By संदीप चव्हाण on August 25, 2013
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या… मंगळवारची सकाळच उजाडली ती या ब्रेक्रिंग न्यूजने… अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी केलेलं कार्य अवघ्या देशानं गौरवलं. अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते संस्थापक सदस्य… समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अवघं आयुष्य वेचलं. त्यांचा विचार संपवता येत नाही म्हणून त्यांनाच संपवण्याचा घाट घातला गेला. पण माणूस संपवून त्याचा विचार संपत नाही. विचाराला विचारानेच उत्तर द्यावं लागतं. दाभोलकरांचा हा विचार महाराष्ट्राने पहिल्यांदा अनुभवला तो खेळाच्या मैदानात. महाराष्ट्रातील खेळाच्या मैदानातील त्यांचं योगदान आजच्या पिढीतील फारच कमी जणांना माहीत असेल. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू… महाराष्ट्राचे व्हाईस कॅप्टन… बांग्लादेशविरुद्धच्या कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेले मुंबई-पुण्या बाहेरचे पहिले कबड्डीपटू… कबड्डीतील संघटन कौशल्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च अशा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मनित… कबड्डीतील बोनस लाइनसाठी आग्रही मांडणी करणारा खंदा प्रशासक, ‘माणूस’ साप्ताहिकातून आपल्या लेखाद्वारे अनेक खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा देणारे क्रीडा समीक्षक… क्रीडा क्षेत्रातील अशा अनेक नाना विविध भूमिका डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी भूषवल्या होत्या. नुसत्या भूषवल्याच नाहीत तर त्या अभिमानाने मिरवल्या आणि सीमारेषेबाहेर राहून प्रसंगी त्यापासून अलिप्तपणाही दाखवला. खेळाडूपेक्षा खेळ मोठा… खेळातील सचोटी जपण्यासाठी त्यांनी आपलं अवघं आयुष्य खर्ची घातलं. ते सर्वत्र होते आणि कुठेही नव्हते. मनात आणलं असतं तर त्यांनी कबड्डीतील संघटनेचं मानाचं पद सहज भूषवलं असतं, तेवढा त्यांचा वकूब होता पण जाणिवपूर्वक ते त्यापासून दूर राहिले. नव्यांना संधी हेच दाभोलकरांचं कायम ध्येय राहिलं.
त्यांच्या या ध्येयवादातून सातार-सांगलीकडे कबड्डीची एक नवी पिढी घडली. सातर्यातील श्री शिवाजी उदय मंडळ संस्था ही त्यांच्या या कार्याची आजही साक्ष देतेय. या संस्थेची भव्य वास्तू उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम सातारकर कधीच विसरूशकणार नाहीत.
कबड्डीतील पहिला अर्जुन पुरस्कार ज्या सदा शेट्ये यांना मिळाला त्यांची दाभोलकरांवरची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. सदा शेट्ये म्हणतात, ‘खेळात हारजीत ही असतेच, पण त्या पलीकडेही खेळाकडे सचोटीने पाहण्यास नरेंद्र दाभोलकर यांनी शिकवलं. त्यांच्यासारख्या व्यक्तिने ‘माणूस’ साप्ताहिकात माझ्यावर लिहिलेला लेख हा मी माझा बहुमान समजतो. नरेंद्र दाभोलकर म्हणजे कबड्डीतील सचोटी…’ हे सांगताना सदा शेट्ये यांचे पाणावलेले डोळे नरेंद्र दाभोलकरांच्या खेळातील योगदानाची साक्ष देत होते…
नरेंद्र दाभोलकरांचं सगळ्यात मोठं योगदान जर क्रीडा क्षेत्रात काय असेल तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. खेळातील अपप्रथा दूर करण्यासाठी ते झटले. अवघा महाराष्ट्र त्यांना यासाठी सदैव ओळखत राहील.
नरेंद्र दाभोलकरांसारखी व्यक्तिमत्त्व मरत नसतात. ते प्रत्येक विचारागणिक कायम जिवंत असतात. आपल्यात… तुमच्यात… आपणा सगळ्यांत… आपल्यातील नरेंद्र दाभोलकर आपण मरून देता कामा नये हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कबड्डीत बोनस लाइनची सुरुवात करण्यासाठी दाभोलकरांनी अथक प्रयत्न केले… महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे त्यांना विरोध झाला. त्यांचा पहिल्यापासून कबड्डीतील संथ खेळाला विरोध होता. कबड्डी अधिक वेगवान होण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कबड्डी लोकप्रिय होण्यासाठी त्यात रोमांच आला पाहिजे ही दाभोलकरांची भूमिका. कबड्डीतील सावध खेळाला पर्याय म्हणून त्यांनी बोनस लाइनचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील निराशावादी दृष्टिकोनानंतर त्यांनी अखेर बडोदा गाठलं. तिथे त्यांनी वाळुंज यांच्याशी संपर्क साधला… आणि कबड्डीतील बोनसलाइनला अखेर मूर्त स्वरूप आलं…
No comments:
Post a Comment