http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-dr-narendra-dabholkar-4355629-NOR.html दिव्य मराठी.....डॉ. विवेक कोरडे | Aug 24, 2013, 00:40AM IST
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्याच पुरोगामी विचारप्रवाहाला फॅसिस्टांनी दिलेले आव्हान आहे. गेली 25 वर्षे विज्ञाननिष्ठा या एकाच अहिंसक हत्याराने डॉ. दाभोलकर अंधश्रद्धेविरोधात लढत होते. त्यांचे हे कार्य समतेसाठी आणि न्यायासाठीचा ज्ञानयज्ञ होता. तो थांबवण्याचा प्रयत्न फॅसिस्टांनी त्यांची हत्या करून केला आहे. म्हणूनच हा ज्ञानयज्ञ पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सर्व विज्ञाननिष्ठांनी घेणे आता भाग आहे. फॅसिस्ट प्रवृत्तींविरुद्धच्या संघर्षात डॉ. दाभोलकरांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही, हे नक्की.
बुवाबाजी, जादूटोणा, भानामती, करणी अशा असंख्य दुष्ट प्रवृत्तींविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून एक प्रदीर्घ आणि महाराष्ट्रव्यापी लढा उभारणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत होते. पलीकडचा कुठल्याही भाषेचा वापर करो, डॉक्टरांनी संयम आणि सभ्यतेच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत. त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांना उत्तरे देतानाही त्यांचा संयम कधी ढळला नाही. अत्यंत संयमित भाषेत, पण निर्भीड आणि स्पष्ट शब्दांत आपला विचार मांडण्याची विलक्षण हातोटी डॉ. दाभोलकरांच्या वक्तृत्वात होती.
अन्य पुरोगामी चळवळींबाबत आणि त्यातील कार्यकर्त्यांबाबत आस्था बाळगणे, हा डॉ. दाभोलकरांचा आणखी एक मोठा गुण होता. साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला चळवळीशी बांधून घेते, तेव्हा ती अन्य चळवळींबाबत उदासीन बनते. परंतु दाभोलकर तसे बनले नाहीत. उलट अगदी लहानातल्या लहान चळवळीला आणि कार्यकर्त्याला प्रोत्साहन द्यायचा त्यांचा स्वभाव होता. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचाच्या स्थापनेनंतर मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बैठकांच्या निमित्ताने जात असे. 2004 किंवा 2005 साल असावे. जालन्याच्या आमच्या एका मित्राने तेथील कृषी विकास केंद्रात बैठकीचे आयोजन केले होते. त्याच दिवशी डॉ. दाभोलकरही एका कार्यक्रमानिमित्ताने जालन्यात आले होते. त्यांना जेव्हा शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचाच्या बैठकीसंदर्भात समजले, तेव्हा ते वेळात वेळ काढून बैठकीच्या ठिकाणी आले.
बैठकीत एका कार्यकर्त्यासारखे वागले आणि शेवटी मला म्हणाले की, तुम्ही एका महत्त्वाच्या विषयावर काम करायला सुरुवात केली आहे. हे करताना तुम्ही ज्या ज्या बैठका घ्याल आणि कार्यक्रम कराल त्यांचा वृत्तांत वर्तमानपत्रांना आवर्जून पाठवत राहा. छापणं न छापणं त्यांच्या हातात आहे, पण पाठवणं आपलं काम आहे आणि त्यानेच आपण लोकांपर्यंत पोहोचू. तसेच तुमचे कार्य अहवाल ‘साधना’कडे जरूर पाठवत राहा. अत्यंत साधेपणाने त्यांनी मला तो सल्ला दिला. दुस-याच्या कार्याबद्दलही त्यांना आत्मीयता होती.
डॉ. दाभोलकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना अनुयायी नको होते, त्यांना कार्यकर्ते हवे होते. प्रत्येक कार्यकर्त्याला विशिष्ट प्रश्न केवळ समजलेला नसावा, तर त्याला लोकांनाही तो समजावता आला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. दोन वर्षांपूर्वी मुंबईत आझाद मैदानात जादूटोणाविरोधी विधेयकासाठी धरणे आंदोलन होते. डॉ. जेव्हा मंचावर आले तेव्हा ते भाषण करतील, असे वाटले. पण त्यांनी कार्यकर्त्यांना या विधेयकाबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली व ब-याच कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती नाही, असे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा एखाद्या कुशल शिक्षकासारखा पाठच घेऊन जादूटोणाविरोधी विधेयकाचा आजवरचा प्रवास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्याकडून पुन:पुन्हा वदवून घेतला. स्वत:ही कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायचे आणि अन्य कार्यकर्त्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण करायचा, ही त्यांची कार्यपद्धती होती.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असे म्हणण्याची एक औपचारिकता असते. डॉ. दाभोळकरांच्या बाबतीत ही औपचारिकता नसून ती वस्तुस्थिती आहे. कारण डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला, गेली दोन-तीन वर्षे तर डॉक्टर दाभोलकर संघटनेचे केवळ मार्गदर्शक म्हणूनच राहिले होते. बाकी सर्व जबाबदा-या त्यांनी अविनाश पाटील व अन्य तरुण कार्यकर्त्यांवर सोपवल्या होत्या आणि ते त्या समर्थपणे पार पाडत होते. त्यांचे गावागावातले कार्यकर्ते केवळ ठरवून दिलेले कार्य
करतात असे नव्हे, तर स्वयंप्रेरणेने नवे कार्य शोधून काढतात व आपल्या अनुभवांच्या आधारावर लिखाण करतात, पुस्तके लिहितात, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे वेगळेपण आहे. म्हणूनच डॉक्टर दाभोलकरांचे कार्य पुढेही जोमाने सुरू राहणार आहे.
फॅसिस्टांच्या नीचपणाचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे; पण केवळ तसा निषेध करून आपली जबाबदारी संपणार नाही. म्हणून समाजातल्या सर्व पुरोगामी चळवळी आणि त्यातल्या कार्यकर्त्यांमागे ठामपणे उभे राहणे हे उदारमतवाद, स्वातंत्र्य आणि सेक्युलॅरिझमवर श्रद्धा असणा-या जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे आणि फॅसिस्ट प्रवृत्तींना पायबंद घालण्याचा तो प्रभावी मार्ग आहे. तसे करणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली असेल.

No comments:
Post a Comment