संजय सोनवणी,
भारतीय इतिहासात अनेक कुट प्रश्न आहेत. हा संपुर्ण देश कधीही एक भाषित, एकछत्री राजवटीखालचा देश नव्हता. पुराश्मकाळापर्यंत या देशातुन असंख्य मानवी टोळ्यांची निर्गमने झाली तशीच आगमनेही. सिंधु संस्कृतीच्या काळात जसा कृषिमानव स्थिरावला, नगररचना करुन रहायला लागला तेंव्हा आपापल्या टोळीच्या शेतीच्या, निवासाच्या व चरावू कुरणांच्या कायमस्वरुपी व्यवस्थेसाठी जमीनीवरील मालकी हक्काची पद्धत रुढ होवू लागली. थोडक्यात पुर्वी जिला काहीएक वस्तुमुल्य नव्हते, भावनिक गुंतागुंतही नव्हती तिला मुल्यही आले व तिच्यातील भावनिक गुंतवणुकही अपरिहार्य झाली. स्त्रीवरील सत्ता व कृषिसत्ता यांत आंतरिक संबंध आहे असे मानवशास्त्र मानते. तत्पुर्वी स्त्रीसत्ता होती, पुरुषसत्ता नव्हे. एकार्थाने मानवी समाजजीवनाचे भावविश्वच या सामाजिक क्रांतीने पुरेपुर बदलवुन टाकले.
स्थिर समाजात अनेक घटक समाजरचनेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात...आहे त्याच समाजातुन ते निवडले जातात. मग रक्षक असो कि पुरोहित. कुंभार असो कि गवंडी. हे एक प्रकारे प्राथमिक कार्यविभाजन असते.
म्हणजे ही तशी अत्यंत सोपी, सैल आणि प्रवाही संरचना असते. टोळी मानव हा नगरमानव बनलेला असतो. काही टोळ्या अद्यापही भटकेपणाच्या उर्मितुन बाहेर पडलेल्या नसतात. काही टोळ्या वन्य जीवनातील साधेपनातच दंग राहतात व नागर समाजापासुन शक्यतो फटकुन दुर रहात असतात. मानवी इतिहासाच्या प्रदिर्घ इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते कि एकही मनुष्य आपला आदिम पुर्वज नेमका कोणत्या भुमीवरचा हे कधीही सांगु शकत नाही. मनुष्य थोडाफार स्थिरावयाला लागला तेच मुळात फारफार तर ७-८ हजार वर्षांपुर्वी. असे असले तरी अनेक टोळ्या वा कुटुंबे अन्यत्र जात होती, अन्यत्रहून येथे येतच होती. आक्रमकही येत होते तसे येथीलही बाहेर चालुन जात होतेच. आजभर जगभरही ही प्रक्रिया चालुच आहे. असे असतांनाही आर्य वंश ही संकल्पना असो कि मुलनिवासी ही मुळातच वंशशास्त्रानेच बाद केली असली तरी तो आजच्या वर्तमानाताही एक कोलाहल माजवणारा विषय बनतो हे आश्चर्य करण्यासारखेच आहे.
डा. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी त्यांच्या अलीकडच्याच "थोडं डावं...थोडं उजवं" या चिंतनशील पुस्तकात एक महत्वाचे विधान केले आहे व ते म्हणजे "जातीव्यवस्था मोडली पाहिजे. आणि ती संपवायची असेल तर पूर्वअट म्हणुन आधी ती कशी निर्माण झाली हे शोधले पाहिजे." दत्तप्रसाद दाभोळकरांचे म्हणने अत्यंत तथ्यपुर्वक आहे व ते अत्यंत गांभिर्याने घेतले पाहिजे. शरद पाटीलांनीही त्याच अंगाने अभ्यास केला होता हेही खरे आहे. पण जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे काही पुरावे फारतर पुरातन वाड्मयात मिळतात पण जातीव्यवस्था नेमकी कशी व का निर्माण झाली याचे उत्तर मिळत नाही. खुद्द वर्णव्यवस्थेच्या निर्मितीबद्दलचे सूक्त जेथे प्रक्षिप्त आहे, बनावट आहे व अनैसर्गिक व कोणत्याही तर्कावर सहज अमान्य होण्यासारखे आहे तरीही तिचा अद्भुत पगडा मनमानसावर बसतो, तर मग ज्या व्यवस्थेचा उगमच माहित नाही तिचा पगडा वर्णव्यवस्थेपेक्षाही बळकट असावा याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. त्यात जातीव्यवस्था ईश्वर्प्रणित असल्याचे विधान मात्र कोठेही मिळत नाही, तरीही ती वर्णव्यवस्थेलाही गिळंकृत करुन बसते हे एक वास्तव लक्षात घ्यायला हवे.
