Wednesday, 7 August 2013

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (११)

संजय सोनवणी, http://sanjaysonawani.blogspot.in

जातिअंताच्या दिशेने आपण जाणारच!



मित्रहो, आपण "पाळेमुळे" मधुन काही जातींचा इतिहास पाहिला तसेच जातिसंस्थेचाही इतिहास पहात तिच्या आजच्या भिषण वास्तवापर्यंत  प्रवासही केला. गेल्या दिडशे वर्षांत जातिसंस्थेच्या उगमाबाबतचे समाजशास्त्रज्ञांचे आकलन वंशवादाच्या व ब्राह्मणी उपपत्तीच्या चुकीच्या आधारावर झाल्याने जातिसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण निकोप न बनता ते अधिकाधिक दुषितच होत गेला असल्याचे चित्रही आपण पाहिले आहे. जातीसंस्थेच्या उगमाबद्दलच संभ्रम असल्याने जातिनिर्मुलनाचे सर्व उपायही निरर्थक ठरले आहेत व त्याला आरक्षणही कसे हातभार लावत आहे हेही आपण पाहिले. असो.

प्रत्येक जातीघटकाचा भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्था घडवण्यात सारखाच व मोलाचा वाटा आहे हे आपण काही जातींचा इतिहास समजावून घेतांना पाहिले आहे. खरे तर भारतात निर्माण करणारा व सेवा देणारा हे दोनच घटक होते व आजही आहेत. कुणबी, लोहार ते ढोरापर्यंत वस्तु-निर्मिती करणारे घटक जसे होते तसेच धार्मिक, व्यापारी, दळणवळणादि ते प्रशासकीय, सैनिकी सेवा देणारे घटकही होते. एकमेकांच्या सहास्तित्वाखेरीज एकही समाजघटक जगु शकला नसता. किंबहुना समाजच अस्तित्वात आला नसता. परंतू आम्ही वर्चस्वतावादी भावनांचे बळी ठरलो. भाकडकथांच्या निर्मित्या करुन आपापला जातिश्रेष्ठत्वतावाद वाढवत गेलो. पुर्वी म्हटल्याप्रमाणे एकाच राष्ट्राला अनेक राष्ट्रांत विखंडित करत गेलो. आमची जुनी ग्रामाधारित अर्थव्यवस्था औद्योगिकरणामुळे मोडीत निघाली. आम्ही नव्या विश्वाशी जुळवून घेत नवनिर्मितीच्या मागे लागत कालसुसंगत परंतू आमच्या मनोवृत्तीशी नाळ जोडणारी नवी अर्थव्यवस्था बनवण्याऐवजी सर्वस्वी परकीय व म्हणुण सहजी अनुकरणास अयोग्य अशा अर्थव्यवस्थेच्या दु:ष्चक्रात अडकुन बसलो. आज आम्ही एकविसाव्या शतकात आलो आहोत पण तरीही आमचा संभ्रम संपलेला नाही.

जातिप्रणित उद्योग राहिले नाहीत कि सेवा. ती अर्थव्यवस्था राहिली नाही कि समाजव्यवस्था. पण जात मात्र आम्ही नुसते जपुन बसलोत असे नाही तर त्या बेड्या जास्त घट्ट करत चाललो आहोत असे विदारक चित्र आपल्या लक्षात येईल. आज जिचे औचित्य उरलेले नाही, स्थान उरलेले नाही तरीही आम्हाला जात महत्वाची वाटु लागलीय कारण जात हीच आम्हाला आमच्या अस्मितेची महत्वाची खुण वाटतेय. जातीमुळे आपल्याला पटकन एकत्र येता येईल, जातीमुळे सामाजिक संरक्षण मिळेल व आपल्या अधिकारासाठी भांडता येईल ही भावना वाढीला लागलीय. राजकीय सत्ताही विशिष्ट जातींच्या हातात केंद्रीभुत झाल्याने या प्रक्रियेला कधी नव्हे तेवढी गती मिळाली हेही वास्तव नजरेआड करुन चालत नाही. आपल्यावर अन्याय होतो आहे, आपल्याला व्यवस्थेत डावलले जाते आहे आणि त्यामुळे आपले भवितव्य धोक्यात आहे अशा प्रकारची असुरक्षिततेची भावना तीव्र होतांना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच जात हे आता रक्षणाचे व सुरक्षिततेचे एक साधन बनले आहे असे विदारक समाजचित्रही आपल्याला दिसेल.

