Monday, 26 August 2013

विवेकी कार्यकर्ता...Pushpa Bhave, Kalamnaama

.Pushpa Bhave,

By  on August 25, 2013
0
feature size
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी युवक चळवळीतून आलेले कार्यकर्ते. डॉ. दाभोलकर हे एकाचवेळी समाजवादी चळवळीशी संलग्न असले तरी स्वतःच्या नव्या नव्या वाटा, चळवळीच्या नवीन नवीन दिशा शोधत राहिले. त्यातलं एक सूत्र नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलनाचं होतं. देवदासी जटा निर्मूलन परिषद निपाणीला घेऊन त्यांनी एका जटिल प्रश्नाला हात घातला आणि हळूहळू अंधश्रद्धांचा कावेबाज बाजार करणार्या अनेक बाबा-बुवा-बाया यांचा दंभस्फोट केला. दाभोलकरांमध्ये उपजतच संघटना कौशल्य असल्याने तरुण मुलंमुली हा या चळवळीचा नवा चेहरा होता. अंधश्रद्धाविरोधी चळवळीची बांधणी करत असताना महाविद्यालयं, विद्यापीठं प्रसंगी कुलगुरूही त्यांनी या चळवळीच्या प्रवाहात आणले.
ही चळवळ विवेकाची असल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करणारं लेखन दाभोलकरांनी सातत्याने केलं. या लिखाणाला डॉ. दाभोलकरांच्या विवेकी व्यक्तिमत्त्वामुळे तार्किक युक्तिवादाचं परिणामकारक स्वरूप आलं. चळवळीच्या विविध दिशांनी लोकांकडे जाण्याच्या प्रयत्नांविषयी ते जागृत असत. त्यामुळे परिषदा, प्रात्याक्षिकं – ज्याला ते ‘भांडाफोड’ म्हणत, कधी समाजातील नामवंत, विचारवंत, कलाकार यांना सहभागी करून घेत, कधी आंतरजातीय विवाहासारखे उपक्रम सातत्याने सुरू ठेवत. दुसर्या बाजूला त्यांनी प्रस्थापित व्यवस्थांकडे कधी पाठ फिरवली नाही. त्यामुळे कुलगुरूंशी बोलून विवेक वाहिनीसारख्या महाविद्यालयीन उपक्रमांना कुलगुरूंची मान्यता आणणं अथवा शासनाशी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक यावं म्हणून विचारविनिमय करणं हे त्यांनी अथकपणे केलं. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या रूपाने महाराष्ट्रातील वाचकांशी सतत संवाद साधला.
हे सारं कार्य करतानाच दुसर्या बाजूला डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या समविचारी सहृदयांबरोबर सामाजिक कृतज्ञता निधी हा प्रकल्प उभारून गेली २५ वर्षं तो यशस्वीपणे चालवला. लग्नाची बेडी या नाटकाचे नामवंत कलाकारांनी केलेले २५ प्रयोग, त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत महाराष्ट्रभर निधी संकलनाची केलेली मोहीम म्हणजे त्यांच्या नेटक्या कार्यप्रणालीचंच उदाहरण होय.
समाजवादी चळवळ, सेवा दल यांचा अनेक वर्षं संपर्क होताच पण ‘साधना’ साप्ताहिकाची धुरा प्रा. वसंत बापटांनंतर त्यांनी खांद्यावर घेतली. त्यांच्या कारकिर्दितील ‘साधना’त राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, तिचं विस्तारित गेलेलं वर्तुळ, तरुण संपादकांवर जबाबदारी टाकून साधनेला ताजेपणा देण्याचा प्रयत्न आणि या सार्याला डॉक्टरांच्या लोकसंपर्कामुळे आर्थिक बळ ही लाभलं.
डॉक्टरांचा दिवस किती तासांचा असतो? अशी विचारणा अनेकदा होत असते. पण दिवस, महिन्यातला वेळ अत्यंत काटेकोरपणे वापरणं ही त्यांची खासियत. विवेकी स्वभावाच्या माणसाला आपल्या हातातला वेळ विवेकानेच वापरता आला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. सामाजिक कृतज्ञता निधीचं कार्य करताना निधीप्राप्त कार्यकर्त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण कसं मिळेल आणि त्यांचं दैनंदिन जीवन स्वस्थ कसं राहिल याची ते सतत काळजी घेत. नुकत्याच जुलैमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत सर्व कार्यकर्त्यांचा विमा उतरवण्याचा उपक्रमही ‘साकृनि’मध्ये सुरू केला होता. डॉ. दाभोलकरांवर आजवर वेगळ्या प्रकारचे अनेक छोटे मोठे हल्ले झाले. त्यांच्याविषयी असत्य प्रचार करण्यात आला. पण त्यांची मनःशांती कधी ढळत नसे. कोणत्याही पातळीवरच्या विरोधकांशी विचारविनिमय करायला त्यांची तयारी असे आणि तसा अवधीही ते देत असत. आपल्या महाविद्यालयीन जीवनात खिलाडी असणार्या दाभोलकरांनी आपल्याला होणारा विरोधही तसाच खिलाडीपणे घेतला. अशा विवेकी सामाजिक कार्यकर्त्याला, त्याला संपवण्यासाठी पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्रात हल्ला व्हावा ही घटनाच लांच्छनास्पद आहे. धर्मांध, जात्यांध शक्तिंची अरेरावी महाराष्ट्रात वाढत चालल्याचं हे लक्षण आहे. गोळ्या घालून विचार थांबवता येत नाही, हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर गेले तरीही विवेकाची, सामाजिक न्यायाची चळवळ सुरूच राहील.
निर्ममवृत्तीने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्याला आमची आदरांजली!
- प्रा. पुष्पा भा

No comments:

Post a Comment