श्रेष्ठत्वतावादाचा नियम खालुन वर गेला कि वरुन खाली आला कि सुरुवातीला समांतर झिरपत राहिला? खरे तर तो अत्यंत आरंभबिंदुला, म्हनजे समाजरचना बीजरुपात असतांना तो समांतरच झिरपत गेला असणे अधिक संयुक्तिक आहे. कारण राजव्यवस्था अद्याप आली नव्हती कि कर्मकांडेही अत्यल्प असल्याने पुरोहितशाहीचीही गरज नव्हती. याचा अर्थ असा नव्हे कि आदिम स्वरुपातील अशी कोणतीच मुलभुत समाव्यवस्था नव्हती. पण ती माहात्म्य उत्त्पन्न व्हावे एवढी सबलही बनलेली नव्हती. मग असे काय झाले कि सनपुर्व ४-५ हजार वर्षांपुर्वीची समाजव्यवस्था सनपुर्व १००० पर्यंत क्रमश: वर्णव्यवस्थेला स्वीकारत गेली? जातीव्यवस्था आधीची कि वर्णव्यवस्था आधीची? जातीसमुह वर्णांत विभक्त झाले कि वर्णांतुन जाती निर्माण झाल्या? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे खरे तर आपणास माहित हवीत परंतु भारतीय संस्कृतीतिहास ज्या दृष्टीकोनातुन तपासला जायला हवा तसा तो न गेल्याने अनेक कूटप्रश्न निर्माण झालेले आहेत.
आपण नेहमी हे विसरतो कि भारतात सिंधुकाळी दोन स्वतंत्र धर्म समांतरपणे नांदत होते. एक पुरातन मुर्ती/प्रतिमापुजकांचा आदिमकालापासुन चालत आलेला धर्म तर दुसरा उत्तरकालीन अग्नीभोवती कर्मकांड गुंफलेला वैदिक धर्म. या काळात पुरोहित दोन्ही धर्मात होते व स्वतंत्र होते. ब्राह्मण म्हणजे तेवढे वैदिक असे तेंव्हा काही नव्हते. अवैदिक संस्कृतीच्या मुर्तिपुजक समाजाचेही ब्राह्मण होते. तर्कतीर्थांनी "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात याबाबतचे भरपूर पुरावे दिले आहेत. वैदिक व्यवस्थेत वर्णव्यवस्था होती...तर मग शैवप्रधान मुर्तिपुजकांच्या समाजव्यवस्थेचे अंग नेमके काय होते?
जातीव्यवस्था हे वैदिक व्यवस्थेचे अंग असल्याचे पुरावे मिळत नाहीत. ऋग्वेदात वर्णांचा अस्पष्ट का होईना संकेत आहे, पण जातींचा नाही. वैदिक साहित्यात पुढे वर्णव्यवस्था कठोर झाली पण तरीही जातींचे उल्लेख येत नाहीत. व्यवसायजनक अनेक उल्लेख येतात पण ते जातीवाचक नाहीत. महाभारतही याला अपवाद नाही. इस. दुस-या शतकातील मनुस्मृतीत व किंचित तत्पुर्वीच्या वसिष्ठसंहितेत मात्र प्रथमच जातींचा उल्लेख येतो.