जातीच्या निर्मितीची मुळ कारणे बाजुला पडुन नवीन व्यवस्थेत स्थान मिळवण्यासाठी जात हा एक मानसिक आधार बनणे हे कोणत्याही समाजाला खरे तर भुषणावह नाही. परंतू आपणच व्यवस्था अशा पद्धतीने विकराळ बनवली आहे कि प्रत्येक जात दुस-या जातीकडे संशयाने पाहते. अर्थव्यवस्थेच्या विनाशक परिस्थितीतुन जन्माधारित जातिसंस्था बळकट कशी बनली हे आपण पाहिले. आजही स्थिती बदललेली नाही. अर्थव्यवस्थेने सर्वव्यापी स्वरुप कधी धारण केलेच नाही वा तसे घडावे व सर्वच समाजघटक अर्थव्यवस्थेचे लाभार्थी बनावेत व साधनसामग्रीचे न्याय्य वाटप व्हावे व पुनर्निर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेलेच नाहीत.

असुरक्षिततेची भावना ही मानवी मानसशस्त्रातील सर्वात विनाशकारी भावना मानली जाते. या असुरक्षिततेच्या भावनेतून आज एकही जातिघटक सुटलेला नसल्याचे आपल्या सहज लक्षात येईल. आज जागतिकीकरणामुळे व काही प्रमाणात का होईना शिक्षण सर्वच जातीघटकांत पसरल्याने सर्वच समुदायांच्या आशा-आकांक्षा अणि अपेक्षांमद्ध्ये वाढ झालेली आहे. त्या प्रमाणात त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न होत नसल्याने व ग्रास-रुट स्तरापासूनच प्रगतीच्या संध्या उपलब्ध नसल्याने एकंदरीत व्यवस्थेतच आपण दुर्लक्षित बनलो आहोत अशी भावना प्रत्येक जातिघटकाची बनली असल्यास नवल नाही. जागतिकीकरणाने ब्रिटिशकाळात जेवढे रोजगार हिरावुन घेतले त्यापेक्षा जास्त प्रमाणात आज लोकांच्या तोंडचा घास विकासाच्या नांवाखाली हिरावला जातो आहे. उदा. चरावू कुरणांची धुळधान करत राजरोस लुट केल्याने आज मेंढपाळ-पशुपालकांचा पारंपारिक उद्योग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे अनेक समाजघटकांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपले रक्षण व हित जातच करेल, कारण किमान जातीसाठी तरी संघटित होता येते अशी भावना बळावत असेल तर त्याबाबत दोष व्यवस्थेलाच द्यावा लागतो.

असे असले तरी या असुरक्षिततेच्याच जाणीवेतुन एकत्र येण्याच्या गरजेपोटी अजून एक नवीन अभिसरण घडुन येत आहे. ते म्हणजे पोटजातींचे एकत्र येत आपापसातील बेटीबंदी तोडण्याचे प्रयत्न. आज धनगर, कोष्टी, शिंपी आदि जाती पोटजातींचे एकत्रीकरण करत व्यापक ऐक्य साधण्याच्या प्रयत्नांत दिसून येतात. एका अर्थाने ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे कारण जाती तोडण्याची पहिली पायरी म्हणुन आपण पोटजाती तोडण्याच्या प्रयत्नांकडे पाहू शकतो.

भारतात आज साडेसहा हजार जाती आहेत. एकाच जातीला प्रादेशिक भाषाभेदांमुळे देशभर अनेक वेगळी नांवे पडलेली आहेत. उदाहरणार्थ एकाच धनगर जातीला पाल, धनगड, कुरुब अशी जवळपास पंचेचाळीस वेगळी नांवे आहेत. ब्राह्मण समाजातच साडेपाचशे पोटजाती आहेत! खरा विचार केला व भाषाभेदामुळे निर्माण झालेले अंतर मिटवले तर देशात केवळ शंभरेकच जाती अस्तित्वात आहेत हे लक्षात येईल. जर पोटजातींप्रमानेच भाषाभेदामुळे निर्माण झालेले पोटभेदही मिटवता आले तर आजचे साडेसहा हजार जाती-पोटजातीत वातले गेलेले तुकडे शंभरेक घटकांतच विभाजित होतील. यामुळे एक व्यापक ऐक्य साधून येउन त्यातून नवसमाजरचना अस्तित्वात यायला मदत होईल. आज धनगर बांधव राष्ट्रीय पातळीवर सर्व भेद तोडत एकत्र येण्याच्या प्रक्रियेत आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण समाजही आता एकत्र होण्याच्या प्रक्रियेत सामील झाला आहे. अशा प्रयत्नांना सर्वांनीच नुसते समर्थन दिले पाहिजे असे नव्हे तर स्वत:ही आपापल्या जातीसंदर्भात असे प्रयत्नही करणे आवश्यक आहे.

