दिव्य मराठी | Aug 21, 2013, 00:07AM IST
सन 19९८ च्या मे महिन्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि जयदेव डोळे या दोघांकडे ‘साधना’च्या संपादकपदाची जबाबदारी एकत्रितपणे देण्यात आली. पाच-सहा महिन्यांतच डोळे ‘साधना’तून बाहेर पडले आणि ‘साधना’चा डोलारा अखेरपर्यंत डॉ. दाभोलकरांनी सांभाळला. तत्पूर्वी ही जबाबदारी ग. प्र. प्रधान मास्तर आणि वसंत बापट या दोघांवर होती. ज्या वैरभावनेने डॉ. दाभोलकरांना संपवले, नेमकी तीच वैरभावना मिटवून टाकण्याचा मनोदय त्यांनी त्यांच्या ‘साधना’तल्या पहिल्याच ‘संपादकीया’त कळकळीने व्यक्त केला होता. त्यांचे 2 मे 1998 रोजी ‘साधना’त प्रसिद्ध झालेले पहिले संपादकीय संक्षेपात येथे देत आहोत.
साधनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या अंकापासून आम्ही संपादक म्हणून जबाबदारी घेत आहोत. पूज्य साने गुरुजी, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथजी, वसंत बापट, प्रधान सर, नानासाहेब गोरे यांसारखे संपादक आणि संपादक मंडळातून या कामाला हातभार लागलेले मंगेश पाडगावकर, सदानंद वर्दे, दुर्गा भागवत, भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे, अनिल अवचट, मधू वाणी, जवाहर कोटेचा, सुनीती जोशी, कुमुद करकरे आदींच्या गौरवास्पद वारशाच्या आठवणीने मन नतमस्तक झाले नाही तरच नवल! हा वारसा सांभाळण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. छोटे आहोत याचे भान आहे. मोठ्या खुर्चीत बसत आहोत याची जाण आहे. प्रयत्नांत कसूर करणार नाही याची आण मनात पक्की घेतली आहे.
ज्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांनी साधनेचे संपादक पद स्वीकारले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक उत्कट पैलू होते; परंतु कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एकेठिकाणी लिहिल्याप्रमाणे जीवनाला अनेक छोटे-मोठे आधार असतात. मात्र, त्या सर्वांपलीकडे एक असतो मूलाधार, त्याबाबत तडजोड संभवत नाही. कारण तो अस्तित्वाचेच अधिष्ठान असतो. भारताच्या राष्ट्रनिर्मितीसाठी हा मूलाधार काय असेल याची स्पष्ट कल्पना पूज्य साने गुरुजींच्या 15 ऑगस्ट 1948 च्या साधनेच्या पहिल्या संपादकीयामध्ये दिसते.
विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, असे त्यांनी लिहिले आहे. या ध्येयासाठीची नैतिक तळमळ ‘साधना’ निर्माण करेल, असा त्यांना विश्वास वाटतो. त्यांच्यानंतर सूत्रे आली आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन यांच्याकडे. ‘गुरुजींची साधना महाराष्ट्राची होवो’ असे शीर्षकच त्यांनी आपल्या पहिल्या संपादकीयाला दिले आहे. सत्याग्रही, लोकशाही, समाजवाद या ध्येयाबद्दल ज्यांना आत्मीयता वाटते त्या सर्वांची साधना बनली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या मते लोकशाही समाजवाद ही एक सांस्कृतिक क्रांती आहे. त्या क्रांतीला सामाजिक, राजकीय, आर्थिक अंगही आहे. महात्मा गांधींनी जी दृष्टी दिली त्यामुळे सत्याग्रही साधनाने भारतीय समाजवाद आणता येईल, असे त्यांना वाटत होते. जवळजवळ अर्धशतकपूर्व आपल्या पहिल्या संपादकीयात या संपादकद्वयांनी व्यक्त केलेली भावना अशी आहे. ‘आपल्या हाती असेल ती सत्ता कायम ठेवणे किंवा नसेल तर काबीज करणे एवढेच राजकीय पक्षाचे कार्य आहे, असे पक्ष मानू लागले आहेत. यामुळे सत्तेचे राजकारण बळावून विधायक व सहकारी वृत्तीचा लोप होतो. असे झाले तर अत्याचार, हुकूमशाही व अराजक निर्माण होईल. असे होऊ नये म्हणून सत्याग्रही अधिष्ठान दृढमूल केले पाहिजे व समाजात, जगात तिसरी शक्ती निर्माण केली पाहिजे’ ही विचारसरणी अनेकदा मांडली जाते. यापुढील कालखंडात ‘साधने’च्या संपादनाचे हेच सूत्र राहिले आहे, असे आम्हाला आढळते. 15 आॅगस्ट 1980 रोजी आपले पहिले संपादकीय लिहिताना ना. ग. गोरे यांनी त्यांचे सारतत्त्व सांगितले आहे. ते असे की, ‘प्रबोधन, रचना, संघर्ष या मार्गांनी सुबुद्ध, संघटित व सक्रिय लोकशक्ती निर्माण करण्याची गरज आहे.’ साधनेचा वारसा हा असा आहे.