मग जाती कोठुन आल्या? जाती मुळच्या व्यवसायोद्भव आहेत हे उघड आहे. त्यामुळे धर्मामुळे जाती निर्माण झाल्या या म्हनण्यात तथ्य नाही. धर्माचा जातीव्यवस्थेला कसलाही पाठिंबा नाही. जातीविषयक इतिहास पहायला गेले तर अनेक वास्तव तथ्ये समोर येतात.
येथे हेही लक्षात घ्यावे लागते कि मुळात जाती अत्यल्प होत्या. पाथरवट, कुंभार, सुतार, लोहार, कलाल, सुवर्णकार अशा काही आदिम काळातच जन्माला आलेल्या जाती होत. व्यवसाय/उद्योग जसे विस्तारत गेले तसतशी जातीनिर्मितीही होत गेली. ही निर्मिती एखाद्या भागापुरती मर्यादित न रहाता देशव्याप्त झाली.
वर्ण आणि जातींमधील नेमके अंतर व साम्य आधी वर्तमानकालीन स्थितीत समजावुन घ्यायला हवे.
१. सुरुवातीला वर्ण व्यवस्था ही सैल असून वर्णांतर सहजी करता येत असे. जातीव्यवस्थाही पुरातन काळी अत्यंत सैल असून कोणीही कोणताही व्यवसाय (जात) स्वीकारु शकत असे.
२. वर्ण हे इश्वरनिर्मित आहेत अशी पुरुषसूक्तप्रणित घोषणा आहे. जातीव्यवस्था मात्र सर्वस्वी समाजनिर्मित आहे. कारण तिच्या निर्मितीबाबत कसलीही धार्मिक उद्घोषना नाही.
३. परंतु वर्णांची ईश्वरप्रणित रचना हेच मुळात मित्थक आहे. त्याला खरे तर कसलेही वैदिक पावित्र्य नाही, कारण ते बनावटपणे उत्तरकालात कोणीतरी घुसवले आहे.
४. वर्णलोप होवू शकतो. परंतु जातीलोप मात्र कधीही होत नाही. उदा. कलियुगात क्षत्रीय व वैश्य हे वर्ण अस्तित्वात नाहीत.
५. प्रत्येक जात स्वयंप्रेरणेने आपण कोणत्या ना कोणत्या उच्चवर्णीय मुळाचेच आहोत असे मानत असते, मग त्याला समाज मान्यता असो अथवा नसो.
६. सर्व जाती चार वर्णांत विभागल्या गेलेल्या नाहीत. अवर्ण जातींची संख्याही मोठी आहे. वर्ण व्यवस्थेनुसार पाचवा वर्ण अस्तित्वात नाही आणि दोन वर्ण तर नष्ट झालेले आहेत. मग या अवर्ण जातींच्या निर्मितीची सांगड कशी घालायची?
या वरील अल्प विवेचनावरुन लक्षात येईल कि मुळात जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत. कारण त्या दोन विभिन्न धर्मरचनांतुन आलेल्या आहेत. वर्ण व्यवस्था ही वैदिक धर्माची निर्मिती आहे तर जातीव्यवस्था ही अवैदिक समाजाची देणगी आहे. अवैदिक समाजाची व्यापकता आणि विशिष्ट जीवनशैली यातून जाती बनत गेल्या. अवैदिक संस्कृतीस प्राय: शैव असूर संस्कृती म्हटले जाते. वैदिक समाज हा तुलनेने छोटा असल्याने आधी तीन व नंतर चार वर्णांत अशी समाजविभागणी करता येणे त्यांना सुलभ होते. वैदिकांचा भुगोलही सरस्वती नदीच्या खो-यापर्यंत मर्यादित होता. तसे अवैदिक असूर संस्कृतीचे नव्हते. हा समाज सर्वत्रच खंडप्राय प्रदेशात विखुरलेला होता. भारतीय उपखंड हा अवैदिक प्रतिमा/मुर्तींनी प्राचीन कालापासुन व्यापुन उरलेला आहे. म्हणजेच मुर्तीपुजकांचे प्राबल्यही जास्त होते. या सर्व देवता-परिवाराची अत्यंत कुशल अशी सांगड एकच एक शिव-शक्ति या सर्वोच्च प्रतीकांशी घालत एक अद्भुत सांस्कृतिक क्रांती घडवत या खंडप्राय देशाला एकाकार आकार मिळाला, मग भाषा, वंश, व्यवसाय काहीही असो. आदिम शैव धर्माचा हा विराट विस्तार होता व आजही तोच हिंदु धर्माचे मुख्य अंग आहे.
