By हरी नरके on August 25, 2013
नरुभाऊंचा स्वभाव अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणं केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपलं म्हणणं अत्यंत विनयपूर्वक, युक्तिवादाच्या आधारे मांडत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारं, सुन्न करणारं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असं वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. श्याम मानव यांच्यासोबत काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. गेली १८ वर्षं राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावं म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रुंनी ही हत्या केली असावी असं वाटतं. गेली अनेक वर्षं ते ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवं कसदार रूप प्राप्त करून दिलं. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते या चळवळीचे जणू प्रतीकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत. नरुभाऊ हे मुळात सातार्यातील एक नामवंत डॉक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्यात आणून सामाजिक कामात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. समतावादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणं त्यांना शक्य झालं नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. १९८२ साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षं काम केलं. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वतः नरुभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असं नरुभाऊंनी सुचवलं. अवघ्या दोन दिवसांत हे करायचं होतं. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नि नाही दिली काय, काय फरक पडतो? असं त्यांचं मत होतं. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकित झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरुभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केलं. तो साधना उत्तम चालवत आहे.
नरुभाऊ तत्त्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तिंशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्हा सांभाळण्यात नरुभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं मात्र त्यांनी कधीही केलं नाही. गेली २५ वर्षं चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चं काम लावून धरलं. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गंमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ. श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावं या हेतुने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ जमा करायचं ठरलं. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी ‘लग्नाच्या बेडीचा’ दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करत होते. दौर्यात या सर्वांची सोय करणं हे सोपं काम नव्हतं. नरुभाऊच ते काम करू जाणोत. नरुभाऊंनी हा ‘साकृनि’ आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरुभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षं समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोन-तीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रित केलेली होती आणि ती कामं चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर (मुद्रा) अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केलं. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. नरुभाऊंचं टायमिंग फार अचूक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली. परवा लातूरलाही ‘जातीला मूठमाती द्या’ ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचं गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असं माझं मत होतं, आहे. नरुभाऊ म्हणाले, ‘हे करण्याएवढे आपण शक्तिशाली नाही. ते करायचं तर ‘पर्यायी राजकारण’ करावं लागणार. आजतरी तसं करणं मला परवडणारं नाही.’
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.
सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावलं होतं. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपं नाहीत, चोर्या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी ‘चला चोर्या करायला, चला शिंगणापुरला’ अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आलं. आम्ही चिडलो. ‘त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं?’ यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला. चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भूमिका न घेण्याचं आणि त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचं कौशल्य त्यांना साधलेलं होतं.
व्यक्तिची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
By हरी नरके on August 25, 2013
No comments:
Post a Comment