हे कार्य करण्याची कधी नव्हती एवढी निकड आज निर्माण झाली आहे, हे साधनेच्या सुज्ञ वाचकांना वेगळे सांगावयास नकोच. जी विषमता संपवण्यासाठी ‘साधने’चा आरंभ गुरुजींनी केला ती विषमता आज झोडपणा-या पावसासारखी अंगावर कोसळत आहे. आलिशान बंगले, भपकेबाज गाड्या, महागडी वेशभूषा आणि चंगळवादी संस्कृतीची सर्वांगांनी उमललेली (अव)लक्षणे समाजात पावलापावलावर आपला टेंभा मिरवीत आहेत. त्याबद्दल घृणा, संताप, तर सोडाच; पण सुप्त आकर्षण जनमानसात पद्धतशीरपणे पसरवले जात आहे. कोणत्याही मार्गाने स्वत:चाच विकास साधण्यात गैर ते काय? आणि आजच्या स्पर्धात्मक युगात ते अटळच नाही का? असा मतलबी युक्तिवाद पुढे केला जातो. याविरोधात ज्यांनी लढावयाचे त्यांची ताकद रोजच्या जीवनसंघर्षात एवढी आटून जाते की लढाईचे बळ उरत नाही. लढून उपयोग काय, हे असेच चालणार, आपण आपल्यापुरते बघावे, असा विचार मग लढण्याची गरज असलेल्या अनेकांच्या मनालाही घेरून टाकतो आणि हा तर फक्त विषमतेचा आर्थिक पैलू झाला. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक बाजूंचा विचार केला तर विषमतेचा रावण केवढे विकट हास्य करतो आहे, हे समजते. समतेच्या लढाया चालूच नाहीत, असा याचा अर्थ नाही. जिवाच्या आकांताने तो संगर मांडलेली मंडळी आहेत, थोडी आहेत, विखुरलेली आहेत, दुर्बल आहेत; पण तरीही जिद्दीने पाय रोवून उभी आहेत. हेच आशास्थान आहे. ‘साधना’ या सर्वांचा आवाज बुलंद करू इच्छिते, उत्साह वाढवू इच्छिते.
वैरभाव संपवणे हे गुरुजींचे ‘साधना’ निर्मितीचे दुसरे प्रयोजन होते. विषमता टिकवण्यासाठी, वाढीसाठी विवेक संपवावा लागतो आणि विवेक संपवावयाचा यासाठी वैरभाव वाढवावा लागतो. समाजहितासाठी व विषमता संपवण्यासाठी कोणते संघर्ष इष्ट आणि कोणते अनिष्ट याची निवड करावी लागेल. भारतामध्ये धर्माधर्मात आणि जातीजातीत जोपासला जाणारा वैरभाव हा पूर्णत: घातक आहे, असे आम्हाला वाटते. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे बालबोध वाटणारे गुरुजींचे वचन आणि सद्सद्विवेकाची जोपासना आज कधी नव्हे एवढी आवश्यक बनली आहे. वारसाहक्काने आलेला हा वसा आम्ही स्वीकारला आहे. अगदी कळकळीने आवाहन करतो, हा वारसा सांभाळण्यासाठी आणि वसा जोपासण्यासाठी आपले हजारो हात आम्हाला हवे आहेत. विषमता आणि वैरभावना मिटवण्याची झुंज साधनेच्या पानापानातून आणि त्या आधारे मनामनातून पोहोचवण्याची उमेद बाळगून आहोत.

No comments:
Post a Comment