वैदिक धर्माने वर्णव्यवस्था बनवण्यापुर्वीच जाती संस्था निर्माण झाली होती असे म्हणता येते. डा. इरावती कर्वेंच्या मतेही वैदिक धर्मियांनी अवैदिक समाजांकडुन स्वीकारल्या. वंशशुद्धतेच्या भावनेतुन जातीसंस्था निर्माण झाली हे प्रा. धुर्येंचे मत आता कालबाह्य झालेले आहे. जातीसंस्था ही पुरातन असून वर्णव्यवस्था नंतरची आहे हेही आपण पाहिले.
मग आता प्रश्न असा येतो कि वर्ण आणि जाती या दोन लागणी भारतीय समाजाला एकत्रीतपणे कधी ग्रासू लागल्या.
भारतात दोन प्राचीन धर्म होते हे आपण पाहिले. वैदिक व अवैदिक. एक यज्ञीय तर दुसरा शैव. आता आपण या दोन्ही धर्मांना एकत्रीतपणे हिंदू असे संबोधतो. कालौघात वैदिक-शैवांचे मिश्रण जसे होवू लागले तसा शैवांनी चातुर्वर्ण्य स्वीकारला तशी वैदिकांनी जातीव्यवस्थाही स्वीकारली. ही सामाजिक साहचर्याची, एकत्रीतपनाच्या भावनेतुन सुरुवातीला सुरु झालेली प्रक्रिया असु शकते. हे होण्यामागचे एक ऐतिहासिक कारण म्हणजे खर्चिक, वेळखाऊ व किचकट बनल्याने यज्ञसंस्थाच दुस-या शतकापर्यंत लोप पावली. थोडक्यात वैदिक धर्माचे कर्मकांडच अत्यंत मर्यादेच्या आत व अपवादात्मक बनले. त्यामुळे वैदिक अमृर्त देवतांपेक्षा वैदिक समाजाला मुर्तीपुजकांची/शैवांची प्रतीकपूजा सुलभ वाटु लागली असावी. हे स्वाभाविक आहे. हे संम्मिश्रण नेमके कधी सुरु झाले असावे? ज्या काळात राजे मंदिरेही बांधत, यञही करवून घेत...अगदी विहार वा जैन मंदिरांनाही उदार मदत करत असत त्या काळात. म्हनजे इसपू सहावे ते इस्च्या दुस-या शतकाच्या काळात. धर्म कोणताही असो, पुरातन कालापासून आपल्या देशाच्या जनमानसाचा गाभा हा सहीष्णु राहिलेला आहे. म्हणजे धर्मा-धर्मांत युद्धे झाली नाहीत असे नाही परंतु त्यात पाशवी हिंसकता दिसून येत नाही.
पण या संमिलनामुळे वर्ण-व जातीव्यवस्थांचेही संम्मिश्रण झाले असे मान्य केले तरी जातीव्यवस्थेच्या उगमाचा मूळ प्रश्न सुटत नाही हे उघड आहे. डा. इरावती कर्वे यांच्या म्हनण्यानुसार प्राचीन जमातींपासुन (अथवा टोळ्यां) जातीव्यवस्था बनली हे मत मान्य करता येण्यासारखे नाही. याचा एकच पुरावा येथे देतो तो म्हणजे "अहिर" या पुरातन जमातीतील लोक सोनार, शिंपी, आगरी, कोळी, लोहार, धनगर, गवळी अशा अनेक जातींत विखुरले आहेत. म्हनजेच एकाच पुरातन जमातीतील लोक जसे अनेक व्यवसायांत शिरले ते त्या त्या जातीचे बनले असे दिसते. नुसते जातीचे नव्हे तर पोटजातीचे. अशी अनेक उदाहरणे घेता येतील, पण येथे एवढे पुरे. मुळचे एकाच जमातीतील असुनही त्यांच्यात बेटीव्यवहार होत नाही, ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी.
