा लपवतही नाहीत. मग तुम्हालाच तुमचा अजेंडा लपवण्याची वा त्याबाबत उदासीन राहण्याची गरजच काय? "हे विश्वची माझे घर" हे ठीक आहे, पण ते तुमचेही असले तर पाहिजे कि नको? ज्या घरात तुम्हाला प्रवेशच नाही, तुमची कसलीही मालकीच नाही, अधिकारच नाही, तर या वल्गना करु नका. स्वत:चे घर निर्माण करा, मग हवे तर त्यात सर्वांना स्थान द्या!

तुम्हाला ते अशक्य नाही कारण पुरातन कालापासुन ते करुन दाखवलेच आहे. आता मनावर जमलेली पराभुततेची राख झटका आणि कंबर कसुन नवी अर्थसत्ता, द्न्यानसत्ता बना. मग नवी संस्क्रुती आपोआप निर्माण होईल. यातच देशाचे व सर्व समाजाचे हित आहे हे कदापि विसरु नका.

No comments:

Post a Comment