Monday, 26 August 2013

विवेकाच्या वाटेवर असहिष्णूतेचे काटे

http://prahaar.in/collag/127530

 | 

विवेकाच्या वाटेवर असहिष्णूतेचे काटे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या विचारी, विवेकी आणि विद्वान व्यक्तीची गोळ्या घालून हत्या होणे ही सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद घटना होय. आपले अवघे आयुष्य अंधश्रद्धा आणि मनोविकारांविरोधात जनजागृती करण्यात खर्ची घालणारे डॉ. दाभोलकर म्हणजे अत्यंत नि:स्वार्थी आणि निरलस व्यक्तिमत्त्व. कुणाला त्यांचे विचार मान्य नसणे, हे आपण समजू शकतो, पण त्यांचे जगणे अमान्य करणे म्हणजे पाशवी क्रूरता. ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर डॉ. आठवले यांनी एक लेखलिहिला, त्यात हिंदू धर्माचा अभिमान बाळगणा-या या आठवले यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन, ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच’ असे विधान केले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र संतप्त झालेला असताना डॉ. आठवले मात्र, ‘आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू, ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपाच होय,’ असे बिनधास्त विधान करतात, याला काय म्हणावे?
शेतकरी संघटनेचे शरद जोशी १९८६ मध्ये आजारी पडले होते. त्या वेळी मोहन गुंजाळ या लढाऊ कार्यकर्त्यांने आपल्या नेत्याने विश्रांती घ्यावी, अशी ‘ताकीद’ देणारे पत्र लिहिले होते. त्या प्रेमळ दटावणीने भारावलेल्या जोशी यांनी, मोहनदादाला लिहिलेले पत्र मला डॉ. आठवले यांच्या लेखामुळे आठवले. जोशी लिहितात, ‘जनसामान्यांच्या बाजूने लढणा-या लोकांच्या प्रकृतीवर एवढा परिणाम होणे हा काय शाप आहे? लोकांवर अत्याचार करणारा औरंगजेब दीर्घायुषी आणि लोकांसाठी लढणारा शिवाजी पन्नाशीत जातो, माधवराव पेशवे अल्पायुषीच. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजबिंडयांना हा काहीच त्रास होताना दिसत नाही, हा काय दैवी कोप आहे?
मला वाटते हे अपरिहार्य आहे. ‘पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’मध्ये ऑस्कर वाइल्ड काय म्हणतो, ‘कोणताही बुद्धिवान पाहा, कलावंत पाहा, त्याचे कपाळ पुढे आलेले, नाक वाकडे. जेथे जेथे बुद्धीचा, कलेचा नवनवोन्मेष आहे, तेथे तेथे हिडीसता, कुरूपता आहे. कारण विचार वेदनामय आहे. पिळवटून टाकणारा आहे. तेथे एखादा धर्मगुरू बघा. त्याचा चेहरा कसा सौम्य, प्रसन्न आणि हसरा असतो. कारण लहानपणी ज्या प्रार्थना, मंत्र तो शिकलेला असतो, त्याचे आयुष्यभर पठण करणे एवढेच त्याचे काम, मग त्याच्या चेह-यावर वेदना उमटण्याची शक्यताच काय?’ शरद जोशी यांचे हे म्हणणे डॉ. आठवले यांच्या विकृत कृतीला पुरेसे लागू पडते. डॉ. दाभोलकर यांनी आयुष्यभर दु:खी, वंचितांच्या, वेदनांना आत्मस्वर दिला होता. म्हणून त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अवघा महाराष्ट्र कळवळला, दु:खी झाला. एखाद्याची गोळी मारून हत्या होणे, ही जर डॉ. आठवले यांच्या मते ‘दैवी कृपा’ असेल तर आम्हाला त्या ‘देवा’पासून आणि त्याच्या भक्तांपासून जपून राहिले पाहिजे.

No comments:

Post a Comment