अजून एक महत्वाची बाब आपण येथे लक्षात घ्यायला हवी. पहिली बाब म्हनजे जाती अपरिवर्तनीय आहेत व होत्या ही बाब खरी नाही. इतिहासात अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. रथकार, सूत, मागध, बंदी, आयोगव, धिग्वन अशा अनेक जाती, त्यांचे व्यवसायच लोप पावल्याने नष्ट झालेल्या दिसतात. त्याच वेळीस जसजसे नवे व्यवसाय पुढे आले, सेवा पुढे आल्या तसतशा नवीन जाती व पोटजातीही निर्माण होत आलेल्या आहेत. ही प्रक्रिया दहाव्या-अकराव्या शतकापर्यंत सुरु राहिलेली दिसते. जातीबदलही होत होता याचेही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरनार्थ नंपुतीरी ब्राह्मण अथवा कोकणस्थ ब्राह्मण हे मुळचे ब्राह्मण नव्हेत. अन्य जातींतुन त्यांचे जात्युंतर झालेले आहे. ज्ञातिप्रमुखाला धन देवूनही जात बदलता येत असे.
म्हणजे जातीलोप होणे, नवीन जाती बनणे वा जातीबदल करणे ही जी एक गतीशीलता होती जी समाजाच्या प्रवाहमानतेशी जुळुन होती असे म्हनता येते. कोणतीही जात सर्वस्वी आभाळातुन पडत नसते. म्हणजे आहे त्याच समाजातील काही कुशल घटक ती सेवा द्यायला वेगळे होतात. त्यांची जात बनते हे आपले सामाजिक वास्तव होते. पण दहाव्या शतकानंतर पोटजाती वाढल्या असल्या तरी जातींत अपवादात्मक घटना सोडल्या तर त्यांत भर पडलेली नाही. एखादी जात संपुर्णपणे लोप पावल्याचीही उदाहरणे आढळुन येत नाहीत, जशी आधीच्या काळात दिसून येतात. . थोडक्यात जन्मसिद्ध जातीव्यवस्थेचा अवलंब भारतीय समाजाने उत्तरकालातच केलेला दिसतो.
व्यवसायनिहाय सामाजिक विभागण्या होणे जगभर घडले आहे. पण तेथे जन्माधारित जातीव्यवस्था नाही. भारतातच अशी व्यवस्था का आणि ती कशी निर्माण झाली असावी यावर येथे एक हायपोथिसिस मांडायचा प्रयत्न करायचा आहे.
