By कलमनामा on August 25, 2013
डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखी व्यक्ती जाणं ही मुळात एकतर समाजाचं खूप मोठं नुकसान करणारी घटना आहे. पण खून करणार्याला असं वाटत असतं की आपण अशा व्यक्तिला मारून विजय मिळवलाय. मात्र ते खोटं असतं. कारण ती व्यक्ती मरत असते तिचे विचार मरत नसतात. उलट दाभोलकरांसारख्या व्यक्तिंना मारल्यानंतर त्यांचे विचार अधिक बळकट होत जातात. लोक स्वतःहून त्यांच्या विचारांची जिम्मेदारी घेऊ लागतात. शिवाजी मंदिरासमोर झालेल्या निषेध मोर्च्यातही हीच गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. नाटक, सिनेमा क्षेत्रातील कलावंत, साहित्यिक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी या निषेध मोर्च्यात सहभागी होऊन डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकासाठी झटत होते ते विधेयक आता मंजूर करूनच घ्यायचं हा निर्धार या सर्व क्षेत्रातील लोकांनी केलाय. यामुळेच मला असं वाटतं की, माणूस जाण्याने समाजाचं नुकसान होतं हे खरंय पण त्यांच्या अशाप्रकारे जाण्याने लोक त्यांच्या विचारांचा वसा उचलतात. ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानतो. ज्या प्रकाराचा भ्याड हल्ला डॉ. दाभोलकरांवर झालाय. तसे भ्याड हल्ले या देशात सतत सुरूच आहेत. अगदी महात्मा गांधीजींपासून हे भ्याड हल्ले आपण पाहत आलो आहोत. पण आजही असे भ्याड हल्ले करणार्यांना अपयशालाच सामोरं जावं लागतंय आणि इथून पुढच्या काळातही अशा लोकांना अपयशच मिळत राहील याबाबत माझ्या मनात अजिबातच शंका नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकाचा आग्रह धरत होते. त्या विधेयकाबाबत महाराष्ट्र सरकार कमालीचं उदासिन आहे, याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाहीये. याचं कारण म्हणजे, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात हे विधेयक आणलं जायचं नि त्यावर ठोस कोणताही निर्णय न होता ते सातत्याने लांबवलं गेलं. कुठल्या तरी एखाद्या अधिवेशनात त्या विधेयकाबाबत आशेचा किरण दिसायचा पण तो क्षणातच विझायचा. याचंही कारण उघड आहे. कारण, कोणताही मुद्दा लांबवत नेण्याची आपल्या सत्ताधार्यांची ही जुनीच सवय आहे.पण आता हे चालणार नाही. आम्ही कलावंत, साहित्यिक मंडळी आता विधेयकाविषयीच्या सरकारच्या या टोलवाटोलवीच्या भूमिकेला विरोध करणारच. सर्व कलावंतांनी तसा आग्रहच धरला आहे.
डॉ. दाभोलकरांचं ‘साधना’मधील कामही त्यांच्या एकूण कार्याइतकंच मोलाचं आणि महत्त्वपूर्ण आहे, असं मला वाटतं. साने गुरुजींनी जी गोष्ट रुजवून ठेवली होती ती गोष्ट ‘साधना’ने महाराष्ट्रभर पेरली. हे विचार पेरण्याचं मोठं कामही दाभोलकरांनी तितक्याचे निष्ठेने केलं. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचं ‘साधना’ हे एकमेव मुखपत्र आहे. ज्याच्याशी महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारांची माणसं जोडली गेली आहेत. डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या सार्या सहकार्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणांची एक मोठी फळी उभारली होती. या कामातही साधनाचा मोठा सहभाग आहे. आमच्यासारख्या कलावंतांची, समाजप्रबोधनाचं कार्य करणार्या प्रत्येकाची ‘साधना’ने कायमच मोठ्या आस्थेने दखल घेतलेली आहे. असं काम करणार्यांना ‘साधना’च्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहनच मिळालेलं आहे. ‘साधना’च्या माध्यमातून हे सारं काम करण्यातही डॉ. दाभोलकरांनी मोलाचं योगदान दिलंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आणि माझा नेहमीच संबंध येत नसे. पण जेव्हा कधी आम्ही भेटायचो तेव्हा माझ्यासाठी तो एक अनुभव असायचा. कारण ते आपण करत असलेल्या कामाची नेहमी माहिती ठेवत असत. आणि आपण त्यांना भेटलो की त्या कामासंदर्भात चर्चा करत असत. पाठिंबा देत असत. मग मी केलेलं नाटक असो किंवा सिनेमा ते आवर्जून पाहायचे आणि प्रतिक्रिया द्यायचे. महाराष्ट्रात अशाप्रकारे पाठिंबा देणारे जे चार चेहरे आठवता येतील त्यातील एक चेहरा दाभोलकरांचा आहे. आज तोच चेहरा हरपलाय. अगदी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी त्यांना आमच्या ‘सांगड’च्या कार्यक्रमासाठी मेसेज केला होता. त्यात मी त्यांच्या ‘सांगड’साठी काही तारखा मागितल्या होत्या. पण दाभोलकरांच्या त्या तारखा आधीच गेल्या होत्या. त्यांनी मला तसं मेसेज करून सांगितलंही. पण त्याचवेळेस त्यांनी जे काही सांगितलं ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘तू मागत असलेल्या माझ्या तारखा आधीच गेल्या आहेत. त्या तारखा कशा नि कुठे कुठे गेल्या आहेत त्याविषयीची माहिती मी तुला दिलेली आहे. मात्र असं असलं तरीही आपले कार्यकर्ते तिकडे आहेत. ते तुला सर्व प्रकारची मदत करतील. तू त्यांच्याशी संपर्क साध. तू ‘सांगड’च्या माध्यमातून करत असलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे.’
डॉ. दाभोलकर कायमच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारे पाठिंबा देत असत. आता इथून पुढचा संपूर्ण प्रवास डॉक्टरांनी दिलेल्या विचारांची कास धरून करावा लागणार आहे. त्यामुळे नुसते कलावंत, साहित्यिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं हे नुकसान आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे हे विचार कायम जिवंत ठेवत ठेवू याविषयी माझ्या मनात काहीच शंका नाहीये.
No comments:
Post a Comment