सत्तेत प्रतिनिधित्व ही सर्वच समाजघटकांची रास्त अपेक्षा आहे. प्रत्येक समाजघटकाने ऐतिहासिक काळापासून आपापले बहुमोल योगदान समाजाला दिलेले आहे. समाज हे एक यंत्राप्रमाणे असते. प्रत्येक पार्ट नीट चालला तर समाजयंत्र ठाकठीक चालणार आहे. त्यामुळे केवळ जातिअंतर्गतचे ऐक्यच पुरेसे असू शकत नाही. अनेक जातींचे अनेक प्रश्न समान आहेत. परंपराही समान आहेत. स्वत:चेच नव्हेत तर अन्य जातियांचेही प्रश्न आपलेच आहेत असे मानण्याकडे वाढता कल असने अधिक हिताचे ठरेल. आज जातींची संख्या एवढी आहे कि अनेकांना अनेक जातींच्या अस्तित्वाची साधी खबरही नसते. गोवारी नांवाची जात आहे हे नागपुरला झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राला समजले. कलाल जातीबद्दलही असेच घोर अज्ञान असते. जातीनिर्मुलनाच्या दिशेने जायचे तर जमतील तेवढ्या जातींना समजावून घेत, त्यांचा पुरातन इतिहास समजावून घेत परस्परांबद्दल आदर कसा वाढेल याकडे समाजधुरिणांना पुढे लक्ष द्यावे लागनार आहे. त्यासाठी एकमेकांच्या जातीइतिहासाचे लेखन केले तर ते अधिक संयुक्तिक आणि स्वागतार्ह ठरेल. अर्थात द्वेषमुलक लेखन हे त्याज्ज्य असले पाहिजे.

अलीकडे महाराष्ट्रात ब्राह्मण द्वेषाची लाट आली होती. सर्वच सामाजिक दोषांचे पाप ब्राह्मणांवर फोडुन आपल्या वर्तमानाचे समर्थन करता येत नाही याचे भान सुजाण लोकांना असले पाहिजे. इतिहासाची निकोप चिकित्सा केली तरच ती सर्वांनाच स्वीकारार्ह असते. किमान इतिहासाच्या बाबतीत तरी कोनताही जातिविशिष्ट दृष्टीकोण हा घातकच ठरेल याचे भान सर्वच समाजघटकांनी ठेवले पाहिजे. त्याच वेळीस पुर्वास्पृष्य समाजांकडे पाहण्याचा आपला दुषित दृष्टीकोण बदलण्याचे आव्हानही सर्वांसमोर आहे. द्वेषाच्या पायावर आजतागायत कोनतीही संस्कृती उभी राहू शकलेली नाही, ती उध्वस्तच झालेली आहे हा जागतिक संस्कृत्यांच्या पतनांच्या इतिहासावरुन तरी आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही समाजघतकाचा सर्वस्वी द्वेष करणे हा समाजद्रोहच आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

पोटजातींचे तरी विसर्जन करत भाषाभेदामुळे निर्माण झालेला प्रादेशिक जातीभेद मिटवत तरी आम्ही साडेसहा हजार जाती शंभरेकवर आणु शकलो तर मला वाटते ते एक मोठे सामाजिक यश असनार आहे. आज काही जातींनी त्या दिशेने पावले उचललेली आहेत. सर्वांनीच ती उचलावीत अशी अपेक्षा आहे. यातून आपल्या समाजाचे व्यापक हितच होईल आणि खरा व संपुर्ण जातीअंत याच प्रक्रियेतून घडुन येईल याबद्दल मला शंका नाही.

ही लेखमालिका लिहिणे एकार्थाने आव्हान होते. पुर्वसुरीच्या समाजशास्त्रज्ञांनी मांडलेल्या जातिउत्पत्तीच्या प्रमेयांना मला नवीन पुराव्यांच्या आधारावर छेद द्यावा लागला ते काहींना खटकले असले तरी ज्ञान असेच टप्प्याटप्प्याने पुढे जात असते. पुर्वसुरींनी जी कामगिरी करुन ठेवली त्याबद्दल मला नितांत आदरच आहे. माझे सिद्धांतही पुढे नवीन पुरावे समोर आले तर छेदले जातील याचे मला भान आहे आणि त्याचे स्वागतही आहे. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नावरील माझे लेखन प्रसिद्ध केले याबद्दल मी नवशक्तीचा, त्याच्या संपादकांचा नितांत आभारी आहे. आणि वाचकांनी वेळोवेळी मला प्रतिसाद देवून प्रोत्साहन दिले, अनेक मुद्दे सुचवले याबद्दल मी वाचकांचाही आभारी आहे.
"सर्वेपि सुखिन: संतु: सर्व संतु: निरामया:"

(समाप्त)
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

No comments:

Post a Comment