धर्मशास्त्रांनी जातीप्रथा आणल्या व निरंकुशपणे व अन्याय्यपद्धतीने राबवल्या हा आम्हा पुरोगाम्यांचा लाडका तर्क व आरोप असतो. आरोप मांडणे बहुजनप्रिय करण्यात मोठा हातभार लावत असते हे खरे असले तरी या आरोपामुळे जातीव्यवस्थेच्या निर्मितीचे कोडे उलगडता आलेले नाही व ब्राह्मणी व्यवस्थेला जबाबदार धरत एकांगी संशोधन केले तर उलगडा होणारही नाही हेही तेवढेच खरे आहे. शृद्र म्हनजे आर्यांनी/आक्रमकांनी हरवलेल्या एतद्देशिय जमाती होत्या हेही मत कोणत्याही पुराव्याच्या आधारावर टिकत नाही, कारण आर्य आक्रमण सिद्धांत मोडीत निघाला आहे. डा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "Whatever the degree of conflict, it was not a conflict of race. It was a conflict which had arisen on account of difference of religions. That this conflict was religious and not racial is evidenced by the Reg Veda itself." (BAWS Vol. 7)
म्हणजेच शुद्र या हरलेल्या जमाती होत्या आणि त्यांच्यातुनच वैदिक आर्यांनी शुद्र जाती निर्माण केल्या हे मत टिकत नाही. म्हणजे जित विरुद्ध पराजित हे कारण जातीव्यवस्थेच्या निर्मितीमागे देता येत नाही. आणि हा दोन धर्मियांतील युद्धातुन निर्माण होनारी परिस्थिती जेंव्हा असते तेंव्हा जित धर्मीय पराजित धर्मियांचे धार्मिक अस्तित्व संपवून टाकत असतात, प्रतीके, पुजास्थाने नष्ट करत असतात. पण असेही भारतात घडलेले दिसत नाही. म्हणजे मग हा संघर्ष नेमक्या कोणत्या तीव्रतेचा होता? हा रक्तरंजित, खुनशी, धर्मप्रसारासाठीचा संघर्ष होता असे म्हणता येत नाही. सुर-असुरांच्या युद्धांतुन अशा संघर्षाची मित्थके शोधली गेलेली आहेत. सुर हे यज्ञधर्मी तर असुर हे शिवसंस्कृतीचे लोक असे ढोबळमानाने विभाजन केले जाते. त्यांच्यातील संघर्षाच्या अनेक पौराणिक कथा येतात. त्यांत कधी सुरांचे तर कधी असुरांचे पराभव झाल्याचे दिसते. पण अंतत: सुरांचाच पराभव झाल्याचे दिसते कारण यज्ञसंस्कृती पुर्णपणे लोप पावली तर असुरांची शैवप्रधान संस्कृती अव्याहत टिकून राहिली.
मग पराजय कोणाचा झाला?
उलट कालौघात वैदिक धर्मीय शैव धारेत आपले काही वैदिक संस्कार कायम ठेवत मिळुन-मिसळुन गेले. अनुकरणाच्या भावनेतून शैव ब्राह्मणांनीही ते संस्कार उचलले. वैदिक ब्राहमणही त्याच वेळेस जातिव्यवस्थेचे एक भाग बनले व जातीची उतरंड आपापल्या पोटजातींतही पाळु लागले. त्यामुळेही एक वर्णीय म्हणूनची समता किमान ब्राह्मनांत तरी दिसायला हवी ती तशी दिसत नाही. शोषनासाठी ब्राह्मनांनी जाती बनवल्या नाहीत हेही उघड आहे. पुरोहित या नात्याने त्यांनी जातीव्यवस्था नसती तरी धार्मिक शोषण केलेच असते. त्यासाठी त्यांना एवढ्या गुंतागुंतीची सामाजिक संरचना करण्याची गरज नव्हती. आणि करण्याचा प्रयत्न केला असता तर सर्व समाजाने व राजसत्तांनीही ती स्वीकारली नसती. धर्मसत्तेचे शोषण हा येथे अत्यंत वेगळा विषय आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेच्या निर्मितीची कारणे अन्यत्रच शोधणे भाग आहे.
येथे आपल्याला खालील अंगांनी यासंदर्भात विचार करायचा आहे.
१. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?
२. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?
३. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?
४. जातिव्यवस्था समाज-मानसशास्त्र प्रणित?
५. जातिव्यवस्था राज्यशास्त्र प्रणित?
६. जातिव्यवस्था संरक्षणात्मक व्य़ुहरचनाप्रणित?
या व अशा अजून काही तदनुषंगिक उद्भवू शकणा-या प्रश्नांवर व त्यांच्या परस्परावलंबित्वाच्या वाट्यावर चर्चा करुन आपण जातिसंस्थेच्या निर्मितीची मूळ कारणे शोधण्याचा प्रयत्न करु शकु. हिंदू धर्म हा दोन धर्मांच्या संमिश्रणातून बनलेला आहे हे वास्तव लक्षात ठेवावे व या चर्चेत व्यापक भाग घ्यावा ही नेहमीप्रमाणेच विनंती.
No comments:
Post a Comment